“यावर (या विशेषाच्या तिसर्या प्रकाराचे बाबतींत) आतां विचार करूं या :---
विशेष अलंकाराचा हा तिसरा प्रकार आहे, (कोदंडच्युत इ० श्लोकांत) हें कसें ओळखायचें ? रूपक वगैरे अलंकाराप्रमाणें या अलंकाराचें एखादें सामान्य लक्षण आहे म्हणावें तर, तेंही नाहीं. तें असतें तर, हा विशेषाचा तिसरा प्रकार त्यांत म्ह० विशेषालंकाराच्या सामान्य लक्षणांत बसत असल्यामुळें, अशक्य अशी दुसरी वस्तु करणें ह्या प्रकाराला आम्ही विशेषणाचा (तिसरा) प्रकार मानला असता. “या तीन प्रकारांपैकीं कोणताही एक प्रकार असणें हेंच विशेषाचें सामान्य लक्षण”, असेंही म्हणतां येत नाहीं. कारण अशाच तर्हेनें विशेषाला, दुसर्या कोणत्याही अलंकाराचा हा एक पोटप्रकार आहे असें म्हणणें सोपें आहे. (स्वत:च्या सर्व प्रकारांना लागूं पडणारें सामान्य लक्षण नसूनही, हा विशेषाचा प्रकार आहे असें प्राचीनांनीं म्हणजे, राजानें हुकूम सोडण्यापैकींच आहे. तेव्हां यापेक्षां विशेषाच्या या तिसर्या प्रकाराला स्वतंत्र अलंकार मानणें हेंच चांगलें. शिवाय ‘येन द्दष्टोसि देव त्वं तेन द्दष्टो हुताशन: । (हे राजा ज्यानें तुला पाहिलें त्यानें आग्नि पाहिला.) ‘तेन द्दष्टा वसुंधरा’ । (त्यानें पृथ्वी पाहिली) इ० वाक्यांत दुसरी वस्तु अग्नि पृथ्वी वगैरे पाहणें, यांत अशक्य आणि असंभाव्य (वस्तूची कल्पना करणें) असा कांहींही प्रकार नसल्यानें, अशा ठिकाणीं, हा अलंकार संभवतच नाहीं. म्हणून अशा ठिकाणीं जर तुम्ही निदर्शनेचा स्वीकार करतां तर, ‘येन द्दष्टोसि देव त्व तेन द्दष्ट: सुरेश्वर: ।’ इ० विशेषालंकाराच्या उदाहरणांतही त्याच निदर्शनेचे पाय धरणें योग्य आहे. (म्ह० निदर्शना मानणेंच योग्य आहे.) अग्नि पाहिला हें म्हणण्यांत किंवा इंद्र पाहिला असें म्हणण्यांत चमत्काराचा कांहींच फरक नाहीं. अशी वस्तुस्थिति असल्यामुळें, प्राचीनांना अनुसरून ‘कोदंदच्युत०’ हें जें उदाहरण आम्ही विशेषालंकाराचें म्हणून दिलें आहे त्यांत सुद्धां विशेषालंकार आहे असें म्हणणें कठिण आहे. वरील विवेचनावरून, ‘त्वां पश्यता मया लब्धं कल्पवृक्षनिरीक्षणम्’ इ० कुवलयानंदांत दिलेल्या उदाहरणाची पण वाट लागली (म्ह० हेंही विशेषाचें उदाहरण मानतां येत नाहीं.) म्हणून विशेषालंकाराचें तिसर्या प्रकाराचें हें उदाहरण द्यावें :---
“हें करुणाकरा शंकरा ! ज्यांनीं सहज तुझें अर्चन केलें, त्यानें कोणतें पुण्य केलें नाहीं बरे ? त्यानें या जगांत कोणत्या लक्ष्मीला दासी करून टाकले नाहीं बरे ? व देवांनाही दुर्लभ असे कोणते भोग भोगले नाहींत बरे ?” येथें धर्म, अर्थ व काम या त्रिवर्गाची प्राप्ति हें अशक्य अशी दुसरी वस्तु करणें, म्हणून येथें विशेषालंकाराचा तिसरा प्रकार आहे.
ह्या ठिकाणीं , निदर्शना वगैरे अलंकार संभवत नाहीं. कारण ह्या ठिकाणीं भगवंताच्या पूजेचें व पुण्य करणें वगैरेचें (परस्पर) साद्दश्य आहे. असें सांगावयाचें नाहीं. असें सांगायचें असते तर येथें निदर्शना झाली असती. पण (भगवंताची पूजा करणें व पुण्य करणें इत्यादिकांत) कार्यकारणभाव आहे हें येथें सांगावयाचें आहे, अशा रीतीनें या श्लोकांत, “अशक्य अशी दुसरी वस्तु निर्माण करण्यांत अभेदाध्यवसान हें कारण आहे.” असें विशेषण लावण्याचीही जरूर पडणार नाहीं. कुणी म्हणेल कीं, ‘अभेदाध्यवसानाला निबंधन म्ह० कारण (तृतीय विशेषाचें) न मानलें तर, “दधि विक्रेतुमटन्त्या” या श्लोकांत विशेषाच्या तिसर्या प्रकाराची अतिव्याप्ति व विशेष या दोन्हीही अलंकारांचा संकर मानणें, आम्हाला इष्ट आहे,” असें कोणी म्हणतात.
येथें रसगंगाधरांतील विशेषालंकार प्रकरण समाप्त झालें.