शत्रूच्या सुखाचें साधन असणार्या वस्तूची निवृत्ति न होणें, उलट आपल्याला दु:खाच्या साधनाची प्राप्ति होणें, या दुहेरी विषमाच्या प्रकाराचें उदाहरण हें :---
“डोळ्याशीं डोळा भिडवीत नाहीं. बोलतांना हसत नाहीं, अन् तुमच्याविषयीं गोष्टी चालल्या असतां ती कपाळाला आठया घालते. (रागानें भुंवया वर चढवते.) अशारीतीनें सवतीची कहाणी प्रियकराच्या समोर ती सांगत असतां (सवतीच्या विषयीं त्याचें प्रेम कमी होण्याऐवजीं) तिच्या स्वत:विषयींचेंच प्रियकराचें प्रेम कमी झालें.”
या ठिकाणीं एका प्रौढ नायिकेनें ‘ही अजून वयांत आली नाहीं’ असें जिच्याविषयीं प्रियकराला वाटत होतें अशा आपल्या सवतीविषयींचें, प्रियकराचें प्रेम कमी करावें. या उद्देशानें त्याच्या समोर तिचे दुर्गुण सांगायला सुरवात केली. पण त्या योगानें तिच्या मनांतला हेतु (सवतीविषयींचें प्रियकराचें प्रेम कमी करणें हा हेतु) सिद्धीस तर हेतु (सवतीविषयींचें प्रियकराचें प्रेम कमी करणें हा हेतु) सिद्धीस तर गेला नाहींच, उलट तिनें स्वत:विषयींचें त्याचें प्रेम कमी करून घेतलें. अशी वस्तुस्थिति असल्यामुळें, वास्तविक ह्या ठिकाणीं स्वत:च्या सुखसाधनाची निवृत्ति ही दु:खसाधनरूपच होत असल्यामुळें, विषमाच्या प्रकाराची निराळी गणना करणें योग्य नव्हतें. (कारण दु:खसाधनरूप अथवा दु:खसाधनप्राप्तिरूप अशा या प्रकारांत, सुखसाधननिवृत्ति हा प्रकार अंतर्भूत करतां आला असतां) तरीपण, दु:खाच्या साधनाची निवृत्ति झाली असतां ज्याप्रमाणें सुख व्हायचें हें ठरलेलेंच आहे, त्याप्रमाणे, सुखाच्या साधनाची निवृत्ति झाली असतां, त्यामुळें हमखास दु:खच उत्पन्न होणार, असें कांहीं ठरलेलें नाहीं. म्हणून सुखसांधननिवृत्तीचा हा प्रकार वरील श्लोकांत निराळा सांगितला आहे. वरीलप्रमाणें विषमाचें दुहेरी स्वरूपाचे बाकीचे आठ प्रकार स्वत:च शोधून काढावें.
केवळ इष्टाच्या अप्राप्तीचें उदाहरण :---
“सकाळचा उजेड, प्रेमामुळें प्रियकरापासून लपवूं पाहणार्या एका स्त्रीनें त्याचे कमलासारखें डोळे स्वत:च्या हातांनीं झाकले. पण त्यानें, (त्या मिटलेल्या डोळ्यांच्या स्थितींतच) कमळांच्या सुगंहाला चोरून नेणार्या वार्याच्या झुळकीवरून सूर्य उगवल्याचें अनुमान बर्याच वेळानें केलें आणि तो जायला निघाला.)”
ह्या ठिकाणीं, प्रियकराला सकाळचें भान न होणें, हें त्या स्त्रीला, सुखाचें साधन म्हणून इष्ट होतें; तें साधन ती मिळवूं पाहत असतांही तें तिला मिळालें नाहीं, ही इष्टाची अप्राप्तीच होय. अथवा (असें समजा कीं) सकाळच्या वेळेचें भान होणें हें तिला स्वत:च्या दु:खाचें साधन वाटत होतें; तें दूर होणें हें तिचें इष्ट० तें ती साधू पाहा असतांही तिला साधलें नाहीं. अर्थात या द्दष्टीनेंही येथें इष्टाची अप्राप्तीच आहे. अशारीतीनें दोन्हीही प्रकारांनीं, या ठिकाणी, इष्टाच्या अप्राप्तीचाच संभव आहे. याचे (म्ह० इष्टाप्राप्तीचे) दुसरे प्रकार स्वत:च शोधून काढावें.