असंगति अलंकार - लक्षण ४
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
आतां विरोधालंकाराहून निराळा शुद्ध विरोधाचा जो अंश, विरोधमूलक सर्व अलंकारांत अनुगत असलेला दिसतो तो, जसा साद्दश्याचा अंश उपमामूलक सर्व अलंकारांत अनुगत दिसतो तसा, कित्येक अलंकारांना जन्म देतो. पण तो शुद्ध विरोधांश स्वत: निराळ्या अलंकाराच्या पदवीला पोचत नाहीं. कारण अलंकार हे विशेषप्रकारच्या (शब्दार्थाच्या) चमत्कृतीवरच अवलंबून असतात. तेव्हां, विमर्शिनीकारानें असंगतीचेम उदाहरण म्हणून दिलेलें पद्य शुद्ध विरोधांशाचें उदाहरण म्हणून (या द्दष्टीनें) मानलें, तर मात्र कांहीं बिघडणार नाहीं.
आतां, “दुसरीकडे एखादी गोष्ट करायची असल्यास त्याहून निराळ्या ठिकाणीं ति करणें (हा एक प्रकार); व दुसरें कार्य करायला प्रवृत्त झालें असतां त्या कार्याच्या विरुद्ध दुसरेंच कार्य करणें हा (दुसरा प्रकार); अशी असंगति दोन प्रकारची आहे.
उदाहरण :---
“पृथ्वीला अपारिजाता, (अप + अरि + जाता = शत्रुसमूहांनीं रहित हा एक अर्थ; व अ + पारिजात = पारिजातवृक्षरहित हा दुसरा अर्थ; हे दोन्हीही अर्थ ह्या ठिकाणीं योग्य स्थळीं घेऊन विरोधपरिहार करावा.) करण्याची इच्छा असतांनाही तुम्ही स्वर्गाला अपारिजात केलें.”
“गोत्रोद्धार करण्यास (गोत्रा म्ह० पृथ्वी - चा उद्धार व गोत्र म्ह० पर्वत यांचा भेद हे दोन्ही अर्थ ह्या ठिकाणीं योग्यस्थळी घेऊन विरोधपरिहार करावा) प्रवृत्त झाला असतांही, तुम्ही पूर्वी गोत्रांचा (पर्वतांचा) भेद केला.” ह्या ठिकाणीं श्रीकृष्णाला उद्देशून इंद्रानें टोचून बोललेल्या वाक्यांत, पृथ्वीवर करायचें म्हणून ठरवलेलें अपारिजातत्व तुम्ही स्वर्गांत केलें, ही एक असंगति; व पूर्वी पृथ्वीच्या उद्धाराला प्रवृत्त होऊन वराहरूप धारण करणार्या तुम्ही, त्याविरुद्ध, गोत्रांचा (म्ह० पर्वतांचा) टापा मारून चुराडा केला ही दुसरी असंगति. अथवा,
“हे जगांतील अद्वितीय वीरा ! तुझ्या तलवारीनें छाटून टाकलेल्या शत्रूंच्या सुंदर स्त्रियांची कांहीं नवीनच वेशभूषा आतां झालेली आहे. कारण त्यांनीं आतां, नेत्रांच्या ठिकाणीं कंकण धारण केलें आहे (कंकण याचे दोन अर्थ = एक बांगडी व दुसरा, डोळ्याभोवत अशक्ततेमुळें दिसणारें काळें कडें; हे दोन्हीही अर्थ येथें योग्य ठिकाणीं घ्यावे) मांडयावर पत्रवल्लीची रचना केली आहे (गालावर निरनिराळ्या रंगीत आकृति काढणें या प्रकाराला पत्रवल्ली असें म्हणतात, हा एक अर्थ, आणि पानें व वेली हा पत्रवल्लीचा दुसरा अर्थ; हे दोन्हीही अर्थ योग्य ठिकाणीं येथें घ्यावे.) आणि हे चोल देशाच्या राजसिंहा ! (त्या स्त्रियांनी) कोमल हातवर तिलक ठेविला आहे (तिलक याचा टिळा हा एक अर्थ, व तिळांनीं युक्त श्राद्धाचें पाणी तिल + क = पाणी, हा दुसरा अर्थ).”
“हे अखिल जगाच्या परमेश्वरा ! त्रैलोक्यांतल्या देहधारी प्राण्यांचा मोह दूर करण्याकरतां तूं मनुष्याचें रूप धारण केलेंस; आणि निस्सीम कांतीच्या रसाचा समुद्रच अशा त्या रूपानें तूं भोळ्या स्त्रियांचा मोह उलटा वाढवीत आहेस.”
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP