“दोन पदार्थांनीं एकमेकांवर एक प्रकारचा विशेष (म्ह० संस्कार) उत्पन्न करणें, हा अन्योन्यालंकार.”
हा विशेष (म्ह० संस्कार) गुण, क्रिया इत्यादि स्वरूपाचा असतो.
उदाहरण :---
“ जिनें रत्नांची जाळी जिंकली आहे अशा, सुरताच्या शेवटीं श्रमानें उठणाच्या धर्मबिंदूंच्या माळेनें, व सोन्यासारखी कांति असलेल्या त्या सुंदरीच्या कपाळानें, एकमेकांची अवर्णनीय शोभा वाढवली.”
ह्या ठिकाणीं गुणरुपी विशेष उत्पन्न झाला आहे; कारण रुचि हा गुण आहे. ‘या श्लोकांत विदधे या शब्दानें विधानरूप क्रिया या विशेषाची निर्मिति झाली आहे.’ अशी शंका घेऊ नये; कारण विधान याचा अर्थ करणें, करणें ही अगदीं सामान्य स्वरूपाची क्रिया (भावना) आहे; त्या क्रियेनें चमत्कार उत्पन्न होत नसल्यानें, ह्या ठिकाणीं क्रियारूप विशेष मानतां येणार नाहीं.
“परपुरूषाच्या द्दष्टिपातरूपी वज्राच्या प्रहाराला भ्यालेली सीता, प्रियकराच्या ह्रदयांत शिरली, व परस्त्रीरूपी नागिणीच्या भयानें तोहीं (रामही) तिच्या ह्रदयांत त्वरेनें शिरला.”
आतां, “जसा जसा वर डोळे केलेला वाटसरू ओंजळीचीं बोटें विरळ करून पाणी पिऊं लागला, तशी पाणपोईवालीही पाण्याची धार बारील करू लागली.”
ह्या ठिकाणीं प्रपापालिका (पाणपोईवाली) स्वत:वर (म्ह० पथिकावर) आसक्त झाल्यामुळें, पाणी देण्याच्या मिषानें फार वेळ स्वत:चे (म्ह० वाटसरूचें) तोंड पाहण्याची इच्छा करीत असतां, वाटसरूनें स्वत:च्या ओंजळीचीं बोटें विरळ करून, पाणी पिण्याला फार वेळ लावला व तिच्यावर जसा उपकार केला तसा, प्रपालिकेनेंही स्वत:च्या तोंडाकडे पाहण्याची इच्छा करणार्या वाटसरूवर, पाण्याची धार बारीक करून पाणी प्यावयाला फार वेळ लावण्याची त्याला संधि देऊन त्याच्यावर उपकार केला.” असें जें कुवलयानंदकारांनीं म्ह्टलें आहे तें चूक आहे;
अगोदर मुळीं हा श्लोक करणार्या ह्या (कवि) महाशयांच्या वाक्यांतील शब्दांची रचनाच त्यांच्या व्युत्पत्तीचें अज्ञान व्यक्त करते. कसें तें बघा :--- ‘स्वमुखावलोकनमभिलषन्त्या:’ ह्या ठिकाणीं, स्वशब्द प्रपालिकेच्या विशेषणांतील एक घटक असल्यानें, त्या स्वशब्दानें प्रपालिकेचा बोध होणेंच योग्य आहे. त्या स्वशब्दानें, पथिकाचा (वाटसरूचा) बोध होणें योग्य नाहीं. याचप्रमाणें ‘स्वमुखावलोकनमभिलषत:’ या शब्दांतील स्व या शब्दानें, वाटसरूचाच बोध होणें योग्य आहे, तुम्हांला इष्ट असलेला पाणपोईवालीचा बोध होणें योग्य नाहीं. अशा रीतीनें स्वशब्दाचा योग्य अर्थ घेतल्यास, वरील श्लोकांत, अर्थाचें भलतेंच तिरपगडें होईल. तुम्ही म्हणाल. ‘सर्वनामें हीं आपल्या मनांत ज्या धर्माला घेऊन एखादा पदार्थ उपस्थित झाला असेल त्याचाच बोध करतात, त्यामुळें येथें आम्हांला इष्ट असलेल्या पदार्थाचा बोध स्वशब्दानें होऊ शकेल.” पण हें तुमचें म्हणणें बरोबर नाहीं. कारण तत्, इदं, अस्मत्, युष्मत् वगैरे शब्दांच्या बाबतींत जसें व्युत्पत्तीचे विशेष नियम केले आहेत, त्याप्रमाणें ह्या स्व शब्दाच्या बाबतींतही व्युत्पत्तीचा विशेष नियम मानला पाहिजे. प्रस्तुत स्वशब्दाच्या बाबतींत तो व्युत्पत्तीचा नियम असा :--- ज्या पदार्थाच्या विशेषणाचे घटक म्हणून स्व, निज वगैरे शब्द वापरले असतील, त्या पदार्थांचाच हे शब्द बोध करतात. या नियमाप्रमाणें पाहतां ‘स्वदाररतांनां विप्राणमहं भक्त:’ (आपापल्या म्ह० स्वत:च्या बायककांवर प्रेम करणार्या ब्राम्हाणांचा मी भक्त आहे.) ‘देवदत्तस्य पुत्र: स्वमातृभक्त:’ (देवदत्ताचा मुलगा आपल्या स्वत:च्या आईवर प्रेम करतो.) या वाक्यांतिल पहिल्या वाक्यांत, ‘माझ्या (म्ह० भक्त होणाराच्या) बायकोवर प्रेम करणार्या,’ व दुसर्या वाक्यांत, ‘देवदत्ताच्या आईवर प्रेम करणारा’ असे अर्थ, ज्याचें डोकें ठिकाणावर आहे अशा कोणाही माणसाला स्वाभाविकपणें प्रतीत होत नहींत. असें असल्यामुळेंच, “निजतनुस्वच्छ - लावण्यवापीसंभूताम्भोजशोभां विदधदभिनवो दण्डपादो भवान्या: ।” या श्लोकांतील निजतनु शब्दानें, ‘वर ताठ केलेल्या पायाचें (म्ह० दण्डपादाचें) शरीर’ अस विचित्र अर्थ प्रतीत होतो; (वास्तविक) ‘पार्वतीचें शरीर’ असा अर्थ होणें इष्ट आहे;’ असा, या श्लोकाच्या बाबतींत व्युत्पन्नांचे अग्रणी मम्मटभट्ट यांनीं, काव्यप्रकाशांत दोष दाखविला आहे. तुम्ही म्हणाल, “श्रुतिकटु, (कर्णकटु) पद प्रतीत होणें,” वगैरे दोषांप्रमाणें हा दोष फक्त काव्यांतच मानला जातो. (इतर गद्य लिखाण या दोषांचा विषय होत नाहीं)” पण हेंही म्हणणें बरोबर नाहीं. शब्दाच्या व्युत्पत्तीच्या प्रांतांत केवळ काव्याचाच अंतर्भाव करतां येत नाहीं. (म्ह० लौकिक गद्याचाही शब्दव्युत्पत्तीच्या द्दष्टीनें विचार केला पाहिजे; काव्यांतच शब्दाच्या व्युत्पत्तीचा विचार करावा; त्याहून शब्दव्युपत्तीचा दुसरा प्रांतच नाहीं, असें मुळींच म्हणतां येणार नाहीं.) (केवळ काव्यांतच हा दोष मानायचा असेल तर) माझ्या बायकोवर प्रेम करणारे, व देवदत्ताच्या आईवर प्रेम करणारा, या तात्पर्यानें पूर्वीं सांगितलेल्या वाक्यांचा प्रयोग कोणी करणारा असेल, तर त्याला नांवें ठेवतां येणार नाहींत.
शिवाय परस्परांनीं परस्परावर केलेला उपकार, स्वत:हून निराळ्या ठिकाणीं होणार्या व्यापारानें साध्य होणार असेल, तरच तो चमत्कार उत्पन्न करतो, व म्हणून तशाच तर्हेचा व्यापार, अन्योन्याच्या लक्षणांत घटक म्हणून सांगितला आहे. पण तो उपकार, स्वत:शीं समानाधिकरण (म्ह० स्वत:च्या ठिकाणीं) असलेल्या व्यापारांनीं साध्य असेल तर चालणार नाहीं. (कराण त्यापासून चमत्कार उत्पन्न होणार नाहीं.) अशा ठिकाणीं, तुषारशिशिरीकरणन्यायानें (म्ह० बर्फानें स्वत:ला थंड करणें यांत कांहीं मजा नाहीं, अथवा स्वत:अवर उपकार केल्यासारखेंही होत नाहीं. या द्दष्टांताप्रमाणें) स्वत:वर उपकार करण्याला दुसर्याच्या व्यापाराची जरूरी नसल्यानें तशा उपकारांत कांहीं चमत्कार नाहीं. प्रस्तुत श्लोकांतही धार बारीक करणारी पाणपोईवाली व बोटें विरळ करणारा वाटसरू, या दोघांनीं आपापल्याला बराच वेळ दुसर्यांचीं तोंडें पाहायला मिळावी म्हणून योजलेले उपाय, स्वत:लाच उपयोगी पडले, या द्दष्टीनेंच त्यांत (कांहींसा) चमत्कार आहे; (आणि मूळ श्लोकाच्या कर्त्याचाही हाच अभिप्राय दिसतो.) दुसर्याला बराच वेळ आपलें तोंड बघायला मिळावें म्हणून, त्या दोन कर्त्यांच्या क्रियांचा येथें उपयोग झालेला नाहीं. त्यामुळें (परस्परांनीं परस्परांवर उपकार न करतां स्वत:वरच उपकार केला असल्यामुळें) हा श्लोक या अन्योन्यालंकाराचें उदाहरण होऊंच शकत नाहीं; रसिकांनीं याचा विचार करावा.
येथें रसगंगाधरांतील अन्योन्य प्रकरण संपलें.