उत्तरार्ध - अध्याय ४१ वा

हरिवंशांतल्या आर्यारचना आर्याभारताच्याच तोलाच्या आहेत.


बळिपुत्रशतज्येष्ठ, श्रेष्ठगुण, ख्यात दितिकुळीं बाण; ।
शाण तया हीरा तप झालें, जनमेजया ! नृपा ! जाण. ॥१॥
गुहकृत शंकरभजन प्रेक्षुनि, आपणहि तो हरास भजे; ।
भजतीच कुलज भावें, न भजति ते, प्राप्तमोह रासभ जे.॥२॥
होय प्रसन्न भगवान्, वरदेश्वर, देवदेव, हर पावे; ।
“वार माग,” म्हणे ज्याच्या चरणस्मरणेंचि ताप हरपावे. ॥३॥
बाण म्हणे, “दे देवीपुत्रत्वहि, बाहु, उरु, सहस्र मला; ।
तुजसम तूंचि, रविसम न कोणी, जरि तपुनि गुरुसह श्रमला.” ॥४॥
देव वर देव रजनिकरचूड, दयासुरनदीसुमेरुच तो; ।
गौरीस म्हणे, ‘घे सुत, बाण रुचो, गुह जसा उमे ! रुचतो. ॥५॥
वढिल गुह तसाचि रुचो देवि ! तवं मना कनिष्ठ हा तनय; ।
अस्मद्भक्त असुतपा सति ! होय न, नाकनिष्ठ हातनय. ॥६॥
गुहजन्मभूप्रदेशीं व्हावें पुर रम्य नाम ‘शोणित,’ या ।
मी आंगें रक्षीन, स्पर्शेल न अहिततेजृ कोणि तया.’ ॥७॥
दुर्गा पुत्रत्वें घे, अनुजत्वें स्कंददेव बाणातें; ।
बाणातें भजतो द्विज, भक्तातें,शंभु, तुल्य जाणा तें. ॥८॥
पुर ईश्वरें रचविलें अप्रतिम त्रिभुवनांत बाणा या; ।
प्रभुला भक्त प्रिय बहु, हें श्रोत्यांच्या  मनांत बाणाया. ॥९॥
ज्याचा भालद्दगग्नि प्राशी रतिजनिचें शरीराज्य, ।
त्याच्या वरसामर्थ्यें बळिसुत शोणितपुरीं करी राज्य. ॥१०॥
झाला बाहुसहस्त्रें वीर्यमदोत्सिक्त बाण अतितेजा, ।
रणकाम धरी, भीती शक्रादि सलोक लोकपति ते ज्या. ॥११॥
स्कंदें या स्वभ्रात्या स्वध्वजवाहनमयूर दिधला, हो ! ।
प्रेमें शिवा म्हणे,“जें रत्न जगीं, तें अनेकविध लाहो.” ॥१२॥
गंधर्व, यक्ष, राक्षस, न टिकति समरांगणीं, न वा सुर तें; ।
उरते घन वायुपुढे, तरि अरि बाणासि संगरीं पुरते. ॥१३॥
सुर मणति, “या जयश्री जोडुनि देतो महामद नविच कीं. ।
ईश्वरतेज म्हणेना कां हो ! तेजोंतरा ‘वदन विचकीं’,” ॥१४॥
गुंरु हरिस म्हणे, “वर्थचि न, वरूनि तपा नवा, सुकिव देहा. ।
बा ! बाण असहय तुला, गरुडरणीं कां न वासुकि वदे ‘हा !’?” ॥१५॥
प्रतिभटमात्र सुदुर्लभ बाणाला, त्रिभुवनीं नसे अन्य, ।
कष्टी चित्तीं तेणें, जरि केला ईश्वरें असा धन्य. ॥१६॥
बळिसुतभुजा क्षम नग न, वारण हरिहरिनखा जसें नाहीं. ।
एकाचीहि सुरांच्या हरिली हरि ! हरि ! न खाज सेनांहीं. ॥१७॥
प्रभुतें नमुनि पुसे तो बाण असें कीं, “मज श्रम स्फार ।
देती रणाविणें हे भुज, भुजगवरांगदा ! वृथा भार. ॥१८॥
जें अचळत्व, द्दढत्व, न धरिति नग, लहोनि बाहुला जे तें, ।
खाजेतें न सहाती, पावति वंध्येच्छ बाहु लाजेतें. ॥१९॥
होइल नि:सीम कधीं भुजकंडूप्रशमहेतु युद्ध ? वद, ।
