अर्जुन म्हणाला:
कृष्णा संन्यास कर्माचा तसा योगहि सांगसी
दोहोत जे बरे एक सांग ते मज निश्चित ॥१॥
मग पार्थ श्रीकृष्णासी म्हणे । अहो हे कैसे तुमचे बोलणे । एक ऐसे सांगावे, जेणें । मनीं विचार करिता ये ॥१॥
मागे सकळ कर्मांचा संन्यास । तुम्हीचि कथिला बहुत वेळेस । तरि कर्मयोगीं कैसा अति रस । दाविता आता? ॥२॥
ऐसे द्व्यर्थी हे बोलता । आम्हा अज्ञानांचे चित्ता । पडावा तैसा अनंता । उमज पडेना ॥३॥
एक तत्त्व जर कथिणे । तर असावे निश्चित एक बोलणे । हे आणिकांनी काय सांगणे । तुम्हाप्रती? ॥४॥
तरि याचिलागी तुम्हास । विनविले होते मी प्रभूंस । की हा परमार्थ - उपदेश । संदिग्ध न सांगावा ॥५॥
परि मागील असो देवा । प्रस्तुतचे उकलुनी दावा । सांगा दोन्हींमाजी बरवा । कोणता मार्ग? ॥६॥
जो अंतिम निर्वाळा । अचुक देई फळा । आणि सरळ आचरिण्याला । सहजचि ॥७॥
जैसे चिद्रेचे सुख न मोडून । बहुत व्हावे मार्गक्रमण । ऐसे सुलभ सुखासन । साधन सांगावे ॥८॥
अर्जुनाचे या बोलें । देव मनीं रिझले । मग संतोषें बोलिले । ऐक, तैसेचि होईल ॥९॥
पहा, माय कामधेनुऐसी । असे ज्या दैववंतासी । चंद्रही तो लाभे तयासी । खेळावया ॥१०॥
शंकर प्रसन्न होता । उपमन्यूने इच्छिता । क्षीरसमुद्र दूधभाता । दिलाचि ना? ॥११॥
तैसे औदार्याचे सदन । तो श्रीकृष्ण होय प्रसन्न । मग सर्व सुखांचे आश्रयस्थान । अर्जुन का न व्हावा? ॥१२॥
येथ चमत्कार कायसा । धनी लक्ष्मीकांताऐसा । आता आपुल्या इच्छेऐसा । मागावा म्हणे वर ॥१३॥
म्हणोन अर्जुनें म्हटले । ते हासोनि याने दिधले । तेचि सांगेन बोलिले । काय श्रीकृष्ण ॥१४॥
श्रीभगवान् म्हणाले:
योग संन्यास हे दोन्ही मोक्षसाधक सारखे
विशेषचि परी योग संन्यासाहूनि मानिला ॥२॥
श्रीकृष्ण म्हणे कुंतीसुता । संन्यास - कर्मयोगाचा विचार करिता । मोक्षदायक तत्त्वता । दोन्हीही असती ॥१५॥
तरि जाणत्या - नेणत्यांस । हा कर्मयोग सोपा सकळांस । जैसी नाव स्त्रिया - बाळांस । जल तरुनि जावया ॥१६॥
सारासार पाहता तैसे । सोपा हाचि दिसे । कर्मत्यागाचे फळ अनायासे । लाभे या योगें ॥१७॥
आता याचिलागी सांगेन । तुज संन्यासाचे लक्षण । मग हे मार्ग अभिन्न । जाणसी तू ॥१८॥
तो जाण नित्य संन्यासी रागद्वेष नसे जया
जो द्वंद्वावेगळा झाला सुखें बंधातुनी सुटे ॥३॥
गेल्याचे स्मरण न करी । न पावता इच्छा न धरी । जो सुनिश्चल अंतरीं । मेरूऐसा ॥१९॥
आणि मी, ऐसे स्मरण । विसरले जयाचे अंतःकरण । पार्था, तो संन्यासी जाण । निरंतर ॥२०॥
जो मनें ऐसा जाहला । तोचि निःसंग जाण भला । म्हणोनि सुखें सुख पावला । अखंडित ॥२१॥
आता गृहादिक आघवे । ते काही न लागे त्यजावे । मन जे घेते असे स्वभावें । तेचि निःसंग जाहले ॥२२॥
पहा, अग्नी विझोनि जाई । मग राख जी केवळ राही । ती कापुसें धरिता येई । ज्यापरी गा; ॥२३॥
