|
अष्ट अभिमानस्थानें (अ) १ कुल, २ रूप. ३ तारुण्य, ४ गर्व, ५ तप, ६ संपत्ति, ७ राज्य (अधिकार) आणि ८ विद्या ; (आ) १ जात्यभिमान, २ कर्माभिमान, ३ विद्याभिमान, ४ धनाभिमान, ५ मूर्खपणाचा अभिमान, ६ बलाभिमान, ७ मद्यप्राशन आणि ८ अहंकार. सातवी मद्य प्राशनाची मस्ती। आठवी मस्ती मीपणाची ॥ ([सि. बो. ४७-७७]) अष्त अमात्य (रामायणकालीन) १ धृष्टि, २ जयंत, ३ विजय, ४ मुराष्ट्र, ५ राष्ट्र्वर्धन, ६ अकोप, ७ धर्मपाल आणि ८ सुमंत्र. धृष्टिर्जयन्तो विजयः सुराष्ट्रो राष्ट्रवर्धनः। अकोपो धर्मपालश्च सुमन्त्रश्चष्टमोऽर्थवित् ॥ ([वा. रा. बाल. ७-३]) अष्ट आत्मगुण (अ) १ अनसूया - निर्मत्सरता, २ भूतदया, ३ सहनशक्ति, ४ अनायास - क्षुद्र कामासाठीं शरिरास कष्ट न देणें, ५ मांगल्य, ६ दैन्यवाणें नसणें, ७ अंतर्बाह्म - पवित्रता आणि ८ अभिलाषबुद्धि नसणें. (भ. ब्राह्म.) (गौतमस्मृति). (आ) १ दया, २ क्षमा, ३ अनसूया, ४ शौच. ५ उद्वेग हीनता, ६ मंगल, ७ अकार्पण्य - उदारता आणि ८ अस्पृहा - निष्कामता. ([आश्चलायन गृह्मसूत्र]) अष्ट आद्य गोत्र प्रवर्तक १ कश्यप, २ अत्रि ; ३ भरद्वाज, ४ विश्वा - मित्र, ५ गौतम, ६ जमदग्नि, ७ वसिष्ठ आणि ८ अगस्ति. ([म. भा. उपसंहार]) अष्ट आयुधें (श्रीकृष्णाचीं) १ शंख, २ चक्र, ३ गदा, ४ पद्म, ५ गोश्रृंग, ६ गोवर्धन, ७ पांवा व ८ मुरली. भागवतांत वर्णन केल्याप्रमाणें ही अशी अष्टभूजा असलेली मूर्ति मोहाडी (जि. नाशिक) येथें आहे. (केसरी १४-९-५६) अष्त आयुधें (देवीचीं) १ खड्ग, २ शूल, ३ गदा, ४ चक्र, ५ शंख, ६ धनुर्बाण, ७ भुशुंडी व ८ परिघ. ([दुर्गा सप्तशती १-८०]) अष्ट आय (आकार - स्वरूप) १ ध्वज, २ धूम, ३ सिंह, ४ श्वान, ५ बृषम, ६ खर, ७ गज आणि ८ उंट. जागेच्या लांबीरुंदीच्या गुणाकारास आठाने भागून जी बाकी (जो अंक) राहील तीस आय म्हणतात. वास्तूसाठीं नियोजिलेल्या क्षेत्राच्या क्षेत्रफळास आठांनीं भागून जो शेष राहतो त्यास आय म्हणतात. असे आय आठ आहेत. (शिल्पशास्त्र) सभा रचिली येवेळीं। आठही आय साधिलें तळीं। अष्टदिक्पाळ महाबळी। पायाचे मुळीं स्थापिले ([पां. प्रा. १५-२५]) ध्वजो धूमश्च सिंहश्च शुनको वृषमस्तथा। खरश्चैव गजश्चैव वायसो वास्तु योनयः ॥ (पाशुपततंत्रसमुच्चय) अष्ट उपांगें (वेदाची) १ प्रातिपद - व्याकरण, २ अनुपद, ३ छंद, ४ भाषा, ५ धर्म, ६ मीमांसा, ७ न्याय आणि ८ कर्मसंहिता. अष्ट उपद्वीपें १ स्वर्णप्रस्थ, २ शुक्ल, ३ आवर्तन, ४ रमणक, ५ मंदर हरिण, ६ पांचजन्य, ७ सिंहल आणि ८ लंका. हीं आठ उपद्वीपें जंबुद्वीपाच्या आसमंतात् क्षार समुद्रांत आहेत. ([भाग. स्कंध ५ अ. १९]) अष्त उपरस (अ) १ गंधक, २ गेरु, ३ हिराकस, ४ तुरटी, ५ हरताळ, ६ मनशीळ, ७ अंजन आणि ८ कुकुष्ट. (र. र. समुच्चय); (आ) १ हिराकस, २ गेरु ३ शिलाजित, ४ सुर्मा, ५ गंधक, ६ हरताळ. ७ तुरटी आणि ८ रसकापूर. (रसायनसार) अष्टाध्यायी पाणिनीकृत व्याकरण सूत्रांचे आठ अध्याय अष्ट ऐश्चर्यें १ दासदासी, २ नौकर, ३ पुत्र, ४ बंधुवर्ग, ५ वास्तु, ६ वाहन, ७ धन आणि ८ धान्य. दासी भृत्यःअ सुतो बंधुवर्गस्तु वाहनमेव च। धनं धान्यमिदं प्रोक्तमष्टैश्चर्यं प्रकीर्तितम् ॥ ([सु.]) अष्ट कमल (ह्ठयोग) १ मूलाधार, २ विशुद्ध, ३ मणिपूर, ४ साधिष्ठानचक, ५ अनाहत, ६ आज्ञाचक्र, ७ सहस्त्रारचक्र आणि ८ ब्रह्मरंध्र. हठयोगांत मूलाधारापासून कपालापर्यंत मिन्न मिन्न स्थानीं हीं आठ कमलें मानलीं गेलीं आहेत. त्यांस अष्ठ कमल म्हणतात. अष्टकरिणी १ अम्रभू, २ कपिला, ३ पिंगला, ४ अनुपमा, ५ ताम्रकणीं, ६ शुभ्रदंती, ७ अंगना व ८ अजनावती. या आठ दिग्गज स्त्रिया होत ([गीर्वाण लघुकोश]) अष्टकाल १ निशांत - सूर्योदयापूर्वींचा दोन तासाचा. काल, २ प्रातःकाल, ३ पूर्वाह्ल, ४ मध्याह्ल, ५ अपराह्ल. ६ सायाह्ल ७ प्रदोषव ८ निशा - रात्रीचा समय. असे अहोरात्राचे आठ भाग मानले आहेत. अष्ट कुलाचल १ नील, २ निषध, ३ विंध्याचल, ४ माल्यवान्, ५ मलय, ६ गंधमादन, ७ हेमकूट आणि ८ हिमालय. अष्ट कुमारिका १ दयंती, २ मालिका, ३ कौमुदिका, ४ सुशीला, ५ भाति, ६ उन्नति, ७ पुष्पावती व ८ चंद्रिका. ह्या इंद्राच्या कुमारिका मानलेल्या आहेत. ([कथाकल्पतरु]) अष्ट कृष्ण १ श्रीनाथ, २ नवनीतप्रिय, ३ मथुरानाथ, ४ विठ्ठलनाथ, ५ द्वारकानाथ, ६ गोकुळनाथ, ७ गोकुळचंद्रमा आणि ८ मनमोहन. अशा श्रीकृष्णाच्या आठ प्रतिमांस वल्लभ संप्रदयांत अष्टकृष्ण अशी संज्ञा आहे. ([आदर्श हिंदी शब्दकोश]) अष्टगण (काव्यशास्त्र) अक्षरांच्या - गुरुलघुत्वावरून दिलेली संज्ञागण तीन अक्षरांचा होतो हे आठ असून त्यांची नावे, म, य, र, स, त, ज, भ, व न अशी आहेत. अष्टगण (वर्ग) कवितेंत अक्षराच्या गुरुलघुत्वावरून पाडलेले वर्ग. असे आठ आहेत. गण देवता १ मगण - तिन्ही अक्षरें गुरु, उदा. - माताजी - पृथ्वी. २ यगण - आद्याक्षर लघु, उदा. - यशोदा - आपजल. ३ रगण - मध्यअक्षर लघु, उदा. - रामजी - अग्नि. ४ सगण - अंत्याक्षर गुरु, उदा. - सरिता - वायु. ५ तगण - अंत्याक्षर लघु, उदा. - ताराप - आकाश. ६ जगण - मध्यअक्षर गुरु. उदा. - जटायु - सूर्य. ७ भगण - आद्याक्षर गुरु. उदा. - भारत. - चंद्रमा. ८ नगण - तीन्ही अक्षरें लघु, उदा. - नगर - नाग ([पंचग्रंथी]) अष्त गणेश १ विनायक, २ विघ्नराज, ३ द्वैमातुर, ४ गणाधिप, ५ एकदंत, ६ हेरंब, ७ लंबोदर आणि ८ गजानन. ([अमरकोश]) अष्टगंध (अ) १ चंदन, २ अगरु, ३ देवदार, ४ कोष्टकोळींजन, ५ कुसुम, ६ शैलज, ७ जटामांसी आणि ८ सुरगोरोचन, हीं आठ सुंगधी द्रव्यें एकत्र करून केलेलें गंध ; (आ) १ कस्तुरी, २ केशर, ३ कृष्णागरू, ४ गोरोचन, ५ चंदन, ६ रक्तचंदन, ७ गोपीचंदन आणि ८ मलयागर ; (इ) ([देवीचें])- १ अगरु, २ कस्तुरी, ३ गोरोचन, ४ कुंकू, ५ जटामांसी, ६ नखला, ७ चंदन आणि ८ तगराचें गंध. 'अष्टम तगराचे गंध जाण। गंधाष्टक देवीचे' ([देवी महात्म्य]) अष्टगुण अमात्यपदास आवश्यक १ शुश्रूषा, २ श्रवण, ३ ग्रहण, ४ धारण, ५ ऊहन (अंदाज), ६ तर्क, ७ अपोहन - अविद्या निरसन व ८ असत्तर्क निरसन. ([म. भा. भीष्म अ ८५]) सविलास अविद्या निरसन। अपोहन या नांव। ([ए. भा. १३-१८५]) अष्टगुण (बुद्धीचे) १ शुश्रूषा, २ श्रवन, ३ ग्रहण, ४ धारण, ५ चिंतन, ६ ऊहापोह, ७ अर्थविज्ञान आणि ८ तत्त्वज्ञान. शुश्रूषा श्रवणं चैव ग्रहणं धारणं तथा। ऊहापोहोऽर्थविज्ञानं तत्त्वज्ञानं च धीगुणाः ॥ (का. नीति.) अष्ट गुरु (अ) १ मातापित, २ दाई, ३ कुलोपाध्याय, ४ विद्यागुरु, ५ मंत्र गुरु, ६ उपास्ना गुरु, ७ ब्रह्मज्ञानी व ८ मुक्तिदाता ([पंचग्रंथी]) (आ) १ बोधकगुरु, २ वेदकगुरु, ३ निषेधगुरु, ४ काम्यगुरु, ५ सूचक्गुरु ६ वाचकगुरु, ७ कारकग्रुरु व ८ विहितगुरु. विहितो गुरुमित्येवमष्टधा गुरवोमताः ॥ ([विवेकचिंतामणि]) अष्टग्रही एका राशींत आठ ग्रह असणें या योगाला अष्टग्रही म्हणतात. असा योग साधारणपणें ८००० वर्षांनीं येतो. महाभरतकालीं तसेंच पृथ्वीराज चव्हाणच्या कालीं (अकरावें शतक) हा योग आला होता असें म्हणतात. ते ग्रह असेः - १ मंगळ, २ शनि, ३ चंद्र, ४ रवि, ५ बुध, ६ शुक्र, ७ केतु आणि ८ गुरु होत. या योगामुळें पुथ्वीवर पुराच्या पाण्याचे लोट वा रक्ताचे पाट वहातात. अष्टग्रहैकराशिस्था गोलयोगप्रकीर्तितः। प्लावयन्ति महीं सर्वां जलेन रुधिरेण वा ॥ ([ज्योतिषाशास्त्र]) असा योग सन १९६२ फेब्रुवारींत होता. त्यावेळीं पुण्याजवळील पानशेत धरण फुटलें. (दि. १२ जुलै १९६२) निरनिराळ्या नद्यांनन महापूर येऊन बिहार वगैरेकडे जलप्रलय झाले. अष्ट छाप १ सूरदास, २ कृष्णदास, ३ परमानंददास, ४ कुंभनदास, ५ चतुर्भुजदास, ६ छीतस्वामी, ७ नंददास व ८ गोविंदस्वामी, हे श्रीबल्लभाचार्यांचे प्रमुख शिष्य व आचार्य होत. यांना अष्ट छाप असें म्हणतात. अष्टतारिणी १ देवी भगवतीच्या आठ मूर्ती. १ तारा, २ उग्रा, ३ महोग्रा, ४ वज्रा, ५ काली, ६ सरस्वती, ७ कामेश्चरी व ८ चामुण्डा. ([आदर्श - हिंदी - कोश]) अष्टतारा १ तारा, २ उग्रा, ३ महोग्रा, ४ वज्रा, ५ नीला, ६ सरस्वती, ७ कामेश्वरी व ८ भद्रकाली अशा तारा देवता आठ प्रकारच्या आहेत. (मायातंत्र) अष्टताल अष्टताल ८४ इंच, मानवाची उंची सामान्यतः आठ ताल मानलेली आहेत. नवताल पुरुष हा श्रेष्ठ पुरुष होय. ([संस्कृतिकोश]) अष्ट तैल १ कुसुंब - करडी, २ अतसी - जवस, ३ सर्षप - मोहरी, ४ शिरस, ५ नारळ, ६ करंज, ७ मधु आणि ८ खसखस. अष्ट दर्शन (अ) १ गुरु, २ भाग्यवान्, ३ दाता, ४ कामधेनु, ५ आरसा, ६ प्रमु, ७ सुर्य आणि ८ ईश्वर, ([पांडवप्रताप]); (आ) १ दहीं, २ तूप, ३ आरसा, ४ मोहर्युआ, ५ बैल, ६ गोरोचन, ७ सुवर्ण आणि ८ पुष्पमाला. अष्ट दरिद्री १ अन्न, २ वस्त्र, ३ निवास (घर), ४ भूमि ५ संतती, ६ संपत्ति, ७ आप्तइष्ट व ८ मित्रपरिवार. या आठहि गोष्टींचा, ज्याचे ठिकाणीं अभाव, अशास म्हणतात. अष्टदिशेच्या आठ सिंहाचीं नांवें (शिवछत्रपतींच्या सिंहासनाचे) - सिंहावरील आसन म्हणजे सिंहासन. १ पूर्वेस - सिंह, २ आग्नयेस - हर्यक्ष, ३ दक्षिणेस - नाग, ४ नैऋत्येस - केसरी, ५ पश्चिमेस - मृगेंद्र, ६ वायव्बेस - शार्दूल, ७ उत्तरेस - गजेंद्र आणि ८ ईशान्येस - हरि. (श्रीशिवराज्यभिषके) अष्ट द्वारपाल गौरीचे १ जया, २ विजया, ३ अजिता, ४ अपराजिता, ५ निभक्ता, ६ मंगला ७ मोहिनी व स्तंभिनी, ([Vastushastra. VOL II]) अष्टदुर्ग १ गिरिदुर्ग, २ वनदुर्ग - निबिडअरण्य, ३ गव्हरदुर्ग, ४ गुहा, ५ जलदुर्ग, ६ ग्रामदुर्ग, ७ कर्दमदुर्ग - दलदल व ८ सभोंवती तटबंदी. असे संरक्षणाचे आठ प्रकार प्राचीनकालीं होते. "सप्तमं ग्राहदुर्गं स्थात् कोष्ठदुर्गं तथाष्टकम्६"(दैवज्ञविलास) अष्ट द्वारपाल चंडिकेचे १ वेताळ, २ कोटर, ३ पिंगाक्ष, ४ भुकुटी, ५ धुम्रक, ६ कंकट, ७ राकक्ष व ८ सुलोकन. ([Vastushastra VOL II]) अष्टद्वारपाल (श्रीविष्णूचे) (अ) १ चंड, २ पार्षदचंड, ३ मद्र, ४ सुमद्र ५ जय, ६ विजय, ७ धाता व ८ विधाता ([दु. श. को.]) (आ) १ जय, २ विजय, ३ प्रचंड, ४ चंड, ५ नंद, ६ सुनंद, ७ कुमुद आणि ८ कुमुदांक्ष. नंदाः सुनंदः कुमुदः कुमुदाक्षस्तथैव च। अष्टौ हि द्वारपालाश्च कालाद्या अपि पार्षदाः ॥ ([गुरुड ब्रह्मकांड १७-२]) अष्ट द्वारपाल (श्रीशिवाचे) (अ) १ नंदी, २ भृंगी, ३ रिटी, ४ स्कंद, ५ गणेश, ६ उमामहेश्वर, ७ वृषम आणि ८ महाकाल. ([बृ. ना. पूर्व ६६-८३]) (आ) १ नंदी, २ महाकाल, ३ हेरंब, ४ मृंगी, ५ दुर्मुख ६ पांडुर, ७ सित आणि ८ असित. ([Vastushastra. VOL II]) अष्ट दिक्पाल आठ दिशा पालन करणार्या देवता, १ पूर्वेस - इंद्र, २ आग्नेयीचा - अग्नि, ३ दक्षिणेचा - यम, ४ नैऋत्येचा - निऋति, ५ पश्चिमेचा - वरुण, ६ वायव्येचा - मरुत्, ७ उत्तरेचा - कुबेर आणि ८ ईशान्येचा - ईश. हे अष्ट दिक्पाल होत. ([अमरकोश]) अष्ट दिग्गज १ ऐरावत, २ पुंडरीक, ३ वामन, ४ कुमुद, ५ अंजन, ६ पुष्पदंत, ७ सार्वमौम आणि ८ सुप्रतीक, असे आठ दिशांस ज्यांच्या आधारावर हें सर्व ब्रह्मांड स्थिर होऊन राहिलें आहे. असे आठ हत्ती आहेत. ([बृहन्नारदीय़]) अष्ट देवयोनि (अ) १ ब्रह्मा, २ प्रजापति, ३ देव, ४ गंधर्व, ५ यक्ष, ६ राक्षम, ७ पितर आणि ८ पिशाच ; (आ) १ किन्नर, २ चारण, ३ यक्ष, ४ विद्याधर, ५ गंधर्व, ६ सिद्ध, ७ योगी आणि ८ मुनि. (तुलसी शब्दप्रकाश). (इ) १ अप्सरा, २ गंधर्व, ३ यक्ष, ४ राक्षस, ५ किन्नर, ६ पिशाच, ७ गुह्मक आणि ८ सिद्ध. विद्याधरोप्सरा यक्षःअ रक्षो गंधर्वकिन्नराः। पिशाचो गुह्यकः सिद्धो भूतोऽमी देवयोनयः ॥ ([अमरकोश]) अष्टदेह १ स्थूल, २ सूक्ष्म, ३ कारण, ४ महाकारण, ५ विराट, ६ हिरण्यगर्म, ७ अव्याकृत व ८ मूलप्रकृति. ([दा. बो. १७-८]). अष्ट दैवप्रकार व त्यांचे अधिपती ग्रह १ स्वकर्म - शनि, २ कुलकर्म - राहु, ३ मातृकर्म - चंद्र, ४ पितृकर्म - रवि, ५ संततिकर्म - गुरु, ६ पत्नीसुख - शुक्र ७ बाह्य दैव - बुध व ८ गृहदैव - मंगल. (दैवयोगविचार) अष्ट दोष जैन धर्म शंका, २ कांक्षा, ३ विचिकित्सा, ४ मूढ द्दंष्टि, ५ अनुपगूहन, ६ अवात्सल्य, ७ अस्मितिकरण आणि ८ अप्रभावना, अष्टद्रव्यें १ अश्चत्थ, २ उदुंबर, ३ प्लक्ष, ४ न्यग्रोध, ५ समिध, ६ तिल, ७ पायस व ८ आज्य - हीं यज्ञीय अष्ट द्र्व्यें मानलीं आहेत. ([संस्कृति कोश]) अष्टधातु १ सोनें, २ रुपें, ३ तांबें, ४ कथील, ५ शिसें, ६ पितळ, ७ लोखंड आणि ८ तिखें पोलाद किंवा पारा. अष्ट धामें श्रीविष्णूचीं स्थानें १ त्रिजुगी नारायण - हिमालय, २ मुक्तिनाथ - नेपाळ, ३ बद्रीनाथ, ४ जगन्नाथपुरी, ५ रंगनाथ - श्रीरंगम, ६ गया, ७ पंढरपूर आणि * तिरुपती, अष्टधा प्रकृति (अ) १ प्रकृति, २ मह्त्तत्त्व, ३ अहंकार, ४ शब्द, स्पर्श, ६ रूप, ७ रस आणि ८ गंध. या अष्टधा प्रकृतीपासून व्रह्मांडकोश उत्पन्न झाला. ([भागवत, स्कंध, ३ अ. ११ तळटीप]) (आ) १ पृथ्वी, २ आप, ३ तेज, ४ वायु, ५ आकाश, ६ मन, ७ बुद्धि व ८ अहंकार. शरीर हें या आठ तत्त्वांचे बनलेलें आहे. ([भ. गी. ७-४]) आप तेज गगन। महीं मारुत मन ॥ बुद्धि अहंकार हे भिन्न। आठै भाग ॥ ([ज्ञा. ७-१८]) अष्ट नाग १ अनंत, २ वासुकि, ३ तक्षक, ४ कर्कोटक, ५ शंख, ६ कुलिक, ७ पद्म आणि ८ महापद्म, अशीं नागजातीचीं आठ कुलें. अष्टनायिक (अ) (श्रीकृष्ण स्त्रिया)- १ रुक्मिणी, २ सत्यभामा, ३ जांबवंती, ४ कालिंदी, ५ मित्रविंदा, ६ याज्ञजिती, ७ मद्राअ आणि ८ लक्ष्मणा ; (आ) साहित्यांतील - १ वासकसज्जा, २ विरहोत्कंठिता, ३ स्वाधीनभर्तृका, ४ कलहांतरिता, ५ खंडिता, ६ विप्रलब्धा, ७ प्रोषितभर्तृका आणि ८ अभिसारिका ; (इ) १ गुप्ताअ, २ विदग्धा, ३ लक्षिता, ४ कुलटा, ५ अनुसमना, ६ मुदिता, ७ कन्यका आणि ८ मानन्या ; (ई) १ स्वीया, २ परकीया, ३ वेश्या, ४ मुग्धा, ५ प्रौढा, ६ मध्या, ७ मानववती व ८ धीरा, (श्रृंगारनायिका) नायिकांचे एकंदर ११५२ प्रकार भानुभट्ट्कृत रसमंजिरींत बर्णिलेले असून त्यांतील या प्रमुख आठ प्रकारच्या नायिका होत. ([नाटयशास्त्र]) तथा अभिसारिका चैव इत्यष्टौ नायिकाः स्मृताः ॥ ([भ. ना. २२-२०४]) अष्ट निधि १ पद्म, २ महापद्म, ३ मकरनिधि, ४ कच्छपनिधि, ६ मुकुंदनिधि, ६ नंदनिधि, ७ नीलनिधि व ८ शंखनिधि, हे आठ निधि म्हणजे मानवाच्या संपत्तींच्या देवता. या आठहि निधींची अधिकारी देवता लक्ष्मी आहे. ([मार्कंडेय पु. ६८]) अष्ट नृत्यांगना देवलोकींच्या १ घृताची, २ तिलोत्तमा, ३ ऊर्वशी, ४ रंभा, ५ मेनका, ६ सुकेशी, ७ मंजुघोषा आणि ८ पूर्वचिति. "अष्टनायिका नृत्य करिती"([शिवलीलामृत, अ ३]) अष्ट पल्लवी भाषा १ अकंपल्लवी, २ करपल्लवी, ३ नेत्रपल्लवी, ४ शब्दपल्लवी, ५ वाजिंत्रपल्लवी, ६ चातुर्यपल्लवी, ७ भाषापल्लवी आणि ८ ओष्ठपल्लवी, अष्ट पाश (अ) १ घृणा (किळस), २ शंकर, ३ भय, ४ लज्जा, ५ जुगुप्सा (निंदा), ६ कुल, ७ शील आणि ८ जाती. घृणा शङ्का भयं लज्जा जुगुप्सा चेति पञ्चमी। कुलं शीलं च मानं च अष्टौ पाशाः प्रकीर्तिताः ॥ ([सु.]) (आ) १ आशा, २ भय, ३ लज्जा, ४ भीति, ५ जुगुप्सा, ६ काम, ७ क्रोध आणि ८ अतिलोभ. (वेदान्तसूर्य). पाशबद्धो भवेज्जीवः पाशमुक्तः सदाशिवः। या पाशांनीं बद्ध असतो तो जीव आणि त्यांच्यापासूऊन मुक्त असतो तो सदाशिव होय. (स्कंस्कृति - कोश) अष्टपुत्रा सौभाग्यवती भव विवाहित सौभाग्यसंपन्न स्त्रीस आशीर्वाद देण्याविषयींचा संकेत. स्त्रीस किमान आठ पुत्र व्हावेत अशी वैदिक ऋषींचि मागणी असे. अष्टपुत्रा भवत्यं च सुभगा च पतिव्रता। ([ऋग्वेद आठवें अष्टक]) अष्ट पुष्पें (पूजेचीं) १ अहिंसा, २ इंद्रियसंयम, ३ भूतदया, ४ क्षमा, ५ शम, ६ दम, ७ ध्यान, ८ सत्य, या आठ पुष्पांनीं केलेली पूजा भगवंताला प्रिय आहे. अष्ट प्रकार (गणिताचे) १ संकलन - मिळवणी, २ वेवकलन - वजाबाकी, ३ गुणन - गुणाकार, ४ भाजन - भागाकार, ५ वर्ग, ६ वर्गमूळ, ७ घन व ८ घनमूळ. असे गणिताचे आठ प्रकार आहेत. त्यास गणिताचें परिकर्माष्टक म्हणतात. अष्ट प्रतिमा १ शिला. २ मृत्तिका, ३ धातु, ४ रत्न, ५ काष्ठ, ६ वालुका, ७ चित्रलेखन आणि ८ मनोमय. अशा आठ प्रकारांनीं प्रतिमापूजन करतां येतें. ([देवीमाहात्म्य]) अष्ट प्रधान (शिवनिर्मित) (अ) १ पंतप्रधान, २ पंत अमात्य, ३ पंतसचिव, ४ मंत्री, ५ सुमंत, ६ सेनापति, ७ न्यायाधीश आणि ८ पंडितराव, (आ) १ सुमंत्र - आयव्यय प्रविज्ञाता, २ पंडित - धर्मतत्त्ववित्, ३ मंत्री - नीतिकुशल, ४ प्रधान - सर्वदशीं, ५ सचिव - सेनावित् , ६ अमात्य, ७ प्राड् - विवाक - लोकशासनतज्ज आणि ८ प्रतिनिधि - कार्याकार्य प्रविज्ञाता, ([शुक्रनीति]) अष्ट भाव (आध्यात्मिक) १ धर्म, २ ज्ञान, ३ वैराग्य, ४ ऐश्चर्य, ५ अधर्म, ६ अज्ञान, ७ अवैराग्य (आसक्ति) आणि ८ अनैश्चर्य. (शांकरभाष्य) अष्ट भूतगण १ शाकिनी, २ यातुधान, ३ वेताळ, ४ ब्रह्मराक्षस, ५ भूत, ६ प्रेत, ७ पिशाच व ८ प्रमथ ([शिव, पु. अ. ४०]) अष्ट भैरव (अ) भैर्व म्हणजे भयंकर, शिवाचें एक नांव आहे. (अ) असितांग. २ संहार, ३ रुरू भैरव, ४ काल, ५ क्रोध, ६ ताम्रचूड, चंद्रचूड आणि ८ महाभैरव. हीं शिवगणांतील देवतेचीं आठ स्वरूपें होत ; (आ) १ असितांग, २ रुरु, ३ चुणुभैरव, ४ क्रोध, ५ उन्मत्त भैरव, ६ कपाल भैरव, ७ भीषन आणि ८ संहार भैरव. ([ब्रह्मवैवर्त]) (इ) १ शंभुदेव, २ महादेव, ३ त्रिकाळी, ४ विष्णु, ५ काळींद्रि, ६ मणिवर्धन, ७ सुनाम व ८ आलेख ([सि. बो. अ. १९]) अष्ट भोग (अ) १ सुंगध, २ स्त्री, ३ वस्त्र, ४ गायन, ५ तांबूल, ६ भोजन, ७ शय्या आणि ८ पुष्पें. सुगंधं वनिता वस्त्रं गीतं तांबूलभोअजनम् । शय्या च कुसुमं चैव भोगाष्टकमुदह्रतम् ॥ (कायस्थप्रदीप) (आ) १ अन्न, २ उदक, ३ तांबूल, ४ पुष्प, ५ चंदन, ६ वसन, ७ शय्या आणि ८ अलंकार, ([मुक्तेश्वर. सभा. ३-११२]) अष्ट मद (जैनधर्म) (अ) १ ज्ञानमद, २ पूजामद, ३ शरीरमद, ४ कुलमद, ५ जातिमद, ६ तपोमद, ७ धनमद, आणि ८ बलमद ; (आ) १ कुंल, २ दुष्टपणा, ३ धन, ४ रूप, ५ यौवन, ६ विद्या, ७ अधिकार आणि ८ तपस्या. कुलं छलं धनं चैव रूपं यौवनमेव च। विद्या राज्यं तपश्चैव एते चाष्टमदाःअ स्मृताः ॥ (कर्णहंस) (इ) १ धनमद, २ पुत्रमद, ३ राज्यमद, ४ यौवनमद, ५ स्त्रीमद, ६ विद्यामद, ७ स्थानमद आणि ८ पानमद ; (ई) १ देहमद, २ यौवनमद, ३ स्त्रीमद, ४ धनमद हे चार प्रापंचिकद्दया आणि ५ विद्यामद, ६ तपमद, ७ सिद्धिमद आणि ८ ज्ञानमद हे चार पारचार्थिकद्दष्टथा असे आठ मद होत. (निर्पक्षसत्यज्ञानदर्शन) अष्ट मधु १ माक्षिक, २ भ्रामर, ३ रौद्र, ४ पौतिक, ५ छात्र, ६ आर्घ्य, ७ औद्दालक आणि ८ दाल. अशा मधाच्या आठ जाति आहेत. त्यांत माक्षिक मधु श्रेष्ठ मानिली जाते. पित्तिकं भ्रामरं क्षौद्रं माक्षिकं छात्रमेव च। आर्ध्यं औद्दालकं दालंज इत्यष्टौ मधुजातयः ॥ ([सुक्षुत]) अष्टमुद्रा (तंत्रशास्त्र) १ पद्म, २ शंख, ३ श्रीवत्स, ४ गदा, ५ गुरुड, ६ चक्र, ७ खड्ग - व ८ शाङ्र्ग ([ब्रह्म. ६१-५५]) अष्ट मंगल (अ) १ ब्राह्मण, २ अग्नि, ३ गाय, ४ सुवर्ण, ५ घृत, ६ सूर्य, ७ जल आणि ८ राजा. या आठ गोष्टी मंगलप्रद होत ; (आ) १ सिंह, २ वृषभ, ३ गज, ४ पूर्णोदक कुभ, ५ व्यजन, ६ निशाण, ७ वाद्य आणि ८ दीप. मृगराजो बृषो नागः कलशो व्यजनं तथा। वैजयंती तथा भेरी दीप इत्यष्टमंगलम् ॥ ([सु.]) अष्ट मंगलचिह्लें (जैनधर्म) १ मत्स्ययुगुलम्, २ नन्दावर्त ३ मद्रासन, ४ कुंभ, ५ श्रीवत्स, ६ दर्पण, ७ सम्पुट आणि ८ स्वस्तिक. अष्ट मंगल घृत १ वेखंड, २ कोष्ठ, ३ ब्राह्मी, ४ मोहरी, ५ उपळसरी, ६ सेंधेलोण, ७ पिंपळी आणि ८ तूप. यांच्या मिश्रनानें विधियुक्त बनविलेलें तूप. हें बुद्धिवर्धक आहे. ([योगरत्नाकर]) अष्ट मंजरी (विदूषकी अथव थट्टेखोर सख्या) १ रूपमंजरी, २ मंजुलीलामंजरी, ३ रसमंजरी, ४ रतिमंजरी, ५ गुणमंजरी, ६ विलासमजरी, ७ लवंगमंजरी, ८ कस्तुरीमंजरी, ४ रतिमंजरी, ५ गुणमंजरी, ६ विलासमंजरी, ७ लवंगमंजरी, ८ कस्तुरीमंजरी. अशा श्रीकृषणपत्नी राधेच्या आठ सखी होत्या. ([कल्याण ऑक्टो. १९५४]) अष्ट मंत्री (रामायणकालीन) १ वसिष्ठ, २ वामदेव हे दोन ऋषि ऋत्विज, ३ सुयज्ञ, ४ जाबालि, ५ काश्यप, ६ गौतम, ७ मार्कंडेय व ८ कात्यायन, अशी राज्ययंत्रावर नियमन करणारी मंत्रिसंस्था रामायण कालीं होती. वसिष्ठो वामदेवश्च मंत्रिणश्च तथापरे। सुयज्ञोऽप्यथ जाबालिःकाश्यपोऽप्यथ गौतमः ॥ मार्कंडेयस्तु दीर्घायुस्तथा कात्यायनो द्विजः ॥ ([वा. रा. बा. ७-४]) अष्ट मर्यादागिरी १ हिमालय, २ हेमकूट, ३ निषध, ४ गंधमादन, ५ नील, ६ श्चेत, ७ श्रृंगवार आणि ८ माल्यवान् . हे आठ मोठे पर्वत जंबुद्वीपांत असून ते त्यांतील नऊ भागांच्या मर्यादा आहेत. अष्ट महारोग १ वातव्याधि, २ अश्मरी, ३ कुष्ठ, ४ मेह, ५ उदर, ६ भगंदर, ७ अर्श (मूळव्याध), आणि ८ संग्रहणी. ([वाग्भट]) अष्ट मांगल्य १ आरसा, २ फणी, ३ कुंकवाचा करंडा, ४ काजळाची डबी, ५ गंधपात्र, ६ झारी, ७ माप आणि ८ दिवा. हीं आठ शुभ चिह्लें मानिलीं आहेत. हें अष्ट मांगल्या केरळांत विशेषतः सर्व मंगल प्रसंगीं लागतें. (स्त्री मासिक फेब्रु. १९६३) अष्ट महासिद्धि १ अणिमा - शरीर सूक्ष्म्ज होणें, २ महिमा - शरीर मोठें होणें, ३ हलकें होणें, ४ प्राप्ति - सर्व प्राण्यांच्या इंद्रियांशीं त्या त्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवतांच्या रूपानें, संबंध घडाणें, ५ प्राकाश्य - ऐहिक व पारलौकिक स्थानीं भोग व दर्शनाचें सामर्थ्य येणें, ६ ईशिता - मायेची ईशाच्या ठिकाणीं असणारी प्रेरणा, ७ वशिता - आसक्त न होणें आणि ८ प्राकाम्यइच्छा करावी तें सुख अमर्याद प्राप्त होणें. ([ए. भा. १५-४२ ते ४७]) या आठांखेरीज वाटेल ती इच्छा पूर्ण होणें अशी एक"कामवसयित्व"नामक नवबी सिद्धि महासिद्धींतच मोडते असें म्हणतात. (माऊली विशेषांक) अष्ट माता (काव्याच्या) १ स्वास्थ्य, २ प्रतिभा, ३ अभ्यास, ४ भक्ति, ५ विद्वत्कथा, ६ बहुश्रुतता, ७ स्मृतिदाढर्य आणि ८ अनिर्वेद (सनाधान). स्वास्थ्यं प्रतिमाभ्यासो भाक्तिर्विद्वत्कथा बहुश्रुतता। स्मृतिर्दाढर्यमनिर्वेदश्च मातरोऽष्टौ कवित्वस्य ॥ ([सु.]) अष्ट मातृका (देवशक्ति) (अ) १ ब्राह्मी, २ माहेश्चरी, ३ कौमारी, ४ वैषणवी, ५ वाराही, ६ इंद्रणी, ७ चामुंडा आणि ८ महालक्ष्मी. या आठ देवशक्ति, आहेत. विवाहादि मंगलप्रसंगीं यांची पूजा करतात ; (आ) १ रौद्री, २ वैष्णवी, ३ ब्राह्मी, ४ कुमारी, ५ वाराही, ६ नारसिंही, ७ चामुंडा, ८ माहेन्द्री ([काशीखंड]). (इ) १ योगीश्चरी, २ माहेश्वरी, ३ वैष्णवी, ४ ब्रह्मणी, ५ कौमारी, ६ इंद्रजा, ७ यमदंधरा व ८ वराहा. ([वराहपुराण]) अष्ट महाद्वादशी १ उन्मीलनी, २ वञ्जुली, ३ त्रिस्पृशा, ४ पक्षवर्धिनी, ५ जया, ६ विजया, ७ जयन्ती आणि ८ पापनाशिनी. ([ब्रह्मवैवर्तपुराण]) अष्ट महौषधी १ सहदेवी, २ वचा, ३ व्याघ्री, ४ बला ५ अतिबला, ६ शङ्खपुष्पी, ७ सिंही व ८ सुवर्चला. देवाच्या अभिषेकास या आठ महौषधींचा उपयोग करावयाचा असतो. ([मत्स्य. २६७-१४-१५]) अष्ट महारस १ वैक्रान्तमणि, २ हिंगूळ, ३ पारा, ४ हलाहल, ५ कांतलोह, ६ अभ्रक, ७ स्वर्णमोक्षी व ७ रौप्यमाक्षी. ([आयुर्वेद]) अष्ट मूर्ति (अ) १ पृथ्वी, २ आप, ३ तेज, ४ वायु, ५ आकाश, ६ सूर्य, ७ चंद्र आणि ८ ऋत्विंज. या ब्रह्माच्या आठ मूर्ती होत. (वज्रकोश); (आ) (शिवदेवतेच्या)- १ शर्व, २ भव, ३ रुद्र, ४ उग्र, ५ भीम, ६ पशुपति, ७ ईशान आणि ८ महादेव. या शिवदेवतेच्या आठ मूर्ति आठ तत्त्वामध्यें अधिष्ठित आहेत. ([वायुपुराण]) अष्ट मूत्रें औषधी (आयुर्वेद) १ गाय, २ म्हैस, ३ शेळी, ४ मेंढी, ५ हत्तीण, ६ घोडा, ७ गाढवी व ८ उंटीण ([सुश्रुत सूत्र ४५-१०]) अष्त भुजा १ सुरभी, २ ज्ञान, ३ वैराग्य, ४ योनि, ५ शंख, ६ पंकज, ७ लिंग व ८ निर्वाणकम देवीच्या पूजेचे प्रसंगीं करावयाच्या या आठ प्रकारच्या मुद्रा, जपाच्या शेवटीं या मुद्रांचें प्रदर्शन करतात. ([शुक्ल - आह्लिक सूत्रावलि]) अष्ट योगिनी (अ) १ मंगला, २ पिंगला, ३ धन्या, ४ भ्रामरी, ५ भद्रिका, ६ उत्का, ७ सिद्धा आणि ८ संकटा. या पार्वतीच्या आठ सख्या. या शुभाशुभ फल देणार्या आहेत. (आ) १ मार्जनी, २ कर्पूर - तिलका, ३ मलयगंधिनी, ४ कौमुदिका, ५ भेरुंडा, ६ माताली, ७ नायकी आणि ८ जया किंवा शुभाचारा. ([म. ज्ञा. को विभाग ७]) अष्टयंत्रबल सिद्धि प्राचीनकालीं युद्धोपयोगी अशा अष्टयंत्रबल सिद्धि प्रमुख होत्या. हीं आठ प्रकारचीं वाहने, होती, तीं - १ दिव्य विमान, २ पुष्पक विमान, ३ सौभ विमान, ४ सूत विमान, ५ हर्यश्च विमान, ५ हर्यश्च विमान, ६ प्लव विमान, ७ अमृतगवी आणि ८ शिला संतरिणी. (चिंतनके नये चरण) अष्ट रस (अ) १ श्रृंगार, २ हस्य, ३ करुण, ४ रौद्र, ५ वीर, ६ भयानक, ७ बिभत्स आणि ८ अद्भुत. हे आठच रस नाटयशास्त्रांत भरतकालीं मानीत असत. श्रृंगारहास्यकरुणा रौद्रवीरभयानकाः। बीभस्ताद्भुतसंज्ञौ चैत्यष्टौ नाटये रसाः स्मृताः ॥ ([भ. नाटय ६-१६]) (आ) श्रृंगार, वीर, करून आणि हास्य हे चार प्रकृति रस व वीभत्स, रौद्र, भयानक व अद्भुत हे चार गौण रस होत. कोणी कोणी"शांत"हा नववा रस समजतात. निर्वेदस्थायिभावोऽस्ति नवमो रसःअ ॥ ([नासदीय सूक्तभाष्य]) अष्ट रस (अध्यात्म) १ पृथ्वी, २ जल, ३ वनस्पति, ४ मनुष्य, ५ वाचा, ६ ऋचा, ७ साम आणि ८ उद्नीथ म्हणजे ओंकार. हा आठवा श्रेष्ठ रस असें उपनिषदांत मानलें आहे. स एष रसानां रसतमः परम परार्ध्योऽष्टमो य उद्नीथः। ([छांदोग्य]) अष्टलक्ष्मी १ धनलक्ष्मी, २ धान्यलक्ष्मी, ३ घैर्यलक्ष्मी, ४ विजयालक्ष्मी ५ वीरलक्ष्मी, ६ संतानलक्ष्मी, ७ गजलक्ष्मी आणि ८ विद्यालक्ष्मी. अष्टलवण १ पादेलोण, २ ओंवा, ३ अमसुलें, ४ आम्लवेतस हीं एकेक भाग, ५ दालचिनी, ६ वेलदोडा, ७ मिर्यें प्रत्येकीं अर्धा भाग आणि ८ साखर सर्वांबरोबर घालून केलेलें चूर्ण, अष्टलोकपाल १ चंद्र, २ अग्नि, ३ सूर्य, ४ वायु, ५ इंद्र, ६ कुबेर, ७ यम व ८ वरुण, 'अष्टानां लोकपालानां वपुर्धारयते नृपः ॥' ([मनु. ५-९६]) अष्टवर्ग (अ) वर्णमालेंतील आठ वर्ण, अ, क, च, ट, त, प, य, श. ' अकचटतपयश हे ख्यात। अष्टवर्ग असती शास्त्रांत॥"(क. माहात्म्य) अष्टवसु (अ) १ घ्रव, घोर, ३ सोम, ४ आप, ५ नल, ६ अनिल, ७ प्रत्यूष आणि ८ प्रभास, हे आठ चालू मन्वतरांतील धर्मर्षि व प्रचेतसदक्षकन्या वसु हिचे ठायीं झालेले वसुसंज्ञक देव. ([पद्म सृष्टिखंड]); (आ) १ द्रोण, २ प्राण, ३ घ्रुव, ४ अर्क, ५ अग्नि, ६ दोष, ७ वसु आणि ८ विभावसु, ([भागवत]) अष्टवायन १ हलकुंड, २ सुपारी, ३ दक्षिणा, ४ खण, ५ सूप, ६ कंकण, ७ धान्य आणि ८ मणी (एकसर). या आठ सौमाग्यसंपन्न पदार्थांचें वाण देतात. त्यास अष्टवायन म्हणतात. अष्टविकृति व त्यांचे कर्ते ऋषि वेदमंत्रांतील अक्षराचें रक्षण आहेत. १ जटा - व्याडि, २ माला - वसिष्ठ, ३ शिखा - भृगु, ४ रेखा - अष्टा - वक्र, ५ ध्वज - विश्वामित्र, ६ दंड - पराशर, ७ रथा - कश्यप आणि ८ घन - अत्रि. (विकृतवल्ली १-५) (रावण भाष्य) अष्ट विद्येश्चर (अ)१ नंदी, २ महाकाल, ३ चंड, ४ भृंगरिटी, घण्टाकर्ण, ६ पुष्पदंत, ७ कपाली व ८ वीरभद्र. घण्टाकर्णः पुष्पदंतः वीरभद्रकः एवमाद्या महाभागा महाबलपराक्रमाः ॥ ([सिद्धांत शिखामणि]) (आ) १ अनंत, २ सूक्ष्म, ३ शिवोत्तम, ४ एकनेत्र, ५ एकरुद्र, ६ त्रिमूर्ती, ७ श्रींकत व ८ शिखंडी (पाशुपतदर्शन) अष्ट विनायक १ श्रीमोरेश्वर गणनाथ - मोरगांव जि. पुणें, २ श्री - बल्लाळेश्चर - पाली, ३ श्रीगनपति - रांजणगांव, ४ श्रीगजमुखविनायक - कर्जत - नजीक, ५ चिंतामणि - थेऊर जि. पुणें, ६ गिरिजात्मज लेण्याद्रि - जुन्नरजवळ. ७ श्री विघ्नेश्चर - ओझर जि. पुणें आणि ८ श्रीसिद्धिविनायक - सिद्धटेक - दौण्डजवळ. हीं महाराष्ट्रांतील अष्टविनायक स्थानें होत. अष्ट विवाह १ ब्राह्मविवाह - सालंकृत कन्यादान, २ दैवविवाह - यज्ञप्रसंगीं ऋत्विजास दान म्हणून, ३ आर्ष - धन घेऊन, ४ प्राजापत्य - धर्माचरणार्थ कन्यादान देणें, ५ आसुर - शुक्र घेऊन, ६ गांधर्वविवाह - परस्पर अनुमतीनें, ७ राक्षस - जबरीनें कन्यादान करून आणणें, आणि ८ पैशाचविवाह - चोरून आणून विवाह करणें, असे विवाहाचे आठ प्रकार प्राचीनांनीं कल्पिलेले आहेत. ([मनु. ३-२१]) अष्टवृत्ति (मनाची स्थिति - भावना) १ राग, २ करुणा, ३ भीति, ४ काळजी, ५ जिज्ञासा, ६ भावुकता, ७ लज्जा व ८ अभिमान. अष्ट व्यूह (शरीरस्थ) १ अस्थिव्यूह, २ स्नायुव्यूह, ३ पचनेंद्रियव्यूह, ४ अभिसरणव्यूह, ५ श्वासेंद्रियव्यूह, ६ उत्सर्जकव्यूह, ७ शोषणव्य़ूह व ८ मज्जातंतुव्यूह. मानव शरीरांत अंतरिंद्रिंयांच्या नैसर्गिक योजनेच्या ज्या आठ व्यवस्था आहेत. त्यास व्यूह अशी संज्ञा शास्त्रकारांनीं दिली आहे. ([म. ज्ञा. को. वि. २०]) अष्टविध अन्न १ भोज्य, २ पेय, ३ चोष्य, ४ लेह्म, ५ खाद्य, ६ चर्व्य, ७ निःपेय (खीर कण्हेरी इ.) व ८ मक्ष्य, असे आठ प्रकार ([आपटे - कोश]) अष्टविध प्रकार दुधाचे १ गाय, २ म्हैस, ३ शेळी, ४ उंटीण, ५ स्त्री, ६ मेंढी, ७ हत्तीण व ८ गाढवीण. अशा आठ प्रकारच्या प्राण्यांचे दूध (औषधाच्या कामीं) वापरण्याचा सामान्यतः प्रचार आहे. "ऐभमेकशफं चेति क्षीरमष्टविधं स्मृतम्"([अष्टांगसंग्रह सूत्रस्थान]) अष्टविधार्चन १ जल, २ गंध, ३ अक्षता, ४ पुष्प, ५ धूप. ६ दीप, ७ नैवेद्य व ८ तांबूल. या आठ पदार्थांनीं देवतेचें पूजन करतात. नैवेद्यैरपि तांबूलैर्मवेदष्टविधार्चनम् ॥ (वी. प्र. अ. १९) अष्टविध परीक्षा (रोग्याची) १ नाडी, २ मूत्र, ३ मल, ४ जिह्ला, ५ शब्द, ६ स्पर्श, ७ नेत्र व ८ रूप (चर्या). अशी आठ प्रकारची परीक्षा आयुर्वेदांत सांगितली आहे. (नि. र.) अष्टविध पूजास्थानें (परमेश्वराचीं) १ प्रतिमा, २ स्थंडिल. ३ अग्नि, ४ सूर्य, ५ जल, ६ ह्र्दय, ७ ब्राह्मण आणि ८अ गुरु. एवं हीं आठ पूजास्थानें। तुज सांगितलीं सुलक्षणें। तेथलीं पूजेचीं लक्षणें। तें ही भिन्नपणें सांगेन ॥ ([ए. भा. २७-८२]) अष्टविध प्रमाणें १ प्रत्यक्ष, २ अनुमान, ३ उपमान, ४ शब्द, ५ ऐतिह्म, ६ अर्थापत्ति, ७ संभव व ८ अभाव. अशीं आठ प्रमाणें मानिलीं आहेत. (सत्यार्थप्रकाश) अष्टविध प्राणायाम १ सूर्यभेदन, २ उज्जयी, ३ सीत्कारी, ४ शीतली, ५ भस्त्रिका, ६ भ्रामरी, ७ मूर्छा आणि ८ प्लविनी, (ह. प्र.) अष्टविध मूर्ख १ निर्लज्ज, २ शठ, ३ क्लीव, ४ निर्घृण, ५ व्यसनी, ६ अतिलोभी, ७ गर्वित, व ८ निष्ठुर (रत्नकोश) अष्टविध रत्न परीक्षा १ नाम, २ रूप, ३ उत्पत्ति, ४ गुण, ५ दोष, ६ तोल, ७ मोल व ८ शुभाशुभ, अशा आठ प्रकारांनीं करावयाची असते. (रत्नपरीक्षा) अष्टविध समाधि १ यम, २ नियम, ३ आसन, ४ प्राणायाम, ५ प्रत्याहार, ६ धारणा, ७ ध्यान व ८ समाधि, असे समाधि - योगाचे आठ प्रकार. अष्टविधसृष्टि (अ) १ शब्दसृष्टि, २ मानसिकसृष्टि, ३ कल्पनासृष्टी, ४ मायावीसृष्टि, ५ पार्थिकसृष्टि, ६ भावसृष्टि, ७ जडसृष्टि व भूतसृष्टि, (आ) १ कल्पनासृष्टि, २ शाब्दिकसृष्टि, ३ प्रत्यक्षसृष्टि, ४ चित्रलेपसृष्टि, ५ स्वप्नसृष्टि, ६ गंधर्वसृष्टि, ७ ज्वरसृष्ठि, व ८ द्दष्टिबंधनसृष्टि, (दा. वो. ६-६५३) अष्ट व्याकरणशास्त्रकार १ इंद्र, २ चंद्र, ३ काशकृत्स्न, ४ अपिशली, ५ शाकटायन, ६ पाणिनि, ७ अमर आणि ८ जैनेंद्र, हे आद्य शब्दशास्त्रप्रणेते व व्याकरणकार होत. इंद्रश्वन्द्रःअ काशकृत्स्नापिशली शाकटायनः। पाणिन्य्मर्जैनेंद्रा जय्यन्त्यष्टादिशाद्धिकाः ॥ (बोपदेवकृत मुक्तबोध) अष्ट व्यूह (सैन्य रचनाप्रकार) १ भोग (सर्प) व्यूह, २ दंडव्यूह, ३ मंगलब्यूह, ४ सर्वतोभद्र्व्यूह, ५ असह्मव्यूह व ६ असंहतव्यूह ७ विजय व्यूह व ८ गरुडव्यूह असे व्यूहाचे मुख्य प्रकार महाभारत कालीं होते. खेरीज चक्र व्यूह व सूचिमुख असे आणखीहि प्रकार असत. ([म. ज्ञा. को. वि. १९]) अष्ट शक्ति (श्रीविष्णूच्या) १ श्री, २ भू, ३ सरस्वती, ४ प्रीति, ५ किर्ति, ६ शांति, ७ तुष्टि, व ८ पुष्टि, या अष्टशक्ति १ संपत्ति, २ पृथ्वी, ३ विद्या, ४ प्रेम, ५ कीर्ति, ६ शांति, ७ सुख व ८ वल यांच्या देवता होत. ([पद्म. पु.]) अष्ट शिवगण १ नंदी, २ श्रृंगी, ३ भृगिरिटि, ४ गोकर्ण, ५ घंटाकर्ण, ६ वीरभद्र, ७ महाविकट, व ८ शैल. अष्टशुद्धि जपानुष्ठानास आवश्यक १ द्र्व्यशुद्धि, २ क्षेत्रशुद्धि, ३ स्मयशुद्धि, ४ आसनशुद्धि, ५ विनयशुद्धि, ६ मनःशुद्धि, ७ वचनशुद्धि व ८ कायशुद्धि, अशी आठ प्रकारच्या शुद्धि आवश्यक मानली आहे. (मङ्रगल मंत्र - एक अनुचिंतन) अष्ट सात्त्विक गुण १ शोभा, २ विलास, ३ माधुर्य, ४ गांभीर्य, ५ स्थैर्य, ६ तेज, ७ ललित व ८ औदार्य. ([भ. ना.]) अष्ट सात्त्विक भाव (अ) १ कंप, २ रोमांच, ३ स्फुरण, ४ प्रेमाश्रु, ५ स्वेद, ६ हास्य, ७ प्रलास्य आणि ८ गायन, हे शरिराचे सत्त्वगुणांचे आठ भाव - प्रकार आहेत ([हंसकोश]); (आ) १ स्तंभ - गति - निरोधन, २ स्वेद, ३ रोमांचे, ४ विरस्य, ५ वैपथु - कंप, ६ वैवर्ण्य - वर्ण पालटणें, ७ अश्रुपात आणि ८ प्रलय - चेष्टानिरोध ([भ. ना. ७-१४८]); (इ) परमार्थ पथावरील - १ रोमांच, २ स्वेद, ३ अश्रु (शारीरिक) ४ कंप, ५ स्तंभ किंवा ताटस्थ्य (शारीरिक - मानसिक मिश्र) ६ मानसिक, ७ शांति आणि ८ आनंद (मानसिक) ([भ. गी. साक्षात्कार दर्शन]) अष्ट सौभाग्य द्रव्यें १ ऊंस, २ पावटे, ३ जिरे, ४ धने, ५ दूध, ६ करडी, ७ केशर किंवा कुंकू आणि ८ मीठ, या आठ पदार्थांस सौभाग्य अष्टक म्हणतात. 'लवणं चाष्टमं तद्वत सौभाण्याष्टकमुच्यते।' (मल्स्य, अ. ५९) अष्ट स्वभावधर्म १ क्षुधा, २ पिपासा, ३ मल, ४ मूत्र, ५ शीत, ६ उष्ण, ७ भय व ८ निद्रा, हे आठ स्वभाव किंवा देहधर्म होत. अष्ट स्थायीभाव १ रति, २ हास, ३ शोक, ४ उत्साह, ५ क्रोध, ६ भय, ७ निंदा व ८ विस्मय, हे आठ स्वायीभाव. ज्या मनोविकारांस रस ही संज्ञा प्राप्त होते अशा आठ मनोवृत्ति वा रस भरतकालीं साहित्यशास्त्रांत मानले जात. त्यांना स्थायीभाव म्हणत. रतिर्हासश्च शोकश्च क्रोधोत्साहौ भयं तथा। जुगुप्सा विस्मयश्चेति स्थायीभावाः प्रकीर्तिताः ॥ (म. ना. ६-१८) अष्ट क्षार १ पळस, २ निवडुंग, ३ सज्जी, ४ आघाडा, ५ रुई, ६ तील, ७ जव व ८ टांकणखार. अष्टाक्षरी मंत्र (पारमार्थिक) (अ)"ॐ नमो नारायणाय"नमो नारायणेति तारकं मंत्रमुत्तमम् ([रा. गी. १३-११]); (आ)"ॐ नमो बासुदेवाय" (ई)"कृष्ण कृष्ण हरि हरि"; (उ) (वल्लम संप्रदाय)"श्रीकृष्णः शरणं मम"; (ऊ) (व्यावहारिक)"कसें करूं काय करूं." अष्टाक्षरी मंत्र (अ)"ॐ भवति भिक्षां देहि"हा वैदिक अष्टाक्षरी मंत्र - समर्थांनीं लोककार्यार्थ प्रसूत केला. ([दा. बो. १४-२१]) (आ) (वारकरी संप्रदाय)"ज्ञानदेव - तुकाराम"हा वारकरी संप्रदायांत उच्चारला जाणारा व भाविक मनाला मुग्ध करणारा महामंत्र ; (इ)"हरहर महादेव"हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा महामंत्र होय ; (ई)"ॐ भवति मिक्षां देहि"उपनयनानंतर बटूनें प्रथम मातेकडून मिक्षा घेतेसमयीं म्हणावयाचा मंत्र. अष्टावरण १ विभूति लावणें, २ रुद्राक्ष धारण करणें, ३ मंत्र (नमः शिवाय) जपणें, ४ गुरु - आज्ञापालन, ५ लिंगपूजा, ६ जंगमाविषयीं आदर, ७ पादोद्क घेणें आणि ८ प्रसाद, हीं वीरशैव संप्रदायाचीं मुख्य आठ आवरणें अथवा तत्त्वें व आचार आहेत. (कल्यान गो. अंक) अष्टांग योग (प्रकार) १ लययोग २ तारकयोग, ३ अमनस्कयोग, ४ सांख्ययोग, ५ लंबिकायोग, ६ राजयोग, ७ कुंडलीयोग व ८ हठयोग. असे आठ प्रकार, ([पंचग्रंथी]) अष्टांग वैद्यक (अ) १ द्र्व्याभिधान, २ गदनिश्चय, ३ कामसौख्य, ४ शल्यादि, ५ भूतनिग्रह, ६ विषनिग्रह, ७ बालवैद्यक आणि ८ रसायन, हीं आयुर्वेदाचीं आठ अंगें ; (आ) १ कायचिकित्सा, २ बालचिकित्सा, ३ ग्रहचिकित्सा, ४ उर्ध्वांगचिकित्सा, ५ शल्यतंत्र, ६ विषचिकित्सा, ७ रसायन व ८ वाजीकरण. ([वाग्मट अ १]) अष्टांगिक मार्ग (अ) १ सम्यक् द्दष्टि, २ सग्यक् संकल्प, ३ सम्यक् वाचा, ४ सम्यक् कर्मान्त, ५ सम्यक् आजीव, ६ सम्यक व्यायाम, ७ सम्यक् स्मृति आणि ८ सम्यक् समाधि, असे बुद्धधर्मांचें आठ मार्ग ; (आ) १ श्रद्धा, २ संकल्प, ३ भाषण, ४ कृति, ५ धंदा, ६ योग, ७ स्मृति व ८ घ्यान, अष्टांगें (अर्घ्याचीं) १ जल, २ दूध, ३ दर्भाग्रें, ४ दहीं, ५ तूप, ६ तांदूळ. ७ सातु व ८ पांढर्या मोहर्या, या आठ वस्तूंनीं अर्घ्यप्रदान करावयाचें असते. ' यवासिद्धार्थकाश्चेति ह्मर्घ्योष्टांगप्रकीर्तितः। ; (व्रतरत्न) ([भविष्य, पु.]) अष्टांगें (औषधीचीं) - १ मूळ, २ कंद, ३ पान, ४ फळ, ५ पुष्ण, ६ सर्वांग, ७ डिंक व ८ साल, अशीं औषधींचीं आठ अंगें. (नि. र.) अष्टांगें (गायत्रीचीं) १ नाद, २ बिंदू, ३ कला, ४ ज्योति, ५ रूप, ६ रेखा, ७ स्वरवर्ण व ८अ आवृत्ति, (प्रणवोपासना) अष्टांगें (चिकित्सेचीं) १ निदान, २ पूर्वलिंग, ३ रूप, ४ उपशम, ५ संप्राप्ति, ६ औषधि, ७ रोगी व ८ परिचारिका. अष्टांगें (धर्माचीं) (अ) १ देवपूजा, २ धार्मिक ग्रंथांचें पठण, ३ दान, ४ तप, ५ सत्य, ६ क्षमा, ७ इंद्रियनिग्रह आणि ८ निलोंभता. ([म. भा. व. २-७५]); (आ) १ तप, २ सत्य, ३ क्षमा, ४ दया, ५ शौच, ६ दान, ७ योग व ८ ब्रह्मचर्य. ([वामन. पु. अ. २२]) अष्टांगें (नमनाचीं) १ मस्तक, २ छाती, ३ हात, ४ गुडघे, ५ पाय, ६ द्दष्टि, ७ वाणी व ८ मन. हीं नमनाचीं आठ अंगें. या आठ अंगांनीं करावयाच्या नमस्कारास साष्टांग नमस्कार म्हणतात. पद्भ्यां कराभ्यां जानुभ्यामुरसा शिरसा तथा। मनसा वचसा द्दष्टया प्रणामोऽष्टांगमुच्यते ॥ ([सु.]) अष्टांगें (न्यायाचीं) १ स्मृति (निर्बंध) २ न्यायाधीश, ३ पंच - न्यायाचें कामीं सहाय्यक सभासद, ४ लेखक, ५ ज्योतिषी, ६ सुवर्ण, ७ अग्नि व ८ जल, हीं न्यायाचीं आठ अंगें अथवा न्यायसाधनें म्हणून मानिलीं आहेत. अष्टांगें (पात्रतेचीं) १ क्षमा, २ निरिच्छता, ३ सत्य भाषण, ४ दान, ५ सुस्वभाव, ६ सदाचार, ७ तप आणि ८ शास्त्रज्ञान, क्षान्त्यस्पृहा तथा सत्यं दांन शीलं तपःश्रुतम् । एतदष्टांगमुद्दिष्टं परं पात्रस्य लक्षणम् ॥ (ब्राह्म. १७२-३३) अष्टांगें (पुजेचीं) १ पाणी, २ दूध, ३ तूप, ४ दही, ५ दर्म, ६ तांदूळ, ७ जव व ८ सर्षप. ([म. ज्ञा. को. विभाग ७]) अष्टांगें (बुद्धीचीं) १ शुश्रूषा, २ श्रावण, ३ ग्रहण. ४ धारण, ५ चिंतन, ६ ऊहापोह, ७ अर्थविज्ञान व ८ तत्त्वज्ञान, ([म. वा. को.]) अष्टांगें (मैथुनाचीं) १ स्त्रीविषयक चिंतन, २ वर्णन, ३ क्रीडा करणें, ४ कटाक्षयुक्त पाहणें, ५ एकान्तीं भाषण, ६ संकेत, ७ अध्यवसाय (परस्पर निश्चय) आणि ८ प्रत्यक्ष संभोग. स्मरणं कीर्तनं केलिः प्रेक्षणं गुह्यभाषणम् । संकल्पोऽध्यवसायश्च क्रियानिर्वृत्तिरेव च ॥ (वृ. स्मृति) अष्टांगें (योगाचीं) १ यम, २ नियम, ३ आसन, ४ प्राणायाम, ५ प्रत्याहार, ६ ध्यान, ७ धारणा व ८ समाधि. ([पा. योगसूत्रें]) या आठ मार्गांनीं क्रमाक्रमानें साधकाचा होणारा प्रवास हा अष्टांग योग. अष्टांग रतिचक्रांतील (कामशास्त्र) १ आलिंगन, २ चुंवन, ३ नखच्छेद्य, ४ दशनच्छेद्य, ५ संवेशन, ६ सीत्कृत, ७ पुरुषायित व ८ औपरिष्टक. ([नासदीयसूक्त - भाष्य]) अष्टांगें (शकुनाचीं) १ भौम - भूकंप इ., २ उत्पात - उत्कापात, ३ स्वप्न, ४ अन्तरिक्ष - ग्रहाची स्थिति, ५ अंगस्फुरण, ६ स्वर, ७ लक्षण व ८ व्यंजन - शरीरावर नंतर उमटणार्या खुणा. जैनधर्मांत अशीं शकुनाचीं आठ अंगें मानिलीं आहेत. (एस् . एस् . सी संस्कृत दोन दिवसांत) अष्टांगें (शरीराचीं) (अ) ९ शिर, २ कक्ष, ३ ह्रदय, ४ बाहु, ५ ऊरु, ६ जंघा, ७ ढोपरें व ८ पादांगुली. हीं शरिराचीं आठ अंगें. (उड्डीश शास्त्र); (आ) दोन हात, दोन पाय, दोन गुडघे, वाचा व मन अशीं आठ अंगें. अष्टांगें (साधनेचीं) १ सत्यविश्चास, २ नम्रवचन, ३ उच्चलक्ष्य, ४ सदाचरण, ५ सद्वृत्ति, ६ सद्गुणांचें परिपालन, ७ बुद्धीचा सदुपयोग आणि ८ सद्ध्यान. भगवान् बुद्धानें हीं साधनेचींज आठ अंगें सांगितलीं आहोत. ([कल्याण हिं. सं. अंक]) अष्टांगें (सैन्याचीं) १ रथ, २ हत्ती, ३ घोडे, ४ पायदळ, ५ मजूर, ६ नाविकदल, ७ गुप्तहेर आणि ८ टेगळणी पथक, हीं सैन्याचीं आठ अंगें भारतकालीं होतीं. रथा नागा हयाश्चैव पादाताश्चैव पांडव। विष्टिनीवश्चराश्वैव देशिका इति चाष्टमः। ([म. भा. शांति. अ - ५९]) अष्टांगें (संस्कृतीचीं) १ मानवी परिश्रम, २ शासनसंस्था, ३ नीति, ४ धर्म, ५ शास्त्र, ६ तत्त्वज्ञान, ७ वाङ्मय व ८ कला. अष्टांगें वा स्थानें पवित्र गोदावरीचीं १ शिर - ब्रह्मगिरि, २ मुख - पुणतांवे, ३ कंठ - पैठण, ४ मंजरथ - ह्रदयस्थान, ५ शंखतीर्थ (नांदेडजवळळ)- नाभि, ६ कटी - मंथन, ७ जानू - धर्मपुरी, व ८ चरण - राजमहेंद्री (गोदामाहात्म्य) अष्टाधिकार १ जलधिकार, २ स्थलाधिकार, ३ ग्रामाधिकार, ४ ब्रह्मासन (बेलिफाचा अधिकार), ५ कुललेखन, ६ दंडविनियोग, ७ पौरोहित्य व ८ ज्योतिष. अशीं आठ खातीं पूर्वकालीं खेडेगांवांतून असत. ([म. ज्ञा. को. विभाग ७]) अष्टक (अ) ऋवेद संहितेचे पठणाच्या सोयीकरितां आठ भाग केले आहेत. प्रत्येक भागांत आठ अध्याय आहेत. त्या प्रत्येक भागास अष्टक अशी संज्ञा आहे. (आ) आठ वस्तूंचा संग्रह अथवा आठ वस्तूंच्या समुच्चयानें बनलेला पदार्थ. उदा. हिंगाष्टक, गंधाष्टक इ. (इ) स्तोत्र अथवा काव्य, ज्यांत आठ श्लोक आहेत असे. उदा. रुद्राष्टक, गंगाष्टक इ. आठ अंगें आयुर्वेदाचीं १ सूत्र, २ शरीर, ३ ऐंद्रिय, ४ चिकित्सा, ५ निदान, ६ विमान, ७ कल्प व ८ प्रसिद्धि. (सार्थ. मा. नि. प्रस्तावना) आठ अवतार गणपतीचे १ वक्रतुण्ड, २ एकदंत, ३ महोदर, ४ गजानन, ५ लंबोदर, ६ विकट, ७ विघ्नराज आणि ८ धूम्रवर्ण असे श्रीगणपतीचें आठ अवतार असून ते समुद्रतीराला आठदिशांना आहेत. (मुद्रल पुराण) आठ आग्र्याच्या ताजमहालाचे प्रमुख कारागीर १ अमानत खां शिराजी - कंदाहार, २ इसा गवंडी - आग्रा, ३ पिर सुतार - दिल्ली, ४ बन्नुहार, ५ जातमल्ल, ६ जोरावर (नक्षी काम करणारा), ७ इस्माइल खान रुमी (घुमट वनविणारा) आणि ८ रामलाल (काशिमरी वाग बनविणारा). हे प्रमुख कारगीर व निर्माते होत. ([Studies in Moghul India]) आठ उपरस (रसायनशास्त्र) १ गंधक, २ गेरु (सोनकाव), ३ हिराकस, ४ तुरटी, ५ हरताळ, ६ मनशील, ७ सुरमा आणि ८ कंकुष्ट. (मुर्दाडसिंग) (र. र. समुच्चय अ. ३-१) आठ गुण दूतास आवश्यक १ गर्वरहित, २ दुर्वल नसलेला, ३ चेंगटपणा न करणारा, ४ दयाळु, ५ प्रामाणिक, ६ फितुर न होणारा. ७ गिरोगी, ८ सयुक्तिक तसेंच अर्थपूर्ण भाषण करणारा. ([म. भा. उ. ३७-२७]) आठ गुण पुरुषाची योग्यता वाढविणारे १ वुद्धि, २ कुलीनता, ३ विद्या, ४ इंद्रियदमन, ५ पराक्रम, ६ मितभाषण, ७ यथाशक्ति दान व ८ कृतज्ञता. ([म. भा. उद्योग. ३७-३१]) आठ गुण राज्यशासकांना विहित १ दम, २ शांति, ३ क्षमा, ४ धर्म, ५ धैर्य, ६ सत्य, ७ पराक्रम आणि ८ उपद्रव देणार्यांना दंड. ([वा. रा. अयोध्या.]) आठ गुण विद्यासंपादनास आवश्यक १ शांति, २ इंद्रियदमन, ३ स्वदोष - द्दष्टि, ४ सदाचार, ५ ब्रह्मचर्य, ६ अनासक्ति, ७ सत्याग्रह व ८ सहिष्णुता ([नासदीयसूक्त - भाष्य]) आठ गुण आदर्श विद्यार्थ्यांचे १ सुशील, २ चतुर, ३ कर्तव्यांत जागरुक, ४ ज्ञानवान् ५ सेवापरायण, ६ कल्पक, ७ इष्ट व योग्य काम करणारा व ८ अप्रमादी (निरलस). ([सु.]) आठ गुण हनुमंतस्मरणानें प्राष्त होतात १ बुद्धि, २ बल, ३ कीर्ति, ४ धैर्य, ५ निर्मयपणा, ६ निरोगीपणा, ७ चापल्य आणि ८ वाक्यटुत्व. बुद्धिर्बलं यशो धैर्यं निर्मयत्वमरोगता। अजाडयं बाक्पटुत्वं च हनूमत्स्मरणाद्भवेत् ॥ ([वायुस्तुति]) आठ गोष्टी विद्यार्थ्यांस वर्ज्य १ काम, २ क्रोध, ३ लोभ, ४ जिमेचे चोचले. ५ श्रृंगाराची आवड, ६ उत्सव - सभारंम, ७ अतिनिद्रा आणि ८ अति कामधाम. कामं क्रोधं तथा लोभं स्वादुश्रृंगारकौतुके। अतिनिद्रातिसेवा च विद्याथीं ह्मष्ट बर्जयेत् ॥ ([वृ. चा. ११-९]) आठ गोष्टींच्या स्वीकारानें व्रतभंग होत नाहीं १ जल, २ मूळ, ३ फळ, ४ दूध, ५ हवि, ६ ब्राह्मणाची इच्छा, ७ गुरुची आज्ञा व औषध. ([म. भा. उद्योग ३९-७१]) आठ गोष्टी स्थानभ्रष्ट झाल्यास न शोभणार्या १ राजा - अधिकारी, २ कुलवधू, ३ ब्राह्मण, ४ मंत्री, ५ स्तन, ६ दांत, ७ केश व ८ नखें, आठ जाती शब्दांच्या १ नाम, २ सर्वनाम, ३ विशेषण, ४ क्रियापद, ५ क्रियाविशेषण अव्यय, ६ उमयान्वयी अव्यय, ७ केवल - प्रयोगी अव्यय, ८ शब्दयोगी अव्यय. (व्याकरण) आठ जीवनसत्त्वें ए, बी, सी, डी, ई, एफ . जी व एच. हीं आतांपर्यंत ज्ञात अशीं आठ प्रमुख जीवनसत्त्वें मानवी देहधारणेला अवश्य असतात, व तीं अनेक तर्हेचीं व महत्त्वाचीं कार्यें करतात असे आधुनिक जीवनशास्त्र सांगतें. आठ तिथी शुभदायक १ प्रतिपदा, २ द्वितीया, ३ तृतीया, ४ पंचमी, ५ सप्तमी, ६ दशमी, ७ द्वादशी व ८ त्रयोदशी या आठ तिथी शुभदायक मानल्या आहेत. ([अंकशास्त्र]) आठ देवता लक्ष्मीच्या सान्निध्यांत राहणार्या १ आशा, २ श्रद्धा, ३ धृति, ४ क्षांति, ५ विजिति, ६ सन्नति ७ क्षमा व ८ जय ([म. भा. शांति अ. २२]) आठ दुर्गुणांनीं मनुष्याच्या शक्तींचा संकोच होतो १ अहंकार, २ बल, ३ दर्प, ४ काम, ५ क्रोध, ६ वस्तुसंग्रह, ७ ममत्व आणि ८ अशांति. आठ दोष क्रोधामुळें उत्पन्न होणारे १ चहाडी, २ साहस, ३ कपटाचरण, ४ मत्सर, ५ दोषदर्शन, ६ अर्थदूषन (परद्रव्यापहार), ७ वाणीनें कठोर आणि ८ हातपाईवर येणें. ([मनु, ७-४८]) आठ दोष मैथुनापासून उत्पन्न होणारे १ ग्लनि, २ मूर्च्छा, ३ भ्र्म, ४ कांपरें, ५ श्रम, ६ घाम, ७ अंग अगर इंद्रियामध्यें लुळेपणा येणें व ८ क्षयरोगादि दोष. ग्लानिर्मूर्च्छा भ्रमःअ कंपः श्रमः स्वेदोऽङ्गविक्लवः। क्षयरोगादयो दोषा मैथुनोत्थाः शरीरिणः ॥ ([सु.]) आठ दोष (मंत्रसंबंधीं) १ अभक्ति, २ अक्षरभ्नांति, ३ लुप्त (अक्षर सोडून म्हणणें), ४ छिन्न, ५ र्हस्व, ६ दीर्घ (उच्चार दोष), ७ जागृतींत मंत्र दुसर्यास सांगणें आणि ८ स्वप्नकथन (स्वप्नांत दुसर्यास सांगणें). ([कल्याण साधनांक]). आठ धर्ममार्ग १ जयन, २ अध्ययन, ३ दान, ४ तप, ५ सत्य, ६ क्षमा, ७ दया आणि ८ लोभशून्यता. ([म. भा. उद्योग. ३५-५६]) आठ धन वाढविण्याची साधनें १ संथपणा, २ दक्षता, ३ मनोनिग्रह, ४ बुद्धिमत्ता, ५ विचारशीलता, ६ धैर्य, ७ शौर्य, व ८ स्थल - कालविषयक सावधानता. ([म. भा. शांति, १२०-३७]) आठ नांवें अच्युताचीं (अच्युत - अविनाशी तत्त्व) १ अच्युत, २ केशव, ३ विष्णु, ४ हरि, ५ सत्य, ६ जनार्दन, ७ हंस आणि ८ नारायण, हीं नांवें मंगलरूप मानिलीं आहेत. (चंद्र्कांत. भाग. २ रा) आठ नांवें तुळशीचीं १ वृन्दा, २ वृन्दावनी, ३ विश्वपूजिता, ४ विश्वपावनी, ५ पुष्पसारा, ६ नंदिनी, ७ तुलसी व ८ कृष्णजीवनी. ([देवी. भा. ९-२५]) आठ परमेश्वराचीं स्वरूपें १ पृथ्वी, २ जल, ३ अग्नि, ४ वायु, ५ आकाश, ६ सूर्य, ७ चंद्र आणि ८ यज्ञाकर्ता. पृथ्वी सलिलं तेजो बायुराकाशमेव च। सूर्याचन्द्रमसौ सोमयाजी चेत्यष्टमूर्तयः ॥ ([रघुवंशटीका]). आठ प्रकार आत्म्याच्या पुनर्जन्माचे १ जलात्मा - आत्मा प्राणाशीं संलग्न होऊन मेघमंडळाचा आश्रय करतो, २ अन्नात्मा - तें जल वृक्ष वनस्पति सेवन करतात. ३ वीर्यात्मा - अन्नाचें वीर्य बनतें, ४ गर्मात्मा - त्या वीर्यापासून गर्मधारणा होते, ५ पुरुषात्मा - मातेच्या उदरांतून जन्म घेतो, ६ ज्ञानात्मा, ७ कर्मात्मा व ८ चिदात्मा. हा आत्म्याचा आठवा पुनर्जन्म होय. येथें त्याला आनंदावस्थेचा अनुभव येतो. "निजानंदरूपः शिवः केवलोऽहं"(पुरुषार्थ बो. भ. गी.) आठ प्रकार आलिंगनाचे (कामशास्त्र) १ बृक्षाधिरूढ, २ तिलतंडुल, ३ ललाटिक, ४ जांघन, ५ विद्धक, ६ ऊरूपगूढ, ७ क्षीरनीर व ८ वेल्लरिवेष्टित ([अनंगरंग]) खेरीज, ९ सन्मुख आलिंगन हा एक कांहींच्या मतें नववा प्रकार आहे. आठ प्रकार गायत्री छंदाचे १ आर्षी, २ दैवी, ३ आसुरी, ४ प्राजापत्य, ५ याजुषी, ६ साम्नी, ७ आचीं व ८ ब्राह्मी (विदर्भ संशोधन मंडळ वार्षिक १९५८). आठ प्रकार चित्रांचे (दर्शनगम्य) १ वास्तबिक, २ साद्दश्यवादी, ३ वस्तुवादी अथवा विषयावादी, ४ चित्रणवादी, ५ विवरणवादी, ६ स्थिररूप, ७ स्थानकचित्र व ८ व्यक्तिचित्र (कला आणि कलास्वाद) आठ प्रकार चित्रतांडव नृत्याचे १ थरक, २ चाचरी, ३ भवरी, ४ तिरप, ५ खांडव, ६ वोडव, ७ गिरडी आणि ८ झंप. अशाप्रकारचे नृत्य श्रीकृष्णानें कालियाचे मस्तकावर केलें अशी कथा आहे. ([हरिवरदा अ. १६]) आठ प्रकारच्या जपमाळा १ रुद्राक्ष, २ तुळसी, ३ स्फटिक, ४ मोती, ५ प्रवाल (पोवळें), ६ पुत्रजीव, ७ सुवर्ण व ८ रत्न. आठ प्रकारचे दैवी कोप १ अग्नि, २ जल, ३, रोग, ४ दुष्काळ, ५ उंदीर, ६ हिंस्त्रपशु, ७ सर्प व ८ भूत - पिशाच. ([कौटिल्य अ. ८०]) आठ प्रकार ध्वनीचे १ हंस, २ कांसे, ३ मेघ, ४ ढक्का (ढोल), ५ कावळा, ६ वीणा (सतार), ७ गाढव व ८ दगड (बद्द). असे आठ प्रकार. पहिले चार शुभ व पुढचे चार वाईट असतात. "गर्दभश्च स्वरश्चैव ध्वनिरष्टविधः स्मृतः"(प्राचीन हिंदी शिल्पशास्त्र). आठ प्रकार बीजमंत्राचे १ गुरुबीज, २ शक्तिबीज, ३ रमबीज, ४ कामबीज, ५ योगबीज, ६ तेजबीज, ७ शांतिबीज व ८ रक्षाबीज. ([मंत्रशास्त्र]) आठ प्रकार मधुराभक्तीचे १ स्वरूपमाधुरी, २ चिंतनमाधुरी, ३ विरहमाधुरी, ४ मीलनमाधुरी, ५ ब्रह्मानंदमाधुरी, ६ लीलामाधुरी, ७ मुरलीमाधुरी व ८ रासमाधुरी. ([म. सा. मधुराभक्ति]) आठ प्रकार राष्ट्रशासनाचे १ साम्राज्य, २ भौज्य, ३ स्वाराज्य, ४ वैराज्य, ५ पारमेष्ठयराज्य, ६ महाराज्य, ७ आधिपत्यमय व ८ सामंतपर्यायी. असे आठ प्रकार वेदकालीं होते. ([ऐतरेय ब्रह्मण]). आठ प्रसंगीं पुनरुक्ति क्षम्य १ खेद, २ आश्चर्य, ३ क्रोध, ४ आनंद, ५ दैन्य, ६ निर्णय, ७ अनुग्रह व ८ करुणा अथवा सहानुभूति. विषादे विस्मये कोपे हर्षे दैन्येऽवधारणे। प्रसादे चानुकम्पायां पुनरुवितर्न दूष्यते ॥ ([काव्यप्रकाश]) आठ प्रहर अहोरात्राचे १ पूर्वाह्ल - प्रातःकाल, २ मध्याह्ल, ३ अपराह्ल, व ४ सायंकाल (दिवसाचे), ५ प्रदोष अथवा रजनीमुख, ६ निशीथ, ७ त्रियामा आणि ८ उषा अथवा ब्राह्ममुहूर्त (तत्त्वनिज - विवेक) आठ वस्तु सकाळीं पाहाव्या १ ब्राह्मण, २ गाय, ३ अग्नि, ४ सुवर्ण, ५ तूप, ६ आदित्य, ७ जल आणि ८ राजा. लोकिस्मिन् मङ्गलान्यष्टौ ब्राह्मणो गौर्हुताशनः। हिरण्यं सर्पिरादित्य आपो राजा तथाष्टमः ॥ ([आह्लिक सूत्रावलि]) आठ महादशा १ मंगला २ पिंगला, ३ धन्या, ४ भ्रामरी, ५ भद्रिका, ६ उल्का, ७ सिद्धा आणि ८ संडटा. या आठ महादशा आहेत. (फळ ज्योतिषशास्त्र) आठ प्राचीन व्याकरण शास्त्रकार १ गार्ग्य, २ आपिशलि, ३ चाक्रवर्मण, ४ शाकटायन, ५ शाकल्य, ६ भारद्वाज, ७ सेनक व ८ स्फोटायन. ([व्याकरण महाभाष्या प्रस्तावना]) आठ मौक्तिक उत्पत्ति स्थानें १ हत्तीचें मस्तक, २ वराहाचें मस्तक, ३ वेळु, ४ मत्स्य, ५ मेघ, ६ शंख, ७ सर्पाची फणा व ८ शुक्ति (शिंप) (रसरत्न समुच्चय - १-२२) आठ प्रकार संकेतांचा बोध करून देणारे १ व्याकरण, २ उपमान, ३ कोशाचे आधारे, ४ आप्तोपदेश, ५ व्यवहारावरून होणारा अर्थबोध, ६ वाक्यशेष, ७ विवृत्ति - विवरण आणि ८ दुसर्या शब्दाचे सान्निध्य जसेः रामकृष्णौ - बलराम व रामलक्ष्मणौ - दाशरथिराम (भारतीय साहित्यशास्त्र) आठ प्रमुख वैष्णव क्षेत्रें (अ) १ श्रींरग, २ श्रीमुष्ण, ३ वेंकटस्थल, ४ शालग्राम (नेपाळ) ५ नैमिष, ६ तोताद्रि, ७ पुष्कर आणि ८ बदरिकाश्रम, (कल्यान तीर्थांक) (आ) १ बदरिका - बदरी नारायण, २ सालग्राम, ३ पुरुषोत्तम - पुरी, ४ द्वारका, ५ बिल्वाचल, ६ अनन्त, ७ सिंह व ८ श्रीरंगम् ([बार्हस्पत्यसूत्रम्]) आठ प्रमुख शाक्त क्षेत्रें १ ओग्घीन, २ जाल, ३ पूर्ण, ४ काम, ५ कोल्ल, ६अ श्रीशैल, ७ कात्र्ची व ८ महेन्द्र ([बार्हस्पत्यसूत्रम् ]) आठ प्रमुख शैव क्षेत्रें (अ) १ श्रीसूर्यदेवतामंदिर, २ सोमनाथ, ३ पशुपतिनाथ (यजमान मूर्ति), ४ शिवकांची (पृथ्वी), ५ जंबुकेश्वर ([आप]), ६ अरुणाचल (तेज), ७ कालहस्ती ([वायु]) आणि ८ चिदंबरम् (आकाशलिंग). ([कल्याण तीर्थांक]) (आ) १ अमिवुक्त - काशी, २ गङ्गाद्वार, ३ शिवक्षेत्र, ४ रामेश्वर, ५ यमुना, ६ शिवसरस्वी, ७ मध्य शार्दूल व ८ गज. ([बार्हस्पत्यसूत्रम]) आठ प्रकारचें शौच १ कालशौच, २ अग्निशौच, ३ भस्मशौच, ४ मृत्तिकाशौच, ५ गोमयशौच, ६ जलशौच, ७ पवनशौच व ८ ज्ञानशौच. ([रत्नकरण्डकश्रावकाचार अ. १]) आठ प्रमुख स्मृतिकार १ मनु, २ याज्ञवल्क्य, ३ नारद, ४ विष्णु, ५ कात्यायन ६ आपस्तंब, ७ व्यास व ८ देवल. एकंदर ऐंशी स्मृतिकारांत हे आठ प्रमुख स्मृतिकार होत. आठ ब्रह्मसूत्रकार १ जैमिनि, आश्मरथ्य, ३ बादरि, ४ बादरायण, ५ औडूलोमि, ६ काशकृत्स्न, ७ कार्ष्णाजिनि, आणि आत्रेय, ([भ. गी. साक्षात्कारदर्शन]) आठ मंगल वस्तु १ डाव्व्या कुशीकडे निजलेल्या पुण्यवती पत्नीचें मुख, २ आरसा, ३ भरलेली घागर, ४ बैल, ५ दोन चामर, ६ श्रीवत्स, ७ कमल व ८ शंख, अशा आठ मंगल वस्तु सकाळीं पाहाव्या. वामभागस्थितां नारीं निजपुण्यप्रकाशिनीम् । दर्पणं पूर्णकुंभं च वृषभं युग्मचामरम् । श्रीवत्सं स्वस्तिकं शंखमेवमष्टमंगलम् (वी. प्र.) आठ मराठी छंद (शब्दांची गायनयोग्य विशिष्ट रचना) १ अभंग, २ दिंडी. ३ साकी, ४ घनाक्षरी, ५ सवाई, ६ छप्पा, ७ ओंवी आणि ८ कटिबंध. (मराठी छंद) आठ महा पंडित जनकसमेचे १ अश्वल, २ जारत्कारव - आर्तभाग, ३ भुज्यु ; ४ उषस्त, ५ कहोल - कौषीतकेय, ६ गार्गी, ७ उद्दालक आणि ८ विदग्ध - शाकल्य. (बृहदारण्यक अ. ३ आठ म हा रोग १ वातव्याधि, २ प्रमेह, ३ कुष्ठ, ४ अर्श (मूळव्याधि), ५ भंगदर, ६ अश्मरी, ७ मूढगर्म आणि ८ उदररोग. या अशा महारोगांची चिकित्सा व निदान करणें कठीण असतें. वातव्याधिः प्रमेहाश्च कुष्ठमर्शो भगन्दरम् । अश्मरी मूढगर्मश्च तथैवोदरस्मृतम् ॥ ([सुश्रुत ३३-४]) आठ महारस रस (रसायनशास्त्र) १ कपिला, २ गौरीपाषान (सोमल), ३ नवसागर, ४ कवडी, ५ अंबर, ६ गिरिसिंदुर, ७ हिंगुळ आणि ८ मुरदाडशिंगी. (र. र. समुच्चय अ. ३-१२०) आठ राज (शासन) कर्तव्यें १ आदान - कर घेणें, २ विसर्गपागर देणें, ३ प्रैष - आमात्यांच्या कामाची पाहाणी, ४ निषेढ - आज्ञा मोडल्याबद्दल नापसंती, ५ अर्थवचन, (शेवटची आज्ञा) ६ न्यायनिवाडा, ७ जिंकलेल्यापासून दंड घेणें व ८ शुद्धि - अपराधाबद्दल प्रायश्चित्त देणें ([मुक्तेश्वर समा. ३-११५]) आठ राष्ट्रीय ध्येय प्रतीकें १ उपनिषदांतील विश्वचक्र, २ बौद्धांचें कार्यकारण चक्र, ३ अशोअकाचें धर्मचक्र, ४ गीतेंतील संसार चक्र, ५ भागवतांतील शिशुमार चक्र, ६ इस्लाममधील दैवीचक्र, ७ कबीराचें योग चक्र आणि ८ संतांच्या अनुभबांतील अध्यात्मचक्र, (रानडे चरित्र आणि तत्त्वज्ञान) आठ लक्षणें ज्वराचीं १ अन्तर्दाह, २ तहान फार लागणें, ३ बडबड, ४ श्वास, ५ चक्कर येणें, ६ सांधे व हाडें दुखणें, ७ घाम न येणें व ८ वायु व मलमूत्रावरोध. ([सार्थ माधवनिदान]) आठ लक्षणें साधूंचीं १ निरपेक्षता, २ मच्चित - चित्स्वरूपीं चित्त जडून राहणें, ३ प्रशांत, ४ समदशीं, ५ निर्मम, ६ निरभिमान, ७ निर्द्धंद - अमेदभाव आणि ८ अपरिग्रही. सन्तोऽनपेक्षा मच्चिताः प्रशान्ताः समदर्शिनः। निर्ममा निरहङ्कारा निर्द्वंद्वा निष्परिग्रहाः ॥ ([भाग - ११-२६-२७]) आठ वर्ग सुगंधी द्रव्यांचे १ पानें, २ फुलें, ३ फळें, जायफळ वेलदोडे इ. ४ झाडाच्या सालीं - लवंगा वगैरे, ५ लांकूड - चंदन इ., ६ मुळे, ७ वनस्पतींचा स्त्राव - कापूर आणि ८ प्राणिज पदार्थ - कस्तुरी, मघ, लाख इ. (गंधसार) आठ वस्तु लौकिकांत मंगलप्रद १ दीप, २ आरसा, ३ सुवर्ण, ४ धान्यपात्र, ५ फल, ६ दहीं, ७ हस्तलिखित ग्रंथ आणि ८ पूर्णपात्र. दीपिका दर्पणं हेम धान्यपात्रं फलं दधि। पुस्तामङ्लमात्राणि लौकिकं मङ्गलाष्टकम् ॥ ([शिवरत्नम् २२-३७]) आठ विवाह (घटित) कूटें १ वर्ण, २ वश्य, ३ तारा, ४ योनि, ५ ग्रह, ६ गण, ७ भकुट (सत्कूट) आणि ८ नाडी. हीं आठ घटित कूटें असून यांस घटिताष्टक म्हणतात. यांचें क्रमांनें १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, अशी संख्या मिळून ३६ गुण होतात आणि १८ चे वर गुणांचें मेलनं विवाहास ग्राह्म मानलें जातें. कोणी कोणी बारा विवाह - कूटें मानतात. (विवाहसार) आठ विद्येचे अधिपति १ अनंतेश, २ सूक्षम, ३ शिवोत्तम, ४ एकमूर्ति, ५ एकरूप, ६ त्रिमूर्ति, ७ श्रीकंट आणि ८ शिखंडी, अनंतेशश्च सूक्ष्मश्च तृतीयश्च शिवोत्तमः। एकमूर्येकरूपस्तु त्रिमूर्तिरपस्तथा। श्रीकष्ठश्च शिखण्डी च अष्टौ विद्येश्चराः स्मृताः ॥ ([अग्नि]) आठ शिष्टाचाराचीं लक्षणें १ दान, २ सत्य, ३ तपस्या, ४ ज्ञान, ५ विद्या, ६ स्वार्थत्याग, ७ पूजा व ८ इंद्रियनिग्रह. दानं सत्यं तपो लोके विद्येज्या पूजनं दमः। अष्टौ तानि चरित्राणि शिष्टाचारस्य लक्षणम् ॥ ([मत्स्य. अ. १४४]) आठ सन्मित्र लक्षणें १ कृतज्ञ, २ धार्मिक, ३ सत्यनिष्ठ, ४ अक्षुद्र - मनाचा मोठेपना असणें, ५ द्दढ भक्ति करणारा, ६ जितेंद्रिय, ७ योग्यतेप्रमाणें वागणारा व ८ कोणताहि प्रसंग आला तरी त्याग न करणारा. आठ साधारण धर्म १ अक्रोध, २ सत्यभाषण, ३ संविभाग (आपण मिळवितो त्यात सर्वांचा भाग आहे असें समजणें), ४ स्वस्त्रीचे ठायीं प्रजोत्पत्तिअ, ५ शुचिर्भूतता, ६ द्रोहाचा अभाव, ७ प्रामाणिकपना आणि ८ पोष्यवर्गाचें पोषण. अक्रोधः सत्यवचनं संविभागश्च सर्वशः। प्रजनं स्वेषु दारेषु शौचमद्रोह पव च। आर्जवं भृत्यभरणं त एते सार्ववर्णिकाः ॥ ([म. भा. शांति ५९-९]) आठ संकेत स्थानें (प्रियकाराला भेटण्याचीं) १ शेत, २ गृहोद्यान ३, पडकें देवालय, ४ दूतीचें घर, ५ वन, ६ एकांतस्थान, ७ स्मशान ८ नदी, तळें, ओढा इत्यादिकांचा कांठ, क्षेत्रं वाटी भग्नदेवालयो दूतीगृहं वनम् । मालापञ्चः श्मशांन च नद्यादीनाम तटी तथा ॥ (साहित्य दर्पण ३-८०) आठ स्थानें कामजनक (मानव देहांतलीं) १ मस्तक, २ हनु, ३ कक्षा व ४ प्रजननांग हीं चार श्मश्रुल आणि ५ ओष्ठ, ६ चुचुक, ७ गुद आणि ८ उपस्थ ही चार श्लेष्मल. ([नासदीय सूक्त भाष्य - उत्तरार्ध]) आठ स्थानें चुंबनाचीं (कामशास्त्र) १ ललाट, २ केशकलाप, ३ कपोल, ४ नयन, ५ वक्ष, ६ स्तनद्वय, ७ ओष्ठ आणि ८ अंतर्मुख. (नासदीय सूत्र भाष्य) आठ हर्ष स्थानें १ सन्मित्रसमागम, २ विपुलद्रव्य, ३ पुत्राचें आलिंगन ४ रतिसमयीं उभयतांची एक कालीं तृप्ति, ५ समयानुरूप प्रिय भाषण, ६ समाजांत उन्नतस्थिति, ७ इष्ट वस्तूंचा लाभ आणि ८ चारचौघांत प्रतिष्ठा. ([म. भा. उद्योग ३३-९८]) आठ जणांना मार्गांत अग्राधिकार १ वाहन हांकणारा, २ नव्वद वयाचे वरील व्यक्ति, ३ रोगी, ४ ओझेबाला, ५ स्त्री, ६ स्नातक, ७ राजा अथवा शासनाधिकारी व ८ वर. (कल्यान मासिक) आठजण परदुःख्क जाणत नाहींत १ राजा - अधिकारी. २ अग्नि, ३ यम, ४ वेश्या, ५ चोर, ६ बाल, ७ याचक आणि ८ गांवगुंड. राजा वेश्या यमो वह्लिः प्राघूणों बालयाचकौ। परदुःखं न जानाति ह्मष्टमो ग्रामकंटकः ॥ ([सु.]) आठजण विशिष्ट कालपर्यंतच स्वाधीन राहतात १ मुलगा झाला नाहीं तोंपर्यंत बायको. २ सोळा वर्षें होईतों मुलगा, ३ लग्न हीईपर्यंत मुलगी, ४ यौवनदशा येईपर्यंत सून, ५ सासर्याकडून मिळकत होते तोंपर्यंत जांवई, ६ आपण बरें आहों तोंपर्यंत मित्र, ७ गुरुकिल्ली मिळाली नाहीं तोंपर्यंत शिष्य आणि ८ पैसा आहे तोंपर्यंत इतर जन. हे आठजण त्या त्या कालपर्यंत स्वाधीन राहतात. ([सु.]) आठ स्वर्गाचे अधिकारी होत १ मातृपितृभक्त पुत्र, २ पतिव्रत स्त्री, ४ निःस्वार्थी सेवक, ४ गुरुजनांची सेवा करणारा, ५ प्रजापालन करणारा राजा, ६ कर्मनिष्ठ ब्राह्मण, ७ परोपकारार्थ देह झिजविणारा आणि ८ युद्धांत पाठ न दाखविणारा वीर पुरुष. (चंद्रकांत भाग २ रा.) आठजण हिंसक होत १ खाणारा, २ संमति देणारा, ३ पाक करणारा ४ विकणारा, ५ विकत घेणारा, ६ प्रत्यक्ष हिंसा करणारा, ७ वाढणारा अथवा वाटणारा आणि ८ सांगून हिंसा करविणारा. भोक्तानुमन्ता संस्कर्ता कयिविक्रयी हिंसकाः। उपहर्ता घातयिता हिंसकाश्चाष्टधा स्मृताः ॥ ([स्कंद काशी ४०-२२]) गीताष्टक १ कपिलगीता, २ गर्मगीता, ३ परमहंसगीता, ४ उद्धवगीता, ५ अवधूतगीता, ६ हंसगीता, ७ मिक्षुगीता आणि ८ ऐलगीता. या आठ ज्ञानप्रतिपादक ग्रंथांस गीताष्टक म्हणतात. ([भागवत]) गंगाष्टक महर्षि वाल्मीकिविरचित गंगास्तोत्र. यांत आठ पदें आहेत. अष्ट आनंद १ विषयानंद, २ ब्रह्मानंद, ३ वासनानंद, ४ मुख्यानंद, ५ निजानंद, ६ आत्मानंद, ७ अद्वैतानंद, आणि ८ विद्यानंद ([विवेक चिंतामणि]) आठ कारणें वस्तूचे ज्ञानास बाधक १ अतिदूरता, २ अति जवळ, ३ इंद्रियदोष, ४ चित्तैकाग्र्याचा अभाव, ५ सूक्ष्मता, ६ अडथळे. ७ अन्य वस्तूंचे प्राबल्य व ८ तत्सम वस्तूशी मिश्रण, ([सांख्यकारिका ७]) आठ गुण कमलपुष्पाचे १ सौंदर्य, २ कोमलता, ३ प्रसन्नता - प्रफुल्लता, ४ सुगंध, ५ मधुरता, ६ स - रसता, ७ तेजस्विता व ८ अलिप्तता हे आठ गुण सूक्ष्म निरीक्षकांस दिसतात, ([गूढार्थचंद्रिका]) आठ गोष्टी प्रलयकालीं होणार्या १ कुलपर्वत हालणें, २ धूमकेतू, ३ संवर्तकादि मेघ जमणें, ४ उलकापात, ५ अशनिपात, ६ रुधिरवृष्टि, ७ उत्तुंग जललहरी, ८ सर्वदिशा गडद अंधकारमय होतात. (बाणमट्ट कांदबरी टीपा) आठ धर्मकला १ प्राणिमात्रावर दया, २ परोपकार, ३ दान, ४ क्षमा, ५ समानभाव, ६ सत्य, ७ उदारता व विनय, (चातुर्य चिंतामणि) आठ प्रकाराचे गुरू १ बोधक, २ वेधक, ३ निषिद्ध, ४ काम्य, ५ सूचक, ६ वाचक, ७ कारक व ८ बिहित, असे आठ प्रकार, ([विवेक चिंता - मणि प्रथम परिच्छेद]) आठ प्रकार लांचलुचपतीचे पण नांवे वेगळालीं १ बादशहा अथवाअ मुख्य सत्ताधीश - पेशकश - खंडणी, २ प्रधान - नजर, ३ सरकारी खात्यावरील मुख्य व्यवस्थापक - दस्तूर - वहिवाट, ४ खात्याचे सचिव - शुकराना - आभार प्रदर्शन, ५ कारकून - तहरीर - मजकूर ६ मुफती (धर्म खात्याचा मुख्य) मेहराना - कृपा, ७ सरकारी अधिकारी - जरीन - कांचन आणि स्वार शिपाई - सजावलान - देडेली. अशा प्रकारचे विशिष्ट शब्द व संकेत दोनशे वर्षापूर्वी निजामुल्मुल्काच्या राज्यांत वापरांत होते अशी एक आख्यायिका आहे. (विडा रंगतो असा) आठ स्थानें वणोंचाराचीं १ उर, २ कंठ, ३ शिर, ४ जिव्हामूल, ५ दांत, ६ नाक, ७ ओठ आणि ८ तालु हीं वर्णोचाराचीं आठ स्थानें होत. अष्टौस्थानानि वर्णानामुरः कण्ठः शिरस्तथा। जिव्हामूलं च दन्ताश्च नासिकोष्ठौच तालुच ॥
|