|
न. १ जंगल ; वन ; विशेषतः जगलांतील खुजा , ठेंगण्या झाडाझुडपांचा समुदाय . २ तळवट ; माळ ; रुक्ष प्रदेश ; नापीक व निर्जन प्रदेश . ३ मनुष्यास उपभोग्य असा भाजी - पाला इ० कांहून भिन्न असें तण , गवत , उपद्रवी - निरुपयोगी वनस्पती इ० . भाजीचे वाफ्यांत कोठें कोठें रान रुजलें आहे तें उपटून टाक . ४ शेतांत उगवणारें गवत ; तन . ५ शेत . ६ झाडी ; राई ; बन ; वृक्षवाटिका . बंदर किनार्यास सारें नारळीचें रान . ७ देश ; प्रदेश ; भाग . मारवाडदेश म्हणजे उंटाचें रान . त्या रानचे मनुष्यास हें रान मानत नाहीं . ८ विदेश ; परका मुलुख . परस्परें या रानांतील उमराव व रजवाडे यांस पत्रें देऊन तुमची कुमक करवितों . - भाब १३ . ९ ( ल . ) फार मोठी वाढलेली हजामत . प्रदेश ह्या सामान्य अर्थी रान शब्दापूर्वी विशेषणात्मक शब्द जोडल्यानें त्याचा विशेष अर्थ होतो ; उदा० डोंगररान ; खडकरान ; धोंडेरान किंवा गोटेरान ; बनजररान गवतरान ; माळरान इ० तसेंच काळें रान , पांढरें रान , चिक्कणरान काळया - पांढर्या - चिक्कण मातीचा प्रदेश . नवें रान = पूर्वी जंगल किंवा माळ असून नुकतीच लागवडीस आणलेली जमीन [ सं . अरण्य ; प्रा . रण्ण ] म्ह० ( गो . ) रान झालें लागीं घरां जाली पैस = म्हातारपण प्राप्त होणें , मरण जवळ येणें या अर्थी . ( वाप्र . ) न. ( जंबिया ) चड्डीच्या काढणीजवळील मांडीवरचा पुढील भाग ; बाँकमधील एक डाव . आपल्या हातांतील जंबियानें जोडीदाराच्या उजव्या मांडीवर चड्डीच्या काढणीजवळ मारणें . [ फा . ] ०उठणें लोक खवळणें ; क्रुध्द होणें . म्युनिसिपल इमारतीवर संयुक्त निशाण लावण्याचा ठराव हुजूरपक्षानें फेटाळला त्यामुळें शहरांतील रान उठलें होतें . - के २२ . ७ . ३० . ०उठविणें जागविणें - पारधींकरितां धडधड आवाज करून सावजांना जागें करणें . झाडींतून पारध , सावज बाहेर हुसकणें . रान उठविल्याशिवाय , जागविल्याशिवाय शिकार कशी सापडेल ? ०काढणें १ जंगल - जमीन लागवडीस आणणें . २ झाडें झोडपून व ओरडून ओरडून शिकार उठवणें . ३ रानाचा , जंगलाचा शोध लावणें . ०खवळणें १ एखाद्यावर खवळणें ; उठणें ( रान , श्वापदें ). २ अतिशय क्षुब्ध होणें , ( राग , भूक , लोभ , काम इ० कानीं ). लवकर जेवायला वाढा , आज इकडे रान फार खवळलें आहे . ०घेणें १ रानांत पळून जाणें ( गुरांनीं ). २ ( ल . ) वेढंग मार्गाचा स्वीकार करणें ; बारगळणें . ३ रानांत शिरणें पहा . ०बदलणें सोडणें पारखें होणें - ( ल . ) आपलें मन किंवा उद्देश बदलणें ; एखाद्यासंबंधीचा आपला विचार फिरविणें ; आपला पूर्वीचा मुद्दा सोडून देणें . ०भारणें १ सर्व प्रदेशावर जादू पसरणें ; मंत्र टाकणें . तमाम गारोडी रान भारतो तसा प्रकार त्यानें केला . - भाब २४ . २ ( ल . ) यथास्थित पैसे चारणें . ०मानणें त्या देशावी हवा इ० प्रकृतीस मानवणें , पसंत पडणें . कोंकणच्या माणसास हें रान मानवत नाहीं . ०हांकणें ( शिकार उठविण्याकरितां ) झाडें झोडपणें व आरडाओरड करणें . रानांत , आडरानांत पडणें - एकटें सांपडणें ; उदास होणें . रानांत शिरणें - ( ल . ) ( संभाषणप्रसंगीं ) सरळ मार्ग सोडून अयोग्य गोष्टी सांगत बसणें ; विषयांतर करणें ; बहकणें . रानीं रिघणें - अरण्य सेविणें . ब्रह्मसुकाळु लाधला ते ही । जे रानीं रिगाले । - ऋ १६ . रिकाम्या रानीं - क्रिवि . बेफायदेशीर ; व्यर्थ ; निरर्थक ; फुकट ( बोलणें , चालणें ). आतां एथें काम नाहीं काज नाहीं . रिकाम्यारानीं कशाला बसावें , रहावें , फिरावें इ० . रान या शब्दापुढें पक्षी , पशु व वनस्पति यांचीं नांवें जोडून रानटी किंवा न माणसाळलेला , न लागवड केलेला या अर्थी बरेच समास होतात . जसें :- रानडुकर ; रानमसूर ; रानमाठ ; रानमूग इ० . तसेंच रानआंबा - केळी - कोंबडा - जेवण . या व यासारख्या दुसर्या अनेक सामासिक शब्दांत रान ह्याचा रानांत राहणारा किंवा होणारा असा अर्थ होतो ; कांहीं विशिष्ट सामाशब्द - ०आंबा पु. वृक्षविशेष . ०आलें न. रानांत होणारें आलें . ०आळू न. तेरें अळूं . हें पर्जन्यकाळीं उगवतें ; याचा रंग पांढरा , हें फार थंड आहे . याची भाजी चांगली होते . ०कट वि. खेडवळ ; गांवढळ ; रानावनांतील ( मनुष्य , पशु ). [ रान ] ०कंद पु. एक कंद . ०करी पु. रान्या ; गवत , लाकूडफांटा इ० आणण्याकरितां रानांत फिरणारा माणूस . ०काढया वि. शिकार करण्यासाठीं रान काढण्याकरिता लावलेला ( मनुष्य ); पारध्याकरितां सावज कचाटयांत आणणारा . ०कांदळ न. एक वन्य वृक्ष . ०कापशी स्त्री. रानांतील कापशीचें झाड ; देवकापशी , देवपळहीहून भिन्न व पळहेंशीं जुळणारी . हिचें बीं लहान व वाटोळें असून देवकापशीचें मोठें व लांबट असतें . ०कापूस पु. रानकापशीचा कापूस . ०कावळा पु. कावळयाच्या जातींतील जंगली पक्षी . ०केळ केळी - स्त्री . केळीची जंगली जात . हिच्या पानावर जेवतात . कांदा उकडून किंवा वाळवून त्याचें पीठ करून खातात ; कवदर व ही एकच . कवदर पहा . ०कोंबडा कोंबडी कोंबडें - पुस्त्रीन . जंगली कोंबडा . ०खरडा पु. जंगलखरडा पहा . ०गट वि. १ खेडवळ ; गांवढळ . २ वन्य ; लागवडीशिवाय उगवणारा . [ रान ] ०गांजा गांज्या - पु . एक औषधी मूळ ; सालवण . याचीं पानें बेलाप्रमाणें त्रिदळ असून यास निरनिराळया रंगाचीं फुलें येतात . याचें मूळ सर्व प्रकारचे तापावर गुणकारी आहे . ०गाय स्त्री. तार्तरी देशांतील गाय ; वनगाय . ०गोवरी स्त्री. जंगलांत सांपडणारें इतस्तत : पडलेलें शेण , शेणी . याच्या उलट शेण थापटून लावलेली गोवरी . ०घेवडा पु. एक वेल . ०घोळ स्त्री. घोळ नामक भाजीचा एक प्रकार . हिचें पान रंगानें तांबूस व चरबट असतें . ०चा पु. भील किंवा कातकरी . राजा पु. भील किंवा कातकरी . ०चिमणी स्त्री. १ चिमणीसारखा एक लहान पक्षी . २ जांभळीं व पांढरीं फुलें येणारें एक झाड . ०जाई स्त्री. उंच वाढणारें वेलासारखें झुडुप . ०जेवण न. वनभोजन ; रानांत किंवा झाडाखालीं केलेलें जेवण . रानट , रानकट , रानगट - वि . १ रानांत राहणारा ; रानटी ; अज्ञानी . होतां तापत्रयार्त त्वरित भववनीं रक्षितां रानटाचा । - केका १२२ . २ आडगांवीं राहणारा ; शहर , कचेरी , दरबार इ० ठिकाणीं न जाणारा ; अडाणी ( मनुष्य ). ३ जींतभात , गहूं इ० न येतां गवत फार उगवतें अशी जमीन . ०टाकळी स्त्री. टाकळीची एक जात . रानटी , रानठी - वि . १ रानासंबंधीं ; आपोआप उगवणारा . २ गांवढळ ; खेडवळ ; रीतभात नसलेला . [ रान ] ०टोणगा पु. जंगली टोणगा ; रेडा . ०टोळ पु. टोळाची एक जात . ०डुकर डुक्कर - पुन . भुइमूग , ऊंस , भात इ० पिकांचा फन्ना उडविणारें रानटी जनावर . ०तरवड पु. तरवडाची एक जात . ०तीळ पु. काळा तीळ पहा . ०तुळस स्त्री. एक वनस्पति ; वैजयंती ; ही तुळशीसारखीच असते . पानें मात्र मोठीं असतात . हिला मंजिर्या येतात . बीं काळें , किंचित् तांबूस व खसखशीएवढें असून पाण्यांत घातलें असतां फुगतें . हें तुकुमराई ( सबजाचें बीं ) प्रमाणें असतें . यासहि तुकुमराई म्हणतात . ०तूर स्त्री. एक लहान पिवळया फुलांचें झुडुप . ०तेरडा पु. तेरडयाची एक जंगली जात . ०दांडगा वि. आडदांड ; रानटी ; धिप्पाड ; राक्षसी काम करणारा . ०दांडगे पुअव . सर्व तर्हेचीं शस्त्रें घेऊन शत्रूचा किंवा खेडयांतील लोकांचा समुदाय . ०र्निबू न. राननिंबोणीचें फळ . निंबोणी , निंबूण - स्त्री . एक मोठें काटेरी झाड . ०निवडुंग पुन . जंगली निवडुंग . ०पासरा पु. दुकानदारीची झिंबड . ०पाळ वि. नापीक ; भुकिस्त ; बरड ; माळवजा ( भातजमीन ). ०पिंपळ पु. पारोसा पिंपळ ; एक झाड . ०बाजरी स्त्री. गवतासारखी वनस्पति . ०भरी क्रिवि . रानोमाळ . रानभरी झाले साधारण । - एभा २३ . ३१६ . ०भरीभरू वि. १ भयभीत ; घाबरलेला ; पलायमान ; परागंदा ( पशु , मनुष्य ). महा वारण जे उन्मत्त । दैत्यें सोडिले तयावरते । तयास प्रल्हाद सिंह दिसत । मग ते होत रानभरी । २ ( ल . ) चैनीकरितां इतस्तत : भटकण्याच्या हेतूनें ज्यानें आपली बायकापोरें सोडलीं आहेत असा . [ रान + भरणें ] ०भरू १ रस्ता चुकणें ; आडरस्त्यास जाणें . २ गोंधळणें ; घाबरणें ; घाबरें होणें . होणें १ रस्ता चुकणें ; आडरस्त्यास जाणें . २ गोंधळणें ; घाबरणें ; घाबरें होणें . ०भाजी स्त्री. १ लागवडीशिवाय उगवणारी भाजी . २ वनांत होणारी खाद्य वनस्पति . ०मटकी स्त्री. रानांत होणारी मटकी , मठ . ०मसूर स्त्री. एक जंगली झाड ; हीं झाडें महाबळेश्वरकडे पुष्कळ होतात ; ह्यांचें बीं मसुरासारखें असतें . ०मांजर पुन . जंगली मांजर ; मोठा व धाकटा असे याचे दोन भेद आहेत . ०माणूस न. १ एक प्रकारचा वानर . २ ( ल . ) रानटी ; खेडवळ माणूस . ०मूग पु. रानात होणार्या मुगाची जात . ०मोगरा पु. अरुंद पानाची जाई . ०म्हैस स्त्री. जंगली म्हैस . ०रावताण रावताणी - नस्त्री . रावताण पहा . ०वट स्त्री. मोठया रस्त्यापासून फुटलेली रानास जावयाची वाट पुढच्या आंब्याजवळ वाट उजवी फुटली आहे