* केदारगौरीव्रत
एक व्रत. याचा आरंभ कार्तिक अमावस्येस करतात. त्या दिवशी गौरी व केदार यांची पूजा करतात. हे व्रत दक्षिणेत प्रसिद्ध आहे.
* गौरीतपव्रत
या व्रताचा आरंभ कार्तिक अमावास्येला करतात. या दिवशी प्रात:स्नान आदि झाल्यावर हातात गंध, अक्षता, फुले, दूर्वा आणि उदक घेऊन
'ईशार्द्धंगहरे देवि करिष्येऽहं व्रतं तव ।
पतिपुत्रासुखावप्तिं देहि देवि नमोऽस्तु ते ॥'
असा संकल्प करावा व मध्यान्ही सूर्यनारायणास अर्घ्य द्यावे आणि
'अहं देवि व्रतमिहं कर्तुमिच्छामि शाश्वतम् ।
तवाज्ञया महादेवि निर्विघ्नं कुरु तत्र वै ।'
अशी प्रार्थना करावी. नंतर गौरीपूजन व उपवास करावा. पूजेचे आवाहनादी सहा उपचार झाल्यावर अंगपूजा करून गंधपुष्पादी इतर दशोपचारांनी पूजन करावे आणि गौरीच्या उजव्या बाजूस गणेश व डाव्या बाजूस स्कंद यांचे पूजन करावे. नंतर तांब्याच्या अगर मातीच्या आठ पणत्यांत तुपाचे दिवे ठेवावे, रात्रभर (सूर्योदय होईतो ) ते दिवे तेवत ठेवावे. ब्राह्ममूहूर्तावर (प्रतिपदे दिवशी सकाळी ) स्नान करून नंतर ब्राह्मण दांपत्याची पूजा करावी. तांबे, पितळ व शिसे यांच्या तीन पात्रांत गूळ, काही पक्वान्ने, तीळ-तांदूळ व सौभाग्यद्रव्ये ठेवुन ते दिवे त्यावर ठेवावे आणि बगळे, कावळे आदी पक्षी ओरडू लागेपर्यंत ते न घेता तिथे बसून राहावे.
पक्षी ओरडू लागण्यापूर्वी उठल्यास सौभाग्य नष्ट होते. अशातर्हेने, पहिल्या वर्षी अमावास्येपासून, दुसर्या वर्षी प्रतिपदेपासून, तिसर्या वर्षी द्वितीयेपासून या क्रमाने व्रत करीत सोळाव्या वर्षाच्या मार्गशीर्ष पौर्णिमेला आठ ब्राह्मण दांपत्ये बोलावून मध्यान्ही सुपूजित गौरीजवळ अष्टदलावर सोम व शिव यांची पूजा करावी आणि तिखट-मिठाचे वडे, गुळपापडी, पुर्या, अनरसे, खीर, तूप, साखर व मोदक अशा आठ पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. या आठ पदार्थांनी भरलेली आठ जोडपाने वाढून दांपत्यांना जेवू घालावे, त्यांना वस्त्रालंकार वगैरे अर्पण करावे. ती अन्नपात्रे झाकणांसह दांपत्यांना दान द्यावी. हे व्रत स्त्रियांनी करावयाचे आहे. या व्रताने स्त्रियांना पुत्रप्राप्ती होते आणि त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण होतात.
* दर्शश्राद्ध :
दर्शाच्या दिवशी केले जाणारे श्राद्ध पितृत्रयी, मातृत्रयी व मातामहत्रयी यांना उद्देशून करतात. हे श्राद्ध नेहमीच्या श्राद्धासारखेच असते.