तैसा संसारीं असून । कर्मबंधीं न राही गुंतून । संकल्पाची बाधा न जाण । बुद्धीसी जयाचे ॥२४॥
म्हणोनि कल्पना जेव्हा सोडे । तेव्हाचि संन्यास घडे । याकारणें समान होत पुढे । दोन्ही मार्ग ॥२५॥
म्हणती सांख्य-योगाते भिन्न मूढ न जाणते
बाणो एकहि ती निष्ठा दोहींचे फळ देतसे ॥४॥
एरवी तरी पार्था । जे मूर्ख असती सर्वथा । ते ज्ञानयोग - कर्मयोग - व्यवस्था । जाणती कैसी? ॥२६॥
स्वभावता ते अज्ञान । म्हणूनि म्हणती हे भिन्न । एरवी दिव्यांचे प्रकाश जाण । काय अन्य अन्य? ॥२७॥
जयांनी अनुभवें चांगले । अवघे तत्त्व जाणिले । तयांनी दोहोंसहि मानिले । एकचि गा ॥२८॥
सांख्यांस जे मिळे स्थान ते योग्यांसहि लाभते
एकरूपचि हे दोन्ही जो पाहे तोचि पाहतो ॥५॥
ज्ञानयोग्यासि जे लाभत । तेचि कर्मयोगी मिळवीत । म्हणोनि एकता दोहीत । ऐशापरी सहज ॥२९॥
पहा आकाश आणि अवकाशात । जैसा भेद ना वसत । तैसाचि नसे ज्ञान - कर्मयोगात । ओळखे जो ॥३०॥
तयासीचि जगीं उजाडले । आत्मस्वरूप तयानेचि देखिले । ज्ञान - कर्मयोग जाणिले । भेदाविण जयाने ॥३१॥
योगावाचूनि संन्यास कधी साधेचिना सुखें
संयमी योग जोडूनि ब्रह्म शीघ्रचि गाठतो ॥६॥
जो कर्ममार्गें पार्था । चढे मोक्षपर्वता । तो महासुखाचा माथा । सत्वर गाठी ॥३२॥
कर्मामार्ग न आचरीत । तया संन्यासाचा हव्यास व्यर्थ । प्राप्ती कधी न होत । संन्यासाची तया ॥३३॥
अंतरीं धुतला योगी जिंकूनि मन इंद्रिये
झाला जीवचि भूतांचा करूनिहि अलिप्त तो ॥७॥
जयाने भ्रांतीपासुनि हिरावले । गुरूपदेशें मन धुतले । मग आत्मस्वरूपीं घातले । मुरवुनी ॥३४॥
जैसे मीठ समुद्रीं पडले । तोवरि अल्प दिसे वेगळे । मग समुद्रीं जेव्हा मिळे । होई समुद्राचिएवढे; ॥३५॥
तैसे संकल्पातुनि काढिले । जयाचे मनचि चैतन्य जाहले । एकदेशीय, परि तयें व्यापिले । त्रिभुवन ॥३६॥
आता कर्ता, कर्म, कार्य आघवे । हे खुंटले तया स्वभावें । लौकिकीं कर्ममग्न तया पहावे । तरि अकर्ता तो ॥३७॥
न काही मी करी ऐसे योगी तत्त्वज्ञ जाणुनी
देखे ऐके शिवे हुंगे खाय जाय निजे श्वसे ॥८॥
बोले सोडी धरी किंवा पापणी हालवी जरी
इंद्रिये आपुल्या अर्थीं वागती हेचि पाहतो ॥९॥
कारण पार्था तयाचे ठायी । ‘मी देह, ऐसा आठव नाही । तर कर्तेपण कोठचे पाही । उरे सांग ॥३८॥
ऐसे तनुत्यागाविण । अमूर्त ब्रह्माचे गुण । दिसती संपूर्ण । कर्मयोग्याठायी ॥३९॥
एरवी आणिकांचेपरी । तोही एक शरीरधारी । वर्तता सर्व व्यवहारीं । दिसतसे ॥४०॥
तोही डोळ्यांनी पाही । कानांनी ऐकत राही । परि तेथला सर्वथा नाही । नवल पहा ॥४१॥
असे त्यासही स्पर्शज्ञान । असे वासाचेही भान । आणि समयोचित भाषण । येई करिता ॥४२॥
आहाराते स्वीकारी । त्यजावे ते दूर सारी । निद्रेचे अवसरीं । निजे सुखें ॥४३॥
आपुल्या इच्छेऐसे । तोही चालतोसे दिसे । सकळ कर्मे आचरीतसे । खरोखरी ॥४४॥
