मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|प्रमुख दत्तभक्त|
दासोपंत

दत्तभक्त - दासोपंत

महान् व्यक्तिंची चरित्रे नेहमीच प्रेरणादायी असतात. दत्तात्रेयांच्या पौराणिक शिष्यांची वा भक्तांची ओळख येथे केलेली आहे. हे दत्तभक्त अवतारी पुरूष म्हणून ओळखले जातात. 

(शके १४७३-१५३७)

बिदरच्या बहामनीशाहीतील नारायणपेठ नावाच्या गावी दिगंबरपंत देशपांडे यांच्या घरी भाद्रपद व. ८ शके १४७३ रोजी दासोपंतांचा जन्म झाला. घराण्यात चांगली श्रीमंती नांदत होती. याच वेळी प्रांतात मोठा दुष्काळ पडला. म्हणून दिगंबरपंतांनी आपल्या अधिकारात सरकारी कोठारातील धान्य भुकेलेल्यांना वाटून टाकले. या धान्याच्या रकमेची भरपाई वेळेवर खजिन्यात झाली नाही. यामुळे बादशहा नाराज झाला. बादशहाने दासोपंतास ओलीस ठेवून दिगंबरपंतास बजावले की, ‘एक महिन्यात बाकी चुकती झाली नाही तर पोरास मुसलमानी दीक्षा देऊ,’ दिगंबरपंत व दासोपंत या उभयतांनी द्त्तप्रभूंची करुणा भाकली. दत्ताजी पाडेवार नावाच्या एका दत्तस्वरूप विभूतीने रक्कम सरकारात भरून दासोपंतांची सुटका केली. दासोपंत मुक्त झाल्यामुळे सर्वांना आनंद वाटला. तरी खुद्द दासोपंतांची चित्तवृत्ती वैराग्याने उजळून निघाली. त्यांना अस्वस्थता वाटत राहिली. ज्या दत्तप्रभूने आपणास वाचचिले त्याचाच शोध घेण्यासाठी ते एकाएकी घरातून निघून बाहेर पडले.

हिलालपूर, डाकुळगी, प्रेमपूर, नांदेडवरून ते मातापूर तथा माहूर या क्षेत्री आले. येथील निसर्गरम्य परिसर, रेणुकामातेचे दर्शन, द्त्त आणि अनूसयेचे दर्शन, मातृतीर्थावर स्नान इत्यादींत त्यांचे मन रमले. ध्यानधारणेस अतिशय अनुकूल अशा या ठिकाणी दासोपंतांनी दत्तभक्तीचा अनुभव घेतला. ते माहूर येथे सुमारे बारा वर्षेंपर्यंत दत्तसेवेत रमून गेले. त्यानंतर ते पुन्हा संचारास निघाले. राक्षसभुवन येथील गोदामाईच्या वाळवंटात त्यांना दत्तपादुकांचा प्रसाद मिळाला. येथेच त्या एकांतवासात अवधूताचे दर्शन झाले. त्यानंतर ते पुन: डाकुळगीस आले. कृष्णाजीपंतास येथे त्यांनी एक दत्तमूर्ती नित्याच्या उपासनेसाठी देऊन ते वाणीसंगमी आले. येथेच त्यांना त्यांच्या घरचा परिवार भेटला बारा वर्षे पतीचा पत्ता नसल्यामुळे त्या काळच्या लौकिक रूढीप्रमाणे सौभाग्यचिन्हांचा विधिपूर्वक त्याग करण्यासाठी दासोपंतांची पत्नी आपल्या घरच्या लोकांसमवेत येथेच आली होती. अशा त्या नाटयपूर्ण प्रसंगात सर्वांचे मीलन झाले. वाघेश्वराच्या मंदिरात दासोपंत आपल्या आईवडिलांना व पत्नीला भेटले. सर्वांना अतिशय आनंद झाला. दासोपंतांनी नारायणपेठ येथील आपल्या वतनाचे दानपत्र करून ते कायमचे राहाण्यासाठी म्हणून आंबेजोगाईस येऊन स्थायिक झाले.

सितोपंत देशपांडे यांनी त्यांचे शिष्यत्त्व पत्करून आंबेजोगाईस दासोपंतांची सर्व व्यवस्था लावून दिली. या ठिकाणी दासोपंतांनी अखंडपणे लेखन करून मराठी शारदेस उत्कृष्ट नजराणे समर्पित केले. ‘गीतार्णव’ नावाचा त्यांचा एक ग्रंथ सव्वा लाख ओव्यांचा आहे. ग्रंथराज, वाक्यवृत्ती, पंचीकरण, पदार्णव, अनुगीता, महापूजा, वज्रपंजरकवच अशी त्यांची लहानमोठया प्रमाणावरची रचना विपुल आहे. दत्तात्रेयांचा महिमा तर त्यांनी अनेक पदांतून गायिला आहे. दासोपंतांच्या दत्तोपासनेची पद्धतही वैशिष्टयपूर्ण आहे. दासोपंतांच्या परंपरेत दत्तात्रेयांचे सोळा अवतार प्रसिद्ध असून सतरावा अवतार म्हणजे स्वत: दासोपंत असून त्यांचा उल्लेख, ‘श्रीसर्वज्ञावत्तार’ म्हणून होतो. उपासनेची त्यांनी ठरवून दिलेली पद्धती अजून चालू आहे. ‘प्रत्येक दिवशीचा उपासनाविधी. सात वारांची वेगवेळी भजने, पर्वकाळाची आणि उत्सवाची विशेष भजने, पदे, आरत्या, शेजारत्या, अष्टके, स्तोत्रे हे सर्व त्यांनी आखून व रचून ठेविले आहे. विशिष्ट प्रसंगी करावयाची लळिते, संगीत, टिपर्‍या यांचीही रचना केलेली आहे. नित्यासाठी दशनाम, शतनाम, सहस्रनाम, स्तवराज, माहात्म्ये हीही तयार करून दिलेली आहेत. उत्सवपद्धती, सेवा, अर्चन, उत्तरार्चन यांचीदेखील शिस्त त्यांनीच घातलेली आहे. मूर्त्तीच्या नित्य स्नानासाठीही काही नियम आहेत. ‘आनंदें दत्तात्रेय देवदेव’ हा दासोपंत परंपरेतील जयघोष आहे’ (दासोपंतांची पासोडी: न. शे. पोहनेरकर, प्रस्तावना, पृष्ठ १७)

दासोपंतांनी वरीलप्रमाणे दत्तोपासना दृढ चालावी म्हणून दत्तात्रेयांवर अनेक प्रकारची स्फुट व प्रकरणात्मक रचना केली आहे. अवधूतराज, दत्तात्रेयमाहात्म्य (संस्कृत), अवधूतगीता, दत्तात्रेयसहस्रनामस्तोत्र, दत्तात्रेयदशनामस्तोत्र, दत्तात्रेयषोडशनामस्तोत्र, शतनामस्तोत्र, द्वादश-नामस्तोत्र, सिद्ध दत्तात्रेयस्तोत्र, गुरुस्तोत्र, दत्तात्रेयनामावळी, षोडशअवतारस्तोत्र, षोडश-अवतार प्रादुर्भावस्तोत्र, षोडशअवतारध्यानस्तोत्र इत्यादी प्रकरणे दासोपंतांच्या परंपरेत नित्य म्हटली जातात. दासोपंतांची दत्तात्रेयांवरील पदे अतिशय नादमधुर व भक्तिरसपूर्ण आहेत. द्त्तांविषयी दासोपंतांना वाटणारी करूणा, आशा, भक्ती यांचे मूर्तिमंत दर्शन दासोपंतांच्या पदांतून व्यक्त होते. ‘तुम्ही जा, जा वो झडकरूनी त्यासी येई जा घेऊनी’. ‘चालतां बोलतां तुझें रूप ध्याईन !’ ‘बोलवितां न बोलसी, ऐसें म्यां वो काय केले?’ ‘जयुतपु तीर्थाटण माझें हेंचि ब्रह्मज्ञान’ इत्यादी ओळींतून दासोपंतांच्या ह्रदयातील आर्तता जाणवण्यासारखी आहे. दासोपंतांची दत्तविषयक काही पदे तेथे नमुन्यासाठी देत आहे.

१) प्रतिदिनीं प्रतिक्षिणी भासतांसि, अंत:करणी आणितां विसरूं नये, न गमे विषयों मनी ॥१॥ध्रु.॥
आतां, मजसी भुलली माये ! चित्त विपरीत. बोधन बोधासी न ये: न कळे हीत विहीत ॥छ॥
आशंका नुरे भावें; बोधली येणें जीवें । दिगंबरू आत्मा सैये ! जीविचा जिवनु जिवें ॥२॥

२) बहु दिवस क्रमले; सखिये ! मी काये करूं भेटी न ये अवधूत, याचे पाये धरूं ॥१॥धृ॥
भेटीचें आरत माझें परिपूर्ण करा । मन माझें उतावीळ; पाहिन महियेरा ॥छ॥
वाट पाहतां कुंठली गति, मति, आठवण । दिगंबराचें भेटणे मनीं मारूनिं मन ॥२॥

३) लोक बोलती तें मी साहीन; जनाचे अपवाद साहीन ॥०॥
अवधूतपंथें मीं जायीन; करूं नये, तें मीं करीन ॥०॥
बोलों नये औसें करीन, देवोचि स्वयं होयीन ॥१॥धृ॥
अरे मना ! अरे मना ।
मना रे ! मना रे ! अरे ! अरे ! मना रे तुजवीण मना नाहीं दुसरे ॥छ॥
क्रिया कर्म तें सांडीन; गुणाचे व्यापार निरसीन; न करणें कर्म करीन: दिगंबरू
मी ऐसें ध्यायीन; आत्मा अवधूत उमजैन; भेदूचि बळि तेथ देय़ीन ॥२॥

४) चंद्रू वो ! चांदिणें चंदन आंगीं न साहे वियोग - तापु तपें; तपिया तापनु सुमन सेज: करूं काये? ॥१॥धृ॥
सखिये ! सावळ्या सुंदर ! वेधलें माझे मन वो ! गुंपलें अंत:करण देह गेह । सुख सांडुनि सर्वही लागलें अखंड ध्यान ॥छ॥
दीपक निर्द्दीप; गायन खोंचती बाण वो ! शब्द खरतर बाण । दिगंबरेविण शरीर आपुलें सांडीन, हें मीपण ॥२॥

५) आपुला तूं कैसा होसी? चरण झाडीन कैसीं अवधूता ! सांग मातें तें पद देसी ॥१॥धृ॥
बापा ! तुझे ध्यान कयी अनुश्रुत लागैल ह्रदयीं? ॥छ॥
दिंगबरा ! तुझी माया, सूर मोहले जीयां, न तरवे, जाण, आत्मा साधन-क्रीया ॥२॥

६) दत्ते धेनूचे मी वत्स धाकुलें वो ! वत्स धाकुलें वो !
मागुताहें येकु पान्हा वो ! कैसी देउं निघाली ! लागो नेदी मज थाना वो !
कैसें लल्लाट माझें ! बोलूं मी ठेउ हा कवणा? वो ! मी पोटिचें बाळ आहे नाही कळेना वो ! ॥१॥धृ॥
अवो ! अवो ! सुंदरे ! अवो ! सुंदरे ! वो !
अवो ! सुंदरे ! वो ! अवो ! सुंदरे ! वो !
ह्रदय उल्लताहे माझें वो !
दु:ख कवणासि सांगो? आहारु दूजा नेणिजे वो !
नवमास पोटीं होतियें कैसी वो! होतियें कैसी वो !
तुझेनि स्वरसें धाली वो ! जन्मु कां मज दिधला उपेक्षा कासया केली? वो !
आतां येथूनि तर्‍हीं जेथिची तेथें मज घाली वो !
दिगंबरे ! माये ! भारी होती आस केली वो !


N/A

References : N/A
Last Updated : January 30, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP