करक चतुर्थी
आश्विन व. चतुर्थीला (जी चंद्रोदयव्यापिनी ) हे व्रत करतात. जर चतुर्थी दोन दिवस असेल अगर दोन्ही दिवस नसेल तर 'मातृविद्धा प्रशस्यते' या न्यायाने पूर्वविद्धा मानावी.
या व्रतात शिव-शिवा, कार्तिकस्वामी व चंद्र यांची पूजा करावी. नैवेद्यासाठी गुळ-पापडीचे लाडू वगैरे करवे ठेवावेत. हे व्रत सामान्यपणे लग्न झालेल्या स्त्रिया (सौभाग्यवती) अगर त्याच वर्षी लग्न झालेल्या मुलींनीही करणेच आहे. नैवेद्याचे १३ लाडू अगर करवे, १ कापड, १ भांडे, व विशेष लाडू सासूसासर्यांना द्यावेत.
हे व्रत करणार्यांनी त्या दिवशी आंघोळ इ. नित्यकर्मे पुरी करून
'मम सुखसौभाग्यपुत्रपौत्रादि सुस्थिर श्रीप्राप्तये करकचतुर्थीव्रतमहं करिष्ये ।'
हा संकल्प करुन वाळुवर पिंपळाच्या वृक्षाचे चित्र काढून त्याखाली शिवशिवा (पार्वती ) व षडानन यांच्या मुर्ती अगर चित्र यांची स्थापना करून
नम: शिवायै शर्वाण्ये सौभाग्यं संततिं शुभाम् ।
प्रयच्छ भक्तियुक्तानां नारीणां हरवल्लभे ।'
या मंत्राने पार्वतीची षोडशोपचारे पूजा करावी.
'नम:शिवाय व 'षण्मुखाय नम:'
या मंत्रांनी अनुक्रमे शंकर व कार्तिकस्वामी यांची पूजा करून करव्याचा अगर लाडवांचा नैवेद्य दाखवावा. चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ्य देऊन व ब्राह्मणाला दक्षिणा देऊन मग स्वत: जेवावे.
* दशरथपूजा
आश्विन व. चतुर्थी रोजी दशरथाची पूजा करून तेथेच दुर्गापूजन केल्यास सर्व सुखांचा लाभ होतो.
* संकष्टी
ही गणराजाची चतुर्थी प्रसिद्ध आहे. या दिवशी दिवसभर उपास करावा. संपूर्ण निराहार असावे. चंद्रोदयानंतर श्रीगणेशाची विधियुक्त पूजा करावी. त्यास लाल फूल, शमी वाहाव्यात. ब्राह्मणभोजनोत्तर चंद्रदर्शन घ्यावे व जेवावे. यायोगाने सर्वार्थाची प्राप्ती होते. उद्धारक शक्ती प्राप्त होते.
या व्रताच्या आचरणाने शिवपार्वतींना पुन्हा स्कंददर्शन झाले व स्कंदानेही हे व्रत करताच मुक्त होऊन त्यास शिवपद मिळाले व शांती लाभली.