|
न. कोणत्याहि अटीशिवाय शाश्वत , वंशपरंपरेची स्थावर अशी देणगी ; वृत्ति ; इनामांत पुढील प्रकार आहेत . - वतनी ( सनदी ) व गांवनिसबत . वतनींत गैरउपयोगी ( न्हावी , सुतार , चांभार , चौघुला , शेट्या , मांग , कुंभार , पोतदार , महाजन , कुडबुडे जोशी इ० ) व उपयोगी ( उपाध्याय , गुरव , गांवज्योतिषी , जंगम , काजी , मुलाणा , मुजावर इ० ) परगणे वतनदार ( देशमुख , देशपांडे , देशकुलकर्णी , नाडगौडा , नाडकर्णी , सरदेसाई , सरदेशपांडे , सरदेशमुख , सरपाटील , निरखीदार , देशगत , घाटपांडे , देसाई ), गांवनौकर ( पाटील , कुलकर्णी , मतादार , माधवी , महार , तराळ , बळीकर इ० ), क्षेत्रोपाध्ये . गांवनिसबत ( पासोडी , देवस्थान , हाडोळी , मावळी , धर्मादाय , देणगी , वतनदारी इ० ). सनदी म्हणजे सरकारी करापासून मुक्त व कायमचें दिल्याबद्दल सनद मिळतें तें . शराकती दुमाला म्हणजे गांवांतील उत्पन्नांतून गांवकामगाराचा खर्च वजा जातां बाकी राहणार्या उत्पन्नांत सरकारची हिस्सेरस्सी असते ती . शिवाय अग्रहार , भाकरी , चोळीबांगडी , देवस्थान , कदीम , जदीद , जात , जुडी , कोल्हाटी , मळीकी , राजकीय , साधणूक , शेतसनदी , योगक्षेम , इसाफत , नौकरी , वतनीवजीफा , आलतमघा , इ० इ० ऐन इनामतीमध्यें ब्राह्मणांचीं अग्रहारें व बादशहाचे पीर आणि थडगीं , मशिदी आणि देवस्थानें , फकीर इनाम , मोईन , काजी - मुलाणा , फकीर - तपस्वी , अन्नछत्र वगैरे बाबी येत . - भाअ १८३३ . १३८ . देव , ब्राह्मण वगैरेंना दिलेली भूमि वगैरे . मालकी हक्क न देतां देणें , घेणें , खाणें , सोडणें . हा माड यानें इनाम खाल्ला . आम्ही गाईचें दूध काढीत नाहीं , वासरे इनाम पितात . ( सामा . ) कोणतेंहि बक्षीस ; नजर ; देणगी . [ अर . इनआम ] ०इक्राम पु. भेट ; देणगी , बक्षीस , वृत्ति . - वाडसभा २ . १९६ . [ अर . ] ०इजाफत न. देणगी वाढवून देणें ; देणगीची वाढ ; इनामांत घातलेली भर ( कांहीं कामगिरी केल्याचा मोबदला म्हणून वाढवून दिलेलें इनाम . ) ०इजाफतदार वि. इनाम इजाफत मिळालेला ; वाढलेलें इनाम उपभोगणारा . ०चिटणावळ स्त्री. इनामावरील सरकारी बाब किंवा कर . [ हिं . ] ०चिठ्ठी पु. वेगवेगळ्या इनामांची यादी , तपशील ( जिल्ह्यातील , किंवा तालुक्यांतील ). इनामपत्र ; इनामपट्टा , इनामखत . ०चौकशी स्त्री. इनामपाहणी पहा . ०चौथाई स्त्री. इनामाचा चौथा हिस्सा ( सरकारांत भरणा करावयाचा ). ०जमीन स्त्री. एखाद्या मोठ्या कामगिरीबद्दल सरकारांतून बक्षीस मिळालेली सारामाफीची जमीन . ०तिजाई स्त्री. इनाम जमिनीच्या उत्पन्नाचा तिसरा हिस्सा . हा कर सरकार सहा किंवा दहा वर्षांनी वसूल करी . - शारो ४० . पूर्ण अथवा सर्वस्वी इनाम नसलेल्या इनामी जमिनीवरील सार्याचा तिसरा भाग . इदलशाही दिवाणांत हक्कचौथाई व इनामतिजाईंच नव्हती - रा ३ . ११७ . [ फा . ] ०दार पु. इनाम धारण करणारा ; इनामी जमीनीचा मालक ; वतनदार . [ फा . इन + आम + दार ] ०नोकरी स्त्री. गांव , महाल , परगणा यांची महसुली , फौजदारीसंबंधानें गावकी , घरकी कामें करणार्या गांवकामगांरांनां व परगणे अमलदारांना इनाम जें देण्यांत आलें तें ; काळीचें उत्पन्न , ( स्वामित्व नव्हे ; ) म्हणजे महसूल घेण्याचा अधिकार ; किंवा इनाम जमीन धारण करणार्यांना महसुलाची सर्वस्वीं अथवा अंशत : सूट देण्यांत आली ती . इनाम मिळकती दोन प्रकारच्या असतात . - प्रत्यक्ष ( दुमाला ) आणि अप्रत्यक्ष ( परभारा ). पहिल्या प्रकारांत इनामदारांना सबंध गांव , महाल किंवा गांवांतील सर्व जमीन दुमाला करुन देत आणि धारा वसूल करण्याचा राजाधिकार हा त्यांना देत . दुसर्या प्रकारचें इनाम ऐन किंवा नक्त किंवा ऐनजिनसी असे . धारा वसूल करुन आपल्या खजिन्यांतून सरकार इनामदारांना जी ठराविक नेमणूक रोकडीनें आदा करी तिला नक्त इनाम म्हणत आणि जमीन धारण करणाराकडून इनामदार परस्पर ठराविक घुगरी म्हणजे दर बिघ्यास किंवा नांगरास धान्याचीं अमुक मापें घेत ती ; अथवा बाजारहाटांत विकावयास आलेल्या मालाची शेव - फसकी किंवा वाणगी घेत ती , यांना परभाराहक्क किंवा ऐनजिनसी इनाम म्हणतात . - गागा २९ . ४० . ०पट्टी ताजम - स्त्री . पु . इनामदारावर बसविलेली पट्टी , कर . हा कर दर तीन वर्षांनीं जेवढें उत्पन्न असेल तेवढा बसवीत , जेवढें त्या वर्षाचें उत्पन्न असेल तेवढा घेत . ०पत्र न. इनाम दिल्यासंबंधींचें खत , सनद ; इनाम दिल्याचें राजपत्र ; सरकारनें कोणास इनाम दिल्यास त्याबद्दल पुढील चार सरकारी हुकूम निघत -( अ ) खुद्द इनामदारास , ( आ ) इनाम गांव अथवा जमीन ज्या परगण्यांत आहे त्या परगण्याच्या मामलेदारास , ( इ ) त्याच परगण्याच्या . देशमुख देशपांड्यास , ( ई ) इनाम असलेल्या गांवच्या पाटील - कुलकर्णी वगैरे मुकदमास . ०परभारा पु. सरकारांतून न घेतां परभारें गांवाकडून वसुल करण्यांत येणारें इनाम . ०पासोडी स्त्री. गांवकामगारांना जी किरकोळ जमीन इनाम देतात त्याबद्दल व्यापकतेनें योजावयाचा शब्द . जसें :- पाटलास पासोडीसाठीं ; कुलकर्ण्यास रुमालासाठीं , पोतदारास घोंगडीसाठीं ; महारास जोड्यासाठीं ; भटास धोतरासाठीं , वगैरे इनाम दिलेल्या जमिनीबद्दल . ०पाहणी स्त्री. दिलेल्या इनामजमिनींची पाहणी , तपासणी . ०फैजावी स्त्री. जमिनीवरील सरकारसार्याच्या एकतृतीयांशाइतका दरसाल सरकारांत करावयाचा भरणा . [ अर . ]
|