|
पु. आकाशांत दिसणारा एक कलायुक्त व सूर्यप्रकाशित गोल ; पृथ्वीचा उपग्रह ; नवग्रहांतील दुसरा ग्रह ; चंद्रमा ; चांद ; चांदोबा ; सोम . २ मुसलमानी तारीख . आज चंद्र तेरावा माहे मोहरम . ३ ( ल . ) कित्येक गाई , म्हशी इत्यादिकांच्या तोंडावर जो पांढरा ठिपका असतो तो . ४ स्त्रिया कपाळावर जी अर्धचंद्राकृति गोंदतात ती कोर . ५ मोराच्या पिसांतील डोळा . ६ चंद्रामृत . तैसें शरीर होये । जे वेळीं कुंडलिनी चंद्र पिये । - ज्ञा ६ . २५९ . ७ ( तंजा . ) स्त्रियांच्या नाकांतील एक अलंकार . ८ डोक्यांतील एक चंद्राकार दागिना . [ सं . ] ( वाप्र . ) ( सुतानें ) चंद्र ओवाळणें - द्वितीयेच्या दिवशीं दिसणार्या नूतन चंद्रावरून सूत किंवा दशी ओवाळणें . यामुळें नूतन वस्त्रे मिळतात अशी समजूत आहे . ०पिकणें पूर्ण चंद्रबिंबाचा प्रकाश पडणें . चंद्र पिकलासे अंबरीं । तें पिक घ्यावें कीं चकोरीं । - कथा १ . ८ . ६२ . ०मोहरणें ( माण . ) चंद्र उगवणें . चंद्रानें कोंबडा करणें - चंद्राला खळें पडणें . म्ह० चंद्रम दिवटे दिवम थाळी =( व्यंगोक्तीनें ) अत्यंत दरिद्रावस्था ; ज्याच्या घरांत चंद्र हा दिवटीचें काम करतो व नागवेलीचें पान थाळीच्या ऐवजीं उपयोगई पडतें . सामाशब्द - ०कर पु. १ चंद्रकिरण . हारपती कां चंद्रकर फांकतां जैसे - ज्ञा १८ . ४०६ . २ चंद्रकळा लुगडें . थाट करुनि मार नेसली चंद्रकरकाळी । - मसाप १ . १ . २ . ०कला कळा - स्त्री . १ चंद्राची कला ; चंद्रबिंबाचा षोडशांश २ एक प्रकारचें एक रंगी लुगडें ( तांबडे अथवा काळें ). चंद्रकला गंगा जमुना = उभार व आडावण काळें , किनार एक बाजू हिरवी एक बाजू तांबडी असें एक स्त्रियांचें वस्त्र . ३ चंद्राचा प्रकाश , किरण . जैसें शारदीयेचे चंद्रकळे - । माजीं अमृत कण कोंवळे । - ज्ञा१ . ५६ . ०कांत पु. एक काल्पनिक रत्न , मणि ; चंद्राचे किरण यावर पडले असतां यास पाझर फुटतो असा समज आहे . अहो चंद्रकांतु द्रवतां कीर होये । परि ते हातवटी चंद्रीं कीं आहे । - ज्ञा ९ . २९ . ०कांती वि. चंद्रकांताचा बनविलेला ( चष्मा ). [ सं . ] ०कोर स्त्री. चंद्राची कोर ; किनार . ( कु . ) १ चंद्रकोरेच्या आकाराचें एक सुवर्णाचें शिरोभूषण या कोरेला लागूनच नाग व विष्णुमूर्ति कोरण्याची हल्लीं नवी तर्हा निघाली असून याच्या पुढच्या बाजूस घागर्या लावितात . २ ( कों . ) कपाळावरची कुंकवाची अगदीं बारीक लहान कोर . [ चंद्र + कोर ; तुल० सं . चंद्रकेयूर ( - राजवाडे भाअ १८३४ ) ] ०ग्रहण न. चंद्रास लागणारें ग्रहण . ग्रहण पहा . पृथ्वीच्या छायेंत चंद्र आला असतां त्याला ग्रहण लागतें तें . [ सं . ] ०घार घारी - स्त्री . ( विनोदार्थी ) कानशिलावर लावलेली चपराक ; चापटी ; मार . ( क्रि० दाखवणें , देणें ). मुष्टिमोदक चंद्रघार्या दिल्या म्हणजे विद्या येते . [ चंद्र + घार ( पक्षी ) ] ०चकोरन्याय पु. चंद्र अमृतबिंदू स्त्रवतो व चकोर सेवन करतो त्यावरून असणारा चंद्र व चकोर यांमधील संबंध . ०चूड शेखर - पु महादेव ; शंकर . याच्या जटेंत चंद्रकला असते यावरून . [ सं . ] ०जोत ज्योति - स्त्री . १ चंद्रासारखा प्रकाश देणारें दारूकाम ; हवाई ; याचे निरनिराळे प्रकार आहेत - सफेत , तांबडी , लाल , हिरवीगार , पिवळी , अस्मानी , किरमिजी , गुलेनारा , आबाशाई , जांभळी , नारिंगी , प्याजी . चंद्रज्योती चंद्राकार । तेजें अंबर प्रकाशे ॥ - ह २ . १२९ . २ ( व . ) मोंगली एरंड . याच्या बिया विषारी असतात , परंतु जाळल्या असतां चंद्राप्रमाणें प्रकाश पडतो . ३ चांदणें ; चंद्रप्रकाश . ४ ( उप . ) कुटुंबांदिकाला लागलेला कलंक , डाग . ५ डोळयांत घालावयाचें एक औषध . [ चंद्र + ज्योति ] ०ज्योत्स्ना स्त्री. ( काव्य ) चंद्रप्रकाश , चांदणें . मुखीं चंद्रज्योत्स्ना अवयव यथापूर्व बरवे । ०घणी स्त्री. मनाची तृप्ति . जाऊं चोरूं लोणी । आजी घेऊं चंद्रघणी । - तुगा २२८ . ०नक्षत्र न. चंद्राधिष्ठितं नक्षत्र [ सं . ] ०पर्व न. चंद्रग्रहणाचा काल , अवधि . [ सं . ] ०प्रभा स्त्री. रससिंदूर , सुवर्णभस्म , अभ्रकभस्म हीं सर्व समभाग , सर्वांबरोबर खैराचा कात , मोचरस घेऊन सर्वाचा एकत्र खल करून सावरीच्या मुळयांच्या रसानें एकत्र दोन प्रहर खलून हरभर्याएवढी गोळी करतात ती . ही अतिसारावर गुणकारी आहे . - योर १ . ४३४ . वटी स्त्री. रससिंदूर , सुवर्णभस्म , अभ्रकभस्म हीं सर्व समभाग , सर्वांबरोबर खैराचा कात , मोचरस घेऊन सर्वाचा एकत्र खल करून सावरीच्या मुळयांच्या रसानें एकत्र दोन प्रहर खलून हरभर्याएवढी गोळी करतात ती . ही अतिसारावर गुणकारी आहे . - योर १ . ४३४ . ०फूल न. सोन्याचा एक दागिना . - ऐरापु विवि ४२९ . ०बल बळ - न . चंद्राची अनुकूलता . माणसाच्या जन्मराशीला चंद्राचें साहाय्य . २ ( ल . ) मदत ; साहाय्य . नेदावें चोराशीं चंद्रबळ । - तुगा ३२५३ . ओढून चंद्रबळ आणणें - १ एखादी गोष्ट इष्ट असतांहि वरपांगीं तिच्याविषयीं अनिच्छा दाखविणें ; आढेवेढे घेणें . आजीनें मला हांका मारल्या मी बराच वेळ ऊं ऊं करून ओढून चंद्रबळ आणिलें ... शेवटी दुर्गीनें मला ओढून नेलें . - पकोघे . २ अंगीं प्रतिष्ठा नसतां बळेंच धारण करणें . ( एखाद्यास ) चंद्रबळ देणें - एखाद्यास कांहीं कार्याविषयीं उत्तेजन देणें . - तुगा ३२५३ . ०बाळी स्त्री. ( कु . ) कानांतील एक मोत्यांचा दागिना . चंद्रपश्वा . यामध्यें चंद्रकोरेप्रमाणें हिरकणी बसवितात . ०बिंब न. चंद्राचे बिंब , मंडल , गोल . [ सं . ] ०मजकूर पु. ( व . ) ( विनोदानें ) रोजची चंदी . ०मंडळ न. १ चंद्रलोक ; चंद्रभुवन ; चंद्राचें राज्य . २ चंद्रबिंब . शुध्द चंद्रमंडल पाहून स्नान करावे . [ सं . ] ०मणि पु. एक काल्पनिक रत्न . चंद्रकांत पहा . चंद्रमा - पु . १ चंद्र . मुखचंद्री चंद्रमा । - एरुस्व ७ . १७ . २ ( तंजा . ) एक शिरोभूषण . [ सं . ] ०मुखी वदना - स्त्री . चंद्रासारखें जिचें तोंड आहे अशी रूपवती स्त्री ; सुंदर स्त्री . [ सं . ] ०मूलिका मूळ - स्त्रीन . एक वनस्पति . [ सं . ] ०मौळी पु. शंकर . उठोनियां प्रात : काळीं । वदनी वदा चंद्रमौळी । - भूपाळी गंगेची ६ . नाम जपतां चंद्रमौळी । नामें तरला वाल्हा कोळी । - तुगा २५२२ . - वि . ( डोक्यावर चंद्र धारण करणारा ) ज्याच्या छपरांतून चंद्रकिरणांचा प्रवेश आंत होतो असें ( म्हणजे मोडकळीस आलेलें , जीर्ण झालेलें ) घर इमारत ; पडक्या घराला व्याजोक्तीनें म्हणतात . [ सं . चंद्रमौलि = शंकर ] म्ह० केळीवर नारळी आणी घर चंद्रमौळी . ०रेखा स्त्री. चंद्राची कोर . पाडिव्याची चंद्ररेखा । निरुती दावावया शाखा । - ज्ञा १५ . ४७० . [ सं . ] ०वंती स्त्री. चांदणें . नदीतटीं रात्री न चंद्रवंती । - जगन्नाथ ( शके १६६९ ). राजवाडे ग्रंथमाला ०विकासी वि. चंद्रोदयानंतर उमलणारें ( कमलादि पुष्प ). ०शाला स्त्री. उंच माडी ; गच्ची . चंद्रासही स्पर्शति चंद्रशाळा । - सारुह ५ . २० . ०समुद्रन्याय चंद्रोदयानें समुद्रास भरती येते या न्यायानें . बॉसवेल यास या महापंडिताचें ( जॉन्सनचें ) वक्तृत्वसेवन करण्याची ... अतोनात इच्छा होती व इकडे जॉन्सन यासहि कोणी भाविक श्रोता मिळाला असतां चंद्रसमुद्र न्यायानें त्याच्या वाणीस मोठें भरतें येई . - नि ६८६ . ०सूर पु. ( योगशास्त्र ) डाव्या नाकपुडीनें श्वास सोडणें . याच्या उलट सूर्यसूर . ०सूर्य पु. ( चंद्र आणि सूर्य ) इडा व पिंगला या दोन नाडया . चंद्रसूर्यो बुझावणी । करूनि अनुहताची सुडावणी । - ज्ञा १२ . ५४ . ०सूर्यसंपुट न. वरील दोन नाडयांचें संगमस्थान . बंधत्रयाचीं घरटीं । चंद्रसूर्य संपुटीं । सुये चित्त । - ज्ञा १३ . ५०८ . ०हार पु. स्त्रियांच्या गळयांतील एक अलंकार ; सोन्याच्या कडयांची माळ .
|