१ कृच्छ्र्चतुर्थी :
या व्रताचा आरंभ मार्ग. शु. चतुर्थीला होतो. हे व्रत प्रत्येक चतुर्थीला करावयाचे असून ते चार वर्षात पुर्ण होते. त्याचे विधान असे -
पहिल्या वर्षी मार्ग. शु. चतुर्थीला प्रातःस्नान करुन व्रतनियम ग्रहण करावा आणि गणेशाचे यथाविधी पूजन करावे. नैवेद्य म्हणून लाडू, तिळाची वडी, जवाचा आणि तिखट-मिठाचा वडा हे पदार्थ घ्यावेत.
'त्वत्प्रसादेन देवेश व्रतं वर्षचतुष्टयं ।
निर्विघ्नेन तु मे यातु प्रमाणं मूषकध्वज ।'
संसारार्णवदुस्तरं सर्वविघ्नसमाकुलम् ।
तस्माद्दीनं जगन्नाथ त्राहि मां गणनायक ॥'
अशी प्रार्थना करून एक वेळ प्रमाणित भोजन करावे. त्याप्रमाणे प्रत्येक चतुर्थीस करावे. दुसर्या वर्षी मार्ग. शु. चतुर्थीला पूर्वीप्रमाणे व्रतनियमग्रहण, व्रतपूजादी करून नक्त करावे. (एकदा रात्री जेवावे). अशाप्रकारे प्रत्येक चतुर्थीला, याप्रमाणे वर्षभर करावे. तिसर्या वर्षी पुन्हा मार्ग. शु. चतुर्थीला असे वर्षभर करावे. चौथ्या वर्षी याच मार्ग. शु. चतुर्थीला नियमग्रहण, व्रतसंकल्प आणि पूजादी करून निराहार उपवास करावा. याप्रमाणे दर चतुर्थीला असे एक वर्षपर्यंत करावे. चौथे वर्ष संपल्यानंतर पांढर्या कमळावर तांब्याचा कलश ठेवून सुवर्णाच्या गणेशमूर्तीची पूजा करावी. संवत्स धेनू दान करावी. हवन करावे. चोवीस ब्राह्मण दांपत्यांना भोजन घालून स्वतः जेवावे. ब्राह्मणांना वस्त्रे, भूषणे दान द्यावी. अशातर्हेने व्रत केले असता सर्वप्रकारची विघ्ने दूर होतात आणि सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त होते.
२ वरदचतुर्थी :
उपरोक्त कृच्छ्र चतुर्थीप्रमाणे हे व्रतही मार्ग. शु. चतुर्थीला सुरु होऊन चार वर्षांनी पूर्ण होते. पहिल्या वर्षी प्रत्येक चतुर्थीला दुपारी अळणी भोजन करावे. दुसर्या वर्षी नक्तभोजन करावे. तिसर्या वर्षी अयाचित भोजन करावे व चौथ्या वर्षी उपवास करून पूर्वीच्या व्रताप्रमाणे समाप्ती करावी. या व्रताने सर्वप्रकारची अर्थसिद्धी होते. परिमित भोजन याचा अर्थ काहीजण ३२ घास असा करतात, तर काहीजण २६ घास असा करतात.
