|
न. तीळ , खोबरे , भुईमूग , चंदन इ० पासून पेटण्याजोगा निघणारा एक स्निग्ध व द्रवरुप पदार्थ ; पदार्थातील स्निग्ध अंश . [ सं . ] तैल ; प्रा . तेल्ल ; आर्मेनियन तेल ] ( वाप्र . ) ०काढणे न. १ पिळून , शोषून घेऊन एखाद्या पदार्थाचा रस , सत्त्व काढणे . २ ( ल . ) खरपूस चोप देणे ; कुटणे . ०घेणे ( स्त्रीविषयी हा वाक्प्रचार योजीत असतात ) आपल्या स्वतःला देवाकडे लावणे ; एखाद्या देवाच्या उपयोगाकरितां कसबीण बनणे ; गरतपणा सोडून भावीण होणे . दिव्यांतील थोडेसे तेल डोक्यावर घालण्याने ती आपला उद्देश जाहीर करते . म्हणून लग्न झालेली स्त्री तेल खरेदी करणे ह्या अर्थी तेल घेणे असे म्हणत तेल ठेवणे असे म्हणते व तिला तेल खरेदी करण्यास सांगावयाचे असल्यास तेल घे म्हणून न सांगता तेल ठेव असे सांगण्याचा रिवाज आहे . ह्या अर्थी तेल जिरविणे असेहि म्हणत असतात . जसे - तिने येउनिया स्वकरी । तेल जिरविले आपले शरी । ०चढविणे उतरविणे ( बायकी ) उष्ट्या हळदीचे वेळी वधूपक्षाकडून वरपक्षाकडे आलेले तेल परटिणीकडून ( किंवा ज्याच्या त्याच्या चालीप्रमाणे एखाद्या स्त्रीकडून ) वराच्या पावलास , अंगास व डोक्यास आंब्याच्या पानाने तीन वेळा लावणे . आणि तोच अनुक्रम तीन वेळ उलटा करणे :- म्हणजे तेल उतरविणे . ( पाठीला ) तेल लावून ठेवणे मार खाण्याची तयारी करुन ठेवणे . ०लागणे ( अंगास तेल लावलेला ( अभ्यंग ) कोणत्याहि कामाला उपयोगी पडत नाही यावरुन ) महाग , दुर्मिळ , अप्राप्त होणे , असणे ( मनुष्य , वस्तु इ० ). ०घालणे ( एखाद्या कामांत त्या ) कामाची खराबी होईल अशी कांही तरी वस्तु अथवा भीड मध्ये घालणे . म्ह ० १ तेल जळे पीडा टळे . २ तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले = दोन फायद्याच्या गोष्टी असतां मूर्खपणामुळे हातच्या दोन्ही जाऊं देऊन मनुष्य पुनः कोराकरकरीत राहणे अशा अर्थी योजितात . सामाशब्द - ०कट कटी , तेलगट वि . ओशट ; स्निग्ध ; तेलाने युक्त , लिप्त . २ ज्यांत तेल आहे असा ( तीळ , खोबरे , इ० पदार्थ ). [ तेल ] ०कटणे गटणे - अक्रि . तेलाने भरणे ; माखणे ; भिजणे ( वस्त्र , शरीरावय इ० ). ०कट - पु . तुळतुळीतपणा ; तेलाची चमक . तजेला - पु . तुळतुळीतपणा ; तेलाची चमक . ०कटाण स्त्री. तेलकट घाण - वास . ०कटी स्त्री. १ तेलाचा चिकट मळ , वळकट्या . २ ओशटपणा . - वि . तेलकट पहा . ०कार पु. ( गो . ) तेली ; तेल काढणारा . ०खिस्का पु. ( माण . ) खेड्यांतील मानकर्याच्या सुवासिनीला लग्नाचे आमंत्रण देण्याकरितां हळदकुंकू , तेल देतात ते . तेलगंड पु . तेल्याला तिरस्काराने संबोधतात ( न्हावगंड शब्दाप्रमाणे ). [ तेली + गंड प्रत्यय ] तेलगाटी तेलखा