ब्रम्हांडीं मज नाहीं समरसम रस प्रगल्भ उद्धवद.” ॥२०॥
“हौनि असपत्न,” म्हणे जो प्रभु बळिसूनुतें, “विशंक रहा,” ।
तो त्याच्या या कामें वदला, कितवाप्त तेंवि शंकर ‘हा !’ ॥२१॥
शंकर हांसुनि सांगे, “जरि काम तुझ्या मनांत संगर हा, ।
तरि बा ! निजध्वजाचा वांच्छितपूरक पहात भंग रहा. ॥२२॥
जेव्हां ध्वजभंग तुझा, होयिल तेव्हां महासमर जाण.” ।
ऐसें प्रभुचें वचन श्रवण करुनि, फार हर्षला बाण. ॥२३॥
प्रभुतें बाणासुर तो स्तवि, सविनय बहु पुन:पुन्हा नमुनी; ।
ज्ञानक्षीरधिलाभें वाटे झाला सुखी असा न मुनी, ॥२४॥
प्रभुनें आज्ञा देतां, वंदुनि गेला स्वकीय सदनातें ।
जेथें तो ध्वज, तेथें बैसे चिंतीत कामकदनातें. ॥२५॥
स्मित करुनि म्हणे, “कथिन, प्रिय कुंभांड प्रधान जो, त्यातें, ।
बळिमोक्षादि महोदय वर चिंतुनि परमहृष्ट होत्यातें.” ॥२६॥
कुंभांड पुसे, “सांगें, सुवरा पावोनि, हर्ष वीरा ! ज्या, ।
त्या ऐकों दे; न तुला भलतासा लाभ हर्षवी, राजा !” ॥२७॥
सांगें बाण सविस्तर वरदवरप्राप्त युद्धवर हा या, ।
कुजतगृहीं सुजन, तसा त्याच्या ह्रदयीं न उद्धव रहाया. ॥२८॥
कुंभांड म्हणे, “म्हणतो देवांच्या बहु यशें न शोभ नगा, ।
त्या ऐसें मागावें ? केलें, राजा ! तुवां न शोभन, गा !” ॥२९॥
वदति असें, तोंचि ध्वज सहसा पावोनि भंग, तो खचला, ।
सुरमुनि म्हणे, “अमर ! हो ! रण पाहूं, व्हावयासि तोख, चला.” ॥३०॥
शोणितपुरांत शोणित वर्षे घन; भूमि पावली कंपा; ।
शंपा उल्काहि, पडे, म्हणती उत्पात, “असुर हो ! संपा.” ॥३१॥
बहु युद्धोत्सुक बाण ध्वजभंगें कां यथेष्ट नाचेना ? ।
कुंभांड म्हणे, “होतां उत्पात, बुडेल हे न कां सेना ? ॥३२॥
दिसतें अनिष्ट भारी, परि लघिल शंभुतें न, न गुहातें; ।
हें तेज, जें उपासिति मुनिवर्य वरुनि महावनगुहा, तें. ॥३३॥
न मिरविल च्छत्र शिरीं, तैसेंचि समत्त बाण हा चवर, ।
कीं मागे प्रभुपासीं दाटूनि, म्हणावयासि ‘हा !’ च, वर.” ॥३४॥
बाण प्राशी हर्षें, संगें घेवूनियां सुरामा, ती, ।
जी श्रीची, कीर्तीची, पुण्यर्धींची, करी सुरा माती. ॥३५॥
एके समयीं शिव करि देवीसह सन्नदीतटीं केली, ।
ज्या प्रभुने, स्वीकारुनि, करुणाचि विभूषणीं पटीं केली. ॥३६॥
गंधर्व, अप्सरा बहु होत्या सेवेंत, चित्रलेखा या ।
प्रभुतें मोहूं पाहे, रूप धरी सत्य मित्र लेखाया. ॥३७॥
हांसे प्रभु, देवीही समजे तीच्या तशाहि परि सोंगा, ।
किंचित् कोपे, लंघन साहे न, असा वशाहि, परिसों गा ! ॥३८॥
देवीच्या आज्ञेनें देवीचें  रूप अप्सरा धरिती, ।
पार्षदहि शंभुरुप, भ्रांत क्षणमात्र ते तिला करिती. ॥३९॥
त्यास्तव अंशें झाली कुंभांडसुता वराप्सरा, बापा ! ।
रामा जातिस्मृति ती प्रभुंच्या बहु मानवे मनीं शापा. ॥४०॥
सेवेंत नगसुतेच्य त्या बाणाची सुता उषा होती, ।
पाहे प्रभुसीं क्रीडा देवीची निकटवर्तिनी हो ! ती. ॥४१॥
इच्छी अनुरूपसुगुणपतिसीं क्रीडा तसीच ती धन्या. ।
समजे, स्मित करुनि, म्हणे तीतें ती श्रीहिमाद्रिची कन्या. ॥४२॥
“वत्से ! करिसिल तूंही ऐसीच प्रियतमासह क्रीडा,”।
या श्रीदेवीवचनश्रवणें आलींत पावली व्रीडा. ॥४३॥
“पतिलाभ घडेल कधी ?” ऐसें जों ती उषा मनीं आणी, ।
तेंही समजोनि, वदे श्रितकल्पलता शिवा अशी वाणी. ॥४४॥
“जो रमवील स्वप्नीं वैशाखद्वादशीनिशाकाळीं ।
कन्ये ! तो दयित तुझा, तूं त्याचें वचन सर्वदा पाळीं, ॥४५॥
दे तृप्ति वरें मतिला, जसि दधिपृथुकें नवें तुषातीतें; ।
दैत्यसुतादिस्वसखीजनसह वंदुन बिघे उषा तीतें. ॥४६॥
सखिया हंसति, हंसविति, म्हणती, “वांच्छितवरा उखा लाहो, ।
स्वप्नीं लग्न, वर्‍हाडी आपणचि ! भव्य यश गाती. ॥४८॥
न निजे जेवी, सेवी न जळहि, तांबूलही न ती चावी, ।
पांडुत्वातें देह प्रतिपळ अतिशक्तिहीन तीचा वी.॥४९॥
निंदी शीतकरातें, सेव्यहि वाटे तिला असेव्य जन, ।
आर्द्रहि नलगेचि,’ म्हणे, ‘भाजितसे तापलें असें व्यजन.’ ॥५०॥
पुसति वयस्या, “होतें काय तुला ? सांग, न व्यथा राहो. ।
क्लेशासि, स्वजनह्रदय, मृदु हेंहि न आंग नव्य थारा हो. ॥५१॥
सखि ! न तुझा राहों दे शत्रुमनामाजि गर्व लव तात, ।
यातें शिवप्रसादें प्रबळहि लोकेश सर्व लवतात.” ॥५२॥
प्रभुजलकेलिविलोकनसमयापासूनि फार माते, तें, ।
दासी कथिति उषेच्या देहींचें व्याकुलत्व मातेतें. ॥५३॥
माता धांवुनि आली, प्रियकन्येतें विलोकितो झाली; ।
चित्तीं बहु ती भ्याली, घर्माच्या, अश्रुच्या, भरें न्हाली. ॥५४॥
आलिंगी, कुरवाळी, वदवी, परि किमपि ती सुता न वदे, ।
दावी चिकित्सकांला, तीस परम भय तिचें सुतानव दे.  ॥५५॥
पटु वैद्य वदति, “देवि ! स्वस्थ रहा, ईस लागली द्दष्टी, ।
कीं अति सुंदरपण हें, न असें अन्यत्र, शोधितां सृष्टी. ॥५६॥
अभिषेक करा, उतरा सर्षप, लावा मुलीस आंगारा, ।
सांगा रामकवचमनुपाठ; सुधा जवळि असुनि, कां गारा ?” ॥५७॥
वदल्या चतुरा नारी, “केला देहीं प्रवेश तारुण्यें. ।
पति शीघ्र उषेसि मिळो पितृवात्सल्यें महेशकारुण्यें.” ॥५८॥
त्याउपरि भगवतीनें कथिल्या काळीं उषा सखीसहिता ।
निजहर्म्यवरीं निजली, स्वप्नीं पाहे तसेंचि ती महिता. ॥५९॥
देवीवरसामर्थें अतुळें, नागोत्तमें जसी नागी, ।
स्वप्नीं सभोगचिन्हा पुरुषवरें होय भोगिली जागी. ॥६०॥
झाले ते नव संगीं, होतात विकार भोगलीला जे, ।
कुळदूषण मानी, भी, प्रबळ विटें जेंविं भोगली लाजे. ॥६१॥
कुंभांडसुता रामा तीस म्हणे, “सखि ! धरूं नको ताप, ।
घडतां स्वप्नीं संग, स्त्रीसहि, पुरुषासही, नसे पाप. ॥६२॥
स्मर वर, सखि ! अखिलेश्वरदयिता वदली, तसेंचि हें घडलें; ।
जडलें कंठीं चिंतारत्न, क्लेशांत ह्रदय का पडलें ? ॥६३॥
ईश्वररक्षितशोणितपुरपतिकन्येसि तुज बळें भोगी, ।
तो गीष्पतिहुनि, हरिहुनि, कवि, तेजस्वी, महेशसम योगी. ॥६४॥
तुज जो कांत शिवेनें दिधला, तो त्रिभुवनीं असामान्य; ।
सखि ! तूं धन्या, कन्या कोण दुजी ? पति जिचा असा मान्य. ॥६५॥
न कळे सुर, कीं दानव, मानव; या नवस करुनि, रतिचोरा ।
बांध द्दढ प्रेमगुणें, प्राप्त हो देवि ! कीर्ति तुज थोरा.” ॥६६॥
रामेसि उषा प्रार्थी, “प्रियसखि ! न सुचेचि, मन्मति भ्रमली; ।
तूं सांग उपाय, सुजनजिव्हा नच सांगतां हित श्रमली.” ॥६७॥
रामा सांगे, “कार्या करिल निजा तेंवि चित्रलेखा या, ।
कविंनीं न सुमैत्रीहुनि कल्पलतेतें विचित्र लेखाया. ॥६८॥
तत्काळ अप्सरा ती प्रभुपौत्रीनें समीप आणविली, ।
पडुनि गळां, अतिपीडा, वांच्छा, विनवूनि तीस, जाणविली. ॥६९॥
देवी तीस म्हणे, “सखि ! हें कार्य अशक्य;  कींन न कुल, शील, ।
देशहि, लोकहि, ठावा; परि विरहें तू उरांत उलशील. ॥७०॥
याकरितां लिहितें मी, त्रैलोक्यामाजि पुरुष जे महित ।
सुरदानवयक्षोरगराक्षसगंधर्वमानवांसहित. ॥७१॥
परि दिवस चित्रपट्टीं लागतिल मला लिहावया सप्त, ।
पाहुनि पावसिल प्रिय, तोंवरि तव मन उषे ! न हो तप्त.” ॥७२॥
प्राप्तसुखा वदलि उखा, “तुज जन परिपाल्य आलि ! हा, याचें ।
स्मरण असोंदे, मतिमति ! घेउनि साहित्य जा लिहायाचें. ॥”७३॥
देवस्त्री ती आणी पट्टांतें सप्त दिन सदा लिहुनी, ।
प्रिय संसारांत करी, सेविल संपत्तिहि न सदालिहुनी, ॥७४॥
उकलुनि, उषेसि देवी लिहिला तो चित्रपट्ट नव दावी; ।
दुर्गावरशक्तिच ती, स्वर्वेश्याबुद्धिशक्ति न वदावी. ॥७५॥
देवासुरादि सुपुरुष जे चित्रपटांत रेखिले होते, ।
सादर सर्व उषेण्नें, वळखाया दयित,  देखिले हो ! ते. ॥७६॥
नंदाचें भाग्य म्हणे, ‘व्रज तारायासि, वळ खिलारा,’ ज्या, ।
त्या प्रभुचा पौत्र परम सुंदर अनिरुद्ध वळखिला, राजा ! ॥७७॥
वदली स्मित करुनि उषा, “रतितस्कर हाच साच जाणावा, ।
सखि ! कोणाचा कोण, ध्यानीं त्वां प्रथम नीट आणावा. ॥७८॥
कुल, शील, नाम, याचें प्रथम मला त्वा अशेष कळवावें, ।
मग मी कथिन उचित ते, जन्मुनि पितृयश सये ! न मळवावें.” ॥७९॥
सांगे देवी, “ज्याची कीर्ति निवविती, सुधा जसी तप्ता, ।
त्या श्रीकृष्णप्रभुचा सखि ! अनिरुद्धाख्य होय हा नप्ता. ॥८०॥
सखि ! धन्या तूं, तुज हा योग्य पति प्रथितकीर्ति, शिवशील; ।
निवशील, श्री आजी याची, तीच्या पदांसि शिवशील.” ॥८१॥
ती तीस म्हणे, “सखि ! करि, बहुत न लावूनि दिवसू, भेटि कसी; ।
सेवेंत शिवेच्या तूं शीलितयोगींद्रशिवसभे टिकसी.” ॥८२॥
देवी म्हणे, “जसें हें प्रभुसंरक्षित, तसेंचि कीं पुर तें; ।
तेथें प्रवेश दुर्घट सहसा, आयुष्य साहसें पुरतें. ॥८३॥
सखि ! तूं साहस न करीं, रक्षीं मज, आपणास, जनकास; ।
साध्या कार्याविषयीं घाली स्वपरार्थ सुज्ञ जन कास.” ॥८४॥
ती तीस म्हणे, “आहे तुज मायायोगही सुतनु ! ठावा; ।
कोण,म्हणेल ? अमृतरस पुष्कळ असतां करीं, सुत नुठावा. ॥८५॥
जीवितसंदेहा, कीं कामार्त न वंशदूषणा, पाहे; ।
साहे सर्वस्वक्षय, देवि ! तुला सर्व ठावुकें आहे. ॥८६॥
चित्तांत मरणनिश्चय, वदतें, बाहून आण, जागे हा; ।
आल्यें शरण तुला मी, सखि ! पति पाहूनि, आण, जा, गेहा.” ॥८७॥
देवी बदली. “जात्यें, म्हणसि, मज स्तवुनि, ‘साहसीं आण;’ ।
करिल भगवती करुणा, कीं वदसि ‘मरेन,’ वाहसी आण.” ॥८८॥
वदुनि असी गुप्तपणें ती प्रभुच्या नित्यनव पुरा गेली, ।
कीं, कीर्ति, सदुपकारीं करितां श्रमपात्र न वपु, रागेली. ॥८९॥
द्वारवतीप्रति पावे, प्रभुभवननिकट नभीं सुधी राहे, ।
पाहे अनिरुद्धहरण विभुसि कळायासि, युक्ति धीरा हे. ॥९०॥
मज्जन करीत होता श्रीनारदमुनि, तयासि पाहून, ।
तो आपणासि पाहे, तों कर जोडी, समीप राहून. ॥९१॥
पाहुनि देवर्षि पुसे, “वद, कां या द्वारकेसि आलीस ? ।
एकाहि चित्रलेखें ! नाणूनि समागमें स्व आलीस.” ॥९२॥
पायां पडेचि, देवी ती बहु विनयें तदा नमुनि, पाहे; ।
आगमनहेतु सांगे, पावुनियां अभयदान, मुनिपा हे. ॥९३॥
वृत्त सविस्तर परिसुनि, करि सुनिपुण तोदया दयालु बरी; ।
या आवडली बहु हे, जो भोआ जन जसी तया लुबरी. ॥९४॥
दे तामसी सुविद्या, अभय प्रभुकडिलही, तिला गाया; ।
मुनि भाविरणें हर्षें, जो कारण साधुरीति लागाया. ॥९५॥
मग ती अनिरुद्धातें पाहे, जाऊनि रम्य गेहांत, ।
ज्याच्या ऊषाविरहज्वर दु:सह सुप्रवृद्ध देहांत. ॥९६॥
उपभोग जिचा स्वप्नीं, चिंतित होता उषेसि चित्तांत; ।
तद्रूपीं तो तैसा, लुब्ध जसा हृष्ट नष्टवित्तांत. ॥९७॥
चिंती उषेसि तो त्या, प्रेमें हृदयांत राम सीते ज्या; ।
त्यासीं वदे, स्त्रियांतें मोहुनि, पसरूनि तामसीतेज्या. ॥९८॥
“अनिरुद्धा ! यदुवीरा ! शुशल असे कीं ? तुला पहायाला ।
आलें, दूती हौनि, मि बाणसुतासखी बहायाला. ॥९९॥
दिघलासि भगवतीनें  जीचा स्वप्नांत तूं समागम, ती ।
मत्प्रियसखी उषा पतिविरहें त्या जानकीसमा गमती. ॥१००॥
प्राण उषेचे विरहीं यावरि यदुसत्तमा ! न वांचावे; ।
ज्ञात्यांहि सुरां, असुरां, स्मर अहि अतिमत्त मानवां चावे. ॥१०१॥
शिरलें असेल ह्रदयीं जरि काय स्त्रीसहस्रही, तरि ती, ।
‘कामयमाना कविनें रक्षवी !’ प्रणति तुज असी करिती. ॥१०२॥
आहे तव चित्र दिलें म्यां जें, त्यातें उखा सदा पाहे, ।
म्हणती, ‘अजि नाथ ! गिळों स्मरशर पसरिति मुखास, दापा हे.; ॥१०३॥
बळिसुत शोणितपुरपति बाण, तयाची सुता उखा, लाहो ।
तुज ती, तिस तूं लाहें, बा ! हें यश सत्सभासुखाला हो.” ॥१०४॥
अनिरुद्ध म्हणे, “मज ने, सत्य करीं स्वप्न, रक्ष तीस, मज; ।
जी उपकृति अत्यार्तीम, देवि ! स्वल्पाहि लक्ष ती समज. ॥१०५॥
तुज सत्य चित्रलेखे ! वाटो, स्वप्नीं विलोकिली, परि ती ।
करिती खरीपरिसही बहु विकळ, मन क्षणक्षणीं हरिती.” ॥१०६॥
देवी चित्तांत म्हणे, “परमेश्वरि ! पावली उखा यास; ।
चंद्रासि चकोरीसी, सेविल हा जन जगीं सुखायास.” ॥१०७॥
मग अनिरुद्धासि म्हणे, “भेटवितें शीघ्र अंगना, चाल; ।
दोघे परमानंदें, पावुनि अन्योन्यसंग, नाचाल.” ॥१०८॥
श्रीनारददत्ताद्भुत विद्येनें ती तयासि झांकून, ।
घेउनि जाय, करूं दे कोणी पुरुषस्त्रियांसि कांकूं न. ॥१०९॥
शिणितपुरांत ने त्या, न धरूं  दे विरह नेटा वीर ज्या; ।
अनिरुद्धासि, उषेसीं क्षण करुनि विनोद, भेटवी, राजा ! ॥११०॥
ती तीस म्हणे, “अनघे ! धन घे शोधुनि दिलें, उखे ! नाच, ।
दोघें सावध वर्ता, जेणें मन लेशही दुखेनाच. ॥१११॥
वाढे शरजाहृदयीं, नि:सीम, प्रीति, भीतिही, राया ! ।
आधीं सखीस, मग ती आलिंगी साधुरीतिहीरा या. ॥११२॥
बाणात्मजा म्हणे, “सखि ! कैसें हें कर्म गुप्त राहेल ? ।
पाहेल प्रभु जरि, तरि हरिलचि असु, न क्षणार्ध साहेल.” ॥११३॥
ती अप्सरा म्हणे, “गे ! प्रियसखि ! न मनांत काळजी वाहें, ।
वरदापदयुग चित्तीं ध्यात्या हित सर्वकाळ जीवा हें. ॥११४॥
श्रीहरिहरांसि वंदुनि, गांधर्वें सुज्ञ इष्ट संपादी; ।
दुर्गावरविश्वासें सोडी ती सुतनु दैन्यकंपादी. ॥११५॥
कांहीं काळ प्रेमें क्रीडा व्रीडावती करी, राजा ! ।
निववी पतिसंग सुखें, कामदहन तापवी शरीरा ज्या. ॥११६॥
रक्षक दक्ष कपट तें समजुनि, कळविति अनर्थ बाणातें, ।
तो असुरांसि म्हणे, “जें शासन चोरांसि, यासि जाणा तें. ॥११७॥
मत्कुलदूषक दुर्जन माराचि, धरूं नकाचि आळसा, जा; ।
हूं, घ्या शस्त्रें, कवचें, शीघ्र तुम्ही सर्व शत्रुकाळ सजा.” ॥११८॥
या बाणाज्ञेनें तें असुरांचें धांवलें नृपा ! सैन्य, ।
वेढुनि मंदिर, म्हणती ‘मारा’, तो पावली उषा दैन्य, ॥११९॥
बहु भिउनि, रडों लागे, दयिता, त्या बाणवंशभूषेतें ।
अनिरुद्ध स्मित करुनि, स्वमुखें कळवि स्वतेज ऊषेतें. ॥१२०॥
गर्जति दानव, परजति शस्त्रांतें, दांतओंठ ते खाती; ।
संकटसमयीं स्मरली  श्रीनारदमुनिस चित्रलेखा ती. ॥१२१॥
तो भगवान् मुनि गगनीं प्रकटे, हांसे, म्हणे, ‘कुमारा  ! हो ।
निर्भय, हूं, झगड, रगड कटकचटक, चित्रसी उमा राहो.’ ॥१२२॥
हर्षोत्फुल्लवदन, मुनिपद नमुनि, उठे, धरूनि परिघातें; ।
अरिघातें यश मिरवी, असुर बळ म्हणे, “शिखींत न रिघा”तें. ॥१२३॥
त्या हर्म्यद्वाराच्या कवळूनि करें सलील परिघास, \
पळवी, पळ वीर गमे तो दीप्त ज्वलन नूर्त, अरि घास. ॥१२४॥
पाहुनि असुरभटकदन, देवर्षि म्हणे, “भला ! साधो ! ।
बाधो न त्रास तुला, जा कोणासहि न लाभला साधो. ॥१२५॥
हतशेष क्षतजोक्षित भट म्हणती, “रक्ष, रक्ष,” बाणातें, ।
तो अन्यासि म्हणे, “रे ! जा, कुलदूषण समूळ खाणा तें.” ॥१२६॥
पुनरपि वीर अयुतश; प्रेषी द्वेषी मदांध तो बाण, ।
प्राण हराया गेले, परि न शकति आपुलेंचि ते त्राण, ॥१२७॥
तच्छस्त्रांहींच रणीं केलें तत्कदन मदनतनयानें, ।
न्यायापुढें टिकावें कैसें, बहुतहि झटोनि, अनयानें, ॥१२८॥
शोणितपुरांत शोणितपूरीं घाली परांसि आंघोळ, ।
न करिल करिकटकाचा कंठीरव एकही न कां घोळ ? ॥१२९॥
वरचर्मखङ्गधर परकदन करी तो कुमार मदनाचा, ।
त्याचा सिंहरव म्हणे सुरमुनितें , हरुनि दैत्यमद, “नाचा.” ॥१३०॥
मेलेम, बहुत पळाले, सोडुनि बाणा, सहाय ‘हा !’ करिती, ।
याची परांत पडली नच म्हणवायास ‘हाय !’ हाक रिती. ॥१३१॥
होतां बळभंग, बहु क्रोधें ह्रदयंत बाण तो कढला, ।
ज्यासि सहस्र हय, अशा दशनल्व रथीं मग स्वयें चढला. ॥१३२॥
कुंभांड करुनि सारथि, नानायुधधर सहस्रबाहु निघे, ।
हांसे अनिरुद्ध, ‘भला !’ म्हणुनि मुनि मुखें तयासि बाहुनि घे. ॥१३३॥
तों बाण “धरा, मारा,” ऐसें क्रोधें वदे, करी लगट; ।
ऊषा भिउनि बहु रडे, तीस गमे स्वपतिला करील गट. ॥१३४॥
तीतें अनिरुद्ध म्हणे, “मज यापासूनि लेश भय नाहीं, ।
स्वस्थ रहा, अधिक न हा, सुमुखि ! पहा शुद्ध युद्ध नयनांहीं. ॥१३५॥
वीरसुता तूं सुज्ञे ! पडुनि गळां ठाकशीं समरसिकता, ।
मी यादव कीं, करिता रडुनि गळांठा कशीं समर, सिकता ? ॥१३६॥
बाणप्राण हराया कोपें बाणादि शस्त्र जें सोडी, ।
तोडी खड्गें, चर्मे, उडवी, बहु साधुवाद तो जोडी. ॥१३७॥
असि, मुसळ, शूल, पट्टिश, तोमर, हाणी, सहस्रभुज बाण, ।
तो धीट नीट त्यावरि जाय, म्हणे “हाणिसील किति ? हाण.” ॥१३८॥
बाण उपाय वधाया, येतां अणिरुद्ध निकट, लाख रची; ।
ईषा खंडुनि, तद्धरि, हौनि अनिरुद्ध, चिकटला खरची. ॥१३९॥
त्यातें बळिसुत झांकी बहु विशिखप्रमुखशस्त्रवर्षानें, ।
‘मेला अनिरुद्ध,’ असें मानुनि, गर्जति सुरारि हर्षानें, ॥१४०॥
घनजालातें रविसा क्षिप्र विदारूनि शस्त्रजालातें, ।
बाहिर निघे, सुरांला बहु नवल गमे तशांत जाला तें. ॥१४१॥
पार्श्वीं उडोनि येताम बाणानें देखिला स्वजामाता, ।
केवल न उषेचीच, स्कंदाचीहि प्रसन्न ज्या माता. ॥१४२॥
‘कन्या होइल विधवा,’ ऐसें चित्तांत बाण तो नाणी; ।
सोडी शक्ति महोग्रो, सुरजनही ‘हा !’ असी नबीं वाणी. ॥१४३॥
येतां प्रद्युम्नावरि वन्हिज्वाळा भयानका वमली. ।
भ्रमली प्रेक्षकजनता, जैसी कृत्या, तसीच ती गमली. ॥१४४॥
