|
पु. ( कों . ) १ ( कुण . ) मृताच्या दहाव्या किंवा बाराव्या रात्रीं केलेलें जाग्रण . अंगात येऊन आपल्या मरणाचें कारण सांगावें , पुरलेल्या पैशाची जागा दाखवावी किंवा आपल्या गुप्त गोष्टी सांगाव्या म्हणून त्याच्या कुटुंबांतील माणसें जाग्रण करितात ; यावेळीं चार देवझाडें मिळवून वाद्यादि पूर्वक समारंभ करतात . - स्त्री . १ जागृतावस्था ; जागरण . ( क्रि० होणें ; येणें ). २ ( राजा . ) हालचाल ; गडबड ; गजबज . ( घर , खेडेगांव यांतील ) ३ गर्दी ; गोंगाट ( दाट वस्तींतील , जत्रेंतील ). ४ कोणत्याहि प्राण्याची एखाद्या जागेंतील सतत वस्ति ; पाहरा ; वचक बसण्याजोगें अस्तित्व . त्या रानांत वाघाची जाग होती म्हणून गुरें जात नसत . घरांत मांजराची जाग असली म्हणजे उंदरांचा उपद्रव होत नाहीं . ५ वस्ती . यवतेश्वराच्या डोंगरावर मनुष्याची जाग असल्यामुळें तो डोंगर न चढतां ... - स्वप ३६४ . ६ ( गो . ) चाहूल . [ सं . जागृ ] सामाशब्द - ०माग स्त्री. जाग अर्थ ४ पहा . जागणा - वि . जागा ; जागृत . जागता - वि . १ जागरूक ; सावध ; दक्ष २ शक्ति , गुण आणि सामर्थ्य यांनीं युक्त ; तात्काल फलदायी ; उपासकाला पावणारी ( देवाची मूर्ति , मंत्र - तंत्र , औषध ) या गांवचा देव असा जागता आहे कीं , तत्काल धावण्यास पोंचतो . मंत्र जागता असला तर तत्काल विष उतरेल . ३ तजेलदार ; तेजस्वी ; टवटवी असणारा ; ज्याची सुधारणा आणि रक्षण काळजीपूर्वक होतें असा ; संस्कृतिसंपन्न ; सुस्थितीनें युक्त ( धर्म , विधि , चाल ) ४ तरतरीत जोमदार ( मन , बुध्दि इ० ). ५ ताजेंतवानें न गंजलेलें ; मलिन नसलेलें ( मिळविलेलें ज्ञान ). ६ लोकांच्या डोळयांपुढें असणारा व ज्याची लोकांना नेहमीं आठवण होते असा ; अविस्मृत ( मेलागेला माणूस , गोष्ट , प्रसंग ). जागतीजोत - स्त्री . जागता अर्थ २ पहा . कडक ; सामर्थ्यानें युक्त अशी देवी , देव मंत्र , औषध सद्य : परिणामी तात्काल फलदायी गोष्ट ; खडखडीत दैवत ; रामबाण औषध , ( पुष्कळ देवस्थानांतून कांहीं विशिष्ट प्रसंगीं मूर्तीच्या अंगांतून ज्योत बाहेर पडते व म्हणून देवत्व नष्ट झालें नसून अद्याप आहे असें मानतात ). जागती जोती काढिली हनुमान रूपें । - सप्र . ३ . ४२ . [ जागती + ज्योत ] जागतीझोंप , जागती निद्रा - स्त्री . १ गाढ नसलेली झोंप ; थोडीशी चाहूल लागतांच जाग येते अशी झोंप . २ डुलक्या घेणें ; पेंगणें . ०भाषा स्त्री. प्रचलित भाषा ; जिवंत भाषा . संस्कृत जागती भाषा नाहीं . जागणें - अक्रि . १ जागत राहणें ; सावध राहणें ; लक्ष ठेवणें . २ निजून उठणें ; जागे होणें , असणें ; झोंप न घेणें , टाकून देणें . सूर्य देखोनि उदयाचळीं । जागिन्नले समस्त । - मुआदि २९ . १३० . ३ पाहरा करणें ; सावधगिरी ठेवणें ४ लक्ष देणें ; दख्खल ठेवणें ; काळजी घेणें ( धंदा , नोकरी , इनाम , शपथ , वचन यांची ) त्यानें वचन दिलें होतें पण त्यास तो जागला नाहीं ५ ताजें असणें ; म्हटल्यावेळीं तयार असणें ; आठवणें ; कायम राहणें ; स्मरणें ( अभ्यासिलेलें शास्त्र इ० ). व्यासंगानें श्रुत जागे । - लेलेशास्त्री . म्ह० १ सारी रात्र जागली आणि शेंगावांगीं रांधली = व्यर्थ श्रम आणि प्रयत्न . २ जागेल त्याची वांठ आणि निजेल त्याला टोणगा . [ सं . जागृ - जागरण ] जागर , जागरण - पुन . १ जागेपणा जागृतावस्था . ल पोरांचे गडबडीमुळें रात्रीस चारी प्रहर जागर पडला . २ निद्रा संयमन ; देखरेख पाहरा . ३ पोवती ( नारळी , श्रावणशुध्द ) पौर्णिमा . ४ देवतेच्या उद्देशानें विवक्षित कालपर्यंत जागण्याचा प्रकार . नवरात्रामध्यें देवाजवळ कथा करून कालचें नाटक . ६ पुनरावृत्ति ; उजळणी करणें ; नवें , ताजें करणें ( वेदघोषानें मंत्र ). मंत्रजागर [ सं . जागृ . ] ०घालणें ( माण . ) खंडोबाच्या नांवानें वाघ्यामुरळया आणून त्यांची पूजा करून त्याना जेवावयाला घालून नाचविणें जागरा - वि . १ भारी जागणारा . २ जागा राहणारा ; दक्ष ; सावध . जागरूक - वि . १ जागता पहा . २ स्पष्ट ; उघड ; टिकाऊ तोंडावर फेंकता येण्याजोगा ( पुरावा ). ३ जागरणशील . जागरें - न . जागृति ; जागेपण . नीद मारूनि जागरें । नांदिजे जेंवि । - अमृ . ४ . १ . जागल - स्त्री . १ पहारा ; राखण ; सावधानता . २ पहारेकर्याचा पगार . ३ जागरण ; जागृतावस्था . मला रात्रीं जागल घडली . जागलकी - स्त्री . जागल्याबद्दलची मजुरी ; राखणावळ . गांवांत घोडें , गाढी मुक्कामाला रात्रीं राहिली तर महार जागले अर्धा आणा जागलकी घेतात . - गांगा ९७ . जागल्या , जागळया - पु . पहारेकरी ; रखवालदार ; प्रवाश्यांच्या सामानावर पाहरा करणारा खेडयांतील महार ; रामोशी . जागवणें , जागविणें - उक्रि . १ जागें , जागृत करणें , ठेवणें ; जागें राहून काळ काढणें . २ पहारा करणें ; नजर ठेवणें . ३ ( सामा . ) राखणें ; पाळणें ; ठेवणें , वाक्यरचनेंत याचा पुष्कळ शब्दांशी जोडून उपयोग करितात . जसें - अब्रू - नाम - नांव जागविणें = अब्रू , नांव सांभाळणें ; शील राखणें . दिवस जागविणें = दिवस राखणें ; त्या दिवशीं जें कर्तव्य , जे विधी करावयाचे असतील ते करणें . नियम - नेम - जागविणें = स्वत : चा नेम , चाल राखणें ; चालविणें . सती जागविणें = सतीची चिता प्रज्वलित ठेवणें , विझूं न देणें . गौर जागविणें = गौरीला , देवीला जागविणें ; रात्रभर गौरीप्रीत्यर्थ जागरण करणें . जागसूद - वि . ज्याची झोंप चटकन उघडते असा ; चटकन जागा होणारा . २ जागता ; सावध . तूं जागसूद ऐस मी निजतों . ३ सावध , गाढ नसलेली ( झोंप ).
|