कालज्ञानाचे महत्व आमच्या देशात फार प्राचीन कालापासून माहीत असल्यामुळे व ते कालज्ञान सूर्य चंद्रादिक ग्रहांच्या गतींवर अवलंबून असल्यामुळे ज्योतिषशास्त्राचा विचार फार पूर्वीपासून सुरू झाला. पैतामह, वासिष्ट, सौर, इत्यादि सिद्धांत ग्रंथ निर्माण झाले. शालिवाहन शकाच्या तिसर्या शतकापासून आर्यभट्ट, वराहमिहीर, ब्रह्मगुप्त, लल्ल, द्वितीय आर्यभट्ट, वगैरे ज्योतिषांनी यात मोलाची भर घातली. यात सजीवपणा आणला तो भास्कराचार्यांनी ११ व्या शतकात. नंतर १५ व्या शतकात ग्रहलाघवकार गणेश दैवज्ञ हे नामांकित, कुशाग्र बुद्धीचे विद्वान ज्योतिषी झाले.