पहा . - गांगा ३३ . ०घडी स्त्री. जखमेवर घालण्याकरितां तयार केलेली , तेलांत बुडवून केलेली कापसाची घडी . ०घाणा पु. १ तेलाची घाणी ; तेल काढण्याचे यंत्र . २ ( शूद्रादि जातीत ) गणपतिपूजनापासून लग्न लागेपर्यंत ब्राह्मणाने करावयाचे धार्मिककृत्य . तेलची स्त्री . १ तेलांत , तुपांत तळलेली गोड पुरी ; पुरणाची पोळी . तेलच्या आणि फेण्या गुरोळ्या जाण । - अफला ५७ . २ कणकेत तेलमिठाचे मोहन घालून त्याचीए तळलेली पुरी . - गृशि १ . ३९५ . ०तवा पु. तळण्याचा तवा ; हा पितळीप्रमाणे असतो . ०तावन स्त्री. ( ना . ) कढई . ०तिमण न. तिमण पहा . ०तूप - ( बायकी ) लग्न झाल्यावर पहिली पांच वर्षे संक्रांतीच्या दिवशी तेल , तूप , तिळगूळ , हळदकुंकू , विडा इ० जिन्नस घेऊन पांच घरी नवर्यामुलीने नेऊन देण्याची क्रिया . घालणे - ( बायकी ) लग्न झाल्यावर पहिली पांच वर्षे संक्रांतीच्या दिवशी तेल , तूप , तिळगूळ , हळदकुंकू , विडा इ० जिन्नस घेऊन पांच घरी नवर्यामुलीने नेऊन देण्याची क्रिया . ०तूप - ( गो . ) तेल गेले तूप गेले हाती निरांजन आले या म्हणीप्रमाणे वाक्प्रचार . निरांजन - ( गो . ) तेल गेले तूप गेले हाती निरांजन आले या म्हणीप्रमाणे वाक्प्रचार . ०दिवाळी स्त्री. दिवाळीकरितां पाटलाने तेली लोकांवर बसविलेली तेलाची पट्टी , वर्गणी . ०धार स्त्री. पाटलाला वगैरे देण्याकरिता गांवच्या तेल्यावर बसविलेली तेलाची पट्टी . ०पक वि. तैलपक्व ; तेलांत शिजविलेले , तळलेले . ०पाषाण न. ( गो . ) काळे तुळतुळीत दगड . ०फळ साडी नस्त्री . ( बायकी ) लग्नापूर्वी वराकडून वधूला दिली जाणारी देणगी . लग्न लागण्याचे पूर्वी नवर्याकडून नवरीकडे पाठविलेले तेल , साडी , खोबर्याच्या वाट्या , नारळ , हळदकुंकू ; फराळाचे सामान , करंज्यालाडू इ० सामान ; लग्नापूर्वीचा आपुलकीचे व कौतुकाचे चिन्ह दाखविण्याचा हा पहिला प्रकार आहे . ०बोळ पु. बाळंतिणीसाठी लागणार्या आवश्यक वस्तू . म्ह ० पोराचे पोर गेले आणि तेलबोळाचे मागणे आले . ०मीठ न. किरकोळ वस्तु , पदार्थ ; तेलमिठाखाली - वारी इ० प्रकाराने कारक विभक्तीमध्ये हा शब्द योजितात व ह्याचा अर्थ हिंगतूप अथवा हिंगधूप ह्यासारखा होतो . ०येवप ( गो . ) ( तेल येणे ) नवरानवरीकडील एकमेकांकडे तेलहळद येणे . ०रतीब पु. प्रत्येक चालू असलेल्या तेलघाण्याच्या मालकाने द्यावयाचा रोजचा तेलाचा रतीब ; कर . ०रवा गोष्टी पुस्त्री . कढत तेलांतून वस्तु काढताना जर हात भाजला नाही तर काढणारी व्यक्ति निर्दोष आहे असे समजतात . दिव्य पहा . - गांगा ३३ . - गुजा १३ . ०रांधा पु. ( माण . ) देवतेचा स्थापनाविधी व त्यानंतर देवतेस करावयाचा भात , पोळ्या , तेलच्या इ० पदार्थांचा नैवेद्य . गोट्यांना तेल शेंदूर लावून त्याच दिवशी रात्री तेलरांधा करतात . - मसाप ४ . ४ . २५८ . ०वण न. १ तेलफळ पहा . लग्नापूर्वीचा सोहाळा . जाहले तेलवण मुहूर्त । अलंकार वाहिले समस्त । - कथा ४ . ८ . ५५ . २ ( आगरी ) विवाहसमारंभात सुपांत दिवे लावून नवरी अगर नवरा यांस ओवाळण्याचा विधि . - बदलापूर ३९ . ३ दैवज्ञ ब्राह्मणांत विवाहसमारंभात विड्याच्या पानाला भोंक पाडून ते डोक्यावर धरुन त्यांतून मुलीवर तेल पाडण्याचा विधि . - बदलापूर २३६ . तेलवण काढणे , घालणे ( ल . ) चांगला मार देणे ; कुटणे . ०वरी स्त्री. तेलची पहा . घार्या पुर्या तेलवर्या विदग्धा । - सारुह ६ . ७८ . ०वात स्त्री. दिव्यांत तेल घालणे , वाती करणे , दिवे पुसणे इ० दिवे लावण्याच्या पूर्वीची तयारी . ०वात - दिवाबत्ती करणे . २ दिव्यांमध्ये तेल व वाती घालणे ; दिवे पुसणे . करणे - दिवाबत्ती करणे . २ दिव्यांमध्ये तेल व वाती घालणे ; दिवे पुसणे . ०वात - ( बायकी ) ( दर शनिवारी मारुतीस ) तेल व वात तेथे असलेल्या दिव्यांत नेऊन घालणे व दिवा लावणे . घालणे - ( बायकी ) ( दर शनिवारी मारुतीस ) तेल व वात तेथे असलेल्या दिव्यांत नेऊन घालणे व दिवा लावणे . ०शिपा पु. ( नाविक ) मोठमोठ्या माशांपासून काढलेले एक साधारण तेल व वात तेथे असलेल्या दिव्यांत नेऊन घालणे व दिवा लावणे . नावेच्या बाहेरल्या अंगाला लावण्यास याचा उपयोग करितात . जमाबंदीच्या हिशोबांत या शब्दाबद्दल नुस्ता शिपा येवढाच शब्द आहे . ०शुभ्रात स्त्री. एखाद्या प्रसिद्ध देवळांत नंदादीप लावण्यासाठी आसपासच्या खेड्यापाड्यांवर सरकारी पट्टी बसवून जमविलेले तेल . [ तेल + शुभ + रात्र ] ०ष्टाण साण स्त्री . तेलाची घाण . तेलस सर वि . १ तेलकट . २ तेलट ; ज्यांत तेल जास्त आहे असा . ०साडी तेलफळ पहा . मग सावित्रीशी तेलसाडी नेसविती । - वसा ४६ . तेलाचा टिकला , तेलाची धार थोडकेसे तेल . तेलाडे पुअव . ( नवीन बनावट शब्द ) जमीनीत तलाचे झरे पाहणारे ; तेलपारखी . उत्तम वाकबगार पानाडे विहिरीस पाणी कोठे लागेल हे सांगण्यात पटाईत असतात तसेच इकडे तेलाडेहि असतात . - सासं २ . १३२ . [ तेल ] तेलिया पु . एक काळा रंग ; तेलासारखा तुळतुळीत रंग . [ तेल ; हिं . ] ०कुमाईत पु. घोड्याचा एक रंग . यांत केस लाल कमी व काळे जास्त असावे , पाय गुडघ्यापर्यंत काळे व कपाळावर पांढरा ठिपका असावा . ०पंचकल्याण वि. चारी पाय पांढरे असणारा तेलिया कुमाईत ( घोडा ). - अश्वप १ . २९ . तेली पु . तिळाचे वगैरे तेल काढून त्याच्यावर उपजीविका करणारी एक जात ; तिच्यातील एक व्यक्ति ; तेल काढणारा व विकणारा . [ तेल ] म्ह ० तेल्याचा बैल सदां आंधळा .
|