'स्मृत्यन्तर' मध्ये 'अष्टौ ग्रासा मुनेर्भक्ष्याः षोडशारण्यवासिनः ।
द्वात्रिंशतं गृहस्थास्यापरिमितं ब्रह्मचारिण: ॥'
मुनीने आठ घास, वनवासियांनी सोळा, गृहस्थांनी बत्तीस आणि ब्रह्मचार्यांनी यथारुची (अपरिमित) भोजन करावे, अशी शास्त्राची आज्ञा आहे. एक घास म्हणजे एका आवळ्याएवढे अन्न समजावे, किंवा जेवढे अन्न एकदा सहजपणे तोंडात घेता येईल, तो एक घास समजावा. याज्ञवल्क्यस्मृतीमध्ये अगदी थोडे अन्न म्हणजे तीन घास समजावे, असे म्हटले आहे
३ विनायकी :
या मार्ग. शु. चतुर्थीला 'मुकुंदा चतुर्थी अशी संज्ञा आहे. या दिवशी श्रीगणेशाची पूजा करावी व या तिथीपासून प्रत्येक चतुर्थीला एक वर्ष एकवेळ खाऊन राहावे व दुसर्या वर्षी फक्त रात्रीचे जेवण करावे. तिसर्या वर्षी प्रत्येक चतुर्थीला न मागता मिळालेले अन्न एकवेळ खाऊन राहावे. चौथ्या वर्षी प्रत्येक चतुर्थीला निराहार राहून गणेशाचे चिंतन, भजन, असेच आवडीने पूजन करावे. अशा प्रकारे विधीपूर्वक चार वर्षे व्रत पूर्ण झाल्यानंतर शेवटी व्रतस्नान करावे. गणेशाची सुवर्ण प्रतिमा करावी. ते शक्य नसल्यास हळदीची करावी. नंतर विविध रंगांनी कमळाची पाने जमिनीवर काढून त्यावर कलश स्थापन करावा. कलशावर तांदळांनी भरलेले ताम्हन ठेवावे. तांदळांनी भरलेल्या ताम्हनावर वस्त्र ठेवून त्यावर गणेशाची स्थापना करावी. त्यानंतर गंधादी उपचारांनी दयामय ईश्वराची पूजा करावी. त्यानंतर लाडवांचा नैवेद्य दाखवावा. नमस्कार, प्रदक्षिणा व प्रार्थनेनंतर रात्रभर गायन-वादन, पुराण, कथा व गणेशाचे स्तवन व नामजाप करुन जागरण करावे.
सकाळ झाल्यावर स्नानादी नित्यकृत्ये उर्कून, शुद्ध वस्त्र धारण करुन श्रद्धेने तीळ, तांदुळ, जव, पिवळी मोहरी, तूप व साखर या हवन-सामग्रीने होम करावा. गण, गणाधिप, कूष्माण्ड, त्रिपुरान्तक, लंबोदर, एकदंत, रुक्मदंष्ट्र, विघ्नप, ब्रह्मा, यम, वरुण, सोम, सूर्य, गंधमादी, तथा परमेष्ठी या सोळा नावांनी, प्रत्येक नावाच्या सुरुवातीस प्रणव आणि शेवटी चतुर्थी विभक्ती व नमः हे पद जोडून अग्नीमध्ये एकएक आहुती द्यावी.
यानंतर
'वक्रतुंडाय हुम'
या मंत्राने १०८ आहुती द्याव्यात. त्यानंतर अग्निहोत्रीकडून यथाशक्ती होम करुन पुर्णाहुती द्यावी. नंतर दिक्पालांची पूजा करुन २४ ब्राह्मणांना अत्यंत आदराने लाडू आणि खिरीचे जेवण घालावे. आचार्यांना दक्षिणा व सवत्स धेनू दान करुन अन्य ब्राह्मणांना यथाशक्ती भूयसी दक्षिणा द्यावी. त्यानंतर त्या श्रेष्ठ ब्राह्मणांना नमस्कार करुन प्रदक्षिणा घालावी व आदराने त्यांना निरोप द्यावा. मग आप्तेष्ट-मित्रांसह प्रसन्न चित्ताने स्वतः भोजन करावे. या व्रताचे पालन करणारी माणसे या लोकात उत्तम भोग भोगून गणेशाच्या प्रसादाने परलोकात विष्णूच्या सहवासात राहतात.
या चतुर्थीला 'नक्त चतुर्थी' असेही म्हणतात. व्रतकर्त्याने त्या दिवशी विनायकाची पूजा व नक्त भोजन आणि दुसर्या दिवशी तिलमिश्रित अन्नाने पारणे करावयाचे असते.
४ श्रवणिका व्रत :
हे व्रत मार्ग. शु. चतुर्थीस व अष्टमीस करतात. या तिथींना ब्राह्मण, कुमारिका यांना भोजन घालावयाचे असते. कुमारिकांच्यापुढे बारा जलपात्रे आलंकृत करुन ठेवावीत आणि एक जलपात्र स्वतःच्या मस्तकावर ठेवून केशवाचे ध्यान करावे, असे सांगितले आहे.