श्रीवरदलक्ष्मी सार्थकथा
सूतउवाच ॥ कैलासशिखरेरम्येनानागणनिषेविते ॥ मंदारपीठे विक्रांतेनानामणिविभूषिते ॥१॥
रत्नपीठेसुखासीनंशंकरंलोकशंकरं ॥ पप्रच्छगौरीसंतुष्टापरानुग्रहकाम्यया ॥२॥
पार्वत्युवाच ॥ भगवान् सर्वलोकेशसर्वभूतहितेरत ॥ यद्रहस्यमिदंपुण्यंतदाचक्ष्वममानघ ॥३॥
वरदलक्ष्मीव्रतंचास्तितन्मेब्रूहिजगत्प्रभो ॥ शंकर उवाच ॥ व्रतानामुत्तमंनामसर्वसौभाग्यदायकं ॥ सर्वसंपत्करंशीघ्रंपुत्रपौत्र प्रवर्धनं ॥४॥
शुक्लेश्रावणकेमासेपौर्णमास्यांतुभार्गवे ॥ तदारभ्यव्रतंनार्यामहालक्ष्मीं चपूजयेत् ॥५॥
श्रीगणेशाय नमः ॥ सूत शौनकादी ऋषींना सांगतात - " पूर्वी नाना प्रकारच्या मणिगणांनी शोभायमान, सभोवती वीरभद्रादी गणांनी सेवति, अति रमणीय अशा कैलास पर्वताच्या शिखरावर ॥१॥
रत्नजडीत सिंहासनावर सर्व लोकांचे नेहमी कल्याण करणारे श्रीशंकर विराजमान झाले आहेत; हे पाहून, सर्व लोकांवर अनुग्रह करण्याकरिता त्यांना पार्वती प्रश्न करते की, ॥२॥
हे भगवन् शंकरा, आपण सर्व लोकांचे स्वामी आहात व प्राणिमात्रांच्या कल्याणार्थ रात्रंदिवस झटत आहात. आपण सर्वांमध्यें श्रेष्ठ असून आपले ठिकाणी पातकाचा लेशसुद्धा नाही, तरी आपणाला मी पुण्यकारक अत्यंत गुप्त गोष्ट विचारते; ती मला आपण कृपा करुन सांगावी ॥३॥
ती गोष्ट ही की, हे जगत्प्रभो, एक वरदलक्ष्मी नावाचे व्रत मी ऐकले आहे. त्याचा विधी आणि महिमा काय ते मला सविस्तर सांगावे. " पार्वतीचा हा प्रश्न ऐकून शंकर म्हणतात, " हे पार्वती, वरदलक्ष्मीव्रत हे सर्व व्रतांमध्ये उत्तम व्रत असून अत्यंत सौभाग्य देणारे असे आहे. ह्या व्रताचे आचरण केले असता तत्काळ सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त होते. पुत्रपौत्रादि संततीची वृद्धी होते. ॥४॥
हे पार्वती, ज्यावेळी श्रावणातील पूर्णिमेस शुक्रवार येतो त्या पूर्णिमेपासून स्त्रियांनी या महालक्ष्मीचे ( वरदलक्ष्मीचे ) पूजेला आरंभ करावा ॥५॥
पार्वत्युवाच ॥ विधिनाकेनकर्तव्यंतत्रकानामदेव ता ॥ कथमाराधितापूर्वंसाभूत्संतुष्टमानसा ॥६॥
ईश्वरउवाच ॥ वरदलक्ष्मीव्रतंपुण्यंवक्ष्यामिश्रृणुपार्वति ॥ कथंत्वंचच कोराक्षितदधीनाभविष्यसि ॥७॥
कौंडिण्यनामनगरेसर्वमंडनमंडिते ॥ हेमप्राकारसहितेचामीकरगृहोज्ज्वले ॥८॥
तत्रचब्राह्मणीकाचिच्चारुनामे तिविश्रुता ॥ पतिभक्तिरतासाध्वीश्वश्रूश्वशुरयोर्मता ॥ कलानिधिसमा रुपेसततंमंजुभाषिणी ॥९॥
तस्याःप्रसन्नचित्तेनलक्ष्मीः स्वप्नंगतातदा ॥ एहिकल्याणिभद्रंतेवरलक्ष्मी प्रसादतः ॥१०॥
हे ऐकून पार्वती पुन्हा विचारते, " देवा, त्या व्रताचा विधी काय, देवता कोण आहे व पूर्वी कोणी, कोणत्या प्रकारे याचे आचरण केले ते सर्व सांगावे. " ॥६॥
