|
पु. पोटांत होणारा एक रोग . - मनको पु. १ दहा शेरी वजन केलेल्या मालाचे परिमाण . २ तराजूच्या एका पारड्यांत ( ज्यांत पदार्थ घ्यावयाचा ते ) भांडे इ० ठेवून कांटा समतोल करण्याकरितां दुसर्या पारड्यांत टाकलेली वजने इ० अभंड ; पासंग . तराजुआ निवृत्तिचा । धडा बांधौनि तीर्थांचा । करि कांटा कलताए दैवाचा । जेउता राजमठु । - ऋ ३९ . तुळे उभवूनि धडा । कनक भरितां पारडा । - मुवन ( हरिश्चंद्राख्यान नवनीत पृ . १९० ). ३ मण , दोनमण इ० सारखे एकदांच वजन करावयाचे असल्यास व त्या परिमाणाची वजने जवळ नसल्यास लहान परिमाणाच्या वजनाने तितक्याच वजनाचे दगड इ० मोजून घेऊन त्यांनी बांधतात ते मोठे वजन . ४ ( व . ) सपाटा ; तडाखा . तुपाचा धडाच लावला . ५ ( पेंढारी इ० लुटारुंची ) टोळी . ६ समायिक जमीनीचा , मालमत्तेचा वांटा हिस्सा , भाग . ७ ( जरतार धंदा ) पंचवीस ते ३० तोळे वजनाचा तांब्याचा रुळ घेऊन त्यावर जरतार गुंडाळतात व त्या तांब्याच्या रुळासह त्याचे केलेले वजन [ सं . धट = ताजवा ; हिं . धडा = वजन , जोख , जथा , टोळी ; गु . धडो = वजन ; सि . धडो ] पुस्त्री . ( कु . ) घराचे जोते इ० कांची कड . पु. ( महानु ) घडा ; घागर . तो कैसा दिसताए कांतळा । जैसा अमृतरसाचा ॐतिला । की श्रेष्ठेने धडा घातला । रवांतासी । - शिशु ९९४ . पु. ( भाजीपाला इ० कांची ) पेढी . पु. १ ( तंजा . ) तोफ . २ तोफेचा बार . धडेबाजी - स्त्री . १ तोफेचा भडिमार . २ ( ल . ) शिव्यांचा भडिमार , वर्षाव . [ धडा ] पु. ( राजा . ) किनार्यावर गलबत . पडाव , ठेवण्याची आच्छादित जागा , ठिकाण . गलबत भाड्याने न देतां धड्यावर ओढून ठेवले आहे . पु. १ विवक्षित मुदतीत तयार करण्यास पंतोजीने शिष्याला नेमून दिलेला , पाटी इ० कांवर लिहून दिलेला पाठ . २ ( पुस्तक इ० कांतील ) पाठ . तिसर्या पुस्तकांतील शेवटला धडा वजनाविषयी आहे . ३ ( ल . ) ( एखाद्यास ) वर्तनाच्या बाबतीत घालून दिलेला नियम ; शिस्त ; उदाहरण ; ( काम इ० करण्याकरिता घालून दिलेली ) पद्धत ; सरणी वहिवाट ; रिवाज . कासया पडिला जी धडा । उगाचि वेडा आणि वांकडा । - तुगा ७१६ . यजमान धडा घालून देतो त्याप्रमाणे गुमास्ते वागतात . ४ हिय्या ; हिंमत ; धाडस ; निश्चय . आतां मनाचा धडा करुन करंजा खातो . - कफा २ . ५ ( एखादी वस्तु मिळाल्याने ) विवक्षित कालपर्यंत ती मिळविण्याविषयी होणारी निश्चिंतता . एक पितांबर घेऊन ठेविला म्हणजे बारा वर्षांचा धडा होतो . [ सं . दृढ ? ] ०घेणे शिकणे ; बोध घेणे .
|