|
पु. १ नियम ; शास्त्राची आज्ञा ; वेदविहित क्रिया , कर्म वगैरे . विधीतें पाळित । निषेधातें गाळित । - ज्ञा १२ . ७७ . २ पध्दति ; कर्म करण्याची रीत ; धार्मिक कृत्याचा प्रयोग . उदा० उद्यापनविधि ; उपासनाविधि ; दानविधि ; स्नानविधि ; होमविधि ; व्रतविधि ; पूजाविधि . क्रियाविशेषें बहुतें । न लोपिती विधीतें । निपुण होऊन धर्मातें । अनुष्ठिती । - ज्ञा २ . २४९ . ३ सामान्यतः नियम ; आज्ञा ; विधान ; अनुशासन ; आदेश ; कल्प . विधि हाचि मान्य आहे । - मोआदि ४ . १४ . ४ दैव ; प्रारब्ध ; नशीब . स्थिर न राहे माझी बुध्दि । तरी हा आपुलाचि विधि । सुजाण राया । - कथा ६ . १९ . १५९ . ५ ब्रह्मदेव ; सृष्टिकर्ता . तें निर्मितो विधि विभूषण भूमिकेचें । - वामन स्फुटश्लोक ( नवनीत पृ . १४१ ). अतर्क्य महिमा तुझा गुणहि फार बाहे विधी । - केका १४० . ६ शास्त्रवचन ; धर्मग्रंथातील वाक्य , आधार ; प्रमाण . ७ तर्हा ; प्रकार ; रीत . गर्हवारे हा विधी । पोट वाढविलें चिंधी । - तुगा ६२५ . लिहिल्या विधे येईन मी त्वरें । - होला ३४ . ८ योजना ; क्रिया . कवण कार्याचिये विधि । तुम्ही आलेती कृपानिधि । - एरुस्व ३ . ४३ . [ सं . विध् = विधान करणें ] ०अंड न. ब्रह्मांड ; विश्व ; भूगोल . तडतडि विधिअंड त्रास दे ... - वामनसीता स्वयंवर . [ विधि + अंड ] ०किकर पु. कर्मांचा दास . मग विधिकिंकर तो नव्हे । - यथादी ३ . २२९९ . ०दृष्ट वि. वेदविहित ; शास्त्रोक्त ; साधार ; सप्रमाण . ०निषेध पु. अमुक बरें , अमुक वाईट , अमुक करावें , अमुक करूं नये यासंबंधी नियम ; बंधन ; नियम ; कर्तव्याकर्तव्य . एथ सारासार विचारावें । कवणे काय आचरावें । आणि विधिनिषेध आघवे । पारुषता । - ज्ञा १ . २४६ . [ विधि + निषेध ] ०निषेधातीत वि. १ ब्रह्मज्ञान प्राप्त होऊन मुक्त स्थितीस गेल्यामुळें ज्यास सामान्य धर्मनियम बंधनकारक नसतात असा ; सर्व नियमांच्या पलीकडे गेलेला . २ ( उप . ) स्वैर , अनिर्बंध वागणारा . [ बिधि + भंजक ] ०भंजन न. नियम मोडणें ; अपवाद होणें . ०मंडळ न. कायदे , नियम करणारी संस्था , सभा . ( इं . ) लेजिस्लेटिव्ह कौन्सिल . ०मंत्र पु. विधियुक्त मंत्रसंस्कार ; नियमानुसार सर्व धर्मकृत्य . मग जाहला विधिमंत्र । चारी दिवस । - कथा १ . ७ . २०७ . ०मुख न. सच्चिदानंद स्वरूपाचें वर्णन . - हंको . ०युक्त वि. विधिपूर्वक ; शास्त्रोक्त ; वेदविहित ; शास्त्राज्ञेप्रमाणें . ०लिखित लिपी - स्त्री . लल्लाटरेषा ; ब्रह्मलिखित . आपले सुख खास गमावशील ही विधिलिपी समज . - कल्याणी , नवयुग . ०वत् क्रिवि . विधीप्रमाणें ; शास्त्रोक्त ; यथायोग्य ; वेदविहित पध्दतीप्रमाणें . क्रिवि . विधीप्रमाणें ; शास्त्रोक्त ; यथायोग्य ; वेदविहित पध्दतीप्रमाणें . ०वाक्य न. शास्त्रवचन ; वेदवचन ; वेदवाक्य . ०वाचक न. कर्तव्यबोधक धातुसाधित ; नियम घालून देणारें धातुसाधित . उदा० करावें ; धरावें इ० . धातुसाधित न. कर्तव्यबोधक धातुसाधित ; नियम घालून देणारें धातुसाधित . उदा० करावें ; धरावें इ० . ०विधान न. शास्त्राज्ञा किंवा नियम यांस अनुसरून सांगणें , बोलणें , योजणें ठरविणें , वर्तन करणें . [ विधि + विधान ] ०विवर्जित वि. शास्त्रमर्यादेचें बंधन नसलेला ; नियमांपलीकडील . मज विधिविवर्जिता व्यवहारु । आचारादिक । - ज्ञा ९ . १५७ . ०विवाह पु. यथाविधि लग्न . निर्धारेसीं तुझी जाया । मी जाहलेंसे यदुराया । विधिविवाह तुवां कीजै । - एरुस्व ४ . १४ . ०विशेषण न. ( व्या . ) क्रियापदाबरोबर योजलेला गुणवाचक शब्द ; विशेषणाचा एक प्रकार . ०वृत्ति स्त्री. ( निषेधवृत्तीच्या उलट ) प्रत्यक्ष कृति , क्रिया करावयासाठीं आज्ञा करण्याची पध्दति , रोख , तर्हा , स्थिति , नियमन . - वि . ( निषेधक नव्हे तें ) प्रत्यक्ष नियम , कृति , कार्य सांगणारें ; अनुज्ञापक . ०संकुचित संकोचित - वि . नियमबाह्य ; अपवादभूत ; नियमांत न येणारें . ०संकोच पु. अपवाद . विध्युक्त - वि . वेदविहित ; शास्त्रांत सांगितलेलें ; धर्मग्रंथांत सांगितलेलें . किती आच्मनें शौच्य विध्युंक्त चाले । - दावि १७९ . ४ . - अप विध्योक्त . श्रीराम समर्थ विध्योक्त अर्चनें । - सप्र ११ . १३५ . [ विधि + उक्त ]
|