हे सांगू काय एकेक । पहा श्वासोच्छवासादिक । आणि पाणण्यांची उघडझाक । आदि कर्मे; ॥४५॥
पार्था, तयाचे ठायी । हे आघवेचि असे पाही । परि तो कर्ता नव्हे काही । स्वानुभवबळें; ॥४६॥
जेव्हा भ्रांतिशेजेवरी निजला । तेव्हा स्वप्नसुखें घेरिला । मग ज्ञानोदयीं जागा जाहला । म्हणोनिया ॥४७॥
ब्रह्मीं ठेवूनिया कर्मे संग सोडूनि जो करी
पापें न लिप्त तो होय पद्मपत्र जसे जळें ॥१०॥
आता चैतन्यासंगती । सकळही इंद्रियवृत्ती । विषयीं वावरती । आपुलाल्या ॥४८॥
दीपाचे प्रकाशें । गृहींचे व्यवहार जैसे । देहीं कर्मजात तैसे । कर्मयोग्यासी ॥४९॥
तो सकळ कर्मे करीत । परि कर्मबंधें न लिप्त । जळीं जळापासुनि अलिप्त । कमलपत्र जैसे ॥५०॥
देहा - मनाने बुद्धीने इंद्रियांनीहि केवळ
आत्मशुद्ध्यर्थ निःसंग योगी कर्म अनुष्ठिती ॥११॥
जे आकळण्याआधी बुद्धीसी । विचाराचा न अंकुरही मानसीं । म्हणती ऐशा व्यवहारासी । शारीर ऐसे ॥५१॥
सांगतो उलगडुनी तुजसी । बालकाची हालचाल जैसी । योगी कर्मे करिती तैसी । देहेंचि केवळ ॥५२॥
मग पंचतत्त्वांचे घडलेले । जेव्हा शरीर असे निजलेले । तेव्हा मनचि वावरे एकले । स्वप्नीं जैसे ॥५३॥
नवल एक अर्जुना पहा । कैसा वासनेचा पसारा हा । जागे होऊ न देता देहा । सुखदुःखे भोगवी ॥५४॥
इंद्रियांचे गावीहि गोष्ट नसे । कर्म जे होई ऐसे । ते केवळ म्हटले जातसे । मानसींचे ॥५५॥
योगीजन तेही करिती । परि कर्मीं बांधिले न जाती । कारण संगत ते त्यागिती । अहंभावाची ॥५६॥
जैसे पिशाच्चाचे चित्त । तैसा भ्रमिष्ट होत । जेव्हा दिसती विक्षिप्त । क्रिया इंद्रियांच्या ॥५७॥
समोरले रूप देखे । हाकारिले ऐके । शब्द बोले सुखें । परि ज्ञान नाही ॥५८॥
हे असो, कारणरहितही । जे जे कर्म घडत राही । ते म्हणती पाही । केवळ इंद्रियांचे ॥५९॥
मग सर्वत्र जे जाणीवपूर्वक होत । ते बुद्धीचे कर्म निश्चित । अर्जुना हे ओळख येथ । म्हणे हरी ॥६०॥
बुद्धीसी ठेवुनि पुढती । चित्त देउनि कर्म करिती । परि ते मुक्त दिसती । नैष्कर्म्यप्राप्त व्यक्तींहुनी ॥६१॥
बुद्धीपासुनि देहापावत । अहंकाराची गोष्ट न तेथ । म्हणोनि ते कर्मे करीत । तरि शुद्धचि असती ॥६२॥
अगा कर्तेपणाविण कर्म । तेचि ते निष्कर्म । हे जाणती मर्म । गुरुकृपेने ॥६३॥
आता शांतरसाचे भरते । पात्र ओसंडुनी वाहते । बोलण्याचे पलीकडले ते । कथन केले ॥६४॥
जयाची इंद्रियाधीनता । फिटली असे सर्वथा । तयासीचि योग्यता । परिसावया ॥६५॥
“राहो हे विषयांतर । न सोडी कथासूत्र । श्लोकसंगती भंगणार । म्हणूनिया ॥६६॥
जे कठीण आकळण्यासी । जे जत्नेंहि न मिळे बुद्धीसी । तेदैवयोगें सांगण्यासी । लाभले तुज ॥६७॥
स्वभावत: जे शब्दातीत । ते सामावे जर वाणीत । तर आणिक काही अप्रस्तुत; । आता सांग कथा” ॥६८॥
