अथ करमाला - तल्लक्षणं सौभाग्यकल्पद्रुमे - ‘पर्वद्वयमनामिक्याकनिष्ठादिक्रमेण तु । तर्जनीमूलपर्यंतं करमाला प्रकीर्तिता ॥’ इति ।
अस्यार्थ :--- अनामिकाया: मध्यपर्वारभ्य तन्मूलकनिष्ठामूलमध्याग्रानामिकामध्यमाग्रतर्जन्यग्रमध्यमूलेषु दशसु स्थानेषु अनुलोमविलोमत: अंगुष्ठाग्रेण स्पृशन् जपेत् । अत्र मध्यमामध्यमूलयोर्मेरुत्वं बोध्यम् । इति कल्पद्रुमे ।
अर्थ :--- अनाभिका (करांगुलीजवळचें बोट) त्याचे मध्यापासून आरंभ करून अनामिकेचें मूळ, कनिष्ठकेचें मूल - मध्य - अग्र; अनामिका व मध्यमा यांचें अग्र, तर्जनीचें अग्र, मध्य आणि मूल याप्रमाणें या दहा स्थानीं अंगुष्ठाग्रानें स्पर्श करीत जपसंख्या करावी. पुन: उलट क्रमानें म्हणजे तर्जनीमूलापासून अनामिकेचे मध्यपर्वापर्यंत गणना करावी. मध्यमेचें पर्वद्वय हा मेरु समजावा, मेरुचें उल्लंघन करूं नये. याप्रमाणें हें करमालेचें लक्षण होय. वर्णमाला व करमाला या पक्षीं मालासंस्कार, पूजन, मस्तकस्थापन इत्यादि विधि नाहीं. बीजमालापक्षीं मालासंस्कारादि विधि आहे. तो पुढें देतों.