श्री मल्लारिमाहात्म्य - अध्याय दुसरा

श्री मल्लारिमाहात्म्य - अध्याय दुसरा

चतुर पंडित भाविक प्रेमळ । पुढें चरित्र ऎका रसाळ । जें ऎकतां कळिकाळ । विघ्वजाळ बांधीना ॥ १ ॥
यावरी मणिप्राणहरण । इंदिरावराप्रती  बोले वचन 'जगद्‍वंद्या! तुवां तेथ जाऊन । मल्लाप्रती प्रबोधावें ॥ २ ॥
नीति सांगोन घननीला । त्याप्रती धाडावें पाताळा । नायके, तरी त्या कुटिला । संहारीन सर्वस्वें! ॥ ३ ॥
ऎसें वचन ऎकतां श्रीरंग । सुपर्णारूढ जाला भक्तभवभंग । जो घनश्यामवर्ण कोमळांग। वेदशास्त्रें वर्णिती जया ॥ ४ ॥
कमलदलाक्ष कमलावर । मल्लमंदिरा आला मुरहर । दैत्येंद्र उठोनी सत्वर । सामोरा आला बाहेरी ॥ ५ ॥
घालुनियां श्रेष्ठासन । मल्लें पूजिला जगज्जीवन । सर्वोपचार समर्पून । म्हणे, 'धन्य आजी जालों ! ॥ ६ ॥
महाराज तूं जगद्‌वंद्य । माझा पूर्वज जो प्रल्हाद । तेणें अर्चिलासि तूं मुकुंद । मजही पूज्य त्याकरितां!' ॥ ७ ॥
हरि म्हणे, 'कैलासानाथ । वेदशास्त्रां वंद्य समर्थ । ज्याचे आज्ञेनें यथार्थ । ब्रह्मांड केलें कमलोद्‍भवें ॥ ८ ॥
शिवशक्त्यात्मक सर्व जण । हें तूं जाणसी पूर्ण ज्ञान । जो दक्षमखविध्वंसक जाण । पुरातन पंचमुकुट तो ॥ ९ ॥
जो कामरहित कामांतक । गजासुरमर्दक  गजास्यजनक । जो दक्षमखविध्वंसक । अंधकासुरप्राणहरण ॥ १० ॥
हिमनगजामात काकोळधर । महास्मशानवासी जो अगोचर । भक्तसंतापनाशक मम प्राणमित्र । त्यासी मैत्रिकी करीं तूं ॥ ११ ॥
भूताधिपति विश्‍वेश्‍वर । मायाचक्रचालक महत्पापहर । त्रिगुणातीत त्रिनेत्र । तरि तो मित्र करीं तूं ॥ १२ ॥
संसारा आला जो पुरुष । जोडावें लोकीं निर्दोष यश । तरी सर्वभावें व्योमकेश । सखा करुनि नांदे सुखें ॥ १३ ॥
जो भोळा चक्रवर्ती दिगंबर । आपलें सर्व भक्तांस देणार । तरि तो अर्धनारीनटॆश्‍वर । सखा करूनि नांदे सुखें ॥ १४ ॥
शिव दयाळ कारुण्यसमुद्र । कोपलिया विश्‍व जाळील समग्र । तरि तो हिमनगजामात  कर्पूरगौर । सखा करूनी नांदे सुखें ॥ १५ ॥
हे गोष्टी तुज न माने जरी । पाताळीं नांदे तूं राज्य करीं । गो-ब्राह्मण उर्वीवरी । पीडून कष्टी करूं नको!' ॥ १६ ॥
ऎसें ऎकोन मल्लवीर । नेत्र केले जेंवि खदिरांगार । श्‍मश्रु पिळूनि सत्वर । म्हणे, ऎके श्रीवरा ! ॥ १७ ॥
मणी मारूनि आटिली वाहिनी । महावीर माझे ग्रासिले रणीं । त्यासी मैत्रिकी रथांगपाणी ! । करी म्हणसी कैसा तूं? ॥ १८ ॥
मी कोपलिया मल्लवीर । पडत्या आकाशास देईन धीर । आचमन करून सप्तसमुद्र । उदरामाजीं सांठवीन ॥ १९ ॥
चतुर्दश लोकांचे घेईन प्राण । स्वर्ग कैलास क्षणें जाळीन । दिग्गजांचे दंत मोडून । पृथ्वी नेईन रसातळा ॥ २० ॥
ग्रहगण सर्व नक्षत्रें । मोटॆंत बांधीन क्षणमात्रें । परम तेजाळ माझीं शस्त्रें । खंडण करितील वायूचें ॥ २१ ॥
हरि!   मी प्रल्हादकुळीं उत्पन्न । तरि तूं पहा माझें युद्धकदन । मी त्यास कदा न वजाय शरण । साम न करीं मुरारी! ॥ २२ ॥
पूर्वीं प्रल्हादें सहस्त्रनयन । जिंकिला समरीं युद्ध करून । कालाचे हस्तींचा हिरोन । दंड घेतला पुरुषार्थें ॥ २३ ॥
त्याचे कुळीं मी मल्लवीर । करीन त्या शिवाचा संहार । सैन्य गिळीन मी समग्र । वैकुंठपती । पाहें कां ॥ २४ ॥
तूं माझ्या पूर्वजीं पूजिलासी । म्हणवून तुज राखितों ह्रषीकेशी ! नाहीं तरी तुज गिळावयासी । उशीर मज कायसा? ॥ २५ ॥
मणिपर्वतीं उभा राहोन क्षणभरी । माझा संग्राम पाहें मधुकैटभारी । शिवाचें उदर फाडून झडकरी । गिळिला बंधु शोधीन ॥ २६ ॥
माझीं शस्त्रें तृषित समग्र । शोषूं भावितीं शिवाचें रुधिर । सुरसैन्य जाळीन सत्वर । पाहें आतां पद्मनाभा !' ॥ २७ ॥
हरि म्हणे, 'ऎक माझें वचन । तूं सोडीं गर्व अभिमान । महीपतीप्रति जाई शरण । अक्षय कल्याण होय तेणें ॥ २८ ॥
बंधुशोकाचें ज्वाळ । तेणें आहाळले तुझें ह्रदयकमळ । ढाळहीन मनमुक्ताफळ । जालें तुझें मल्लवीरा! ॥ २९ ॥
जेणें होय अनर्थ पूर्ण । तेथ चतुरें न घालाचें मन । उत्तम सन्मार्ग टाकून । आडमार्गा न वजावें!' ॥ ३० ॥
मल्ल म्हणे, 'ऎक श्रीपति । पश्‍चिमेस उगवेल गभस्ती । मृगजळीं बुडेल अगस्ती । तरि मी मैत्री न करीं कदा!' ॥ ३१ ॥
ऎसें बोलोन मल्लवीर । उभा ठाकला महासुर । सूर्यरथासी कोटीर । झगटला जाऊन तेधवा ॥ ३२ ॥
समुद्रांत करितां स्नान । नाभीपर्यंत त्यासी जीवन । कीं आकाशमंडपास जाण । स्तंभ दिधला दिसतसे ॥ ३३ ॥
मंदरगिरी जैसा प्रचंड । तैसे सरळ त्याचे दोर्दंड । खदिरांगापर्वत चंड । तैसे नेत्र तयाचे ॥ ३४ ॥
मल्ल चालता धरणीवरी । लवत भारें सकळ धरित्री । सिंदूरवर्ण जटा शिरीं । चर्चिला भाळीं रक्तचंदन ॥ ३५ ॥
छत्रचामर मित्रपत्रें शोभती । मकरबिरुदें पुढें चालतीं । अपार रणतुरें खाकातीं । दिग्गज कांपती ऎकतां  ॥ ३६ ॥
चौदंत हस्ती चौताळती । कीं पायांचे पर्वत धावती । हिरे पांचा जडिल्या दातीं । दशकोटी निघती कुंजर ॥ ३७ ॥
सुपर्णासमान वेगाडे । धावती पक्षांचे चपळ घोडे । रणसागरींचीं जहाजें प्रचंडें । रथ चहुंकडे तेंवि दिसती ॥ ३८ ॥
समुद्र पृथ्वीवरी लोटती । तैसी पायदळा नाहीं मिती । इकडे मल्लास पुसोन रमापती । महेश्‍वराजवळीं पातला ॥ ३९ ॥
वर्तमान समूळ सांगितलें । शिळेवरी उगवतील कमळें । हेंहि घडे एक वेळे । परि मल्ल शिकविले नायके ॥ ४० ॥
ऎसें ऎकतां कैलासनाथ । निजदळेंसि चालिला समर्थ । मल्ल निजभारेंसि लोटत । थरथरित ब्रह्मांड ॥ ४१ ॥
मेघांची बैसली दांतखिळी । चतुर्दश लोक कांपती चळीं । शेष कूर्म वराह सकळीं । दणाणिलीं पाताळें ॥ ४२ ॥
भगणें रिचवितीं धरणी । विजा पडती कडकडूनी । सप्तदीपें नवखंड अवनी । हलकल्लोळ होतसे ॥ ४३ ॥
उभयदळीं वाद्यगजर । तेणें छप्पन्नदेश जाले बधिर । जाला एकचि हाहाकार । कल्पांतप्रलयासारिखा ॥ ४४ ॥
वाटॆ धरणी होईल पालथी । रविमंडप पडेल क्षितीं । सृष्टी गेली गेली म्हणती । सुर पळविती विमानें ॥ ४५ ॥
दोहीं सैन्यां भेटी होत । कोट्यवधी असिलता झळकत । शरांचा मेघ वर्षत । गारा पडत शिरांच्या तेथें ॥ ४६ ॥
यमराष्ट्रवर्धिनी निम्नगा । शोणितें भरोनि चालिल्या वेगा । लवण पाहोन लगबगा । भेटूं धावती सिंधूतें ॥ ४७ ॥
कल्पांतवीज पडे धरणीं । तैसीं घृतमारी आली धावोनी । संहारित चालली वाहिनी । देव गगनीं पाहती ॥ ४८ ॥
पर्वत सांठवी मुखांत । ऎसी ते आवली पसरित । महाशूल जैसे दंत दिसती ॥ ४९ ॥
शतांचे शत कुंजर धरुनी । गरगरां फिरवीत गगनीं । सवेंच घालून वदनीं । चावून गिळी क्षणार्धें ॥ ५० ॥
इभ फिरवून आपटी धरणी । तेथ चूर्ण होती रथश्रेणी । अश्‍वांसहित स्वार उचलुनी । दाटी वदनगर्तेत ॥ ५१ ॥
आकाशीं भिरकावी बहुत । ते समुद्रांत जाऊन पडत । घृतमारीची हाक गाजत । डळमळीत भूगोल तेणें ॥ ५२ ॥
जिव्हा तिची लंबायमान । तेणेंच आवरी गजास्यनंदन । दैत्य शस्त्रें दारुण । घृतमारीवरी प्रेरिती ॥ ५३ ॥
वज्रदाढा कडकडित । चावून गिळिली क्षणांत । दैत्यसेना धाकें पळत । मल्ल पहात अद्‍भुत हें ॥ ५४ ॥
कल्पांत हाक फोडून । मल्लें मांडिलें संधान । म्हणे, 'कृत्ये ! सैन्य भक्षून । माजलीस बहुत पुष्ट तूं !' ॥ ५५ ॥
मुद्‌गल घेऊन घृतमारी । मल्ल ताडिला ह्रदयावरी । मग तीक्ष्णबाण धारीं । दैत्य वर्षे सक्रोधें ॥ ५६ ॥
विजेऎसे येती शर । मुखांत घालुनी गिळी समग्र । दैत्यें त्रिशूळें भुजा सत्वर । छेदिला तेव्हां कृत्येचा ॥ ५७ ॥
आणीक भुज सवेंच निघाली । मग दैत्य गेला गगनमंडळीं । शिलापर्वत तत्काळीं । वर्षता जाला वरूनी ॥ ५८ ॥
देवसेनेचा संहार होत । घृतमारी गेली गगनांत । युद्ध जालें परमाद्‍भुत । मागुती येत भूतळीं ॥ ५९ ॥
यावरि मल्लें तिच्या कपाळांत  । शतबाण भेदिले अकस्मात । सत्याहत्तरि बाण सत्य । स्तनावरी भेदिले तिच्या ॥ ६० ॥
नाभी आणि उरावरी । खिळिली शत शत शरीं । पर्वत विरूढती तृणांकुरीं । तैसी सर्वांगीं भेदिली ते ॥ ६१ ॥
मूर्छा येऊन पडतां धरणी । त्यावरि मुख्य मार्तंड ते क्षणीं । नंदीवरी वळघोनी । चपलेऎसा धाविला ॥ ६२ ॥
मल्ल म्हणे, 'तूं पशुपती । भीक मागणार, स्मशानीं वस्ती । नरकपाळ घेतलें हातीं । चिताभस्म सर्वांगी तुझ्या ॥ ६३ ॥
परम अपवित्र मुंडमाळ । दुर्गंधी गजचर्म अमंगळ । भूतें घेऊनि पुष्कळ । निरंजनीं राहसी सदा ॥ ६४ ॥
तुझी स्त्री वृद्ध महाकाळी । दुजी जटेंत लपविली । ते तुज सांडून समुद्रास मिळाली । सहस्त्रमुखें चुंबित ॥ ६५ ॥
तूं अभागी कापट्यकोश । तुज पाप पुण्य न कळे नि:शेष । सेनेसहित तुझा ग्रास । क्षणमात्रें करीन मी ॥ ६६ ॥
माझें विशाळ शरीर बळ अद्‍भुत । तुज ग्रासीन एक क्षणांत!' । यावरि तो खड्‍गधर जगदीश बोलला । ऎक मश्यका वृथापुष्टा ॥ ६७ ॥
तुज मी दिसतों सान । क्षणें तनु तुझी विदारीन । भस्में आच्छादिलों द्विमूर्धान । परि क्षणें कानन जाळील ॥ ६८ ॥
कंठीरव दृष्टीं न भरे परी । क्षणांत वारणचक्रे विदारी । कुलिश धाकटें शक्रकरी । परि धराधर चूर्ण केले ॥ ६९ ॥
बहु धाकटा वामन । परि ढेंगेंत आटिलें ब्रह्मांड जाण । कुंभोद्‍भवाची तनु सान । परि मेदिनीवसन प्राशिला ॥ ७० ॥
लहान दिसे चंडांश । परि कमळभवांडीं न माये प्रकाश । तरि तुझा क्षणमात्रें नाश । मीच करीन पाहें आतां ॥ ७१ ॥
पंडितापुढें शतमूर्ख जाण । सव्यापसव्य करी भाषण । तैसा तूं जल्पसी पूर्ण । देहांतीं फाटा फुटला तूंतें ॥ ७२ ॥
खांडववनाचा सूड सवेग । वैश्‍वानरास मागे पतंग । की विष्णुवहनापुढें उरग । झेपावत आला जैसा ॥ ७३ ॥
तेंवि मणीचा सूड घ्यावया देखा । आलास तूं एथ कीटका ! । तरणीच्या किरणावरि पिपीलिका । कैसी चढोन जाईल? ॥ ७४ ॥
कल्पांतविजू धरून वदनीं । केंवि शलभ उडेल गगनीं । उर्णनाभीतंतेंकरूनी । बांधवेकेंवि ऎरावत ॥ ७५ ॥
आपलें तेज धुंधुमार । तरणीस दावी वारंवार । कीं ब्रीदें बांधोन खर । नारदापुढें गाऊं आला!' ॥७६ ॥
ऎसे तीक्ष्ण शब्द ऎकोन । मल्ल धाविला खड्‌ग घेऊन । तें खंडेरायें छेदून । क्षणमात्रें टाकिलें ॥ ७७ ॥
मल्ल तेव्हां चाप ओढून । शर सोडी चपलेसमान । परि महाराज मणिप्राणहरण । छेदिता जाला खड्‍गघायें ॥ ७८ ॥
शक्ति सोडीत बळें दैत्य । असिलताघायें त्याही तोडित । अग्निअस्त्र मल्ल प्रेरित । चालिली जळत देवसेना ॥ ७९ ॥
शिवें मेघास्त्र घालून । तत्काळ विझविला अग्न । मल्लें वातास्त्र सोडून । जलदजाळ विदारिलें ॥ ८० ॥
शिवें पर्वतास्त्र घालून तत्काळ । वात कोंडिला परम सबळ । पर्वत फोडिला न लागतां वेळ ।  मल्लें वज्रास्त्र घालुनी ॥ ८१ ॥
दैत्य सोडी माहेश्‍वर । ब्रह्मास्त्र प्रेरी जगदीश्‍वर । शक्तिअस्त्र घालून शंकर । म्हैसासुर पळविले ॥ ८२ ॥
दैत्य प्रेरी पादोदर । शिव सोडी त्यावरी खगेंद्र । असो, प्रळय वर्तला थोर । युगान्त वाटला महावीरां ॥ ८३ ॥
खड्‍ग हातीं घेऊन । मल्ल भिडला जवळीं येऊन । एक हाक गाजली दारुण । विमानें सुरगण पळविती ॥ ८४ ॥
मेघमुखाहून घोष थोर । गडगडा गर्जती दैत्येंद्र । देवसेना अपार । आटिली तेणें क्षणार्धे ॥ ८५ ॥
अशुद्धनिम्नगा वहाती । त्यांमाजीं जीत वीर पोहती । प्रेतांच्या लाखोल्या पाडिल्या क्षितीं । वस्त्रालंकारीं मंडित हो! ॥ ८६ ॥
शस्त्रांसहित पडिले कर । मुगुटांसहित शिरें अपार । ऎसें रण माजिलें अनिवार । संकट वाटे सर्वांसी ॥ ८७ ॥
देवसेना आटली बहुत । ऎसें देखोन हिमनगजामात । निर्वाणशस्त्र पाशुपत । काढिता जाला तेधवां ॥ ८८ ॥
गभस्ती पावला अस्त । एकयाम रजनी होत । दीपिका पाजळील्या तेथ । तेतीस कोटीं सुरवरीं ॥ ८९ ॥
झळकती दीपिकांचे भंभाळ । हरिद्रचूर्ण उधळे पुष्कळ । तेणें पीतवर्ण पृथ्वी निराळ । त्यांत सुर सुमनें वर्षती ॥ ९० ॥
सप्तकोटी मुख्य गण । त्यांसहित खड्‌गराज विराजमान । जयजयकार करून । दीपिका सुरगण ओवाळिती ॥ ९१ ॥
म्हणती, 'दयाळा महीपति ! । मल्लास द्यावी यावरि मुक्ति । याच्या भयें भयभीत क्षिती । करी निर्वृति सर्वही !' ॥ ९२ ॥
इकडे मल्लें केला संहार । अजा पिटीत जैसा व्याघ्र। तैसे पळती निर्जर । हांक घोर गाजली ॥ ९३ ॥
ऎसें देखोन उमानाथ । जें सकळ शस्त्रास्त्रांमाजीं समर्थ । प्रेरिता जाला पाशुपत । तेजें उजळत ब्रह्मांड हे ॥ ९४ ॥
उगवले सहस्त्रे सहस्त्रकर । तैसें अस्त्र प्रचंड अनिवार । कीं कृतांतदंड साचार । उभारला महाप्रळयीं ॥ ९५ ॥
कीं असंख्य विजांचा एक रोळ । कीं प्रळयकाळची जिव्हा सबळ । सप्तकोटी मंत्रांचे तेज सकळ । सामर्थ्य तेथ एकवटलें ॥ ९६ ॥
पृथ्वी तडतडं उधळत । शेष मस्तक सांवरित । वराहवेष भगवंत । देत दंत सांवरूनी ॥ ९७ ॥
ऎसें चालिलें पाशुपत । तेजें ब्रह्मांड उजळत । दोन्ही दळे मोह पावत । येत अकस्मात मल्लावरी ॥ ९८ ॥
त्रुटि न वाजतां ते क्षणीं । शिर छेदून  पाडिलें धरणीं । पायांखाले घालूनी । रगडिलें खंडेराजें ॥ ९९ ॥
जाला एकचि जयजयकार । देव वर्षती सुमनें भंडार । दीपिका घेऊन समग्र । नाचती तेव्हां रणगोंधळी ॥ १०० ॥
अष्टनायिका नृत्य करिती । नारद तुंबर आनंदें गाती । इंद्र ब्रह्मा यश वर्णिती । ऋषि स्तुति करिती सर्व ॥ १०१ ॥
दिव्यदेह पावोन मल्ल अपार । स्तवन करीत प्रीतीनें थोर । 'मल्लारी हें नाम साचार । एथून वागवीं दयाळा ! ॥ १०२ ॥
तुझें पढती जें माहात्म्य । त्यांचे पुरविसी सकळकाम । युद्धामाजीं जय परम । दॆईं त्यांस दयाळा ! ॥ १०३ ॥
मल्लपुत्र पांच जण । कुंभ शूलधर दोघे जण । देवगंधर्व लोहार्गल पूर्ण । महाबाहु पांचवा ॥ १०४ ॥
ते पांचही पर्वत करून । स्थापिले भक्तपुत्र म्हणवून । त्यावरि धर्मपुत्र सत्य सुजाण । मणिचूल पर्वतीं स्थापिले ॥ १०५ ॥
'तुम्हांस जो द्वेषील त्रासील जाण । त्यास मी सगळेंच ग्रासीन । माझ्या भक्तास जो करील विघ्न । त्यास निर्दळीन नेमेंसीं ॥ १०६ ॥
माझे भक्तीस जो रत पूर्ण । त्यास मी अंतर्बाह्य रक्षीन । कोठेंहि पडों नेदी न्यून । भक्ताअधीन मी साच!' ।१०७ ॥
त्यावरि कल्पवृक्षातळीं । दोनी लिंगें उत्पन्न जालीं । मल्लारी म्हाळसा देव सकळीं । षोडशोपचारें पूजिते जाले ॥ १०८ ॥
मासांमाजीं उत्तम मास । हरीची विभूति मार्गशीर्ष । शुद्धपक्षीं चंपाषष्ठीस । शततारका नक्षत्रीं ॥ १०९ ॥
रविवारीं प्रकट अवतार । मणिमल्लमर्दन परमेश्‍वर । देव ऋषि गंधर्व नर । यात्रा अपार भरलीले ॥ ११० ॥
तें अवतारस्थळ साचार । महाराज क्षेत्र प्रेमपुर । प्राकृत लोक म्हणती पेंभर । निजमाहेर भक्तांचें ॥ १११॥
मुख्यस्थल प्रेमपुर पाहीं । मग भक्तांलागीं प्रगटला ठायीं ठायीं । स्थापना किती मिती नाहीं । पूजा घेत भक्तांची ॥ ११२ ॥
म्हणोन पुराणप्रसिद्ध स्थळ । तें प्रेमपुर निर्मळ । निजभक्त जाणती प्रेमळ । सुख तेथिंचें कैसें तें ॥ ११३  ॥
जेथिंचे यात्रेस अभिनव । स्वर्गीहून येती देव । अष्टनायिका आणि गंधर्व । नृत्य गायन करिती तेथें ॥ ११४ ॥
मणि आणि मल्ल । अश्‍वारूढ दोघे द्वारपाळ । होउनी तिष्ठती सर्व काळ । प्रेमपुरीं शिवापुढें ॥ ११५ ॥
तेथिंचा महिमा अपार । वर्णूं न शके सहस्त्र वक्त्र । ते स्थळीं जाऊन पूजिती जे नर । त्यांस इहपरत्र सुखरूप ॥ ११६ ॥
ब्रह्मादि शक्र ऋषि मिळोनी । मृत्तिकेचीं लेपें करोनी । प्राणप्रतिष्ठा करितां तत्क्षणीं । सजीव जालीं रूपें तींच ॥ ११७ ॥
म्हाळसा गंगा दोघी जणी । दोहींकडे विलसती कामिनी । दिव्यवस्त्रीं दिव्याभरणीं । दैदीप्यवंत सर्वदा ॥ ११८ ॥
देव म्हणती, 'मल्लारी! । तूं कुळदैवत ज्याचे घरीं । त्याचे सर्व काम पूर्ण करीं । उणें तिळभरी पडों नेंदी ॥ ११९ ॥
अष्टगंधें आणि भंडार । आरक्तपुष्पें गुंफून हार । अर्चिती जे म्हाळसाप्रियकर । तेचि नर धन्य पै ॥ १२० ॥
तुझें माहात्म्य करिती पठण । श्रवण करिती भावेंकरून । त्यांचे मनोरथ पुरवून । विजय करीं सर्वस्थळीं !' ॥१२१ ॥
चंपाषष्ठीच्या दिवसांत । सहा दिवसपर्यंत । त्रिकाळ जे प्राणी पढत । नाहीं अंत भाग्या त्यांच्या ॥ १२२ ॥
त्रिमास पठण करितां नित्य । पोटीं पुत्र होईल प्रतापवंत । लक्ष्मी घरीं अमित । नित्य काळ तयाचे ॥ १२३ ॥
ग्रहपीडा पिशाच भूतावळी । यांची पीडा नव्हे कदाकाळीं । षण्मास पढतां त्रिकाळीं । महाव्याधि दूर होये ॥ १२४ ॥
धान्यक्षेत्रीं जे पठण करित । तेथ पीक होय परमाद्‍भुत । दक्षणामुख पढतां मासांत । शत्रुक्षय होय पैं ॥ १२५ ॥
आदित्यवारीं पुस्तक पूजोन । जे करिती हें माहात्म्यश्रवण । नष्टद्रव्य सांपडे पूर्ण । तस्करउपद्रव नव्हे कधीं ॥ १२६ ॥
आधिव्याधी दूर करून । मृत्यू दरिद्र संहारून । भक्तगृहीं मणिमल्लमर्दन । रात्रिदिवस राहे सुखें ॥ १२७ ॥
त्याचें ऋण मल्लारी । आपण आंगें परिहारी । ग्रामास गेला बहुदिन दुरी । तोही भेटे श्रवणें याच्या ॥ १२८ ॥
चतुर्दश अक्षरांचा मंत्र । गुरुमुखें शिकती जे साचार । त्यांचे घरीं सर्व प्रकार । म्हाळसावर पुरवील सदा ॥ १२९ ॥
यंत्रपूजन मंत्रधारण । सहस्त्रनाममंत्रश्रवण । जे भक्त करिती अनुदिन । प्रपंच परमार्थ गोड त्यांचा ॥ १३० ॥
चंपाषष्ठीस जाण । द्यावें ब्राह्मणास उत्तम भोजन । रोट वृंताकशाक क्षीरोदन । प्रिय पूर्ण मल्लारीतें ॥ १३१ ॥
एथे मूर्ख बुद्धिहीन । म्हणती, करावें पलांडूभक्षण । हें मूळ ग्रंथ पाहतां शोधून । संस्कृतीं नाहीं सर्वथा ॥ १३२ ॥
सनत्कुमारीं हे कथा । मनूप्रती सांगितली तत्वता । मल्लारिकवच मंत्र पढतां । निर्भय भक्तां सर्वकाळ ॥ १३३ ॥
प्रेमपुराभोवतीं तीर्थें असतीं । अष्टतीर्था आणिक नाहीं मिती । तीं वर्णिलीं मूळ ग्रंथीं । नाना रीतीं ऋषींनीं ॥ १३४ ॥
जैशीं वाराणशीस बहुत तीर्थें तैसींचि प्रेमपुरीं अद्‌भुतें । पापसंहारकें अमितें । सनत्कुमारीं वर्णिलीं बहु ॥ १३५ ॥
तीर्थविधी करावा पर्वकाळीं । सर्वस्वें तोषविजे कपाळमाळी । मुख्य याग विप्र सकळीं । धनधान्यदानीं पूजावे ॥ १३६ ॥
महानवमीचे दिवशी । अगत्य पूजावें मणिमर्दनासी । त्यावरि पूर्णिमा कार्तिकमासीं ते दिवशीं पूजावा तो ॥ १३७ ॥
त्यावरि मुख्य चंपाषष्ठी । ते दिवशीं अर्चावा धूर्जटी । ते भक्त कधीं संकटीं । न पडतीच जाणिजे ॥ १३८ ॥