ती रानवट आहे . - वि . १ जंगली ; लागवड न केलेली व साफ न केलेली ( जमीन ). २ खेडवळ ; गांवढळ ; रानटी ( मनुष्य ). ३ वन्य आपोआप उगवणारा ( वृक्ष , वनस्पती ). ०वत न. ( राजा . ) वन्य वृक्षाचें पान ; ज्यांचीं पानें सामान्यत : भोजनाकरितां , पुडयाकरितां उपयोगी पडत नाहींत अशा झाडाचें पान . [ रान + पत्र ] ०वन न. ( व्यापक ) रान ; जंगली प्रदेश ; रानांत फिरणें , वन्य पदार्थींवर उपजीविका करणें किंवा निर्वाहाकरितां वन्य पदार्थ शोधणें . ( क्रि० करणें ; पाहणें ; फिरणें ; हिंडणें ). रानवन मला व्हावयाचें - किंवा मी करीत असतों . [ रान + वन ] रानवा - पु . लागवडीस न आणलेली पडीत जमीन ; जंगल ; रान . गांवाला रानवा असल्यावांचून तृणकाष्ठाची सोय होत नाहीं . रानवाट - स्त्री . जंगली व रानवट प्रदेशाकडे जाणारी वाट . ०वाळूक न. ( थट्टेनें , ल . ) दगड . ०वाळूक ( ल . ) दगड मारणें . चारणें ( ल . ) दगड मारणें . ०शकट्ट पु. एका जातीचें श्वापद . रानशकट्ट आणी रीसें । - दा ३ . ७ . ९ . ०शेकट पु. रानशेवगा पहा . ०शेण शेणी गवरी - स्त्री . १ रानांत पडलेलें गाई - म्हशीचें वाळलेलें शेण , याच्या उलट वळशेण . २ जेव्हां एखाद्या मनुष्याचें ज्ञान , समज , सामर्थ्य किंवा संपत्ति यासंबंधीं पूर्णपणें निषेध दाखवाववाचा असतो तेव्हां उपमानाप्रमाणें योजलेल्या ( शेण , गोवर्या , माती , धूळ , दगड , धोंडा , राख इ० ) शब्दांपैकीं हा एक शब्द आहे . उदा० त्याला रानशेणीचें पीठ समजतें ? = त्याला काय समजतें ? ०शेर पु. एक वनस्पति ; हुरा . ०शेवगा पु. एक झाड . सामान्यत : रानेशर . ०सठवी सटवी - स्त्री . सठवीचें रूप धारण करणार्या देवीचें किंवा दुर्गेचें नांव . उच्छिष्टचांडाळी रानसटवी जखणी । - ह १३ . ६८ . ०सावज न. रानांतील जंगली पशु . कीं रानीचें रानसावज उन्मत्त । - नव २२ . १३१ . ०सिवार न. शिवारांतील जंगल . गांवचें रानसिवार खोताची सत्ता आहे . - मसाप २ . ५९ . ०सोडवण स्त्री. रान तोडून साफ केल्याबद्दलची जकात . - अस्पृ . ३८ . ०सोर वर सोरु - पु . रानडुक्कर . रानसोवर बळकट । - कालिका २२ . १९ . [ रान सूकर - सूअर - वर ] ०हळद हळदी - स्त्री . एक वनस्पति . ०हुरा पु. सामान्यत : रानशेर . रानावळी - स्त्री . एक लहान फुलझाड . हिचा औषधांत उपयोग करतात . रानी , परज - स्त्री . सुरतपासून नवापूरपर्यंत राहणारे रानटी लोक . रानोमाळ - क्रिवि . १ रानांत आणि माळांत . २ तजावजा ; अव्यवस्थित ; अस्ताव्यस्त रीतीन ; पांगून . तैसे ब्राह्मण रानोमाळ । भयें करूनि पळतात । ३ ( ल . ) पसरल्यासारखें ; इकडे तिकडे अस्ताव्यस्त फेकल्यासारखें . वार्यानें पोथीचीं पत्रें रानोमाळ झालीं . [ रान + माळ ] रानोरान - क्रिवि . रानांतून आणि वनांतून ; दरीखोर्यांतून ; सर्व देशभर माझी गाय चुकली म्हणून मी रानोरान फिरलों [ रान द्वि . ] रान्या - वि . रानावनांतील ; खेडवळ ; गांवढळ ; रानकरी ; रानट . [ रान ]
|