अति उत्कंठित भाव श्रोत्यांचा । जाणोनि दास निवृत्तिचा । म्हणे संवाद कृष्णार्जुनांचा । मननपूर्वक ऐकावा ॥६९॥
मग पार्थासि म्हणे कृष्ण । आता सिद्धपुरुषाचे लक्षण । सांगतो तुज उलगडून । चित्त देई ॥७०॥
युक्त तो फळ सोडूनि शांति निश्चिळ पावतो
अयुक्त स्वैरवृत्तीने फळीं आसक्त बांधिला ॥१२॥
आत्मज्ञानें संपन्न जाहला । जो कर्मफळा विटला । घरबसल्या जगीं तयाला । शांति प्राप्त ॥७१॥
अर्जुना, अन्यांसी कर्मबंधाने । अभिलाषेचे दाव्याने । खूंटयासीचि खिळणे । फळभोगाच्या ॥७२॥
मनाने सगळी कर्मे सोडुनी संयमी सुखें
नवद्वारपुरीं राहे करीना करवीहि ना ॥१३॥
जैसी की फळाची हाव । ऐसी कर्मे करी सर्व । मग न केलेचि ऐसा भाव । ठेवुनि उदास ॥७३॥
ज्या ज्या दिशेसी पाही । तेथ सुखाची सृष्टी होई । तो म्हणे तेथ राही । महाबोध ॥७४॥
नवद्वारांचे देहीं । तो असूनिही नाही । करिताहि न करी काही । फलत्यागी ॥७५॥
न कर्तेपण लोकांचे न कर्मे निर्मिंतो प्रभु
न कर्मी फलसंयोग स्वभावें सर्व होतसे ॥१४॥
जैसा का सर्वेश्वर । पाहता दिसे निर्विकार । परि तोचि रची विस्तार । त्रिभुवनाचा ॥७६॥
आणि कर्ता ऐसे म्हणावे काय । तर कोणे कर्मीं लिप्त न होय । न लिप्ताळे हातपाय । उदास वृत्तीचा ॥७७॥
योगनिद्रा तर न मोडे । कर्तेपणासी सळ न पडे । महाभूतांचे समुदाय फाकडे । उभारी भले ॥७८॥
जगीं असे प्राणिमात्रांसाठी । परि केव्हाही कोणाचा नाही । जग हे होई जाई । तया शुद्ध नसे ॥७९॥
न घे पापहि कोणाचे न वा पुण्यहि तो विभु
अज्ञाने झाकिले ज्ञान त्यामुळे जीव मोहित ॥१५॥
पापपुण्ये अवघी ही । निकट असून न पाही । आणि साक्षी न होई । अन्य गोष्ट कशासी? ॥८०॥
तो सगुणाचे संगतीमुळे । सगुणचि होउन खेळे । परि निर्गुणपण न मळे । त्या समर्थाचे ॥८१॥
तो सृजी, पाळी, संहारी । ऐसे बोलत जे चराचरीं । ते अज्ञान गा, अवधारी । पंडुकुमरा ॥८२॥
गेले अज्ञान ते ज्यांचे आत्मज्ञानें तयां मग
परब्रह्म दिसे स्वच्छ जणू सूर्यें प्रकाशिले ॥१६॥
ते अज्ञान समूळ तुटे । तेव्हा भ्रांतीची काजळी फिटे । मग अकर्तृत्व प्रगटे । मज ईश्वराचे ॥८३॥
येथ ईश्वर एक अकर्ता । ऐसे पुरते ठसले चित्ता । तर तोचि मी हे स्वभावता । आदिसिद्ध ॥८४॥
ऐसा विवेक चित्तीं ये उदया । त्रिभुवनं भेद कसला तया? । पाही अनुभवें आपुलिया । जगाचि मुक्त ॥८५॥
जैसी पूर्वदिशेचे राउळीं । येता सूर्योदयाची दिवाळी । अन्यहि दिशातुनी त्याचिवेळीं । काळोख होय नष्ट ॥८६॥
रंगले त्यात ओतूनि बुद्धि निश्चय जीवन
पुन्हा येती न माघारे ज्ञानेंपाप धुऊनिया ॥१७॥
स्थिरबुद्धी आत्मज्ञानी । ब्रह्मरूप आपणा मानी । पूर्णब्रह्मीं निष्ठा राखुनी । ब्रह्मपरायण अहर्निश ॥८७॥
ऐसे ज्ञान भले व्यापक । जयाचे ह्रदया घाली हाक । तयाची समतादृष्टी चोख । शब्दांत काय वर्णू? ॥८८॥
आपण पाहती ब्रह्मरूप जैसे । ते देखती विश्वही तैसे । हे बोलणे कायसे - । नवल येथ? ॥८९॥
