मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
पूर्व समुद्रीं छटा पसरली ...

अरुण - पूर्व समुद्रीं छटा पसरली ...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


पूर्व समुद्रीं छटा पसरली रम्य सुवर्णाची
कुणीं उधळिली मूठ नभीं ही लाल गुलालाची ?
पूर्व दिशा मधु मृदुल हांसते गालींच्या गालीं.
हषनिर्भरा दिशा डोलती या मंगल कालीं,
क्षितिजाची कड सारविली ही उज्ज्वल दीप्तीनें,
सृष्टिसतीनें गळां घाललें कीं अनुपम लेणें ?
हे सोन्याचे, रक्तवर्ण हे, हे पिवळे कांहीं,
रम्य मेघ हे कितेक नटके मिश्रित रंगांहीं,
उदरांतुनि वाहते कुणाच्या सोन्याची गंगा,
कुणीं लाविला विशुद्ध कर्पुररस अपुल्या अंगा ?

अरुण चितारी, नभ:पटाला रंगवितो काय ?
प्रतिभापूरित करी जगाला कीं हा कविराय ?
कीं नवयुवती उषासुंदरी दारीं येवोनी
रंगवल्लिका रम्य रेखिते राजस हस्तांनीं ?
दिवसयामिनीं परस्परांचें चुंबन घेतात -
अनुरागाच्या छटा तयांच्या खुलल्या गगनांत !
स्वर्गीच्या अप्सराच अथवा गगनमंडळांत
रात्रीला शेवटचीं मंगल गीतें गातात ?
किंवा ‘माझी चोरुनि नेली मोत्यांची माला’
म्हणुनि नभ:श्री रुसली, आली लाली गालांला ?
कीं रात्रींचें ध्वांत पळालें, आशेची लाली
उत्साहाशीं संगत होऊनि ही उदया आली ?
किंवा फडके ध्वजा प्रीतिची जगता कळवाया,
कीं आपणांवर आज पातली हीच खरी विजया ?
कीं स्वर्गींच्या दिव्यांचें हें फुटलें भांडार,
जणूं वाटतें स्वर्गच त्यासह खालीं येणार !
प्रगट जाहलें श्रीरामाचें पुष्पक किंवा हें ?
कीं सोन्याची पुरी द्वारका लखलखते आहे ?

“तेजानें न्हाणितें जगाला कोण सखे बाई ?
नवल अगाई ! तेजोमय तूं ? तेजोमय मीही !”
परस्परांना दिशा म्हणाल्या प्रेमळ वचनांनीं
“विरहकाल संपला गा गडे प्रेमाचीं गाणीं !
या मेघाच्या कुंजामध्यें ही लपली कोण ?
तिला बोलवा - पुरे गडे ग ! हा तुमचा मान !
अम्ही गवळणी हृदयरसांनीं पूजूं प्रेमाला,
प्रेमकाल हा ! म्हणोत कोणी अरुणोदय याला,
पूर्वदिशेशीं गोफ खेळतो कृष्णागडी बाई !
उधळित सोनें सर्व तयाच्या लागूं या पायीं,
मधुस्मितानें विश्व भरूं ग ! शंकित कां म्हणुनी ?
सर्व सारख्या ? हांसावें मग कोणाला कोणीं ?”
गोफ चालला गगनमंडळीं, रंग नवा आला,
त्यांत लागला कृष्णाचा कर पूर्वेच्या गाला,
विनयवती ती पूर्वदिशा मग अधोवदन झाली,
तों प्रेमाची अदभुत लहरी वसुधेवर आली !

या प्रेमाच्या लाटेखालीं मस्तक नमवावें,
हें आम्हांला, ब्रम्हांडाला, देवाला ठावें,
परंतु ही बघ भूदेवी तर वेडावुन गेली,
टकमड पाहत स्वस्थ बैसली या मंगल कालीं !
दंवबिंदूचा - नव्हे नव्हे ! हा  पडदा लज्जेचा -
मुग्धपणाचा, बालपणाचा, कोमल हृदयाचा -
निजवदनाहुनि या प्रौढेनें दूर पहा केला,
योग्यच अथवा, प्रेम न मोजी क्षुद्र लौकिकाला !
प्रेमातिशयें मला वाटतें विसरुनि जाहल ही
प्रिय नाथाचा आगमनोत्सव हा मंगलदायी,
कविते ! तिजला साहय तूंच हो, तूंही पण वेडी !
परंतु वेडाविण सुटतिल का हृदयाचीं कोडीं ?
जा जा ! आतां लाजुं नको ग ! पाहुं नको खालीं !
लाजच अथवा - खुलशिल तूंही या मंगल कालीं,
या लज्जेनें कविमानस हें होऊनियां लोल,
प्रेमचंचले ! प्रेमच तुजवर मग तें उधळील !
प्रेमावांचुनि फेड कशानें प्रेमाची व्हावी ?
हा बघ सविता प्रेमळ भूतें प्रेमानें नटवी !

हा प्रेमाचा लोंढा वरुनी आला हो आला
भव्य गिरींनो ! निजशिखरांवर झेलुनि घ्या याला,
नील झग्याला वेलबुटी तो तुमच्या चढवील,
‘निगा रखो !’ येईल तुम्हांला सरदारी डौल !
कविवाणीचा स्फूर्तियुक्त मग होतां अभिषेक,
तट्स्थ होऊनि तुम्हांस बघतिल हे सारे लोक !
सुवासिनींनो, वनदेवींनो, डोला ग डोला !
नटवा, सजवा वनमालेला तुमच्या बहिणीला !
वनमालांनो हळूंच हलवा हा हिरवा शेला,
सूत्रधार हा नभीं उदेला, उधळा सुमनांला !
‘जय’ शब्दानें आळविण्याला लोकनायकाला
नभोवितानीं द्या धाडुनि ही विहगांची माला !
सरोवराच्या फलकावरतीं स्वर्गाच्या छाया
कुणी रंगवा, कुणी फुलांवर लागा नाचाया !
वेलींच्या वलयांत बसोनी गा कोणी गाणीं,
या झाडावर त्या झाडावर हंसत सुटा कोणी.
कोणीकुणी या नदीबरोबर नाचत जा बाई,
प्रपातांतही बसुन गा कुणी मंजुळ शब्दांहीं,
उष:कालच्या सुगंध, शीतल मृदृल मंद वाता !
विहार कर, ये पराग उधळित अवनीवर आतां !
या कोमल रविकिरणांवरतीं स्वर्ग बसुनि आला,
सख्या मारुता, गाउनि, गाणीं झोंके दे त्याला !

ऊठ कोकिळा ! भारद्वाजा ! ऊठ गडे, आतां,
मंगल गानीं टाका मोहुनि जगताच्या चित्ता !
सरिते ! गाणें तुझें सुरांमधिं या मिळवीं बाई !
साध्याभोळ्या तुझ्या गायना खंड मुळीं नाहीं !
पिंवळीं कुरणें या गाण्यानें हर्षोत्कट झालीं,
गाउं लागलीं, नाचुं लागलीं, बेडावुनि गेलीं !
चराचरांच्या चित्तीं भरलें दिव्याचें गान !
मूर्त गान हें दिव्य तयाला गाणारें कोण ?
दिव्य गायनें, दिव्य शांतता, दिव्याचे झोत,
वसुंधरेच्या अरुण ओतितो नकळत हृदयांत !
त्या दिव्यानें स्वर्भूमीचें ऐक्य असें केलें;
त्या दिव्यानें मांगल्याचे पाट सुरू झाले !
मंगलता ती दिव्य कवीला टाकी मोहोनी,
वाग्देवीने सहज गुंफिलीं मग त्याचीं गाणीं,

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP