आत्मनः पितृपुत्राभ्यामनुमेयौ भवाप्ययौ ।
न भवाप्ययवस्तूनामभिज्ञोऽद्वयलक्षणः ॥४८॥
म्हणती पित्याचा आत्मा गेला । यालागीं पितृदेह नासला ।
परी पैल तो आत्मा गेला । ऐसा नाहीं देखिला कोणींही ॥८३॥
म्हणती पुत्रजन्में आत्म्यासी जन्म । करितां पुत्राचें जातककर्म ।
देखिजे देहाचा संभ्रम । आत्मा दुर्गम दिसेना ॥८४॥
येथ आत्म्यासी येणेंजाणें । सर्वथा नाहीं पूर्णपणें ।
देहासीचि जन्ममरणें । येणेंजाणें दृष्टांतें ॥८५॥
प्रत्यक्ष देहासी जन्मनाश । आत्मा साक्षित्वें अविनाश ।
येचि अर्थी विशद विलास । स्वयें हृषीकेश सांगत ॥८६॥