परि दैव जैसे कवतिकें । कधीचि दैन्य न देखे । किंवा विवेक न ओळखे । भ्रांतीसी जैसा; ॥९०॥
अथवा अंधाराची वानगीही । सूर्य स्वप्नींही न पाही । अमृताचे कानींही नाही । मृत्युवार्ता; ॥९१॥
हे राहो, चंद्रमा । न जाणे जैसा उष्पा । प्राणिमात्रीं ज्ञानियांसी, हे सुवर्मा, । भेदभाव न तैसा ॥९२॥
विद्याविनयसंपन्न द्विज गाय तसा गज
श्वान चांडाळ हे सारे तत्त्वज्ञ सम पाहती ॥१८॥
मग हे चिलट, हा गज । हा अंत्यज, हा द्विज । हा परका, हा आत्मज । हे उरेल कोठे? ॥९३॥
वा ही धेनू, हे श्वान । एक थोर, एक हीन । हे असो, कैसे स्वप्न । जागृतासी? ॥९४॥
येथ तरचि भेद दिसेल । जर अहंभाव उरेल । तो तर आधीचि नाशेल । मग विषमता कोठली? ॥९५॥
इथेचि जिंकिला जन्म समत्वीं मन रोवुनी
निर्दोष समजे ब्रह्म झाले तेथेचि ते स्थिर ॥१९॥
म्हणोनि सर्वत्र सदा सम । ते आपणचि अद्वय ब्रह्म । हे संपूर्ण जाणे वर्म । समदृष्टीचे ॥९६॥
जयाने विषयसंगन सोडिता । इंद्रियां न दंडिता । भोगिली निःसंगता । निरिच्छतेने ॥९७॥
लोकांसी अनुसरून । लौकिक व्यवहार करून । सोडिले जयाने अज्ञान । लौकिक हे ॥९८॥
जैसा जनीं असून पिशाच्चसंचार । जनांसी न होय गोचर । तैसा देहधारी तो, परि संसार - । न ओळखे तया ॥९९॥
हे असो, वार्यामुळे । जळावरिचि जळ लोळे । लोक त्यास म्हणत वेगळे । लाटा ऐसे; ॥१००॥
तैसीचि गोष्ट तयाच्या नामरूपाची । एरवी खरोखर तो ब्रह्मचि । मन ज्याचे वाहिले समतेसीचि । सर्वत्र गा ॥१०१॥
ऐसा समदृष्टी जो आहे । तयाचे लक्षणही पाहे । अर्जुना, संक्षेपें सांगेन हे । अच्युत म्हणे ॥१०२॥
प्रियलाभें नको हर्ष नको उद्वेश अप्रियें
बुद्धि निश्चल निमोंह ब्रह्मीं ज्ञानी स्थिरावला ॥२०॥
जैसे मृगजळाचे पुरात । लोटले न जाती पर्वत । तैसे शुभाशुभ लाभात । विकार जो न पावे; ॥१०३॥
तोचि समदृष्टी खरा । तत्त्वता जाणणारा । हरि म्हणे, पंडुकुमरा, । तोचि ब्रह्म ॥१०४॥
विटला विषयीं जाणे अंतरीं सुख काय ते
ब्रह्मीं मिसळला तेव्हा भोगी ते सुख अक्षय ॥२१॥
आत्मस्वरूपा त्यजुनि केव्हाही । जया इंद्रियग्रामीं येने नाही । तो विषय न सेवी कधीही । नवल काय? ॥१०५॥
सहजशा आत्मसुखें अपार । प्रफुल्लित अंतरीं स्थिर । म्हणोनि त्याबाहेर । पाऊल न घाली ॥१०६॥
कमळदळाचे पानावर । जेविला चंद्रकिरणें सुखकर । वाळवंट काय तो चकोर । मुखीं घाली? ॥१०७॥
तैसे अंतरीं उत्सुक । जया लाभे आत्मसुख । तो विषय सहजी त्यागी देख । सांगणे कशासी? ॥१०८।
तरी सहज एरवी । विचार करूनि पाही । या विषयसुखेंही । फसती कोण? ॥१०९॥
विषयांतील जे भोग ते दुःखासचि कारण
येती जसे तसे जाती विवेकी न रमे तिथे ॥२२॥
जयांनी आत्मस्वरूप न देखिले । तेचि इंद्रियविषयीं रंगले । जैसे दरिद्री भुकेले । कोंडा खाती; ॥११०॥