प्रेमपुर देखिलें नाहीं नयनीं । तरी माहात्म्य ऎकावें श्रवणीं । कवच सहस्त्रनाम पढोनी । मंत्र यंत्र आराधिजे ॥ १३९ ॥
तेणें सर्वपापसंहार । अष्टादश कुष्ट समग्र । नाना रोग पीडा करणार । श्रवणपठणें दूर होती ॥ १४० ॥
मूर्तीपुढें बैसोन । माहात्म्य वाचावें, करावें श्रवण । पार्यातकपुष्पें आणून । मल्लारीस अर्चावें ॥ १४१ ॥
आठां दिवसां आदित्यवारीं । भक्तीं अर्पिजे प्रीतीं मल्लारी । पीतवर्ण तंदूळ कल्हारी । भक्तकैवारी अर्चावा ॥ १४२ ॥
वसंतऋतूंत मल्लारीस । करिजे बहुत पूजाविलास । महिमा वर्णितां शेष । लज्जित होय प्रेमपुरींचा ॥ १४३ ॥
ब्रह्मांडपुराणीं क्षेत्रखंड । तेथींचें हें माहात्म्य अति गोड । श्रवणें पुरवी सकळ कोड । न पडे चाड इतरांची ॥ १४४ ॥
प्रेमपुराजवळी शिवगया पूर्ण । जे तेथ करिती पिंडदान । त्यांचे पूर्वज उद्धरोन । शिवलोकाप्रती जाती ॥ १४५ ॥
मेघवाहन नगरीं भाग्य विशेष । चंद्रानन नामें होता वैश्‍य । कुटदुर्मती  नाम त्याच्या पुत्रास । परम नष्ट द्र्व्यलुब्धी ॥ १४६ ॥
कपटताजवा करून । ग्राहकांस नाडी रात्रंदिन । पुढें ती मृत्यु पावोन । काग जन्माप्रति गेला ॥ १४७ ॥
मुखीं यावानल धरूनी । अंतरिक्ष जातां गगनीं । गयापदावरी येऊनी । क्षणएक स्थिरावला ॥ १४८ ॥
मुखींचे यावानल सुटोन । गयापदीं पडिलें गळोन । सदाशिवें संतोषोन । पिंडदान मानिलें ॥ १४९ ॥
त्याचे पितृगण नरकीं पडिले । ते नेऊन कैलासीं स्थापिले । ऎसीं तीर्थें तेथ प्रबळें । महिमा अपार न वर्णवे ॥ १५० ॥
ब्रह्मानंदे जोडून कर । चतुर पंडितां विनवी श्रीधर । आमचे पूर्वज सर्व योगीश्वर । तिहीं देव अर्चिला हा ॥ १५१ ॥
पंढरीहून पश्‍चिमेस देख । नाझरें नाम पुण्यकारक । ह्याखालें ग्राम सुरेख । वाटंबर नाम त्याचें ॥ १५२ ॥
वडिलांची भक्ति अभिनव । देखोनि प्रेमपुरीचा राव । मायागंगातीरीं निजभाव । पाहोनिया प्रकटलासे ॥ १५३ ॥
ज्ञानानंद ब्रह्मानंद । उभयबंधु जगप्रसिद्ध । त्यांचे चरणाब्जीं मिलिंद । श्रीधर स्वानंद अभंग सदा ॥ १५४ ॥
संस्कृत बावीस अध्याय उत्तम । ग्रंथ जाणिजे मल्लारिमाहात्म्य । त्याची प्राकृत टीका सप्रेम । दो अध्यायांत कथियेली ॥ १५५ ॥
ब्रह्मानंदा श्रीधरवरा । म्हळसाह्रुदयारविंदभ्रमरा । भक्तवत्सला करुणासमुद्रा । अतिउदारा अभंगा ! ॥ १५६ ॥
॥ इति श्रीब्रह्माण्डपुराणे क्षेत्रखण्डे मल्लारिमाहात्म्यं सम्पूर्णमस्तु ॥

N/A

N/A
Last Updated : February 10, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP