मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|स्त्रीगीते|
खेळाचे गाणे

स्त्रीगीत - खेळाचे गाणे

मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.


नाचूं या सख्यांनो नादांत । करूं या आनंदाची लूट
एक मताच्या आपण मैत्रिणी
स्वच्छंदाने गाऊ गाणी
तनमन विसरूनी धुंदीत । रंगु या खेळाच्या रंगात ॥१॥
जोडीजोडीने फुगडी दणाणे
परस्परांना घालू उखाणे
हात पाय होतील बळकट । सळसळे अंगात नव रक्त ॥२॥
आगोटा-पागोटा भरभर
अधांतरी ग उडू हवेवर
चपळाई येईल अंगात । उत्साह वाटेल कामांत ॥३॥
लवलव वाकू खाली सरसर
पिंगा घालूं चला ग गरगर
कंबर होईल मजबूत । भरदार मान ताठ ॥४॥
एका पायी तोल धरुनिया
खेळ लंगडीचा चला खेळुंया
उणीव जरिही जीवनांत । सोडणार नाहीच हिंमत ॥५॥
किसूं दोडकी घाईघाईने
काम करुं ग चढाओढीने
रमुं या सदैव कामांत । श्रमाचे सोल ह्या विश्वात ॥६॥
सईबाईचा कोंबडा रोज आरवतो
कधी तयाचा नेम न चुकतो
कुचराई नकोच कामांत । कामांत हवीच अन् शिस्त ॥७॥
हातामधे हात गुंफु या
झिम्म्याचा ग फेर धरु या
गीत गाऊ खड्या आवाजांत । पाय टाकू एकाच ठेक्यात ॥८॥
गोफ विणूं ग कला कुसरीने
रास रचूं ग तन्मयतेने
एकचित्त करा ग साधनेंत । मनांत नकोच ते द्वैत ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : October 22, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP