|
घायपात गण, ऍगॅव्हेलीस हचिन्सन यांनी बनविलेला एकदलिकित फुलझाडांचा एक गण. याचा प्रसार उष्ण व उपोष्ण खंडातील शुष्क प्रदेशात व ऑस्ट्रेलियात आहे. प्रमुख लक्षणे - वृक्षासारख्या व अनेक वर्षे जगणाऱ्या वनस्पती, काष्ठमय खोडावर किंवा जमिनीवर वाढणाऱ्या खोडाच्या टोकास जाड, मांसल, सूत्रल, कधी कधी काटेरी असलेल्या पानांचा झुबका, फुले लहान, सच्छद, अनेक शाखायुक्त परिमंजिरीवर येतात, ती बहुधा अरसमात्र, द्विलिंगी, किंवा एकलिंगी व दोन स्वतंत्र झाडावर येतात, परिदले शुष्क किंवा मांसल, केसरदले सहा व परागकोशात दोन कप्पे, ऊर्ध्वस्थ किंवा अधःस्थ किंजपुटात तीन किंवा एक कप्पा व त्यात अक्षावर किंवा मध्यावर बीजके, बोंडे किंवा मृदुफळ, बीजे सपुष्क, या गणात फक्त एकच कुल (घायपात कुल) घातले आहे.
|