पाठविली बाणानें जी कृत्यासी करावया कवळ, ।
अतिवेगें कृत्यासी, आली जों उग्र शक्ति ती जवळ, ॥१४५॥
धरिली त्या अनिरुद्धें, गरुडें भुजगी, तसीच उडुनि करें, ।
स्तविला तो सुरनिकरें जेंवि शरत्पूर्ण चंद्र, उडुनिकरें. ॥१४६॥
मूर्च्छित केला प्रभुच्या पौत्रें त्या शक्तिनेंचि तो बाण, ।
प्राण व्याकुळ झाले, शकला न करावया निजत्राण, ॥१४७॥
त्यातें कुंभांड म्हणे, “तूं विषय असा वधा न हो, माया ।
प्रकटीं शीघ्र न शकसिल या अरिस असावधान होमाया.” ॥१४८॥
तो सावधान आधीं, गुप्त रथामात्यसहित होय मग, ।
वर्षें सर्पशर, म्हणे, “कुळदूषक, धृष्ट, अहित हो यमग.” ॥१४९॥
फणिकुळ चंदनतरुला, अतिरुद्धा त्यासमान वेढी, गा ! ।
त्या मुनि मानी बाणा, कीं नागांच्या न मानवे ढीगा. ॥१५०॥
मंत्री म्हणे, “दिसतसे वर पुरुष, करीं विचार, बा ! राया ! ॥१५१॥
ज्याच्या देहीं दिसतें तेज सुदु:सह अरीस अधिक रणीं, ।
उत्तरमीमांसेच्या जैसें पहिल्यापरीस अधिकरणीं. ॥१५२॥
कोणाचा हा ? कवणें तव गेहीं आणिला ? कसा आला ? ।
झाला बहुमत तनयाहृदयाला, मारिसी कसा याला ? ॥१५३॥
त्वदधिकबळ गांधर्वें वरिला वर हा, तुझी उषा कन्या ।
धन्या, कीं हे राजा ! अन्याय स्पष्ट अर्पितां अन्या. ॥१५४॥
बा ! तूं दशशतभुज, हा द्विभुज, तदपि वद, पिनाकिपुत्रास ।
तुजं द्ता झाला कीं नाहीं समरांगणांत उत्त्रास ? ॥१५५॥
रूप कसें ? तेज कसें ? प्रभुहि वधिल वामदेव तात न या, ।
चतुरा आहे, पाहें, या पुरुषीं कामदेवता तनया. ॥१५६॥
क्षतविग्रह, विग्रहपटु; कृतविग्रहहि, ग्रहप्रवरतेजा, ।
वदन पहा, भय लेशहि,  बांधुनि, देती न सर्पशर ते ज्या.” ॥१५७॥
ऐसें हित, विहित वदे जें मंत्री, मान्य धन्य तो करि तें; ।
कीं सन्नीतिसुरभिचें न पडे, पडतेंचि अन्यतोक रितें. ॥१५८॥
रक्षक अनिरुद्धनिकट ठेवुनि, तो बाण जाय गेहातें; ।
गेला मुनिहि कथाया तें त्या लीलामनुष्यदेहातें. ॥१५९॥
चित्तीं अनिरुद्ध म्हणे, “मुनिवर सांगेल वृत्त हें हरिला, ।
अरिला मर्दिल, मदगद कोणाचा न प्रभूत्तमें हरिला ?” ॥१६०॥
बाणसुता, ती पतिगति अति कष्टा पाहतां, रडे, मोहे. ।
अनिरुद्ध म्हणे, “प्रभुला कळविल मुनि भीरु ! मद्दशा तो हे. ॥१६१॥
येतिक बळ कृष्ण प्रभु, तूं शोकाचळभरें नको चिरडों; ।
स्वप्ननिधनसम हा श्रम, अंतीं होइल बरें, नकोचि रडों. ॥१६२॥
मरतिल बळबाहुरवें, दामोदरदररवेंचि देवारी; ।
गळतिल गर्भ वधूंचे, तूं या दु:संगतीस दे वारी.” ॥१६३॥
ऐसें जरि सत्य कथी परमेश्वरपौत्र वीर तो, तरि ती ।
अरितीक्ष्णत्वें ऊषा चिंता चित्ताम्त जाहली करिती. ॥१६४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 01, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP