(प्रतीपाच्या) पाचव्या प्रकारचें उदाहरण :---
“वाह्यात कवि तुझ्या स्तनांची हत्तीच्या गंडस्थलाबरोबर तुलना करीत असतां हे सखि ! तूं तें अगदीं मन लावून ऐकतेस तरी कसें ? (खरोखरी) बायकांना नेहमी उलटें (सांगितलेलें) च खरें वाटायचें !”
ह्या ठिकाणीं, ‘ऐकतेस तरी कसें ! असें म्हटल्यानें (स्तनांची व गंडस्थलाची) तुलनाच संभवत नाहीं; असें सूचित केलें आहे. याच अर्थाचा परिपोष (येथील) अर्थान्तरन्यासही करीत आहे. अशा रीतीनें पांच प्रकारचा हा प्रतीप प्राचीनांच्या म्हणण्याला मान देऊन आम्ही सांगितला.
पण खरें सांगायचें म्हणजे, ह्या प्रतीपाचे पहिले तीन प्रकार उपमेच्याच पोटांत घालतां येतील. चवथा प्रकार कांहींच्या मतें, आक्षेप अलंकारच. पण पांचवा प्रकार, धर्माचा निराळेपणा असूनही, ज्यांत शब्दानें सांगितला नाहीं, अशा व्यतिरेक अलंकारांत घालतां येईल. कसें तें पहा :--- स्पष्टपणें सिद्ध होणारें अथवा सुंदर असें जें साद्दश्य त्याला उपमा म्हणतात. आतां, ‘मुखाप्रमणें कमल’ या पहिल्या प्रतीपांत साद्दश्य स्थापित झालें नाहीं असेंही नाहीं; किंवा त्यांत सौंदर्य नाहीं असेंही नाहीं. मग त्याला उपमेंतून बाहेर काढून टाकतां येईल तरी कसें ? कारण, ह्या प्रातीपांतील साद्दश्यांत, के विशेष प्रकारचें सौंदर्य आहे हें तुम्हांलाही कबूल आहे. (हें विशेष प्रकारचें सौंदर्य, सामान्य सौंदर्याला दूर लोटतें असेंही नाहीं. कारण,) विशेष हा सामान्याला दूर करू शकत नाहीं. आतां, ‘प्रसिद्ध उपमानें जीं कमल वगैरे, त्यांनीं निरूपित (म्ह० दाखविलेलें म्ह० शास्त्रीय भाषेंत, तें कमल वगैरे ज्या साद्दश्यांत प्रतियोगी आहे असें,) जें साद्दश्य त्यालाच उपमा म्हणावें’ असें कांहीं (कुठल्या) राजांनीं फर्मान काढलेलें नाहीं. “प्रतीप हा शब्द उपमेच्या विरुद्ध अर्थाच वाचक असतो, अशा या प्रतीप शब्दाच्या व्युत्पत्तीच्या योरावरच, प्रतीपांतील (प्रसिद्ध उपमानोपमेयभाव उलटा होऊन येणार्या) साद्दशला तें उपमा आहे असें म्हणणें शक्य नाहीं.” असेंही म्हणतां येणार नाहीं. कारण ‘विशिष्ट प्रकारच्या उपमेच्या म्ह० साद्दश्याच्या विरुद्ध अर्थाचा वाचक हा प्रतीप हा एक उपमेच्या विरुद्ध प्रकार आहे’ या विधानाची संगति लावतां येईल. अशा रीतीनें, प्रतीपाचा पहिला प्रकार, लोकप्रसिद्ध उपमेप्रमाणें, उपमेचाच एक विशेष्ट प्रकार आहे (हें निश्चित); आणि याच न्यायानें, प्रतीपाचा दुसरा व तिसरा, हे प्रकार आहे (हें निश्चित); आणि याच न्यायानें, प्रतीपाचा दुसरा व तिसरा, हे प्रकार सुद्धांत उपमेचेच विशिष्ट प्रकार आहेत (हेंही उघड आहे.) आतां (या दुसर्या व तिसर्या प्रकारांत) उपमानाचा अथवा उपमेयाचा तिरस्कार दिसतो खरा; पण त्यावरून फारतर असें म्हणा कीं, येथील साद्दश्याचा, (उपमेंतील) विशिष्ट साद्दश्याहून निराळेपणा दाखविण्याला तो तिरस्कार कारण होतो; पण सामान्य (उपमा म्ह०) साद्दश्याहून येथील साद्दश्य निराळें आहे, असें मात्र त्या तिरस्कारावरून तुम्हांला म्हणतां येणार नाहीं; करण या दोन प्रकारांतील तिरस्कारांतील तें सामान्य साद्दश्यच अनुस्यूत आहे अशी प्रतीति होते. (त्या उपमानाच्या अथवा उपमेयाच्या तिरस्कारांतही साद्दश्याचा एक अखंड धागा ओवलेला दिसतो.) द्राक्ष अत्यंत मधुर असल्यानें, तें पृथ्वीवरील इतर मधुर पदार्थांहून निराळें पडतें; म्हणून कांहीं तें द्राक्ष पृथ्वीहून निराळें होत नाहीं.