देवल स्मृती
१ . सिंधुनदीच्या तीरावर सुखाने बसलेल्या मुनिश्रेष्ठ देवलाकडे येऊन सर्व मुनि पुढीलप्रमाणे म्हणाले .
२ . भगवन , म्लेंछांनी बाटविलेले , ब्राह्मण , क्षत्रिय , वैश्य व शूद्र क्रमाने कसे शुद्ध होतील ?
३ . त्यांनी स्नान कसे करावे , शुद्ध कसे व्हावे आणि प्रायश्चित्त कसे घ्यावे , त्यांनी कोणत्या आचारांना पाळावे हे सविस्तर आम्हांस सांगा . देवल म्हणालेः -
४ . उत्तर बाजूस महानदी व दक्षिण बाजूस कीकट ( मगध ) देश असा बारा योजने विस्तीर्ण त्रिशंकु देश सोडून
५ . हे महर्षिहो , मी विस्तारपूर्वक प्रायश्चित्त सांगतो . अनुलोमपद्धतीने केलेल्या पत्नीस व दासीस जाताशौच व
६ . मृताशौच पतीच्या जातीप्रमाणे पाळावयाचे . पति मेल्यानंतर भाऊबंदाइतके पाळावयाचे ;
७ . म्लेच्छांनी बाटविलेल्या ब्राह्मणांनी अपेयपान , अभक्ष्यभक्षण , आणि अगम्यागमन एक वर्षापर्यंत केले असल्यास
८ . त्यास मी प्रायश्चित्त सांगतो . ब्राह्मणांस सपराक चांद्रायण
९ . क्षत्रियास पादकृच्छ्रासहित पराक , वैश्यास पराकार्ध व शूद्रास पांच दिवस प्रायश्चित्त द्यावे .
१० . नख , केश काढून प्रायश्चित्त द्यावे . चारहि वर्णांना त्याच्याशिवाय शुद्धि नाही .
११ . म्लेंच्छ झालेल्या माणसाचे शरीर प्रायश्चित्त न घेतां मृत झालेले असेल , परंतु त्यांची प्रायश्चित्त घेण्याची इच्छा असेल तर त्याच्या प्रेतास मेखलादण्डवर्जित संस्कार करावेत .
१२ . बाटलेल्या किंवा शूद्रांनी दण्डमेखला पळविल्यास त्याचे यथाविधि संस्कार करुन
१३ . विप्रांना दान , गाय , दक्षिणा , द्यावी . विशेष पवित्रपणाची इच्छा करणारांनी , अश्व , गाय , भूमि , सुवर्ण यांचे दान द्यावे .
१४ . इतके केल्यानंतर तो आपल्या कुटुम्बातील लोकांच्या पंक्तीस बसण्यास योग्य होतो , नाही तर होत नाही . स्वतःच्या पत्नीकडे यथाशास्त्र गमन करील तरच तो शुद्ध होतो .
१५ . एक वर्षापेक्षा जास्त दिवस जर बाटलेला असेल तरच तो वरीलप्रमाणे प्रायश्चित्त घेऊन गंगास्नान केल्याने शुद्ध होतो .
१६ . सिन्धु , सौवीर , आणि सौराष्ट्र तसेंच त्या देशाच्या आसपास राहणार्या लोकांच्या देशांत , व तसेच कलिंग , कोंकण आणि वंग या देशांत जाऊन आले असता शुद्धीकरितां संस्कार करावे लागतात .
१७ . बलात्काराने म्लेंछ , चाण्डाळ व दस्यूंनी जे आपले दास बनविले आणि गाई वगैरे प्राण्यांची हिंसारुप अपवित्र कृत्ये करावयास लावली
१८ . उच्छिष्ट धुवावयास लावले , तसेच उष्टे खाण्यास भाग पाडले , तसेच गाढव , उंट , गांवडुक्कर यांचे मांस खावविले ,
१९ . त्या जातींच्या स्त्रियांशी संग घडला , त्या स्त्रियांशी भोजन घडले असे ब्राह्मणाला महिनाभर घडले तर त्याला प्राजापत्य प्रायश्चित्त शुद्ध करिते .
२० . आहिताग्नीला चान्द्रायण किंवा पराक प्रायश्चित्त आहे ; पण एक वर्षपर्यंत असे राहण्याचा प्रसंग आल्यास चांद्रयण आणि पराक अशी दोनहिं प्रायश्चित्ते केली पाहिजेत .
