अष्टक ३ - जय नमोस्तुते श्रीदिगंबरा ...
देवी देवतांची अष्टके आजारपण किंवा कांही घरगुती त्रास होत असल्यास घरीच देवासमोर म्हणण्याची ईश्वराची स्तुती होय.
Traditionally,the ashtakam is recited in homes, when some one has health or any domestic problems.
जय नमोस्तुते श्रीदिगंबरा । सद्गुरु निरूपाधिं तूं बरा । उरुं न देसि दैवाचि बाकि ती । करुं विनंति दत्तात्रया किती ॥१॥
सुकुळिं जन्म हा, लाभला मला । जरि तुझा न बा, लाभ लाभला ॥ तरि वृथा कृती, गेलि पंकिं ती । करुं विनंति दत्तात्रया किती ॥२॥
तुज म्हणावया, लाज वाटती । मुळिंच चूकलों, मीच वाट ती ॥ परि तुझ्या सुरी, मान ही हतीं । करुं विनंति दत्तात्रया किती ॥३॥
विषय वीष हे सोमलादिक । खचित वाटतें तें मलाऽधिक ॥ परि नसे दुजी, भक्षितां गती । करुं विनंति दत्तात्रया किती ॥४॥
जरि प्रपंच चिंताग्नि पोळवी । तरिही त्यामधें, मोह लोळवी । विविध ऊठती, कल्पना भिती । करुं विनंति दत्तात्रया किती ॥५॥
कनक द्रव्य लावण्य कामिनी । चटक लागली दिवस यामिनी ॥ विषय ध्यानिं लाचावली मती । करुं विनंति दत्तात्रया किती ॥६॥
षडविकार कामादि बापुडे । गमति काजवे बा । तुझ्यापुढें ॥ दिनमणी तुं ये, ऊदयाप्रती । करुं विनंति दत्तात्रया किती ॥७॥
अठवितों तुला, मी ज्यव्हां ज्यव्हां । पळसि दुरचि कां, तू त्यव्हां त्यव्हां ॥ स्तवन कानचि का न ऐकती । करुं विनंति दत्तात्रया किती ॥८॥
निपट हा करावा विचारची । अनसूया वडीलो-पचारची ॥ मनिं अणून दात्याचि नेकि ती । करुं विनंति दत्तात्रया किती ॥९॥
करिसी भक्तिच्या कागदा सही । म्हणुनि प्रार्थितों, विष्णुदासही ॥ मज प्रसन्न हो, ऐकुनी स्तुती । करुं विनंति दत्तात्रया किती ॥१०॥
शुद्धकामदा
N/A
References : N/A
Last Updated : September 27, 2013
TOP