|
न. १ अस्थि ; हाडूक . २ ( ल . ) मूळ जात ; उत्पत्ति . त्या मनुष्याचें हाड खरें . ३ अंगकाठी ; शरीररचना ; बांधा ( जनावर , माणूस इ० चा ). [ सं . हड्ड ; हिं . हड्डी ] म्ह० - १ हाड तितकें शेंपूट जाड तोंड पाहून जेवण वाढ . २ ( गो . ) हाडली पड खाल्ली पड - हातावरचें पोट हाडचा - वि . १ मूळचा ; जातीचा ; वर्णाचा . हा हाडचा ब्राह्मण . २ स्वभावाचा . हाडचा गरीब आहे . एका हाडाचा , एका हाडामासाचा - वि . एकाच जातीचा , कुळाचा . हाडाचा खंबीर , हाडाचा कणखर , हाडाचा कठीण , हाडाचा बळकट , हाडाचा खबरदार - वि . कणखर प्रकृतीचा - शरीराचा - बांध्याचा शरीरानें मजबूत . हाडाचा खरा , हाडाचा चांगला , हाडाचा भला - अस्सल ; जातीवंत ; टिकाऊ ( मनुष्य , वस्तु ). हा रुपया वरून वाईट दिसतो पण हाडाचा खरा आहे . हाडांचा चुना , हाडांचा चुरा , हाडांचा चूर , हाडांचीं काडें , हाडांचे पाणी , हाडांचे मणी , हाडांच्या फुंकण्या , हाडांच्या फुंकण्या करणें , हाडांच्या फुंकण्या होणें - शरीर झिजविणें ; फार परिश्रम करणें . शरीर खराब होणें ; रोडावणें ; झिजणें . हाडांला खिळणें , हाडीं खिळणें - १ सर्व अंगांत मुरणें , शिरणें ; दृढमूल होणें ( भावना , रोग , गुण , दुर्गुण ). हाडाला लागणें , हाडीं लागणें - १ ( जिव्हारीं लागणें ; वर्मी लागणें . २ त्रासदायकपणें चिकटणें . ३ ( मूल , कर्ज , धंदा इ० बद्दल ). फार काळजी लागणें ; अभ्यास - चिंता - शोध इ० चा विषय होणें . हाडाला , हाडीं , फासण्या घालणें , मारणें - जिव्हारी टोचून बोलणें ; एखाद्यास लागेल असें बोलणें . हाडांवर घाव घालणें , हाडीं घाव घालणें - १ वर्म मर्मच्छेद करणें . २ कडक रीतीनें , कठोरपणें वागविणें . हाडावर चोट असणें - ( वना . ) तोशीस लागणें . हाडांशीं लग्न लावणें - म्हातार्याशीं किंवा अत्यंत रोडक्या माणसाशीं मुलीचें लग्न लावणें . हाडीं विसावणें - हाडीं शिरणें व तेथे थांबणें ( जबर शत्रूचें शत्रुत्व , स्वतःच्या दुष्कृत्याचा पश्चात्ताप , असाध्य रोग ). हाडीं शुध्द - जातीनें , मनानें शुध्द , चांगला . हाडें उजविणें , हाडें भाजणें , हाडें शेकणें - कसें तरी लग्न करणें ; लग्न होणें . ( अविवाहित , ब्रह्मचारी मृत झाला असतां त्या प्रेताचा समावर्तन व विवाह संस्कार करून मग दहन करतात . हा प्रेतसंस्कार कसा तरी उरकून घ्यावा लागतो यावरून ल . ) हाडें घुसळणें - १ अतिशय काम करणें . २ सतावणें ; गांजणें ; जर्जर होणें . हाडें मोडणें , हाडें पडणें - हाडें दिसणें ; फार अशक्त , रोड होणें . हाडें मोडणें , हाडें घुसळणें , हाडें खिळखिळीं करणें - अतिशय गांजणें ; निष्ठुरपणानें छळणें ; त्रास देणें . सामाशब्द - ०कपाळया वि ( हाडाच्या कपाळाचा - कपाळावर नशीब लिहिलें असतें म्हणून ) दूर्दैवी ; कमनशिबी ; कपाळकरंटा . हाडकपाळी - वि . हेकड ; शिरजोर ; सैरट ; बेपर्वा ; उपदेश ; ताकीद इ० स न जुमानणारा . हाडकी - स्त्री . १ लहान हाड . २ मेलेल्या जनावरांची हाडें इ० ठेवण्यासाठीं महारांना दिलेली जमीन . हडकी पहा . हाडकुरकुटी - स्त्री . हाडीज्वर . हाडकुळा , हाडकुळी , हाडकुळें - वि . हाडें निघालेला ; अशक्त ; रोड . हाडकेंकाडकें - नअव . १ शेतीचीं जनावरें व आउतें . २ झिजलेलें व हाडहाड उरलेलें शरीर ( क्रि० होणें ; रहाणें ; उरणें ). हाडखाईर - न . हाडवैर . म्हणोनि समर्थेसीं वैरा । जया पडिलें हाडखाईरा । - ज्ञा १३ . ५५ ०हाडखाऊ वि. ( तिरस्कारार्थी ) मांसभक्षक ( शूद्र - यवनादिक जाती ) हाडगळ - वि . रोडका ; हाडें वर निघालेला ; कृश . [ हाड + गळणें ] हाडगात - न . शरीरयष्टि , बांधा . हा पोटानें दुबळा झाला आहे पण हाडगात मोठें आहे . [ हाड + गात्र ] हाडजर , हाडीं ज्वर - पु . हाडांत मुरलेला ताप . हाडति , हडौति - स्त्री . गळयाखालच्या अर्धचंद्राकार हाडावरील खळगा . मुख मळिण वदन उभा हाडतिये घोणें । - तुगा १२२ . हाडपरब - पु . ( व . ) पितृपक्ष . हाडपेर - न . अंगकाठी . हाडगत पहा . हाडबोड - पु . ( गो . ) मासळीचा डोकें इ० भाग . हाडभाऊपणा - पु . भाऊबंदकी . वडीलकीचे अथवा हाडभाऊपणा सिध्द करणारे महजर सांपडतात . - अडिवर्याची महालक्ष्मी ६ . हाडमोडी - स्त्री . एक बांडगुळासारखी वेल . हिला पानें नसून शेराप्रमाणें कांडया असतात . हाडवळा - पु . हाडोळा पहा . हाडवैर - न . अत्यंत तीव्र व फार जुनें वैर . हाडशिंगारी , सांधण - स्त्री . एक बेल . हाडसंद , हाडसंधी - स्त्री . ( बे . ) हाडशिंगरी पहा . त्रिधारी कांडवेल . ही ठेचून ३ दिवस मोडलेल्या हाडावर बांधल्यास तें बरें होतें . हाडहाड , हाडोहाड - क्रिवि . प्रत्येक हाडांत . हाडळ - वि . हाडकुळा पहा . हाडांचा पंजर , हाडांचा सांपळा - पु . हाडांचा सांगाडा . हाडी जखम - स्त्री . जबर दुखापत . हाडींज्वर , हाडींताप - पु . हाडज्वर पहा . हाडूक - न . लहान हाड . गळयाशीं हाडूक बांधणें , दाराशीं हाडूक बांधणें - १ एखादी बाई ठेवून घेणें , रखेली राखणें . २ त्रासदायक काम अंगावर ओढून घेणें . हाडूक दाराशीं रोवणें , हाडूक दाराशीं लावणें , हाडूक दाराशीं पुरणें , हाडूक दाराला रोवणें , हाडूक दाराला लावणें , हाडूक दाराला पुरणें - जातीबहिष्कृत करणें . हाडेंकाडें - नअव . हाडांचा सांपळा ; कृश शरीर . ( क्रि० होणें ; रहाणें ; उरणें - शरिराचें ). हाडोहाड - क्रिवि . हाडहाड पहा . हाडोळा , हाडोळी - पुस्त्री . १ महाराला दिलेली जमीन . हडोळी पहा . २ असल्या जमीनीचें उत्पन्न . हाडया - पु . १ ( खा . व . ) कावळा . जाय उडून रे हाडया । नको करूं काव काव । - कोलते . २ ( खा . ) गाडी जमीनीवर टेकण्याचें जुंवाखालील लांकूड , खुंटा . - वि . १ हाडकुळा . २ फार हट्टी ; हेकड . हाडा रजपूत - पु . फार हेंकट माणूस . ( रजपुतांच्या स्वभावावरून पुढील म्हण आहेच ). कुवा ( विहिर ) टळे पण रजपूत ना टळें . हाडयावर्ण , हाडयाव्रण - पु . हडयावर्ण पहा . हाडांत खोल गेलेला व्रण .
|