सूत उवाच ॥ मंदारमालाकुलितालकायै कपालमालांकितशेखराय ॥ दिव्यांबरायै च दिगंबराय नमः शिवायै च नमः शिवाय ॥१॥
कैलासशिखरे रम्यै गौरी शंकरम् ॥ गुह्याद्गुह्यतरं गुह्यं कथयस्व महेश्वर ॥२॥
सर्वेषां सर्वधर्माणामल्पायासं महाफलम् ॥ प्रसन्नोऽसि यदा नाथ तथ्यं ब्रूहि ममाग्रतः ॥३॥
केन त्वं मया प्राप्तस्तपोदानव्रतादिना ॥ अनादिमध्यनिधतो भर्ता चैव जगत्प्रभुः ॥४॥
ईश्वर उवाच ॥ श्रृणु देवी प्रवक्ष्यामि तवाग्रे व्रतमुत्तमम् ॥ मम सर्वस्वं कथयामि तव प्रिये ॥५॥
श्रीगणेशाय नमः ॥ हरितालिकाची व्रतकथा सांगण्यसाठी सूत आरंभी मंगल स्तवन करतात . शौनकादी ऋषींनी ही कथा लिहिली आहे . मंदार फुलांच्या वेण्या जिने घातल्या आहेत व जिने दिव्य वस्त्र परीधान केले आहे , अशी भगवती आदीमाया पार्वती आणि स्वतः दिगंबर असणारा जो भगवान शंकर , ज्याचे शिरोभूषण नरकपालमालांनी युक्त आहे , त्या उभयतांस मी नमस्कार करतो . ॥१॥
याप्रमाणे शंकर पार्वतीस वंदन करुन सूत म्हणतात , ऋषीही , एका रम्य वेळी कैलास पर्वताच्या शिखरावर उमामहेश्वर आनंदाने बसलेली असताना पार्वती विचारते , " हे महेश्वरा , कृपा करुन मला सर्व गुह्यांतून गुह्य असे जे काही असेल ते सांगा , ॥२॥
की जे समजले असताना सर्वांना सर्वसकलधर्मांचे महत्फल थोडया परिश्रमाने मिळेल . हे भगवन , आपण मजवर प्रसन्न आहातच , तर मुख्य गुढ जे काय असेल ते मला सांगा . ॥३॥
मी कोणते तप , दान , करावे की ज्यामुळे आपण आदी , मध्य , अंत याविरहित व सर्व जगाचे स्वामी व प्रभू असूनही मला पती म्हणून मिळाला . " ॥४॥
" हे प्रिये , जे व्रत अत्यंत गुप्त असून केवळ माझे सर्वस्व आहे , असे एक अत्यंत उत्तम व्रत मी तुला सांगतो . त्याचे श्रवण कर . ॥५॥
यथा चोडुगणे चंद्रो ग्रहाणां भानुरेव च ॥ वर्णानां च यथा विप्रो देवानां विष्णुरेव च ॥६॥
नदीषु च यथा गंगा पुराणानां च भारतम् ॥ वेदानां च यथा साम इंद्रियाणां मनो यथा ॥७॥
पुराणवेदसर्वस्वमागमेन यथोदितम् ॥ एकाग्रेण यथा दृष्टं पुरातनम् ॥८॥
येन व्रतप्रभावेण प्राप्तमर्धासनं मम ॥ तत्सर्वं कथयिष्येऽहं त्वं मम प्रेयसी यतः ॥९॥
भाद्रे मासिसिते पक्षे तृतीया हस्तसंयुता ॥ तस्यानुष्ठानमात्रेण सर्वपापैः प्रमुच्यते ॥१०॥
जसा नक्षत्रांच्या समुदायात चंद्र श्रेष्ठ , नवग्रहांत सूर्य श्रेष्ठ , सर्व वर्णांत ब्राह्मण व सर्व देवांत विष्णू श्रेष्ठ . ॥६॥
तसेच , सर्व नद्यांत गंगा श्रेष्ठ . सर्व पुराणांत भारत , सर्व वेदांत सामवेद व सर्व इंद्रियांत मन श्रेष्ठ आहे , तसे ॥७॥
हे सर्व व्रतांत उत्तम व्रत आहे . हे आगमात यथासांग जसे वर्णन केले आहे व मी पूर्वी जसे पाहिले आहे तसे मी तुला सांगतो . हे सर्व पुराणांचे व वेदांचे रहस्य आहे . हे देवी , ते तू ऐक . ॥८॥
तू माझी अत्यंत आवडती असल्याने तुला ज्या व्रताने माझे अर्धासन मिळाले , ते व्रत मी तुला सांगतो . ॥९॥
भाद्रपद महिन्यातील शुद्ध तृतीया हस्त नक्षत्रयुक्त असली म्हणजे त्या दिवशी हे व्रत केले की , सर्व पापांपासून मनुष्य मुक्त होतो . ॥१०॥
* भारताची अठरा पुराणांत गणना नाही ; पण पुराण म्हणजे प्राचीन कथानके असा अर्थ घेऊन येथे म्हटले आहे .
श्रृणु देवी त्वया पूर्व यद्व्रतं चरितं महत् ॥ तत्सर्वं कथयिष्यामि यथा वृत्तं हिमालये ॥११॥
पार्वत्युवाच ॥ कथं कृतं मया नाथ व्रतानामुत्तमं व्रतम् ॥ तत्सर्वं श्रोतुमिच्छामि त्वत्सकाशान्महेश्वर ॥१२॥
शिव उवाच ॥ अस्ति तत्र महादिव्यौ हिमवान्नग उत्तमः ॥ नानाभूमिसमाकीर्णो नानाद्रुमसमाकुलः ॥१३॥
नानापक्षिंसमायुक्तो नानामृगविचित्रितः ॥ यत्र देवाः सगंधर्वाः सिद्धचारण गुह्यकाः ॥१४॥
विचरंति यथा देवी गंधर्वध्वनिसंकुलाः ॥ स्फाटिकैः कांचनैः श्रृंगैर्वैडूर्यमणिभूषितैः ॥१५॥
पूर्वी तू जे महाव्रत केलेस व हिमालयावर जे घडले ते सर्व तुला मी कथन करतो . " ॥११॥
पार्वती म्हणाली " हे महेश्वरा , सर्व व्रतांमध्ये उत्तम असे जे व्रत ते मी कसे केले ते आता आपणाकडून ऐकण्याची इच्छा व्यक्त करते . " ॥१२॥
उमाशंकर म्हणतात , " या पृथ्वीतलावर हिमवान् नावाचा एक अतिसुंदर व श्रेष्ठ असा पर्वत आहे . त्या पर्वतावर अनेक प्रकारच्या वनस्पती व विविधा वृक्ष आहेत . तसेच तो सर्व प्रकारच्या भूमींनी युक्त आहे . ॥१३॥
तो पर्वत नाना प्रकारच्या पक्ष्यांनी युक्त असून अनेक प्रकारच्या प्राण्यांमुळे चित्रविचित्र दिसत आहे . तेथे गंधर्वांसह इंद्रादी देव , सिद्ध , चारण , गुह्यक ॥१४॥
हे गंधर्वांच्या गायनाच्या मधुरध्वनीने युक्त होऊन चहूकडे संचार करीत आहेत आणि हे देवी , वैडूर्यमण्यांनी सुशोभित अशा स्फटिकमय व सुवर्णमय शिखररुपी ॥१५॥
भुजैर्लिखन्निवाकाशं सुह्रदो मंदिरं यथा ॥ हिमेन पूरितो नित्यं गंगाध्वनिविनादितः ॥१६॥
पार्वती त्वं यथा बाल्ये परमाचरती तपः ॥ अब्दद्वादशकं देवी धूम्रपानमधोमुखी ॥१७॥
संवत्सरचतुःषष्टिः पक्कपर्णाशन कृतम् ॥ माघमासे जले मग्ना वैशाखे चाग्नि सेविनी ॥१८॥
श्रावणे च बहिर्वासा अन्नपानविवर्जिता ॥ दृष्टा तातस्तु तत्कष्टं चिंतया दुखितोऽभवत् ॥१९॥
कस्मै देया मया कन्या एवं चिंतातुरोऽभवत् ॥ तदैवांबरतः प्राप्तो ब्रह्मपुत्रस्तु धर्मवित ॥२०॥
भूजांनी आकाशरुप भिंतीस जणू काय चित्रित करीत आहे , असा अत्यंत उंच व राहण्यास केवळ मित्रमंदिरासारखा , आनंददायक , नेहमी बर्फाने आच्छादलेला आणि गंगेच्या ध्वनीने नादयुक्त असणारा असा आहे . ॥१६॥
हे पार्वती , अशा पर्वतावर तू मोठे उत्कृष्ट तप तुझ्या लहानपणी केलेस . ते असे की , बारा वर्षेपर्यंत अधोमुख राहून धुम्रपान केले . ॥१७॥
त्यानंतर चौसष्ट वर्षेपर्यंत तू झाडाची पिकलेली पाने खाऊन राहिलीस . माघ महिन्यात उदकात पाण्यात उभे राहून , वैशाखात पंचाग्नि साधन करावे . ॥१८॥
पावसाळयात अन्नोदक सोडून उघडयावर बसावे . याप्रमाणे अनेक वर्षे गेली . तेव्हा तुझे वडील हिमाचल परमकष्टकारक असे तुझे ते तप पाहून अत्यंत चिंतामग्न झाले ; त्यामुळे मोठे दुःखित झाले . ॥१९॥
आणि आता आपली ही कन्या मी कोणाला देऊ अशी काळजी करु लागले . तेव्हा ब्रह्मदेवाचा पुत्र मोठा धर्मवेत्ता नारदमुनी आकाशमार्गाने तिथे आला . ॥२०॥
नारदो मुनिशार्दूलः शैलपुत्री दिट्टक्षया ॥ दत्वाऽर्ध्यं विष्टरं पाद्यं नारदायोक्तवान् गिरीः ॥२१॥
हिमवानुवाच ॥ किमर्थमागतः स्वामिन् वदस्व मुनिसत्तम ॥ महद्भाग्येन संप्राप्तस्त्वदागमनमुत्तमम् ॥२२॥
नारद उवाच ॥ श्रृणुशैलेन्द्र मद्वाक्यं विष्णुना प्रषितोऽस्म्यहम् ॥ योग्यं योग्याय दातव्यं कन्यारत्नमिदं त्वया ॥२३॥
वासुदेवसमो नास्ति ब्रह्मविष्णुशिवादिषु ॥ तस्मै देया त्वया कन्या ह्यत्रार्थे संमतं मम ॥२४॥
हिमवानुवाच ॥ वासुदेवः स्वयं देवः कन्यां प्रार्थयते यदि ॥ तदा मया प्रदातव्या त्वदागमनगौरवात ॥२५॥
मुनिश्रेष्ठ नारदमुनी आपल्याच मुलीला पाहण्याच्या हेतूने आले , हे पाहून हिमाचल त्यांना आसन , अर्घ्य , पाद्य इत्यादी उपचार अर्पण करुन सत्कारपूर्वक म्हणाले , ॥२१॥
" हे स्वामिन् ऋषिश्रेष्ठा , आज आपण मनात कोणता हेतू धरुन आला ते मला सांगा . आज माझे मोठे भाग्य उदयाला आले असावे , म्हणूनच आपले येथे येणे झाले . " ॥२२॥
हिमाचलाचे भाषण ऐकून नारदमुनी म्हणाले , " हे गिरिराजा , मी आज इथे का आलो ते आता ऐक . मला भगवान विष्णूनेच इथे पाठविले आहे . कारण की , योग्य पुरुषाला योग्य वस्तू द्यावी हेच उत्तम होय . तेव्हा स्त्रियांत रत्नभूत अशी जी तुझी ही कन्या आहे , ती तू योग्य पुरुषालाच द्यावीस . ॥२३॥
ब्रह्म , शिव इत्यादी देवांमध्ये वासुदेवासारखा कोणीच नाही . याकरिता ही कन्या त्याला द्यावी , असे मला वाटते . " ॥२४॥
नारदाचे बोलणे ऐकून हिमवान म्हणाला , " सर्व देवांत भगवान वासुदेव स्वतः माझी कन्या मागतो आणि आपणही तसे करावे म्हणता , तर मग मला तसे केलेच पाहिजे . " ॥२५॥
इत्येवं गदितं श्रुत्वा नभस्यंतर्दधे मुनिः ॥ ययौ पीताबरधरं शंखचक्रगदाधरम् ॥ कृतांजलिपुटो भूत्वा ॥२६॥
नारद उवाच ॥ श्रृणु देव भवत्कार्यं विवाहो निश्चितस्तव ॥ इत्युक्त्वा नारदो वाक्यं तत्रैवांतरधीयत ॥२७॥
हिमवांस्तु तदा गौरीमुवाच वचन मुदा ॥ दत्तासि त्वं मया पुत्रि देवाये गरुडध्वजे ॥२८॥
श्रृत्वा वाक्यं पितुर्देवी गता सा सखिमंदिरम् ॥ भूभौ पतित्वा सा तत्र विललापातिदुःखिता ॥ विलपंती तदा दृष्टा सखी वचनमब्रवीत् ॥२९॥
सख्युवाच ॥ किमर्थं दुखिता देवी कथयस्व ममाग्रतः ॥ यद्भवत्वाभिलषितं करिष्येऽहं न संशयः ॥३०॥
याप्रमाणे हे हिमाचलाचे बोलणे ऐकून नारदऋषी लगेच तिथेच गुप्त झाले आणि नंतर पीतांबर नेसलेले व शंखचक्रादी आयुधांनी विराजित असे भगवान विष्णूजवळ गेले ॥२६॥
आणि हात जोडून सांगू लागले - नारदमुनी म्हणाले , " भगवान , मी तुमचे कार्य केले आहे . तुमचा विवाह निश्चित करुन आलो आहे . " याप्रमाणे विष्णूंशी संभाषण करुन नारद तेथेच लगेच गुप्त झाले . ॥२७॥
