सदसदविवेकबुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण , आचरण व प्रचार .
२५ . ( १ ) सार्वजनिक सुव्यवस्था , नीतिमत्ता व आरोग्य यांच्या व या भागातील अन्य तरतुदींच्या अधीनतेने , सदसदविवेकबुद्धीच्या स्वातंत्र्याला आणि धर्म मुक्तपणे प्रकट करण्याच्या , आचरण्याच्या व त्याचा प्रचार करण्याच्या अधिकाराला सर्व व्यक्ती सारख्याच हक्कदार आहेत .
( २ ) या अनुच्छेदातील कोणत्याही बाबीमुळे , ---
( क ) धर्माचरणाशी निगडित असेल अशा कोणत्याही आर्थिक , वित्तीय , राजनैतिक वा अन्य धार्मिकेतर कार्याचे विनियमन करणार्या किंवा त्यावर निर्बंध घालणार्या ;
( ख ) सामाजिक कल्याण व सुधारणा याबाबत अथवा सार्वजनिक स्वरुपाच्या हिंदू धार्मिक संस्था , हिंदूंचे सर्व वर्ग व पोट - भेद यांना खुल्या करण्याबाबत तरतूद करणार्या ,
कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही किंवा असा कोणताही कायदा करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही .
स्पष्टीकरण - एक --- कृपाणे धारण करणे व स्वतःबरोबर बाळगणे हे शीख धर्माच्या प्रकटीकरणात समाविष्ट असल्याचे मानले जाईल .
स्पष्टीकरण - दोन --- खंड ( २ ) च्या उपखंड ( ख ) मध्ये " हिंदू " या शब्दोल्लेखात शीख , जैन वा बौद्ध धर्म प्रकट करणार्या व्यक्तींच्या उल्लेख समाविष्ट आहे असा त्याचा अर्थ लावला जाईल , आणि हिंदू धार्मिक संस्थांच्या उल्लेखांचा अर्थही तदनुसार लावला जाईल .
धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य .
२६ . सार्वजनिक सुव्यवस्था , नीतिमत्ता व आरोग्य यांच्या अधीनतेने प्रत्येक धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास , ---
( क ) धार्मिक व धर्मादायी प्रयोजनांकरता संस्थांची स्थापना करुन त्या स्वखर्चाने चालविण्याचा ;
( ख ) धार्मिक बाबींमध्ये आपल्या व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचा ;
( ग ) जंगम व स्थावर मालमत्ता मालकीची असण्याचा व ती संपादन करण्याचा ; आणि
( घ ) कायद्यानुसार अशा मालमत्तेचे प्रशासन करण्याचा हक्क असेल .