“नाजूक पायाची ती, रस्त्यावरून जात असतां, आपल्या नितंबाच्या भारानें थकून जाते; आणि काय चमत्कार सांगावा ! तिचें रूप न्याहाळून पाहणारे भोवतालचे तरुण घामाघूम होतात.”
या श्लोकांत भारांमुळें होणार्या श्रमाच्या कारणरूपी अंशांत श्लेषानें होणारें अभेदाध्यवसान मुळींच नाहीं. तुम्ही म्हणाल, या ठिकाणींही पाण्यानें भरलेल्या घडयाच्या भारानें होणारे श्रम व नितंबांच्या भारानें होणारेम श्रम या दोहोंचा अभेदाध्यवसाय आहे कीं ! पण याला उत्तर हें कीं, नितंबाच्या भारानें उत्पन्न होणारे श्रम हे स्वत:च थकवून टाकणारे असल्यामुळें, दुसर्या भारानें होणार्या थकव्याचें अभेदाध्यवसान येथें अपेक्षित नाहीं. ‘सा बाला वयमप्रगल्भमनस: सा स्त्री वयं कातरा:’ ह्या प्राचीनांच्या पद्यांत, बाला असणें व स्त्री असणें या कारणाच्या अंशांत अभेदाध्यवसायाचा (इतर असंगतीच्या उदाहरणांत व्कचित् आढळणारा) लेश पण संभवत नाहीं. (म्हणून कारणांशांतही अभेदाध्यवसाय या अलंकारांत संभवतो, असें म्हणता येणार नाहीं.)
“विरोधालंकारांत, एका जागीं दोन विरोधी वस्तूंचा संबंध आल्यामुळें विरोधाचें भान होतें, पण असंगति अलंकारांत दोन ठिकाणीं दोन संबंधी पदार्थ आल्यानें विरोधाचें भान होतें असा, विरोधालंकाराहून ह्या असंगतीचा फरक आहे” असें जें विमर्शिनीकारांनीं म्हटलें आहे, तें चूक आहे. असंगतींतही कार्याचा कार्यतावच्छेदक धर्म, व कारणाशीं त्याचें म्ह० कार्याचें असलेलें वैयधिकरण, हे दोन्ही धर्म एकाच कार्यरूप अधिकरणांत येत असल्यानेंच विरोधाचें भान होतें; म्हणून, विरोधालंकारांत उत्पत्तीचा (कारणापासून होणार्या कार्याच्या उत्पत्तीचा) विचार न करतांच विरोधाचें भान होतें व असंगतींत उत्पत्तीचा विचार प्रथम केल्यानें विरोध भासतो, असा या दोन अलंकारांत फरक. खरें सांगायचे म्हणजे, निरनिराळ्या जागेवर राहणारे म्हणून प्रसिद्धा असलेले दोन पदार्थ एका जागेवर राहतात, असें सांगणें हा विरोधालंकार; व एकाच ठिकाणीं राहणारे म्हणून प्रसिद्ध असलेले दोन पदार्थ निरनिराळ्या ठिकाणीं राहतात, असें सांगणें ही असंगति. आतां आम्ही वर जें असंगतीचें लक्षण दिलें आहेत त्यांत, हेतु व कार्य असे जे शब्द घातले आहेत, त्याचा अर्थ, ‘एकत्र आलेले दोन पदार्थ’ (मग त्यांच्यांत कार्यकारणभाव असो वा नसो) एवढाच घ्यावा. मग या द्दष्टीनें पाहतां, ‘नेत्रं निरजंनं तस्या: शून्यास्तु वयमदभुतम् ।’ [ तिचे डोळे काजळावाचूनचे आहेत; आणि आम्ही मात्र ओकेबोके (शून्यह्रदयाचे) झालों आहों हे मोठें नवल आहे.] या वाक्यांत, निरंजनत्व व शून्यत्व या दोहोंत कार्यकारणभाव नसल्यामुळें व शुद्ध समानाधिकरण म्हणून हेदोन पदार्थ प्रसिद्ध असल्यानें, असंगति अलंकार झाला आहे, हें योग्यच आहे. लक्षणांतील हेतुकार्य या शब्दांचा शब्दश; केवळ हेतुकार्यसंबंध असा अर्थ घेतल्यास, येथें असंगति होणार नाहीं, अशातीनें विरोधाहून असंगति अलंकाराचा फरक स्पष्टच आहे.