मराठी मुख्य सूची|स्तोत्रे|
करुणाष्टके

करुणाष्टके

करुणाष्टके म्हणजे करुणाघन परमेश्वरास प्रेमभराने आळविणारी कविता. आपल्या दुर्गुणाची आठवण होऊन अनुतापयुक्त जे छंदोबद्ध उद्गार मुखावाटे बाहेर पडतात, ती करुणाष्टके होत. श्रीसमर्थ रामदासस्वामींच्या या करुणाष्टकांत करुणरस ओतप्रेत भरलेला आहे. ही करुणाष्टके म्हणताना बाह्यसृष्टि विसरुन जाऊन अर्थाबरोबर मनाने रमावे.
"Karunashtake" are the poems by Swami Ramdas depicting Karunya Rasa to forget yourself in true devotion of Lord Rama.


अनुदिन अनुतापें तापलों रामराया ।
परमदिनदयाळा नीरसी मोहमाया ॥
अचपळ मन माझें नावरे आवरीता ।
तुजविण शिण होतो धांव रे धांव आता ॥ १ ॥

भजनरहित रामा सर्वही जन्म गेला ।
स्वजनजनधनाचा व्यर्थ म्यां स्वार्थ केला ॥
रघुपति मति माझी आपुलीशी करावी ।
सकळ त्यजुनि भावें कांस तूझी धरावी ॥ २ ॥

विषयजनित सूखें सौख्य होणार नाहीं ।
तुजविण रघुनाथा वोखटें सर्व कांहीं ॥
रघुकुळटिळका रे हीत माझें करावें ।
दुरित दुरि हरावें सस्वरूपीं भरावें ॥ ३ ॥

तनु-मन-धन माझें राघवा रूप तुझें ।
तुजविण मज वाटे सर्व संसार वोझें ॥
प्रचलित न करावी सर्वथा बुद्धि माझी ।
अचल भजनलीला लागली आस तूझी ॥ ४ ॥

चपळपण मनाचें मोडितां मोडवेना ।
सकळ स्वजनमाया तोडितां तोडवेना ॥
घडि घडि विघडे हा निश्चयो अंतरीचा ।
म्हणवुनि करूणा हे बोलतो  दीनवाचा ॥ ५ ॥

जळत ह्रदय माझें कोट्यानुकोटी ।
मजवरि करुणेचा राघवा पूर लोटीं ॥
तळमळ निववीं रे राम कारुण्यसिंधू ।
षड्‌रिपुकुळ माझें तोडि याचा समंधू ॥ ६ ॥

तुजविण करुणा हे कोण जाणेल माझी ।
शिणत शिणत पोटीं लागली आस तुझी ॥
झडकरि झड घालीं धांव पंचानना रे ।
तुजविण मज नेती जंबुकी वासना रे ॥ ७ ॥

सबळ जनक माझा राम लावण्यकोटी ।
म्हणवुनि मज पोटीं लागली आस मोठी ॥
दिवस गणित बोटीं ठेवूनि प्राण कंठीं ।
अवचट मज भेटी होत घालीन मीठी ॥ ८ ॥

जननिजनकमाया लेंकरूं काय जाणे ।
पय न लगत मूखीं हाणिता वत्स नेणे ॥
जळधरकण आशा लागली चातकासी ।
हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी ॥ ९ ॥

तुजविण मज तैंसे जाहलें देवराया ।
विलग विषमकाळीं तूटली सर्व माया ॥
सकळजनसखा तूं स्वामि आणीक नाहीं ।
वमकवमन जैसें त्यागिलें सर्व कांहीं ॥ १० ॥

स्वजनजनधनाचा कोण संतोष आहे ।
रघुपतिविण आतां चित्त कोठें न राहे ॥
जिवलग जिव घेती प्रेत सांडूनि जाती ।
विषय सकळ  नेती मागुता जन्म देती ॥ ११ ॥

सकळ जन भवाचे आथिले वैभवाचे ।
जिवलग मग कैंचे चालतें हेंचि साचें ॥
विलग विषमकाळीं सांडिती सर्व माळीं ।
रघुविर सुखदाता सोडवी अंतकाळीं ॥ १२ ॥

सुख सुख म्हणतां हें दु:ख ठाकूनि आलें ।
भजन सकळ गेलें चित्त दुश्र्चीत जाले ॥
भ्रमित मन कळेना हीत तें आकळेना ।
परम कठिण देहीं देहबुद्धि वळेना ॥ १३ ॥

उपरति मज रामीं जाहली पूर्णकामीं ।
सकळभ्रमविरामीं राम विश्रामधामीं ॥
घंडिघडि मन आतां रामरूपीं भरावें ।
रघुकुळटिळका रे आपुलेंसें करावें ॥ १४ ॥

जळचर जळवासी न्स्णती त्या जळासी ।
निशिदिन तुजपासीं चूकलों गूणरासी ॥
भुमिधर निगमांसी वर्णवेना जयासी ।
सकळभुवनवासी भेट दे रामदासीं ॥ १५ ॥

असंख्यात ते भक्त होऊनि गेले ।
तिंहीं साधनांचे बहु कष्ट केले ॥
नव्हे कार्यकर्ता भुमीभार जालों ।
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥ १६ ॥

बहू दास ते तापसी तीर्थवासी ।
गिरिकंदरी भेटी नाहीं जनासी ॥
स्थिती ऎकतां थोर विस्मीत झालों ।
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलॊं ॥ १७ ॥

सदा प्रेमराशी तयां भेटलासी ।
तुझ्या दर्शनें स्पर्शनें सौख्यराशी ॥
अहंता मनीं शब्दज्ञाने बुडालों ।
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥ १८ ॥       

तुझ्या प्रीतीचे दास जन्मास आले ।
असंख्यात ते कीर्ति बोलोनि गेले ॥
बहू धारणा थोर चकीत जालों ।
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥ १९ ॥

बहुसाल देवालयें हाटकाचीं ॥
रसाळ कळा लाघवें नाटकाचीं ॥
पुजा देखितां जाड जीवीं गळालों ।
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥ २० ॥

कितेकीं देह त्यागिले तूजलागीं ।
पुढे जाहले संगतीचे विभागी ॥
देहेदु:ख होतांचि वेगीं पळालों ।
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥ २१ ॥

किती योगमूर्ती किती पुण्यमूर्ती ।
किती धर्मसंस्थापना अन्नशांती ॥
पस्तावलों कावलों तप्त जालॊं ।
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥ २२ ॥

सदा सर्वदा राम सोडूनि कामीं ।
समर्था तुझे दास आम्ही निकामी ॥
बहू स्वार्थबुद्धीनें रे कष्टवीलों ।
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥ २३ ॥

नसे भक्ति ना ज्ञान ना ध्यान कांही ।
नसे प्रेम हें राम विश्राम नाहीं ॥
असा दीन अज्ञान मी दास तूझा ।
समर्था जनीं घेतला भार माझा ॥ २४ ॥

उदासीन हे वृत्ति जीवीं धरावी ।
अती आदरें सर्व सेवा करावी ॥
सदा प्रीती लागो तुझे गूण गातां ।
रघूनायका मागणें हेंचि आतां ॥ २५ ॥

सदा सर्वदा योग तूझा घडावा ।
तुझे कारणीं देह माझा पडावा ॥
उपेक्षूं नको गूणवंता अनंता ।
रघूनायका मागणें हेंचि आतां ॥ २६ ॥

नको द्रव्य- दारा नको येरझारा ।
नको मानसीं ज्ञानगर्वें फुगारा ॥
सगूणीं मना लाविं रे भक्तिपंथा ।
रघूनायका मागणें हेंचि आतां ॥ २७ ॥

मनीं कामना कल्पना ते नसावी ।
कुबुद्धी कुडी वासना नीरसावीं ॥
नको संशयो तोडिं संसारव्यथा ।
रघूनायका मागणें हेंचि आतां ॥ २८ ॥

समर्थापुढें काय मागों कळेना ।
दुराशा मनीं बैसली हे ढळेना ॥
तुटो संशयो नीरसी सर्व चिंता ।
रघूनायका मागणें हेंचि आतां ॥ २९ ॥
ब्रिदाकारणें दीन हातीं धरावें ।
म्हणे दास भक्तांसि रे उद्धरावे ।
सुटे ब्रीद आम्हांसि सांडूनि जातां ।
रघूनायका मागणें हेंचि आतां ॥ ३० ॥

विश्रांति देहीं अणुमात्र नाहीं ।
कुळाभिमानें पडिलों प्रवाहीं ॥
स्वहीत माझें होतां दिसेना ।
तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ३१ ॥

विषया जनानें मज लाजवीलें ।
प्रपंचसंगे आयुष्य गेलें ॥
समयीं बहू क्रोध शांती घडेना ।
तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ३२ ॥

संसारसंगे बहु पीडलों रे ।
कारुण्यसिंधू मज सोडवीं रे ॥
कृपाकटाक्षें सांभाळि दीना ।
तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ३३ ॥

आम्हां अनाथांसि तूं एक दाता ।
संसारचिंता चुकवीं समर्था ॥
दासा मनीं आठव वीसरेना ।
तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ३४ ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP