|
एक एकोऽहम् - एकच ब्रह्म हें एकच आहे. एकच 'सत् स्वरूप' 'एकोऽहम् बहु स्याम्' सर्व सृष्टींतील चराचर वस्तूंच्या उत्पत्तीचें कारकत्व या 'एक' च्या मागें आहे. ([अंकशास्त्र]) एक अग्नि, एक सुर्य आणि एकच उषा एकच अग्नि अनेक ठिकाणीं प्रज्वलित होतो, एकच सूर्य जगभर प्रकाश पाडतो व एकच उषा सर्व विश्व प्रकाशित करते. एकापासूनच हा सर्व पसारा झाला आहे. ([ऋग्वेद ८-५८-२]) एक आत्मा जगदात्मा. एककरपद्धति -(अर्थशास्त्र) सर्व कर काढून टाकून फक्त जमिनीच्या उत्पन्नावरच कर बसविण्याचें तत्त्व म्हणजे सर्व करांचें एकीकरण. ([म. श. को.]) एक खांबी ज्या कुटुंबांत फक्त एकच कर्ता माणूस राहिला आहे त्यास लावतात. एकटाच कर्ता पुरुष असलेलें घर. एक चक्त सूर्याचा रथ (प्रामाणिक हिंदी कोश) एकतत्त्ववाद या जगांत फक्त एकच सत्य तत्त्व आहे, मग तें भौतिक असो अथवा आध्यात्मिक असो. या तत्त्वज्ञानविषयक मतास एकतत्त्ववाद म्हणतात. ([म. ज्ञा. को. विभाग ९]) एक तिथि अखंड तिथि म्हणजे सूयोंदयापासून कर्मकालपर्याप्त असलेली म्हणजे पूर्ण. एकदंत गणपति. एकदन्ताय विद्महे। वक्रतुण्डाय धीमहि। तन्नो दन्ती प्रचोदयात् । (गणपति अथर्वशीर्षम्). 'नमन तुज एक्दंता। एकपणें तूंचि आतां' ([ए. भा. १-२]) एकनाड पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या जन्मनक्षत्रावरून आद्य, मध्य व अन्य अशा तीन नाडी ठरलेल्या असतात. जन्मनक्षत्रानुसार येणारी नाडी एकच असेल तर अशा स्त्री - पुरुषांचा विवाह होत नाही. त्यास 'एकनाड' आली असें म्हणतात. एक परमेश्वर परब्रह्म वा परमेश्वर (ईश्वर एकच आहे). एकवाणी, एकवचनी आणि एकपत्नी मर्यादापुरुषोत्तम श्रीरामचंद्र. तद् ब्रूहि वचनं देवि राज्ञो यदभिकांक्षितम् । करिष्ये प्रतिजाने च रामो द्विर्नाभिभाषते ॥ ([वा. रा. अयोध्या १९-३०]) द्वि : शरं नाभिसंधत्ते रामो द्विर्नाभिभाषते। ([सु.]) एक मूळप्रकृति आदिमाया. एकाक्ष एका डोळ्यानें आंधळा, शुक्राचार्य. एकाक्षरी मंत्र (अ)"ॐ". हें ईश्वराचें उत्तमोत्तम प्रतीक. यासच एकाक्षर ब्रह्म. शब्द ब्रह्म किंवा ॐ कार म्हणतात. ओमिति ब्रह्म। ओमितींद सर्वम् ([तैत्तिरीय शिक्षावल्ली]) ॐ इत्येतदक्षरमिदम् ([मांडुक्य]) (आ) द द द म्हणजे दमन, दान आणि दया. प्रजापतीनें अनुक्रमें देव, मनुष्य व असुर या आपल्या तिन्ही अपत्यांस हा एकाक्षरी मंत्र दिला. ([बृहदारण्यक अ. ५-२]) एक देव देव एकच आहे. एको देव : सर्वभूतेषु गूढ :। सर्व व्यापी सर्वभूतान्तरात्मा (श्वेताश्वेतर ६-११) एकेरी मार्ग मृत्यूचा रस्ता. या रस्त्यानें जातां येतें ; पण परत येता येत नाही. एक वेद, एक देव व एकच वर्ण पूर्वी एकच वेद, सर्व वाड्मयात्मक प्रणव (ओंकार) एकच, नारायण हा एकच देव, एकच अग्नि, एकच वर्ण व एकच भाषा होती. 'एकवर्णा : समा भाषा एकरूपाश्व सर्वश :।' ([वा. रा. उत्तरकांड ३०-१९]) एक एव पुरा वेद : प्रणव : सर्ववाड्मय :। देवो नारायणो नान्य एकोऽग्रिर्वर्ण एव च ॥ ([भागवत स्कंध ९ अ. १४-४८]) एकाच वृक्षा (देह) वरील दोन पक्षी १ जीवात्मा आणि २ परमात्मा. 'द्वा सुपर्णा सयुजा सखाया'. ([मुंडकोपनिषत्]) एक शत्रु अज्ञान हा मनुष्य जातीचा एक महान् शत्रु आहे. 'एक : शत्रुर्न द्वितीयोऽस्ति शत्रुरज्ञानतुल्य : पुरुषस्य राजन् ।' ([म. भा. शांति २९-२८]) एकात्मवाद आत्मा एक आहे व तो सर्वत्र व्याप्त आहे. हा वेदान्त - शास्त्राचा एक मुख्य सिद्धान्त. मूळ सांख्यशास्त्रकारांना एकात्मवाद मान्य नाहीं. ते आत्मे (पुरुष) अनेक मानतात. "जन्मादि व्यवस्थात : पुरुष बहुत्वम् "([सांख्यसूत्र ६-४५]) एकाचें आश्रयानें असणारे एकवीस गुण १ रूप, २ रस, ३ गंध, ४ स्पर्शे, ५. एकत्वम्, ६ पृथक्वम्, ७ परिमाण, ८ परत्व, ९ अपरत्व, १० बुद्धि, ११ सुख, १२ दु:ख, १३ इच्छा, १४ द्वेष, १५ यत्न, २६ गुरुत्व, १७ द्ववत्व, १८ स्नेह, १९ संस्कार, २० अद्दष्ट व २१ शब्द. (शब्द कल्पद्रुम) एकाध्यायी गीता गीतेचा अठरावा अध्याय. 'अठरावो अध्यावो नोहे। हे एकाध्यायी गीताचि आहे। जैं वांसरूचि गाय दुहे। तैं बेळु कायसा ?'। ([ज्ञा. १८-८४])
|