|
पुस्त्री . १ पुरुषाचे रेत ; वीर्य ; धात . २ सोने , रुपे , तांबे ; लोखंड इ० जास्त विशिष्ट गुरुत्वयुक्त , अपारदर्शक व एक प्रकारच्या चकाकीने युक्त अशा खनिज पदार्थांपैकी प्रत्येक . ३ पैसा ; द्रव्य ; धन . कोणी धातूचा न करिती स्पर्श । - दावि ४०१ . तेव्हा कळेल की अमके महाल अमके धातु । - ऐपो २५३ . ४ शरीरांतील रक्त , मज्जा , वसा , मांस , अस्थि मेद व रेत या सात घटकांपैकी प्रत्येक . धातूंचे समुद्र उलंडी । मेदाचे पर्वत फोडी । आंतली मज्जा काढी अस्थिगज जे । - स्वानुदिन ९ . ४ . ७५ . ६ पृथ्वी , आप , तेज , वायु , आकाश इ० पंचमहाभूतांपैकी प्रत्येक . ७ पंचमहाभूतांच्या रुप , रस , गंध व तेज या गुणधर्मापैकी प्रत्येक . ८ मनशीळ , काव , पारा , गंधक , अभ्रक इ० सारखा पदार्थ . ९ ( महानु ) गेरु , काव . एके धातुचिआं उटी घेते । - दाव ७७ . १० ( तत्व . ) अहंकार . या अहंकारासच तैजस , अभिमान , भूतादि , धातु अशी दुसरी नावे आहेत . - गीर १७२ . ११ ( संगीत . ) चिजेचे निरनिराळे भाग . अवयव ५ अर्थी पहा . [ सं . ] ( वाप्र . ) पु. १ क्रियापदाचे मूळरुप ; ज्याला प्रत्यय लावून क्रियापद बनवितां येते तो शब्द . जसेः - कृ , वद , करणे ; बोलणे , चालणे इ० २ शब्दाचे मूळ ; ज्याचे पुढे पृथक्करण करतां येत नाही असा शब्दांतील मूळ अवयव . इं . रॅडिकल , रुट . किताब शब्दांत क त ब हा धातु . [ सं . ] ०फुटणे १ कांही रोगामुळे मूत्रविसर्जनादि प्रसंगी आपोआप गळण्याइतके वीर्य पातळ होणे . २ वयांत येणे . सामाशब्द - ०नाम न. क्रियवाचक नाम [ धातु + नाम ] ०पाठ पु. धातूंची यादी , कोष्टक . [ धातु + रुप ] ०कर्मविद्या स्त्री. धातूंचे शोधन करण्याची विद्या ; शास्त्र ( इं . ) मेटॅलर्जी . [ धातु + कर्म + विद्या ] ०साधित न. धातुवरुन साधलेला , बनलेला ( शब्द इ० ). उदा . कृत , कृत्वा . यांत नाम , विशेषण व अव्यय असे भेद आहेत ; कृदन्त पहा . [ धातु + सं . साधित = बनविलेला , साधलेला ] ०काम न. धातू ओतून अगर हातोड्याने ठोकून त्याच्या निरनिराळ्या सुंदर वस्तू बनविण्याचे कारागिरीचे काम . [ धातु + काम ] ०क्रिया स्त्री. किमया . हातींचा परीस टाकोनियां । साधूं जावे धातुक्रिया । सगुण मूर्ति सांडोनियां । निर्गुण वायां कां कथिसी । - ह २१ . २२० [ धातु + क्रिया ] ०जन्यपदार्थ पु. ( रसा . ) धातूपासून बनलेला संमिश्र रासायनिक पदार्थ ; ( इं . ) मेटॅलिक कॉम्पाउंड . - सेपू २ . १०० . [ धातु + सं . जन्य = उत्पन्नहोणारा + पदार्थ ] ०पात पु. वीर्यस्खलन ; रेत गळणे . [ सं . धातु + सं . पात = पडणे ] ०पुष्ट ०पोषण वि. धातु पुष्ट करणारे , बलवर्धक , पौष्टिक ( खाद्य , औषध ). [ धातु + सं . पुष्ट = वाढलेले ; सं . पोषण = वाढणे , पोसणे ] ०पोषण न. १ ( शरीरांतील ) सप्त धातुंचे पोषण , वर्धन ; बलवर्धन . २ ( ल . ) खुशामत ; तोडपुजेपणा ; टाळाटाळ , बकवा , गोड गोड भाषण इ० करुन खोटा उत्साह उत्पन्न करणे , धीर देणे . लोभ भय दम्भ मानार्थ । धातुपोषण बोलती बहुत । - मुसभा ५ . १२४ . धातुपोषणार्थ समाधान केले . - जोरा १७ . - वि . बलवर्धक ; पौष्टिक . [ सं . धातु + पोषण ] पोषणाचे बोलणे पोषणाच्या गोष्टी ; ०पोषण बोलणे गोष्ट भाषण थापेबाजी ; खुशामत , आर्जव इ० युक्त बोलणे ; गूळखोबरे ; गुळगुळथापडी . ०मय वि. सोने , चांदी , तांबे इ० सारख्या धातूंचे बनविलेले . [ धातु + सं . मय प्रत्यय ] ०माक्षिक न. लोखंड व गंधक यांच्या संयोगापासून बनलेले एक खनिज द्रव्य . [ धातु + माक्षिक ] ०मेह पु. १ मुत्रवाटे धातु , वीर्य गळण्याचा मूत्ररोग . २ वीर्यमिश्रीत मूत्र . [ सं . धातु = वीर्य + सं . मेह = मूत्र , मूत्ररोग ] ०योग पु. रसायन . येक औषधी प्रयोग । येक देती धातुयोग । - दावि ६४ . [ धातु + सं . योग = जुळणे , जोडणे ] ०राशी पु. अस्थि , रक्त , मांस वगैरे सप्त धातूंचा समुदाय ; ( ल . ) शोषोनि गा धातुराशी । करिती तपे । - ज्ञा १७ . ३६४ . [ सं . धातु + राशी = समुदाय ] ०रुप वि. ( रसा . ) ज्यांस धातूचे स्वरुप आहे ( असे मूल द्रव्य ). सोयीकरितां एकाकी पदार्थाचे धातूरुप व अधातुरुप असे दोन वर्ग करितात . - रसापू ६ . [ सं . धातु + रुप ] = वि. ( रसा . ) ज्यांस धातूचे स्वरुप आहे ( असे मूल द्रव्य ). सोयीकरितां एकाकी पदार्थाचे धातूरुप व अधातुरुप असे दोन वर्ग करितात . - रसापू ६ . [ सं . धातु + रुप ] ०वाद धनुर्वाद - पु . १ किमया ; सुवर्णविद्या ; सोने करण्याची विद्या . नातरी जे धातुवादाही न जोडे । ते लोहींचि पंधरे सांपडे । - ज्ञा ६ . ३४ . अतर्क्य नेत्रांतरे नेणे । कां धातूवादे सर्वस्व घेणे । - एभा २३ . २०७ . २ अशोधित धातु शुद्ध करणे . - ज्ञाको क १५३ . ३ रसायनशास्त्र . [ धातु + वाद ] ०वादी धातुर्वादी - वि . १ किमया करणारा . जो सोधोनि भवपारदु । अनादि रससिद्धु । तो लाधला शब्दवेधु । जेणे धातुर्वादिये । - ऋ ५ . टिपरे धातुर्वादी खोटे । - दावि ४७४ . २ रसायनशास्त्रज्ञ ; खनिजपदार्थाचे , रसयनांचे ज्ञान असणारा . [ धातुवाद ] ०विकार क्षय पु . धातुक्षीणतेचा , क्षयरोगाचा एक प्रकार . [ सं . धातु + सं . विकार = रोग ; क्षय = क्षीण होणे ] ०विद्या स्त्री. ( रसा . ) अशुद्ध धातूपासून शुद्ध धातु काढण्याची विद्या . [ धातु + विद्या ] ०शलाका स्त्री. धातुची सळई , कांब . [ म . धातु + सं . शलाका = सळई ] ०साम्य न. कफवातादि शरीरांतील धातूंची समता , योग्य स्थिति . जागणे जरी जाहले तरी व्हावे ते मितले । इतुकेनि धातु साम्य संचले ।असेल सुखे । - ज्ञा ६ . ३५१ . [ सं . धातु + सं . साम्य = सारखेपणा ] ०स्खलन न. रेतस्खलन ; वीर्यपात . [ सं . धातु + सं . स्खलन = गळणे ] ०स्तंभक वि. वीर्याचे स्तंभन करणारे ( औषध इ० ). [ सं . धातु + सं . स्तंभक = थांबविणारे ] ०स्पर्श पु. तांबे , पितळ , सोने , रुपे इ० धातूंचा स्पर्श . ( ल . ) ( अकरणरुपी प्रयोग केल्यास ) १ अठरा विश्वे दारिद्र्य . याच्या घरांत धातुस्पर्श नाही . २ ( अकरणरुपी प्रयोगांत ) दागदागिने मुळीच नसणे . त्या बायकोच्या अंगास धातुस्पर्श म्हटला तर नाहीच . [ धातु + स्पर्श ] ०क्षय पु. धातुविकार पहा .
|