२१ . शूद्रास एक वर्षपर्यंत परधर्मात राहणेचा प्रसंग आलेला असल्यास पंधरा दिवस गव्हाची पेज पिऊन राहावे . एक महिनाभरच तो परधर्मात राहिला असल्यास त्याबद्दल कृच्छ्रपाद प्रायश्चित्त घेतले असतां तो शुद्ध होतो .
२२ . यावरुन एक वर्षापेक्षां जास्त दिवस असल्यास त्याबद्दल विद्वान लोकांनी प्रायश्चित्ताची कल्पना करावी . चार वर्षे असाच परधर्मात राहिल्यास तो त्या धर्माचा होतो ( मग पहिल्या जातीत घेणे कठिण होते . ) बाटल्यानंतर होणारा जीवाच र्हास प्रायश्चित्त घेतल्यानेच बंद होतो . गुह्य , कांख , मस्तक , भ्रू या ठिकाणचे केश काढावेत .
२४ . प्रायश्चित्ताला आरंभ झाल्यापासून प्रायश्चित्त घेणार्या माणसाकडून सर्व विधि करावेत . ( बरेंच वेळा प्रायश्चित्त अनेक दिवसांचे असते . त्याकरितां हे सांगितले आहे . ) स्नान तीन वेळा दिवसांतून करावे . धूत वस्त्र नेसावे आणि इंद्रियनिग्रह करुन असावे .
२५ . दर्भ हातांत घेतलेला , खरे बोलणारा असे प्रायश्चित्त घेणार्या माणसाने असावे असे देवलांनी सांगितले आहे . वर्ष , सहा महिने , महिना किंवा पंधरा दिवस बाटविलेल्या माणसाची शुद्धि कशी करावी ? एक वर्षपर्यंत शूद्र जातीचा मनुष्य बाटलेला असल्यास चांद्रायण प्रायश्चित्त केले असतां त्याची शुद्धि होते .
२७ . सहा महिने बाटला असल्यास पराक , तीन महिने बाटला असल्यास पराकाचा अर्धा भाग आणि महिनाभर बाटलेला असल्यास पादकृच्छ्र , प्रायश्चित्त द्यावे . क्षौर सर्वांना करावयाला पाहिजेच .
२८ . ( वर जे प्रायश्चित्त सांगितले ते ब्राह्मणांना उद्देशून सांगितले ) यापैकी एक चतुर्थांश कमी करुन क्षत्रियांना त्यापैकी अर्धे वैश्यांना आणि ब्राह्मणांना सांगितलेल्या प्रायश्चित्तापैकी १ / ४ शूद्रांना द्यावे .
२९ . प्रायश्चित्त संपल्यानंतर दुभती गाय दक्षिणा म्हणून द्यावी . असे प्रायश्चित्त केल्यानंतर कुटुंबात जाऊन राहिल्यास कोणासहि दोष लागत नाही .
३० . ज्याच्या वयाला ऐंशी वर्षे झाली आहेत , किंवा ज्या मुलाचे वय सोळा वर्षाचे आंत आहे , त्यांना व स्त्रिया आणि रोगी यांना नेहमी सांगितल्यापेक्षा अर्धे प्रायश्चित्त द्यावे .
३१ . अकरा वर्षांच्या आंतील आणि पांच वर्षांच्या वरील मुलकरितां प्रायश्चित्त भाऊ , किंवा अन्य कोणत्याहि पालकांनी केले असतां चांलते .
३२ . या शिवाय इतर वयाच्या लोकांनी सर्व प्रायश्चित्त व्रताचरण स्वतः केले पाहिजे . तिलहोम व निरलस रीतीने जप केला पाहिजे .
३३ . ( आतां मनुष्य कोणकोणत्या गोष्टीने धर्मभ्रष्ट होतो हे सांगतात ) संभाषण , स्पर्श , निश्वास , बरोबर फिरणे , एकत्र बसणे , याजन , शिकविणे , योनिसंबंध , यामुळे परस्परांचे पातक परस्परांस जाते .
३४ . पतित मनुष्याशी सहधर्मविधि , विवाहसंबंध , अध्ययन , सहभोजन केल्याने मनुष्य तात्काळ पतित होतो .
