१ तिलदहीव्रत :
हे तिथीव्रत आहे. पौष व. एकादशीला हे व्रत करतात. या दिवशी उपवास करतात. पुष्यनक्षत्राच्या दिवशी गाईचे शेण गोळा करून त्यात तीळ मिसळून त्याच्या गोवर्या तयार करतात. मग त्या गोवर्यांचे अग्नीत हवन करतात. विष्णू या व्रताची देवता आहे.
फल- सौंदर्य व इच्छित वस्तूची प्राप्ती.
२ षट्तिला एकादशी :
पौष व. एकादशी दिवशीला प्रातःस्नान करून 'श्रीकृष्ण' या मंत्राचा ८, २८, १०८, किंवा १००० जप करावा. उपवास करून रात्री जागरण करावे. हवन करावे. परमेश्वराचे पूजन करावे व
'सुब्रह्मण्य नमस्तेऽस्तु महापुरुष पूर्वज ।
गृहाणार्घ्यं मया दत्तं लक्ष्म्यासह जगत्पते ॥'
या मंत्राने अर्घ्य द्यावेत. ही ' षट्तिला एकादशी आहे. यात तिळाच्या जलाने स्नान, तिळाचे उटणे, तिळाचे हवन, तिळजलप्राशन व तीळ मिसळलेले पाणी दान करावे. तिलमिश्रित मिष्टांन्ने भोजनात वापरावीत. म्हणजे सर्व पापांचा नाश होतो.