|
ना. अग्रधन , आगाऊ दिलेली रक्कम , उचल , खर्चासाठी आधी दिलेला पैसा , पेशगी , बयाणा , विसारा , हप्ता , हमीचा पैसा . [ अग्रिम धन हा आगाऊ दिलेला / द्यावयाचा पैसा अशा व्यापक अर्थाचा शब्द आहे . पण अनेक कारणांनी आणि रूपाने व्यवहारांत आगाऊ पैसे द्यावे लागतात आणि भिन्न संदर्भात अधिक सार्थ असे पर्यायी शब्द वापरले जातात . अग्रधन हा शब्द अलीकडील असून तो इंग्रजी इंप्रेस्ट ( imprest ) या शब्दाला प्रतिशब्द म्हणून देण्यात आला आहे . कनसाईज ऑक्सफर्ड डिक्शनरी ( नववी आवृत्ती ) मध्ये या शब्दाचा अर्थ पुढीलप्रमाणे दिला आहे :-- ``money advanced to a person for use in State business.'' सरकारी व्यवहारात खर्चासाठी म्हणून मंजूर केलेली रक्कम आधी द्यावी लागते . त्याचा हिशेब मागून द्यायचा असतो . अशी मंजूर झालेली रक्कम एका विशिष्ट कारणासाठी असत नाही , दिलेल्या रकमेपैकी जरूरीप्रमाणे एक व अनेक गोष्टींवर खर्च करून त्याचा हिशेब मागाहून द्यायचा असतो . त्याचप्रमाणे मोठया कारखान्यांतून , कंपनीतून , पेढयांतून जिथे मोठया प्रमाणावर व्यवहार चालतात , तिथे असे आगाऊ पैसे देण्याची पद्धत आहे . म्हणून अग्रधन याला खर्चासाठी आगाऊ दिलेला पैसा असा पर्याय दिला आहे . पूर्वी अशा तर्हेने दिलेल्या आगाऊ पैशाला पेशगी असे म्हणत असत . काही व्यवहारात एकूण द्यायची रक्कम मोठी असते आणि व्यवहार पूर्ण झाल्यावरच ती द्यायची असते . अशा वेळेला विश्वासार्हतेचे चिन्ह म्हणून काही रक्कम आधी दिली जाते . त्याला विसारा ( इसारा ), बयाणा किंवा सचकार असे म्हणतात . विसाराची रक्कम आधी द्यायची असली तरी त्या व्यवहाराचा हेतू खर्चासाठी आगाऊ दिलेल्या पैशापेक्षा वेगळा असतो . नियमितपणे द्यावयाच्या पैशाला हप्ता म्हणतात . विम्याचे , कर्जाच्या परतफेडीचे जसे हप्ते असतात तसा पोलिसांना द्यावयाचा हप्ता असतो . तो अगदी काटेकोरपणे व निश्चित कालावधीचा असतोच असे नाही . एवढाच फरक . कित्येकदा दीर्घकालीन व्यवहारात सर्व व्यवहार सोयिस्कर व्हावा म्हणून एका किंवा अनेक हप्त्यांनी रक्कम द्यायची असते आणि शेवटचा हप्ता काम पूर्ण झाल्यावर द्यायचा असतो . सुतारकामात , बांधकामात मोठे यंत्र विकत घेताना आगाऊ रक्कम घेण्याची - देण्याची पद्धत रूढ आहे . अशा दिलेल्या रकमेला आगाऊ दिलेली रक्कम हा शब्दप्रयोग उचित वाटतो . याच्या जवळ येणारा शब्द म्हणजे उचल . पण अर्थच्छटा थोडी वेगळी . सामान्यत : उचल हा शब्द महिन्याच्या शेवटी द्यायच्या पगारातून जी आधी रक्कम कामगारांना देतात . त्याला लावतात . हमीच्या पैशाचे स्वरूप वेगळेच असते . जेव्हा मागणी मोठी असते आणि ती पुरवणारा ठेकेदार ती पुरी करू शकेल की नाही याची खात्री नसते तेव्हा काही तैसा हमी म्हणून घेण्याची प्रथा आहे . करारानुसार काम न झाल्यास हमीचा पैसा जप्त केला जातो . निविदा काढून कामे दिली जातात तेव्हा फक्त जबाबदार लोकांनी निविदा भरावा म्हणून हमीच्या पैशाची अट घातली जाते . ]
|