३५ . अशा तर्हेने एक वर्षपर्यंत पतिताशी सहवास घडल्यास आणि याजन , बसणे यज्ञादि वगैरे सर्व कामनिक क्रिया घडल्यास मनुष्य पतित होतो .
३६ . येथून पुढे क्वचित बलात्काराने बाटलेल्या स्त्रियांना शुद्ध करण्यासाठी चांगले प्रायश्चित्त सांगतो . ब्राह्मणी , क्षत्रिय स्त्री , वैश्य स्त्री आणि शूद्र स्त्री या जर अन्त्यज वगैरेंनी बलात्काराने भ्रष्ट केल्या तर ब्राह्मण स्त्रीला योग्य प्रायश्चित्त कोणते होईल .
३८ . ब्राह्मणी जर म्लेंछ माणसाला भोजन वाढील किंवा अभक्ष्य भक्षण करील तर पराक प्रायश्चित्ताने तिची शुद्धि होते . क्षत्रिय स्त्री , वैश्य स्त्री आणि शूद्र स्त्री यांना शुद्ध होण्याकरिता त्यांतील क्रमाने पाव पाव प्रायश्चित्त कमी करावे .
३९ . केवळ म्लेंछांन्न भक्षण केले आहे , मैथुन व इतर अभक्ष्यभक्षण जिच्या हातून झाले नाही तिला तीन रात्री व्रतस्थ राहिल्याने शुद्धि प्राप्त होते .
४० . रजस्वला जर म्लेंच्छ किंवा अन्य कोणी यांनी स्पृष्ट झाली तर तेथून पुढे तीन दिवस बसून पंचगव्य घेऊन शुद्ध होते .
४१ . रजस्वला जर परस्परांना स्पर्श करतील तर त्या ब्राह्मण असोत वा क्षत्रिय असोत , तीन रात्रींनी शुद्ध होतात असे देवलाने सांगितले आहेत .
४२ . ब्राह्मणी आणि शूद्रस्त्री रजस्वला असून परस्पराला स्पर्श करतील तर पांच रात्री निराहार राहून पंचगव्य घेऊन शुद्ध होतात .
४३ . ब्राह्मणीने उपवास करावा . क्षत्रिय स्त्रीने स्नान करावे . वैश्य स्त्रीने सचैल स्नान करावे आणि शूद्र जातीच्या स्त्रीला नक्त सांगावे .
४४ . म्लेंछभक्षण , म्लेंछसंस्पर्श , आणि म्लेंच्छासहवर्तमान वसति एक वर्ष किंवा वर्षापेक्षां जास्त असेल तर तीन रात्रीत शुद्धि होते .
४५ . अरण्यांत प्रवास करीत असतां , चोर किंवा म्लेंछ यांनी पळविलेल्यास , भुकेने किंवा भयाने भक्ष्य किंवा अभक्ष्यभक्षण करण्याचा प्रसंग आल्यास
४६ . पुनः स्वतःच्या देशांत येऊन कोणत्याहि जातीच्या माणसांनी प्रायश्चित्त घ्यावे . क्षत्रियांनी त्यांच्या एक चतुर्थांश प्रायश्चित्त करावे .
४७ . बलात्काराने स्त्री धरुन तिच्याशी व्यभिचार केल्यामुळे ती गरोदर राहिल्यास गरोदर स्त्री शुद्ध होत नाही . अभक्षभक्षण केले तर ती तीन दिवसांत शुद्ध होते .
४८ . जी स्त्री इच्छेने किंवा अनिच्छेने म्लेंच्छापासून गर्भ धारण करिते , ती स्त्री ब्राह्मणी , क्षत्रिय स्त्री , शूद्र स्त्री किंवा कोणचीहि असो
४९ . तिची शुध्दि कशी होईल ? कृच्छ्रसांतपन करावे आणि तुपान योनिपाचन करावे .
५० . असवर्ण पुरुषापासूनचा गर्भ वेळपर्यंत पोटांत आहे तोपर्यंत स्त्री शुद्ध होत नाही .
५१ . गर्भ पोटांतून बाहेर पडला किंवा रजोदर्शन झाले म्हणजे स्त्री शुद्ध सुवर्णाप्रमाणे शुद्ध होते .
५२ . तो गर्भ दुसर्याला द्यावा . स्वतः केव्हांहि घेऊ नये . स्वतःच्या जातींत त्याला घेऊ नये , कारण तसे केले असतां संकर होईल .
५३ . बलात्काराने म्लेंछांनी बाटविलेला पांच , सहा , सात , वर्षे किंवा दहा ते वीस वर्षेपर्यंत त्याची शुद्धि केली जाते .
५४ . त्याला प्राजापत्यद्वय प्रायश्चित्त केले असतां शुद्धि होते . यांपेक्षा जास्त दिवस राहिल्यास जातींत समाविष्ट करण्यासारखी शुद्धि करतां येत नाही . केवळ इतकी वर्षे बरोबर राहणेच झाले असेल तर कृच्छ्रप्रायश्चित्तानेच शुद्धि होते .
५५ . पांच वर्षांपासून वीस वर्षापर्यंत म्लेंच्छांसह वर्तमान सहवास घडलेला असल्यास दोन चांद्रायणे प्रायश्चित्त घेतले असतां शुद्धि होते .
५६ . कांख , गुह्य , मस्तक , मिशा , सर्व ठिकाणचे केस काढावेत . हातापायाची नखे काढावीत , असे प्रायश्चित्त घेतल्यानंतर शुद्ध होतो .
५७ . ज्याला प्रायश्चित्त देतां येत नाही आणि जो प्रायश्चित्त देऊन शुद्ध मात्र करितो , तो बाटलेल्या माणसाच्या पातकाचा अधिकारी होतो असे निश्चित समजावे .
५८ . सभेत स्पर्श झाला असतांहि म्लेंच्छांसह बसावे . मात्र सचैल स्नान करुन एक दिवस उपवास करावा .
५९ . आई म्लेंछ झाली असेल किंवा बाप वगैरे कोणीहि बाटले असतील तर ते मेले असतां सूतक नाही असे देवल मुनि सांगतात .
६० . श्राद्ध वगैरे करितांनाहि बाटलेल्या आईबापांना पिण्ड न देतां बाटलेल्या अशा पितामहादिकांना पिण्ड द्यावे .
६१ . बाटलेल्या स्त्री किंवा शूद्रांना पंचगव्य देऊ नये . देणे झाल्यास मंत्रांशिवाय द्यावे .
६२ . गाईच्या मूतांत वरुणदेवता , शेणांत अग्नि , दुधांत चंद्र , दह्यांत वायु , आणि तुपांत सूर्य देवता आहे .
६३ . तांबड्या गाईचे गोमूत्र , पांढर्या गाईचे शेण , सोनेरी रंगाच्या गाईचे दूध , निळ्या गाईचे दहि ,
६४ . काळ्या गाईचे तूप घ्यावे . कारण गुण विशेष वर्णावर अवलंबून आहेत . पाण्याला सर्व वर्ण आहेत . कारण उदक कोणाचा वर्ण ग्रहण करीत नाही . कोणत्याहि व्रतांत पंचगव्य सर्ववर्णाच्या लोकांना प्रमाणबद्ध असते .
६५ . सहा भाग गोमूत्र , शेण , दर्भाचे पाणी , आणि तूप तीन भाग . दूध व दहि दहा भाग घ्यावे .
६६ . विद्वान ब्रह्मवेत्त्यांनी वर सांगितल्याप्रमाणे प्रायश्चित्त द्यावे . जर यापेक्षां
६७ . वेगळे प्रायश्चित्त देईल तर तो ब्राह्मण दोषी होईल .
६८ . कपिला गाईचे दूध काढून धारोष्ण पिईल तर ह्या व्यासांनी सांगितलेल्या कृच्छ्र प्रायश्चित्ताने चांडाळहि शुद्ध होईल .
६९ . तिळाचा होम करावा , लक्षपूर्वक ’ विष्णोरराट ’ या मंत्राचा जप केला असतां बाटलेला मनुष्य शुद्ध होतो .
७० . फार काय सांगावे , तिळाचा होम करावा , तीळ द्यावेत आणि पाप नाहीसे करावे .
७१ . ब्राह्मण लोक स्नान , तीर्थफळ , शुद्ध तप यांपासून जे पुण्य संपादन करितात , त्यांचे त्या पुण्याने पाप नाहीसे होते आणि त्या पुण्याचे फळ शुद्ध होणाराला मिळते .
७२ . अशा प्रकारे दवल मुनीने बाटलेल्यास शुद्ध करण्याकरितां प्रायश्चित्त सांगितले आहे . अन्य मुनींचेहि मत याशिवाय वेगळे असणार नाही .
७३ . सुवर्णदान , गोदान ; भूमिदान गाईला लागणारी खाद्य वगैरे सामुग्री ब्राह्मणाला दिली असतां बाटलेला मनुष्य शुद्ध होतो .
७४ . पांच दिवस संभाषण , एकत्र राहणे भोजन असा सहवास घडल्यास पंचगव्य घेऊन दान दिले असतां शुद्ध होतो .
७५ . एक , दोन , तीन अगर चार वर्षेपर्यंत म्लेंछांच्या सहवासांत राहिल्यास पुढीलप्रमाणे प्रायश्चित्त केले असतां ब्राह्मण जातीचा मनुष्य शुद्ध होतो .
७६ . एक दिवस गोमूत्र , दोन दिवस शेण , तीन दिवस दूध , चौथ्या दिवशी दह्यासहित दूध , पांचव्या दिवशी घृतयुक्त पंचगव्य द्यावे , म्हणजे शुद्धि होते .
७७ . पांच , सात , दहा , आणि पंधरापासून वीस
७८ . दिवसपर्यंत जर म्लेंच्छाशी सहवास होईल तर ब्राह्मणांची देहशुद्धि कशी होईल ती सांगतो . पांच दिवस सहवास झाल्यास पंचगव्य द्यावे . दहा दिवस सहवासास पराक द्यावे . वीस दिवस सहवास झाल्यास अतिकृच्छ प्रायश्चित्त द्यावे . ज्याच्या पोटांत शास्त्रोक्त विधानाने पंचगव्य जाईल
८० . त्याचे जे कांही पातक असेल , ते सर्व नष्ट होते . पांच , सात , आठ , बारा , फार काय वीसहि दिवस बाटलेल्या ब्राह्मणास केवळ पंचगव्याने शुद्धि प्राप्त होते .
८१ . पंचगव्य म्हणजे गाईचे दूध , दहि , गोमूत्र , तूप , पाणी हे घेऊन दुसरे दिवशी उपवास करावा म्हणजे कृच्छ्र सांतपन होते .
८२ . पृथवसांतपन म्हणजेच वेगवेगळ्या पदार्थांनी सहा दिवस उपवास करावयाचा . सात दिवस वरीलप्रमाणे उपवास केल्यास त्यास कृच्छ्र असे म्हणतात . तेच महासांतपन होय .
८३ . पर्ण , उदुम्बर , कमल , बिल्वपत्र , कुशोदक यांपैकी एक दिवस एक अशा क्रमाने प्याल्यास पूर्णकृच्छ्र होतो .
८४ . तापलेले दूध , तूप व पाणी यांपैकी एक दिवस एक प्याल्यास आणि एकरात्र उपवास केल्यास तप्तकृच्छ्र नांवाचे शुद्धि करणारे प्रायश्चित्त होते .
८५ . एक वेळा जेवण , नक्त , त्याचप्रमाणे अयाचितवृत्तीने राहणे किंवा एक उपवास केल्यास पादकृच्छ्र होते .
८६ . एकवीस दिवस दूध पिऊन राहिले असतां ’ कृच्छ्रातिकृच्छ्र ’ प्रायश्चित्त होते . बारा दिवस उपवास केल्याने पराक नावाचे प्रायश्चित्त होते .
८७ . पेज , भाजी , ताक , पाणी आणि सातू यांपैकी प्रत्येक दिवशी एक खाऊन एक रात्र उपवास केल्यास सौम्यकृच्छ्र प्रायश्चित्त होते .
८८ . वरील प्रत्येक पदार्थ तीन दिवस क्रमाने पुनः भक्षण केल्यास पुरुष नांवाचे पंधरा दिवसांचे व्रत होते .
८९ . तिथिक्रमाने शुक्लपक्षांत मोराच्या अण्डाएवढे अन्नाचे ग्रास वाढवावे आणि कृष्णपक्षांत कमी करावे यास कृच्छ चांद्रायण असे म्हणतात .
९० . कोणच्याहि रीतीने एका महिन्यांत दोनशे चाळीस घास व्हावेत असे देवालाने धर्मशास्त्र सांगितले आहे .
येथे देवल स्मृतीचे भाषांतर संपले .