अथवा हरिणे तहानेली । संभ्रमें जळा विसरली । बरडमाळीं मृगजळीं । धावुनि येती; ॥१११॥
तैसे आत्मस्वरूप न भेटे । आत्मसुखाचे सदा खराटे । तयासीचि विषय हे गोमटे । आवडती ॥११२॥
एरवी सुख असे विषयीं । हे बोलण्यायोग्यहि नाही । का न जगीं उजाडे पाही । वीज चमकुनी ? ॥११३॥
सांग ऊन पाऊस वारे । यास्तव अभ्रछाया जर पुरे । तर तिमजली चुनेगच्ची घरे । का बांधावी? ॥११४॥
म्हणोनि विषयीं सुख म्हणती । ते अज्ञानी वायाचि बडबडती । चवीसी मधुर म्हणती । बचनागविष ॥११५॥
पीडाग्रहा म्हणती मंगल । मृगजळा म्हणती जळ । तैसे विषयापासुनि सुख ते केवळ । बरळणे होय ॥११६॥
हे राहो बोलणे वायफळ । सांग, सर्पफणीचे सावलीने केवळ । शीतलता कितीशी लाभेल । उंदरासी? ॥११७॥
जोवरि गळा लाविले आमिष । मासा न गिळी गमुनि भक्ष्य । तैसे विषयसंग हे विष । निःसंशय जाण ॥११८॥
विरक्तांचे दृष्टीतून । विषय पाहता न्याहाळून । पंडुरोगाचे पुष्टपण । जैसे दिसे ॥११९॥
म्हणोनि विषयभोगीं जे सुख । ते साद्यंतचि जाण दुःख । परि काय करावे, मूर्ख - । सेविल्याविण न राहती ॥१२०॥
अंतरंग न जाणिती बापुडे । म्हणोनि अगत्य सेविने पडे । सांग, पुवातिल कडे । काय किळस करिती? ॥१२१॥
दुःखिता दुःखचि वाटे जीवन । ते विषयकर्दमींचे बेडूक जाण । भोगजळा जलचर ते कोण - । सोडितील कैसे? ॥१२२॥
दुःखयोनि ज्या असती । काय त्या निरर्थक ना होती? । जर विषयांवरी विरक्ती । धरितील जीव? ॥१२३॥
नातरी गर्भवासादि संकट । वा जन्ममरणींचे कष्ट । ही विसाव्याविण वाट । चालावी कोणी? ॥१२४॥
आसक्तांनी विषय सोडावे । तर महादोषांनी कुठे रहावे? । आणि संसार या शब्दें ठरावे । लटिके काय जगीं? ॥१२५॥
मिथ्या अज्ञान म्हणुनी । घेतले तयांनी साच मानुनी । विषयदुःखा सुख गणुनी । स्वीकारिले जयांनी ॥१२६॥
याकारणें गा पार्था । विषय अनिष्ट सर्वथा । चुकुनि कधीही त्या पथा । नये जाऊ ॥१२७॥
अगा, यांसि विरक्त पुरुष । त्यागिती जैसे की विष । सुखरूपी दुःखपाश । निरच्छां तयां नावडे ॥१२८॥
प्रयत्नें मरणापूर्वी ह्या देहीं जिरवू शके
कामक्रोधातले वेग तो योगी तो खरा सुखी ॥२३॥
ज्ञानियांचे तर ठायी । विषयदुःखाची वार्ताचि नाही । जयांनी देहभाव देहीं । स्वाधीन ठेविले ॥१२९॥
बाह्य विषयांच्या कथा । ते न जाणती सर्वथा । ब्रह्मसुख एक नांदे आता । अंतर्यामीं ॥१३०॥
परि ते वेगळेपणें भोगिती । जैसे पक्षी फळ चाखिती । तैसे नव्हे, तेथ विसरती । भोक्तेपणही ॥१३१॥
भोगीं एक अवस्था येई । अहंकारपडदा दूर होई । मग सुखासी आलिंगन देई । गाढपणे जीव ॥१३२॥
त्या आलिंगनकाळीं । आपणचि आपणा कवळी । तेथ, जळ जैसे जळीं । वेगळे न दिसे; ॥१३३॥
वा आकाशीं वायू हरपे । तेथ दोन ही भाष लोपे । तैसे ब्रह्मस्वरूपचि उरे स्वरूपें । ऐक्यभोगीं त्या ॥१३४॥
ऐसी द्वैताची भाषा सरे । मग म्हणू जर ऐक्य हो पुरे । तर तेथ साक्षी कोण उरे । जाणणारा? ॥१३५॥
प्रकाश स्थिरता सौख्य अंतरीं लाभली जया
ब्रह्म होऊनि तो योगी ब्रह्मनिर्वाण मेळवी ॥२४॥
फिटले दोष शंकाहि मुठीत धरिले मन
पावले ब्रह्मनिर्वाण ज्ञानी विश्वहितीं रत ॥२५॥
म्हणोनि असो हे आघवे । येथ न बोलणे काय बोलावे । ती खूणचि पावेल स्वभावें । आत्माराम ॥१३६॥
ऐशा सुखें जे धुंदले । आपुल्याचि ठायी रमले । ते निखळ ओतीव पुतळे । सामरस्याचे ॥१३७॥
ते आनंदाचे आकार । सुखाचे अंकुर । की महाबोधाचे मंदिर । केले जैसे ॥१३८॥
ते विवेकाचे गाव । की परब्रह्मींचे स्वभाव । अथवा अलंकारिले अवयव । ब्रह्मविद्येचे ॥१३९॥
ते सात्त्विकपण सत्त्वाचे । की अवयव चैतन्याचे । “राहू दे कुठवर एकेकाचे । वर्णन करिसी? ॥१४०॥
तू संतस्तवनीं रममाण । तुज कथेचे न भान । विषयांतर करिसी जाण । परि वर्णिसी रसाळ ॥१४१॥
मिटवी रसातिशयाची कळी । मग ग्रंथार्थदीप उजळी । करी सज्जनांचे राउळीं । मंगल उषा” ॥१४२॥
पावता ऐसा गुरूंचा अभिप्राय । मग म्हणे निवृत्तिशिष्य । श्रीकृष्ण बोलिले काय । तेचि ऐका ॥१४३॥
अर्जुना, अनंत सुखांचे डोहीं । तळचि सरळ ते गाठती पाही । मग स्थिरावुनी त्या ठायी । तद्रूप होती ॥१४४॥
निर्मळ आत्मप्रकाशें पाही । जो विश्व आपुल्याचि ठायी । तो ब्रह्मचि या देहीं । मानावे सुखें ॥१४५॥
जे परमश्रेष्ठ परब्रह्म । क्षयरहित निःसीम । ज्या गावीं निष्काम । अधिकारी ॥१४६॥
जे महर्षींस्तवचि ठेविले विरक्तांचे वाटयासी आले । संशयहितासी फलद्रूप जाहले । निरंतर ॥१४७॥
कामक्रोधांस जिंकूनि यत्नें चित्तास बांधिती
देखती ब्रह्मनिर्वाण आत्मज्ञानी चहूकडे ॥२६॥
ज्यांनी विषयांपासुनि हिरावले । चित्त आपुले आपण जिंकिले । ते निश्चित तेथ लीन केले । देहभानीं येतीचिना; ॥१४८॥
ते परब्रह्म मोक्षरूप । आत्मज्ञानियांचे साध्य आपोआप । तेचि ते पुरुष फलद्रूप । पंडुकुमरा ॥१४९॥
ते ऐसे कोणें यत्नें जाहले? । जे देहींचि ब्रह्मत्वा आले । हे पुससी जर भले । संक्षेपें सांगतो ॥१५०॥
विषयांचा बहिष्कार डोळा भ्रूसंगमीं स्थिर
करूनि नासिकास्थानीं प्राणापानहि सारखे ॥२७॥
वैराग्याचा आधार घेत । विषय बाहेरी दवडित । जयांनी केले देहात । एकनिष्ठ मन ॥१५१॥
इडा पिंगळा सुषुम्ना भेटती । जेथ भिवयांची टोके भिडती । तेथ दृष्टी माघारी फिरविती । स्थिर करीत ॥१५२॥
डावा - उजवा श्वास सोडित । प्राण - अपान एकवटत । चित्ता चिदाकाशीं वळवीत । घेउनी जाती ॥१५३॥
आवरी मुनि मोक्षार्थी इंद्रिये मन बुद्धि जो
सोडी इच्छा भय क्रोध सर्वदा सुटलाचि तो ॥२८॥
जैसे सकळ ओहोळ नाले । घेऊनि गंगा समुद्रीं मिळे । मग एकेक वेगळाले । येती ना निवडिता; ॥१५४॥
तैसी वासनांची विवंचना । मग आपोआप सुटे, अर्जुना, । जेव्हा चिदाकाशीं लयासि मना । प्राण - अपान नेती ॥१५५॥
जेथ हे संसारचित्र उमटे । तो मनोरूप पट फाटे । जैसे सरोवर आटे । मग प्रतिबिंब नाही; ॥१५६॥
तैसे मुदलातचि मनपण जाई । मग अहंभावादि कोठे राही? । म्हणोनि शरीरेंचि ब्रह्म होई । अनुभवी तो ॥१५७॥
भोक्ता यज्ञ - तपांचा मी सोयरा विश्वचालक
जाणूनि ह्यापरी माते शांतीस वरिलाचि तो ॥२९॥
आम्ही मागेचि सांगितले । जे देहींचे ब्रह्म पावले । ते या मार्गें आले । म्हणूनिया ॥१५८॥
आणि यमनियमांचे डोंगर । अभ्यासाचे सागर । ओलांडुनिया पार । पोचले ते ॥१५९॥
आपणा करूनि निर्लेप । प्रपंचाचे घेतले माप । मग ते सत्य ब्रह्माचेचि रूप । होऊनि राहिले ॥१६०॥
ऐसा योगयुक्तीचा उद्देश । जेथ बोलिले ह्रषीकेश । तेथ अर्जुन चाणाक्ष । होय चकित ॥१६१॥
ते पाहुनि श्रीकृष्णें जाणिले । मग हासोनि पार्था म्हटले । चित्त काय प्रसन्न जाहले । या बोलांनी तुझे? ॥१६२॥
तेव्हा कृष्णासि म्हणे अर्जुन । मनकवडयांचे राजे आपण । भाव घेतला जी, जाणुन । मनातला माझ्या ॥१६३॥
मी पुसावे विचार करुनी । ते आधीचि जाणिले देवांनी । परि कथिले तेचि उकलुनी । सुस्पष्ट सांगावे ॥१६४॥
एरवी तरि द्या ध्यान । जो मार्ग दाविला आपण । तो पायउतार, पोहण्याहून । सोपा जैसा; ॥१६५॥
ज्ञानयोगाहुनि अष्टांगयोग तैसा - । सुगम, दुर्बला आम्हाऐशा । काळ लागेल कळण्या काहीसा । परि तो साहता ये ॥१६६॥
म्हणोनि एक वेळ देवा । तोचि पडताळा घ्यावा । विस्तारेल तरि सांगावा । साद्यंतचि ॥१६७॥
तेथ कृष्ण म्हणती होय । हा मार्ग तुज भला वाटे काय? । ऐक जागरूक ठेवुनि कर्णेंद्रिय । सांगतो सुखें ॥१६८॥
अर्जुना, तू ऐकसी । ऐकोनि तैसे आचरिसी । तर काय वाण आम्हासी । सांगायाची? ॥१६९॥
आधीचि चित्त मायेचे । वरि निमित्त जाहले आवडत्याचे । आता ते अद्भुतपण प्रेमाचे । जाणे कोण? ॥१७०॥
ही म्हणू कारुण्यरसाची वृष्टी । की नवस्नेहाची सृष्टी । श्रीहरीची कृपादृष्टी । कैसी वर्णू कळेना ॥१७१॥
जी अमृताची ओतली । की प्रेमचि पिउनि मातली । म्हणोनि अर्जुनमोहीं गुंतली । ढळेना तेथुनि ॥१७२॥
हे बहुत वर्णिता येईल । तेथ कथेसि फाटे फुटतील । परि ते प्रेम रूपा न येईल । शब्दांनी केवळ ॥१७३॥
म्हणोनि आश्चर्य काय यात । तो ईश्वर कोणा आकळत । जो आपुले मोजमाप न जाणत । आपणचि ॥१७४॥
तरी मागील बोलण्यात । कृष्ण गमे सहजी मोहित । तो अळेबळे म्हणत । ऐक बापा ॥१७५॥
अर्जुना, ज्या ज्या परींनी पाही । तुझिये चित्ता बोध होई । तैसे तैसे निरूपणही । करीन कौतुकें ॥१७६॥
या योगासी काय म्हणती । तयाची उपयुक्तता कोणती । तयाचे अधिकारी असती । कोण येथ; ॥१७७॥
ऐसे जे काही । शास्त्रोक्त असे या ठायी । ते आघवेचि पाही । सांगेन आता ॥१७८॥
तू चित्त देऊनि अवधारी । ऐसे म्हणोनि श्रीहरी - । बोलतील ती पुढे सारी । कथा आहे ॥१७९॥
न सोडिता अर्जुनाचा संग । श्रीकृष्ण सांगतील अष्टांगयोग । तो स्पष्ट करू प्रसंग । म्हणे निवृत्तिदास ॥१८०॥