नंतर हिमाचल आत्यंतिक आनंदाने आपल्या मुलीला म्हणाला , " मुली , तुला गरुडध्वज विष्णूला द्यावी , असा मी निश्चय केला आहे . " ॥२८॥
हिमाचलाचे हे बोलणे ऐकून ती आपल्या सखीच्या घरी गेली आणि अत्यंत दुःखीत होत ती जमिनीवर अंग टाकून विलाप करु लागली , तेव्हा तिची सखी म्हणाली - ॥२९॥
" हे देवी , तू अशी दुःखीकष्टी का झाली आहेस ते मला सांग . तुझ्या मनात जे इष्ट असेल ते मी तुला साध्य करुन देईन , यात शंका बाळगू नकोस . " ॥३०॥
पार्वत्युवाच ॥ सखि श्रृणु मम प्रीत्या मनोभिलषितं मया ॥ महादेवं च भर्तारं करिष्येऽहं न संशयः ॥३१॥
एतन्मे चिंतितं कार्यं तातेन कृतमन्यथा ॥ तस्माद्देहपरित्यागं करिष्येऽहं सखि प्रिये ॥३२॥
पार्वत्या वचनं श्रुत्वा सखी वचनमब्रवीत् ॥ सख्युवाच ॥ पिता यत्र न जानाति गमिष्यावो हि तद्वनम् ॥३३॥
इत्येवं संमतं कृत्वा नीतासि त्वं महद्वनम् । पिता निरीक्षयामास हिमवांस्तु गृह गृहे ॥३४॥
केन नीतास्ति मे पुत्री देवदानवकिन्नरैः ॥ नारदाग्रे कृतं सत्यं किं दास्ये गरुडध्वजे ॥३५॥
पार्वती म्हणाली , " सखे , तू माझ्यावर फार लोभ करतेस , तेव्हा माझ्या मनात काय आहे हे मी तुला सांगते . महादेवालाच माझा पती करावा , असा माझा निश्चय आहे . ॥३१॥
असे माझे मत असूनही माझ्या पित्याने माझे वेगळेच ठरविले आहे . म्हणून मी आता देहाचा त्याग करते . " ॥३२॥
पार्वतीचे वरील भाषण ऐकल्यावर तिची सखी म्हणाली , " तुझ्या पित्याला जो प्रदेश माहीत नाही , अशा प्रदेशात आपण जाऊया . " ॥३३॥
याप्रमाणे तुम्ही दोघांनी एकमताने विचार केला व त्या सखीने तुला मोठया अरण्यात नेले . इकडे तुझा पिता हिमाचल मात्र घरोघर फिरुन तुझा शोध करु लागला . ॥३४॥
आणि मनात म्हणू लागला ‘ माझी मुलगी कोणी नेली असावी बरे ? देवांनी वा दानवांनी किंवा किन्नरांनी . नारदाजवळ मी तिला विष्णूला देण्याचे कबूल केले आहे . आता विष्णूला काय सांगावे व काय द्यावे ? ’ ॥३५॥
इत्येवं चिंतयाविष्टो मूर्च्छितो निपपातह ॥ हाहाकृत्वा प्रधावंति लोकास्ते गिरिपुंगवम् ॥३६॥
ऊचुर्गिरिवरं सर्वे मूर्च्छाहेतुं गिरे वद ॥ गिरिरुवाच ॥ दुःखस्य हेतुं श्रृणुत कन्यारत्नं ह्रतं मम ॥३७॥
दृष्टावा कालसर्पेण सिंहव्याघ्रेण वा हता ॥ न जाने क्वगता पुत्री केन दृष्टेन वा ह्रता ॥३८॥
ईश्वर उवाच ॥ चकंपे शोकसंतप्तो वातेनेव महातरुः ॥ गिरिर्वनाद्वनं यातस्तदालोकनकारणात् ॥३९॥
सिंहव्याघ्रैश्च भलैश्च रोहिभिश्च महावनम् ॥ त्वं चापि विपिने घोरे व्रजंती सखिभिः सह ॥४०॥
याप्रमाणे तुझा पिता चिंताकुल होऊन मुर्च्छित झाला , तेव्हा लोकांत हाहाकार झाला व ते हिमाचलावर धावत आले ॥३६॥
आणि म्हणाले , " महाराज , आपणाला एकाएकी अशी मूर्च्छा का आली ? काय कारण झाले बरे ? " हिमाचल म्हणाला - माझे आज कन्यारत्न हरवले . मला असह्य दुःख झाले आहे . ॥३७॥
तिला कोणी सर्पाने दंश केला किंवा सिंह , वाघ यांनी मारले का ती स्वतःच आपण होऊन कोठे गेली किंवा कोणी दुष्टाने तिला पळवून नेले - काहीच समजत नाही . " ॥३८॥
याप्रमाणे दुःखाचे कारण सांगून मोठया वार्याने वृक्ष कापतो , त्याप्रमाणे दुःखाने हिमाचल कापू लागला आणि मुलीला शोधण्याकरिता एका अरण्यातून दुसर्या अरण्यात असा शोध करीत फिरु लागला . ॥३९॥
तो जाता जाता सिंह , व्याघ्र , अस्वले , मृग यांनी व्याप्त अशा अरण्यात येऊन पोचला . इकडे तूही सखीसह वर्तमान घरातून जी निघालीस ती जाता जाता मोठया घोर अरण्यात आलीस . ॥४०॥
तत्र दृष्टा नदीं रम्यां तत्तीरे च महागुहाम् ॥ ता प्रविश्य सखीभोगविवर्जिता ॥४१॥
संस्थाप्य वालुकालिंगं पार्वत्यासहितं मम ॥ भाद्रपदशुक्लतृतीयायामर्चयंती तु हस्तभे ॥४२॥
तत्र वाद्येन गीतेन रात्रौ जागरणं कृतम् ॥ व्रतराजप्रभावेण ह्यासनं चलितं मम ॥४३॥
संप्राप्तोऽहं तदा तत्र यत्र त्वं सखिभिःसह ॥ प्रसन्नोस्मि मया प्रोक्तं वरं ब्रूहि वरानने ॥४४॥
पार्वत्युवाच ॥ यदि देव प्रसन्नोऽसि भर्ता भव महेश्वर ॥ तथेत्युक्त्वा तु संप्राप्तो कैलासं पुनरेव च ॥४५॥
तिथे एक रम्य नदी तुला दिसली . तिच्या काठावर एक मोठी गुहा होती . त्या गुहेत तू तुझ्या सखीसह प्रवेश केला व अन्न , पाणी वगैरे सर्व भोग वर्ज्य केलेस . ॥४१॥
भाद्रपद मासातील शुक्ल तृतीयेच्या दिवशी , हस्त नक्षत्रावर तू तुझ्यासहित माझे वाळूचे लिंग स्थापून माझे पूजन केलेस . ॥४२॥
रात्री तू तिथे गीतवाद्येयुक्त जागरण केलेस , याप्रमाणे व्रत केलेस म्हणून त्याच्या प्रभावाने माझे आसन हलले . " ॥४३॥
तेव्हा तू तुझ्या सखीसह तिते व्रत करीत बसली होतीस तिथे मी आलो आणि तुला म्हणालो , " हे देवी , मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे . तेव्हा तुला हवा असलेला कोणताही वर तू माझ्याकडे माग . " ॥४४॥
त्यानंतर तू मला म्हणालीस , " हे देवा महेश्वरा , तू जर मजवर प्रसन्न झाला आहेस , तर तूच माझा पती हो . " तेव्हा मी फारद चांगले आहे , असे म्हणून पुन्हा कैलास पर्वतावर आलो . ॥४५॥
टीप : येथे स्वतः महादेव पार्वतीला ही कथा सांगत असून पार्वती सहवर्तमान तू माझे पूजन केलेस ; असे म्हटले याविषयी कोणालाही शंका येईल ; पण वस्तुतः शंकेला मुळीच अवसर नाही . कारण भगवान् शंकर अनंत व अविनाशी ; आजपर्यंत शेकडो प्रलय होऊन पुन्हा सृष्टी झाली आहे . हा सृष्टिप्रलयांचा क्रम एकसारखा चाललाच आहे . तेव्हा प्रत्येक सृष्टीत भगवान् शंकर आपले सगुणरुप धारण करुन पार्वतीसह क्रीडा करतो ; म्हणून पूर्वसृष्टीतील आपला इतिहास सांप्रत आपणच सांगत आहेत असे समजावे . प्रत्येक कल्पारंभी सर्वज्ञ परमेश्वर प्रथम ब्रह्मा , विष्णू , शिव अशी रुपे घेतो असे पुराणमत आहे . याप्रमाणे शिवाला पूर्वकल्पवृत्त ज्ञात आहे . त्यामुळे ही पूर्वकल्पातील कथा शिवाने पार्वतीला सांगितली , असे मानतात .
ततः प्रभाते संप्राप्ते नद्यां कृत्वा विसर्जनम् ॥ पारणं तु कृतं तत्र सख्या सार्धं त्वया शुभे ॥४६॥
हिमवानपि तं देशमाजगाम घनं वनम् ॥ चतुराशा निरीक्षंतु विह्वलः पतितो भुवि ॥४७॥
दृष्टा तत्र नदीतीरे प्रसुप्तं कन्यकाद्वयम् ॥ उत्थाप्योत्संगमारोप्य रोदनं कृतवान् गिरिः ॥४८॥
सिंहव्याघ्रादिभल्लूकैर्वने दुष्टे कुतःस्थि ॥ पार्वत्युवाच ॥ श्रृणु तात मया ज्ञातं त्वं दास्यसीश्वराय माम् ॥४९॥
तदन्यथा कृतं तात तेनाहं वनमागता ॥ ददासि तात यदिमामीश्वराय तदा गृहम् ॥५०॥
नंतर इकडे तू प्रातःकाल होताच माझ्या लिंगाचे विसर्जन करुन तुझ्या सखीसह आरंभिलेल्या व्रताचे पारणे तेथेच केलेस . ॥४६॥
तुझा शोध करीत करीत त्या गहन अरण्यात हिमाचलही आला आणि सगळीकडे पाहू लागला ; पण तू त्याला न दिसल्याने विव्हळ होऊन तिथेच भूमीवर पडला . ॥४७॥
काही काळ गेल्यावर तो पुन्हा तुमचा शोध करु लागला व पुढे निघाला . तेव्हा त्याला नदीच्या काठी दोन मुली निजलेल्या दिसल्या . नंतर त्यांना उठवून मांडीवर घेऊन तो रडू लागला ॥४८॥
आणि पार्वतीस म्हणाला , " बाळे , सिंह , सर्प , वाघ इत्यादींनी व्यापलेल्या या अरण्यात तू का बरे येऊन राहिलीस ? " तेव्हा पित्याचा प्रश्न ऐकल्यावर पार्वती म्हणाली , " ऐका बाबा , तुम्ही माझा विवाह शंकराशी कराल असे वाट्ले होते ; ॥४९॥
पण आपण पूर्वी केलेला बेत फिरविला आणि म्हणूनच मी या वनात आले . आपण जर मला शंकराला अर्पण करणार असाल तरच मी परत घरी येईन ॥५०॥
आगमिष्यामि नैवं चेदिह स्थास्यामि निश्चितम् ॥ तथेत्युक्त्वा हिमवता नीतासि त्वं गृहं प्रति ॥५१॥
पश्चाद्दता त्वमस्माकं कृत्वा वैवाहिकी क्रियाम् ॥ तेन व्रतप्रभावेण सौभाग्यं साधितं त्वया ॥५२॥
अद्यापि व्रतराजस्तु न कस्यापि निवेदितः ॥ नामास्य व्रतराजस्य श्रृणु देवी यथाऽभवत् ॥५३॥
आलिभिर्हरिता यस्मात्तस्मात्सा हरितालिका ॥ देव्युवाच ॥ नामेदं कथितं देव विधीं वद मम प्रभो ॥५४॥
किं पुण्य की फलं चास्य केन च क्रियते व्रतम् ॥ ईश्वर उवाच ॥ श्रृणु देवी विधीं वक्ष्ये नारीसौभाग्यहेतुकम् ॥५५॥
नपेक्षा येथेच राहावे असा माझा निश्चय आहे . त्यावर तुझ्या म्हणण्याप्रमाणे सर्व करतो , असे सांगून तुझ्या पित्याने तुला घरी नेले . ॥५१॥
यानंतर सर्व यथाविधी विवाह करुन तुझ्या पित्याने तुला मला अर्पण केले . तात्पर्य हेच की , तू जे व्रत आचरलेस त्याच्या प्रभावाने तुला सौभाग्य मिळाले . ॥५२॥
हे देवी ! हे उत्तम व्रत ( मी ) अद्यापी कोणालाही सांगितलेले नाही . आता ह्या व्रताचे नाव कसे पडले ते तुला सांगतो ( ते ऐक ! ) ॥५३॥
आली म्हणजे सख्या त्यांनी तुझे हरण केले म्हणजे तुला दूर नेले म्हणून या व्रताला हरितालिका असे नाव पडले . याप्रमाणे महादेवाचे भाषण ऐकून पार्वती म्हणाली - " आपण ह्या व्रताचे नाव सांगितले ; पण ह्याचा विधि कृपा करुन मला सांगा ॥५४॥
आणि या व्रतापासून कोणते पुण्य व काय फळ मिळते आणि हे व्रत कोणी करावे ते मला सांगा . " पार्वतीचा प्रश्न ऐकून महादेव म्हणाले - " हे देवी , मी या व्रताचा विधी सांगतो , ऐक . ॥५५॥
करिष्यति प्रयत्नेन यदि सौभाग्यमिच्छति ॥ तोरणादि प्रकर्तव्यं कदलीस्तंभमंडितम् ॥५६॥
आच्छाद्य पट्टवस्त्रैस्तु नानावर्णविचित्रितैः ॥ चंदनेन सुगंधेन लेपयेद गृहमंडपम् ॥५७॥
शंखेभरीमृदंगैस्तु कारयेःस्वनान् ॥ नानामंगलगीतं च कर्तव्यं मम ॥५८॥
स्थापयेद्वालुकालिंगं पार्वत्यासहितं मम । पूजयेद्वहु पुष्पैश्च गंधधूपादिभिर्नवैः ॥५९॥
नानाप्रकारैर्नैवेद्येः पूजयेज्जागरं चरेत् ॥ नालिकेलैः पूगफलैर्जंबीरैर्बहुभिस्तथा ॥६०॥
हे व्रत स्त्रियांच्या सौभाग्यास कारण आहे , म्हणून ज्या स्त्रियांना सौभाग्य हवे आहे त्यांनी हे करावे . केळीच्या खांबांनी तोरण लावून मखर करावे ॥५६॥
मग छत लावावे व त्यावर निरनिराळया रंगांच्या उत्तम उत्तम पट्टवस्त्रांनी शोभित करावे व मग ते मखर चंदनाने सुगंधित करावे . ॥५७॥
नंतर त्या पूजेच्या ठिकाणी मंगल गीत गावे व शंख , चौघडा , नगारा , मृदंग इत्यादी वाद्यांचा गजर करावा ॥५८॥
पार्वतीसह माझी वालुकेची मूर्ती करुन नवीन अशा गंध , धूप , फल , पुष्प इत्यादी उपचारांनी माझे पूजन करावे . ॥५९॥
नानाप्रकारचे नैवेद्य अर्पण करावेत . रात्री जागरण करावे . नारळ , सुपार्या , अनेक प्रकारची लिंबे , ॥६०॥
बीजपूरैः सनारिंगैः फलैश्चान्येश्च भूरिशः ॥ ऋतुकालोद्भवैभूरिप्रकारैः कंदमूलकैः ॥६१॥
गंधपुष्पैर्धूपदीपैर्मंत्रेणानेन पूजयेत् ॥ पूजामंत्रः ॥ नमः शिवाय शांताय पंचवक्राय शूलिने ॥६२॥
नंदिभृंगिमहाकाल - गणयुक्ताय शंभवे ॥ शिवायै हरकांतायै प्रकृत्यै सृष्टिहेतवे ॥६३॥
शिवायै सर्वमांगल्यै शिवरुपे जगन्मये ॥ शिवे कल्याणदे नित्यं शिवरुपे नमोऽस्तुते ॥६४॥
भवरुपे नमस्तुभ्यं शिवायै सततं नमः ॥ नमस्ते ब्रह्मरुपिण्यै जगद्धात्र्यै नमो नमः ॥६५॥
पेरु , महाळुंगे , नारिंगे , इत्यादी अनेक , जी त्या ऋत्तूत उत्पन्न झाली असतील ती उत्तम फळे , दीप इत्यादी उपचार पुढे सांगितलेल्या मंत्राने अर्पण करावे . ॥६१॥
मंत्रार्थः ज्याचे स्वरुप शांत , ज्याला पाच मुखे आहेत , ज्याने हातात शूल धारण केले आहे , अशा शिवाला माझा नमस्कार असो ॥६२॥
नंदी , भृंगी , महाकाल इत्यादी सेवकगण ज्याच्या जवळ आहेत , अशा भगवान् शंभूला नमस्कार असो , जी मंगलरुपिणी , शंकराची प्रिया , प्रकृतिरुप व सृष्टिकारण ॥६३॥
कल्याणरुप , सर्व मंगलरुप , शिवरुप , सर्व जगाला व्यापून राहणारी , शिवपत्नी , नित्य कल्याण देणारी शिवरुपिणी देवी , तुला नमस्कार असतो . ॥६४॥
हा संसार हेच जिचे रुप आहे अशी जी तू शिवा त्या तुला सतत नमस्कार असो . ब्रह्मरुप जी तू त्या तुला नमस्कार असो . जगाचे पालन करणारी जी तू त्या तुला पुनः पुन्हा नमस्कार असो ॥६५॥
संसारभयसंतापात् त्राहि मां सिंहवाहिनि ॥ येन कामेन देवी त्वं पूजितासि महेश्वरि ॥६६॥
राज्यसौभाग्यसंपतिं देहि मामंब पार्वति ॥ इति पूजामंत्रः ॥ मंत्रेणानेन देवी त्वां पूजयित्वा मयासह ॥६७॥
कथां श्रुत्वा विधानेन दद्यादन्नं च भूरिशः ॥ ब्राह्मणेभ्यो यथाशक्ति देया वस्त्रहिरण्यगाः ॥६८॥
अन्येषां भूयसी देया स्त्रीणां वै भूषणादिकम् भर्त्रासह कथां श्रुत्वा भक्तियुक्तेन चेतसा ॥६९॥