शंकर म्हणतात, " हे पार्वती, अत्यंत पुण्यकारक वरदलक्ष्मीव्रताचा इतिहास मी तुला सांगतो. हे सुंदरी, तूही त्या देवीच्या आराधनेत कोणत्या प्रकारे तत्पर होशील तेही कथन करतो. ॥७॥
कौंडिण्य नावाचे एक नगर असून त्या नगरात ज्याच्या सभोवताली सुवर्णाचा कोटा आहे आणि अग्नीप्रमाणे तेजःपुंज असे एक मंदिर होते. ॥८॥
त्या मंदिरात चारुमती नावाची एक सर्व लोकांत प्रख्यात अशी ब्राह्मण स्त्री राहात असे. ही ब्राह्मणपत्नी सतत पतिभक्तीविषयी तत्पर, महापतिव्रता, सासूसासर्यांवर अत्यंत प्रेम करणारी होती. तिची कांती चंद्राप्रमाणे असून तिचे भाषण फार मंजुळ होते. ॥९॥
तिचे सदासर्वकाळ प्रसन्न चित्त व पवित्र आचरण पाहून प्रत्यक्ष लक्ष्मी तिच्या स्वप्नात आली आणि म्हणाली, " हे चारुमती, इकडे ये. वरदलक्ष्मीच्या प्रसादाने तुझे कल्याण असो ॥१०॥
नभोमासेपौर्णमास्यांनातिक्रांतेभृगोर्दिने ॥ आरब्धव्यंव्रतंतत्रमहालक्ष्म्यायतात्मभिः ॥११॥
सुवर्णप्रतिमाकुर्याच्चतुर्भुज समन्विताम् ॥ पूर्वगृहमलंकृत्यतोरणैरंगवल्लिकैः ॥१२॥
तद्दिनेभार्गवेवारेनवभांडसमन्वितम् ॥ गृहंचपूर्वदिग्भागेईशान्यांवाविशेषतः ॥१३॥
गोधूमान्प्रस्थसंख्याकान्भूमौनिक्षिप्यपूजयेते ॥ संस्थाप्यकलशंतत्रतंदु लैर्वासमाभरेत् ॥१४॥
पुष्पाणिचविनिक्षिप्यसुवर्णप्रक्षिपेत्ततः ॥ पल्लवांश्चविनिक्षिप्यवस्त्रेणाच्छाद्यायत्नतः ॥१५॥
तुला मी एक गोष्ट सांगते ती ऐक. ज्या वेळी श्रावणाच्या पौर्णिमेला शुक्रवार येईल त्या वेळी तो दिवस व्यर्थ न घालविता दृढ अंतःकरणाने वरदलक्ष्मी नावाच्या व्रतास तू आरंभ कर. ॥११॥
चतुर्भुज अशी सोन्याची लक्ष्मीची प्रतिमा करावी. आपले घर स्वच्छ करावे व सगळीकडे तोरणे बांधावी. तशाच विविध रंगांच्या रांगोळया काढाव्यात. ॥१२॥
त्या दिवशी पूजेकरिता नवी भांडी घ्यावीत. पूजेची जागा पूर्व दिशेला किंवा ईशान्य दिशेला असावी. ॥१३॥
भूमीवर स्वस्तिक काढून त्यावर एक शेर गव्हाची राशी करावी व त्यावर नवा कलश ठेवून त्यात तांदूळ भरावेत आणि कलशाभोवती वस्त्रे गुंडाळावित. ॥१४॥
त्या कलशावर अनेक प्रकारची फुले वाहावी. त्यावर सोने वाहावे व अनेक प्रकारची पत्री वाहून त्यावर ठेवलेल्या पूर्णपात्रावर वस्त्र पसरावे ॥१५॥
प्रतिमांस्थापयेत्तत्रपूजयेच्च यथाविधि ॥ पंचामृतेनपस्ननंकारेयेन्मंत्रतःसुधीः ॥१६॥
शुद्धस्नानं ततःकृत्वादेवीसूक्तेनवैततः ॥ अष्ट्गंधैःसमभ्यर्च्यपल्लवांश्चसमर्ययेत् ॥१७॥
अश्वत्थवटबिल्वादिचूतदाडिममल्लिकाः ॥ तुलसीकरवीरैश्चकेतकैश्चंपकै स्तथा ॥१८॥
ऐतेषांपत्रमादायएकविंशतिसंख्यया ॥ नानाविधानि पुष्पाणिमालत्यादीनिवैततः ॥१९॥
धूपदीपैर्महालक्ष्मींपूजयेत्सर्वकामदां ॥ पायसंसर्वमन्नंचसर्वभक्ष्यैश्चसंयुतम् ॥२०॥
हे सुबुद्धे चारुमती, त्या पूर्णपात्रावर सोन्याची चतुर्भुजलक्ष्मीची प्रतिमा समंत्रक स्थापन करावी व तिची पूजा करावी. पंचामृतस्नान घालावे. ॥१६॥
देवीसूक्ताने शुद्ध पाण्याचा महाभिषेक करावा. वस्त्रांदी उपचार अर्पावेत. देवीला अष्टगंध, चंदन ( हळद, कुंकू, सौभाग्यद्रव्ये सुवासिक वगैरे ) अर्पण करावीत. विविध प्रकारची पत्री अर्पण करावी. ॥१७॥
ती येणेप्रमाणे - पिंपळ, वड, बेल, आंबा, डाळिंबी, मोगरी, तुलसी, कण्हेर, केवडा, चाफा आदी एकवीस जातींची पाने प्रत्येकी एकवीसप्रमाणे वाहावीत. मोगरी इत्यादी नानाप्रकारची सुवासिक फुले समर्पण करावीत. ॥१८॥ ॥१९॥
तसेच सुवासिक धूप, दीप आदीकरुन इष्ट्काम पूर्ण करणार्या द्र्व्यांनी महालक्ष्मीचे पूजन करावे. नंतर नैवेद्याकरिता उत्तम प्रकारचा पायस, भोजनाचे भक्ष्य, भोज्य, चोश्य, लेह्य आदी युक्त ॥२०॥
एकविंशतिसंख्याकैरपूपैश्चन्यवेदयेत ॥ पुनःपंचैवतेतत्रलक्ष्म्यर्थंतुविनिक्षिपेत् ॥२१॥
उपचारैर्बहुविधैर्नानासन्मानकैस्तथा ॥ देव्यैसर्वंसमर्प्याथवरमिष्टंचयाचयेत् ॥२२॥
नृत्यगीतादिसहितंदेवींसंप्रार्थयेच्छ्रियं ॥ उमासरस्वतीधात्री शचीचप्रियवादिनी ॥२३॥
एताभिश्चकृतंसम्यग्व्रतंसर्वंसमृद्धिदं ॥ मत्पू जातत्रकर्तव्यावरं दास्मामिकांक्षितं ॥२४॥
चारुमतिरुवाच ॥ नमामिवरलक्ष्मित्वामागतांपरमेश्वरीम् ॥ नमस्तेसर्वलोकानांजनन्मैपुण्य मूर्तये ॥२५॥
तसेच एकवीस अनारसे, वडे, घारगे वा मोदक इत्यादींचा नैवेद्य तयार करुन देवीला समर्पण करावा. नैवेद्यास जो पदार्थ समर्पण केलेला असेल त्यातून पाच देवींच्या पुढे ठेवावेत आणि बाकी प्रसाद म्हणून आपण घ्यावा ॥२१॥
यथाशक्ती राजोपचार, नानाप्रकारचे शेषोपचार देवीला सन्मान - पूर्वक समर्पण करुन शरण जावे आणि इष्ट वरहेतूची देवी पाशी प्रार्थना करावी. ॥२२॥
शक्यनुसार नृत्य, गायनवादन करावे. लक्ष्मीची गाणी म्हणून प्रार्थना करावी ॥२३॥
हे प्रियभाषिणी चारुमती, पूर्वी उमा, सरस्वती, सावित्री, इंद्राणी इत्यादी हे समृद्धी देणारे व्रत यथासांग केले व त्यामुळे त्या मोठया अधिकारास पोहोचल्या, त्याचप्रमाणे तू माझे पूजन केले असता मी तुझे सर्व मनोरथ पूर्ण करीन, पाहिजे तो वर देईन. ॥२४॥
याप्रमाणे वरलक्ष्मीने चारुमतीस स्वप्नदृष्टांत दिला असता ती चारुमती म्हणाली, " हे वरलक्ष्मी परमेश्वरी, तू सर्व जनांची जननी आहेत. तू पुण्यमूर्ती इथे प्रगट झाली आहेस, तुला मी नमस्कार करते. ॥२५॥
शरण्येत्रिजगद्वंद्योविष्णुवक्षस्थलस्थिते ॥ त्वयाविलोकिताप्रीत्यामुक्तासा संकटात्क्षणात् ॥२६॥
जन्मांतरसहस्त्रेषुकिंमयासुकृतंकृतं ॥ यतस्त्वत्पा दयुगुलंपश्यामिहरिवल्लभे ॥२७॥
एवंस्तुतासाकमलाप्रहस्यचबहून्वरान् ॥ दत्वाचारुमतिस्तत्रस्वप्नादुत्थायसाक्षणात ॥२८॥
तत्सर्वंकथयामासबधूंनांपुरतस्तथ ॥ श्रुत्वातेबंधवःसर्वेसाधुसाध्वितिचा ब्रुवन् ॥२९॥
तथैवकरवामेतितदागमनकांक्षिणी ॥ भाग्योदयेनसंप्राप्तंवरलक्ष्मीदिनंतदा ॥३०॥
हे शरणागताचे रक्षण करणार्या, हे जगत्पूज्ये, हे श्रीविष्णूच्या वक्षस्थलावर निरंतर वास करणारे, जिला तूं एकवार कृपादृष्टीने अवलोकन केलेस ती तत्काळ सर्व संकटांपासून मुक्त झालीच यात शंका नाही. ॥२६॥
मी पूर्वीच्या सहस्त्रावधी जन्मांत काहीतरी पुण्याचा संचय केला असेल तो असे की, ज्यामुळे हे हरिवल्लभे, आज मी तुझे चरणकमल पाहात आहे. " ॥२७॥
याप्रमाणे चारुमतीने गौरवपूर्वक स्तुती केली असता जगदंबा वरलक्ष्मी हास्य करुन अनंत वर देती झाली. असे स्वप्न पाहून चारुमती तत्काळ मोठया गडबडीने जागी झाली ॥२८॥
आणि आपल्या सर्व आप्तवर्गाला हे आनंददायक स्वप्न कथन केले. ते ऐकताच " छान छान, फार उत्तम " असे सर्व म्हणाले ॥२९॥
नंतर वरलक्ष्मीने सांगितल्याप्रमाणे हे व्रत करण्याचा त्या सर्वांनी संकल्प केला आणि श्रावणातील पूर्णिमा शुक्रवारी केव्हा येईल याची मार्गप्रतीक्षा करीत बसली. त्याच्या सुदैवाने लवकरच श्रावणाची पूर्णिमा शुक्रवारी आली ॥३०॥
स्त्रियः प्रसन्नवदनानिर्मलाश्चित्रवाससः ॥ नूतनेनंदुलैःपूर्णेकुंभेसंपूज्यचश्रियं ॥३१॥
पद्मासनेपद्मकरेसर्वलोकैकपूजिते ॥ नारायणप्रियेदेविसुप्रीताभवसर्वदा ॥३२॥
मंत्रेणानेनकलशेउपचाराननुक्रममैः ॥ त्यक्त्वाचदक्षिणेहस्तेवरसू त्रंददूःश्रियाः ॥३३॥
अन्नदानरतानित्यंबंधुपोषणतत्परा ॥ पुत्रपौत्रैः परिवृताधनधान्यसमन्विता ॥३४॥
ततोदेवीसमीपेतुतिष्ठंतीकृतमंगला ॥ शिवदेव्याः प्रसादेनमुक्ताहारविभूषिता ॥३५॥
मग त्या दिवशी चारुमतीसह तिच्या आप्तवर्गातील सर्व स्त्रिया प्रसन्न मुद्रेने स्वच्छ, सुंदर, विविध उंची वस्त्रे धारण करुन ( तिने पूर्वी सांगितल्याप्रमाणे घर स्वच्छ सारवून, तोरणे बांधून उत्तम रांगोळी काढून ) गव्हाच्या राशीवर तांदळांनी भरलेला कलश स्थापन करुन त्यावर सुवर्णप्रतिमा मांडून यथाविधी वर - लक्ष्मीची पूजा करुन प्रार्थना करतात - ॥३१॥
" हे कमलासने, हे हातात कमळ धारण करणारे, हे सर्वलोकापूज्ये, हे नारायण प्रिये, हे देवी, तू निरंतर आमच्यावर प्रीती करणारी अशी हो " ॥३२॥
( पद्मासने ) या मंत्राने पूजेच्या उपचारातील प्रत्येक वस्तू अनुक्रमाने कलशात टाकून वरलक्ष्मीची पूजा करुन त्यांनी उजव्या हातात वरसूत्र दिले ॥३३॥
ह्या वरलक्ष्मीच्या प्रसादाने चारुमती प्रसन्न अंतःकरण होऊन क्षुधितांना अन्नदान करण्याविषयी व आप्तकुटुंबीवर्गाच्या पोषणाविषयी तत्पर झाली. ॥३४॥
नंतर ती त्या दिवसापासून नित्य मंगलवेष धारण करुन देवीच्या सन्निध बसू लागली. याप्रमाणे वरलक्ष्मीचे ठिकाणी तिची भक्ती जडल्यामुळे तिला मोठमोठाले मोत्यांचे हार व जवाहिराचे अलंकार अंगावर धारण करण्यासारखे वैभव प्राप्त झाले. ॥३५॥
स्वपदंसमयाजग्मुर्हसत्यश्र्वरथसंकुला ॥ अन्योन्यंकथयामासप्रीत्याचारुम तिस्तदा ॥३६॥
इदंगुह्यमिदंसत्यंनरोभद्राणिपश्यति ॥ स्वयंचारुमतिर्म ख्यानपलब्धामनोरथान् ॥३७॥
पूज्याचारुमतिश्चैवभूत्वाभाग्यवतीचिरं ॥ एषाचारुमतिःसाध्वीदृष्टासामित्रयोषितां ॥३८॥
इहमानुषलोकेहिव्रतंकार्यंसुविस्तरं ॥ व्रतंपुण्यकरंचैवकुर्याद्भक्तिपुरःसरं ॥३९॥
भक्त्याकरोतिविपुलान्भोगान्प्राप्यश्रियंव्रजेत् ॥४०॥
व्रता नामुत्तमंपुण्यंवरलक्ष्मीव्रतंशुभं ॥ तत्कृतेननरोनारीपद्भयांस्वर्गंगमिष्यति ॥४१॥
य इदंश्रृणुयान्नित्यंवाचयेद्वासमाहितः ॥ धनधान्यंसमाप्नोतिवरलक्ष्मीप्रसादतः ॥४२॥
इतिश्रीभविष्योत्तरपुराणेईश्वरपार्वतीसंवादेवर लक्ष्मीव्रतकथासमाप्ता ॥ श्रीरस्तु ॥
शेवटी तिचे वैभव इतके वाढले की तिला ज्या ज्या ठिकाणी जाण्याचे असेल तेथे तेथे ती सोबत हत्ती, घोडे, रथ यांनी युक्त अशा मोठया थाटाने जाऊ लागली. नंतर तिच्या ज्या निरनिराळया मैत्रिणी, तुला एवढे वैभव कसे प्राप्त झाले म्हणून विचारीत, त्या वेळी चारुमती त्यांना मोठया प्रेमाने हे वरलक्ष्मीचे व्रत सांगत असे. ॥३६॥
सूत सांगतात, यावरुन हे व्रत खरोखर अत्यंत गुह्य आहे. याचे जो कोणी मानव आचरण करील तो आपले अत्यंत कल्याण झालेले पाहील. चारुमती तर या व्रताने सर्व दुर्लभ मनोरथांना पूर्ण झाली ॥३७॥
नंतर या वरलक्ष्मीच्या पूजेने ती सर्व लोकांत पूज्य होऊन चिरकालपर्यंत मोठे वैभव पावली. आणि तिने ज्या ज्या मैत्रिणींकडून हे व्रत करविले त्याही आपल्याप्रमाणे श्रीमान् झाल्या असे तिने पाहिले ॥३८॥
याकरिता हे पुण्यकारक व्रत सर्व स्त्रियांनी सविस्तर भक्तिपूर्वक करावे. ॥३९॥
जे हे भक्तीने आचरण करतील त्यांना विपुल भोग व अखंड लक्ष्मीची प्राप्ती होईल ॥४०॥
हे सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ असे पुण्यकारक शुभ वरलक्ष्मीचे व्रत जे नरनारी करतील ते आपल्या पायांनी स्वर्गास जातील. ॥४१॥
जे कोणी नित्य स्वस्थ अंतःकरणाने हे वरलक्ष्मीचे चरित्र मुखावाटे गातील किंवा श्रवणद्वारा ऐकतील त्यांचे घरी वरलक्ष्मीच्या प्रसादाने धनधान्यांची समृद्धी होईल ॥४२॥
ही भविष्योत्तरपुराणांतर्गत वरलक्ष्मीची सार्थकथा संपूर्ण झाली ॥ श्रीरस्तु ॥
श्रीवरदलक्ष्मी सार्थकथा समाप्त