कृत्वा व्रतेश्वरं देवी सर्वपापैः प्रमुच्यते ॥ सप्त जन्म भवेद्राज्यं सौभाग्यं चैव वर्धते ॥७०॥
हे सिंहवाहिनी देवी , संसाराच्या भयाने जो संताप होतो त्यापासून माझे रक्षण कर . महेश्वरी देवी , ज्या इच्छेने मी तुझे पूजन केले आहे ती माझी इच्छा पूर्ण कर . ॥६६॥
हे आई , पार्वती ! राज्य , सौभाग्य , संपत्ती , ही मला दे . हे पार्वती , या मंत्राने माझ्यासह वर्तमान तुझी पूजा करावी . ॥६७॥
नंतर यथाविधी कथा श्रवण करावी , पुष्कळ अन्नदान करावे . ब्राह्मणाला वस्त्रे , हिरण्य , गायी इत्यादी यथाशक्ती द्यावे ॥६८॥
इतर ब्राह्मणांना भूयसी दक्षिणा द्यावी . स्त्रियांना अलंकार द्यावे . भर्त्यासहवर्तमान भक्तियुक्त अंतःकरणाने माझी कथा श्रवण करावी . ॥६९॥
याप्रमाणे हे उत्तम व्रत यथाविधी केले असता , सर्व पापांपासून मुक्त होऊन सप्तजन्मापर्यंत राज्य मिळवून सौभाग्याची वृद्धी होते . ॥७०॥
तृतीययां तु या नारी त्वाहारं कुरुते यदि ॥ सप्त जन्म भवेद्वंध्या वैधव्यं जन्मजन्मनि ॥७१॥
दारिद्र्य पुत्रशोकं च कर्कशः दुःखभागिनी ॥ पच्यते नरके घोरे नोपवासं करोति या ॥७२॥
राजते कांचने ताम्रे चाथ मृन्मये ॥ भोजने विन्यसेदन्नं सवस्त्रफलदक्षिणम् ॥ वायनं द्विजवर्याय दद्यादंते च पारणाम् ॥७३॥
एवं विधीं या कुरुते च नारी त्वया समाना रमते च भर्त्रा ॥ भोगाननेकान् भुवि भुज्यमाना सायुज्यमंते लभते हरेण ॥७४॥
अश्वमेधसहस्त्राणि वाजपेयशतानि च ॥ कथाश्रवणमात्रेण तत्फलं प्राप्ते नरैः ॥७५॥
एत्तते कथितं देवी तवाग्रे व्रतमुत्तमम् ॥ कोटियज्ञकृतं पुण्यमस्त्यानुष्ठानमात्रतः ॥७६॥
इति श्रीभविष्योत्तरपुराणे हरगौरीसंवादे हरितालिका व्रतकथा समाप्तः ॥
भाद्रपद शुद्ध तृतीयेला जर कोणी स्त्री आहार करील , तर सात जन्मापर्यंत वंध्या होईल व तिला प्रत्येक जन्मी वैधव्य प्राप्त होईल . ॥७१॥
दारिद्य येईल , पुत्रशोक होईल . स्वभावाने अत्यंत कर्कशा होऊन अंती दुःख होईल . जी उपवास करणार नाही ती भयंकर नरकात पडेल . ॥७२॥
दुसरे दिवशी पारण्याचे वेळी सोन्याचे , रुप्याचे , तांब्याचे , वेळूचे अथवा मातीचे असे जिला अनुकूल असेल तसे पात्र घेऊन त्यात डाळ , तांदूळ वगैरे भोजनाचे पदार्थ घालून वस्त्र , फळे , दक्षिणा यांसह ते वायन उत्तम ब्राह्मणास दान करावे आणि नंतर पारणे करावे . ॥७३॥
हे पार्वती ! याप्रमाणे जी स्त्री हे व्रत करील ती तुझ्यासारखी आपल्या भर्त्यासह रममाण होईल व इहलोकी अनेक उत्तम भोग भोगून अंती शंकराचे सायुज्य तिला प्राप्त होते . ॥७४॥
हजारो अश्वमेध शेकडो वाजपेय यज्ञ केल्याने जे फळ प्राप्त व्हावयाचे ते या कथा श्रवणाच्या योगाने मनुष्याला प्राप्त होते . ॥७५॥
महादेव म्हणतात , " हे देवी , याप्रमाणे हे तुला उत्तम व्रत निवेदन केले . केवळ या व्रताच्या आचरणाने कोटयवधि यज्ञ केल्याचे फळ प्राप्त होते . " ॥७६॥
इति श्रीभविष्योत्तरपुराणेहरगौरीसंवादे हरितालिकाव्रतकथायां महाराष्ट्रभाषाविवृत्तिः समाप्ति मगमत् ॥
सार्थ हरितालिका कथा समाप्त