[ स्थळ : फ़ार जुनाट उत्तरेकडील अरण्य; किती पसरले आहे किती नाही याचा मुळीच थांग लागत नाही; वर आकाशात चांदण्यांचा लख्ख उजेड पडला आहे.
मधोमध अगदी अंधारामध्ये मोठ्या काळ्या झग्यामध्ये गुरफ़टलेले व फ़ार म्हातारे झालेले असे एक धर्मगुरू बसले आहेत. त्यांचे डोके व शरीराचा भाग अगदी निश्चेष्ट व किंचित् मागे झुकलेला असून, तो ओक झाडाच्या मोठ्या व खाचाखळगे पडलेल्या खोडाला टेकलेला आहे. त्यांचे तोंड पाहिले तर भय वाटेल इतके सुकून गेले असून, चांगलेच मेणचट व हिरवेनिले झाले आहे. त्यांचे काळेनिळे झालेले ओठ उघडेच आहेत. त्यांचे डोळे निस्तेज व अनाद्यनंताच्या दृश्य भागाकडे पाहात नाहीत. एकाग्र आहेत पण ते अतोनात दु:खाची व अश्रूंची गर्दी असल्यामुळे डोळ्यांतून रक्त वाहात नाहीत. एकाग्र आहेत पण ते अतोनात दु:खाची व अश्रूंची गर्दी असल्यामुळे डोळ्यांतून रक्त वाहात आहे असे दिसते. त्यांचे केस अत्यंत शुभ्र व आदरणीय असून, त्यांची तुरळक तुरळक व ताठ झुलपे मस्तकावर दोन्ही बाजूस पडलेली आहेत. अंधकारमय अरण्यात पूर्ण शांतता नांदत असून तिच्या ताब्यातील सर्व गोष्टींपेक्षा गुरुमहाराजांचा चेहरा अधिक तेज:पुंज पण अधिक श्रांत झालेला दिसतो आहे. अत्यंत रोड व एकात एक घट्ट अडकवलेले त्यांचे हात मांडीवर पडलेले आहेत.
उजव्या बाजूला कोणी दगडावर, झाडांच्या बुंध्यावर व कोनी वाळलेल्या पानांवर असे सहा म्हातारे आंधळे बसले आहेत. डावीकडे सहा बायका त्यासुद्धा आंधळ्याच, म्हातार्या माणसांकडे तोंड करून बसल्या आहेत. मात्र दोघांच्यामध्ये लहान मोठे खडक व एक उन्मळून पडलेले झाड आहे. बायकांपैकी तिघीजणी घोगर्या व खोल आवाजामध्ये एकसारख्या प्रार्थना करीत अहएत. व रडत आहेत. चौघी फ़ारच म्हातारी आहे. पाचवी वेड लागलेल्या मुक्यासारखी बसली असून, तिने लहान व निजलेले मूल आपल्या गुडघ्यापाशी धरले आहे. सहावी फ़ारच तरूण असून, तिचे केस सर्वांगावर रुळत आहेत. बायकांच्या, त्याचप्रमाणे म्हातार्या पुरुषांच्या अंगात एकजात काळीसावळी व चांगली अघळपघळ अशी वस्त्रे आहेत. बहुतेकजण आपल्या गुडघ्यावर कोपरे ठेवून व हातात डोके धरून वाट पहात बसले आहेत.
उगीच अंगविक्षेप करण्याची सवय सर्वांची मोडलेली दिसते आहे. अस्पष्ट आवाज एकसारखे बेटावर होत आहेते; पण कोणी तिकडे तोंड फ़िरवीत नाहीत. मोठ्या शोकदर्शक वृक्षांच्या सावलीने सर्वांना चांगलेच गुरफ़टून टाकले आहे. गुरुमहाराजांपासून साधारण जवळच कोमेजलेल्या डॅफ़ोडिल फ़ुलझाडांचा गुच्छ अंधारात चमकतो आहे. वृक्षांच्या छायेला हुसकून लावण्याची चंद्रप्रकाशाची धडपड चालू आहे. तरीसुद्धा विलक्षणच काळोख पडला आहे. ]
पहिला : अजून नाही ते येत ?
दुसरा : उठवलेस मला ?
पहिला : मीही निजलोच होतो.
पहिला : मी सुद्धा निजलो होतो.
दुसरा : काही येतेसे ऐकू तर येत नाही.
तिसरा : आश्रमाकडे परत फ़िरायची वेळ जवळजवळ झाली असावी.
पहिला : आपण आहोत कुठे हे तर कळू द्या !
दुसरा : ते गेल्यापासून गारठा पडायला लागला आहे.
पहिला : कुठे ? आहोत कुठे आपण ? हे कळू द्या आधी !
म्हातारा : आहे का ठाऊक कुणाला आपण आहोत कुठे ?
म्हातारी : किती तरी वेळ चालत होतो आपण. आश्रमापासून पुष्कळच आपण दूर आलो आहोत.
पहिला : अरे ! बायका आपल्याबरोबर आहेत ?
म्हतारी : हो तुमच्यासमोरच आम्ही बसलो आहोत.
पहिला : हा आलोच तुमच्याकडे ( तो उठतो आणि इकडेतिकडे चाचपडू लागतो. ) तुम्ही आहात कुठे ? म्हणजे आहात कुठे हे ऐकायला येईल.
म्हातारी : ह्या इथे दगडावर बसलो आहोत आम्ही.
पहिला : ( तो पुढे पाऊल टाकतो व आडव्या पडलेल्या झाडाला व दगडांना अडखळतो. )
अरे ! मध्ये काही तरी आहे.
दुसरा : आपले आहे तिथे रहाणे बरे !
तिसरा : बसला आहात कुठे तुम्ही ? यायचे आहे का तुम्हाला आमच्याकडे ?
म्हातारी : नको ग बाई ! आम्ही नाही उठत इथून !
तिसरा : त्यांनी आपली ताटातूट का केली ?
पहिला : बायकांच्या बाजूस कोणी प्रार्थना करते आहे असे ऐकू येत आहे.
दुसरा : हो, त्या तिघी म्हातार्या प्रार्थना करीत आहेत.
पहिला : पण ही काही प्रार्थनेची वेळ नाही !
दुसरा : अंमळशाने निजायच्या जागी प्रार्थना करता येईल ! ( तिघी म्हातार्या प्रार्थना करीतच राहतात. )
तिसरा : कोणाच्याजवळ मी बसलो आहे ते कळेल तर बरे !
दुसरा : मला वाटते मीच आहे तुझ्याजवळ. ( हातांनी ते आसपास चाचपडतात. )
तिसरा : आपला कोणाचाच कोणाला हात नाही लागत.
पहिला : तरी आपण फ़ारसे दूर नाही. ( तो आपल्या आसपास चाचपडतो. त्याची काठी पाचव्या आंधळ्याला लागते. तो थोडासा विव्हळतो. ) ऐकायला येत नाही. तो बसला आहे आपल्या शेजारी.
दुसरा : मला कुठे प्रत्येकाचे ऐकू येते आहे. आता इतक्यात सहाजण होतो आपण.
पहिला : आता माझ्या लक्षात यायला लागले आहे. बायकांना देखील विचारू. कारण गोष्टी कसकशा आहेत त्या आपल्याला समजल्याच पाहिजेत. अजून ऐकतो आहे, त्या तिघी म्हातार्या प्रार्थना करीत आहेत त्या जवळजवळ बसल्या आहेत का ?
म्हातारी : त्या इथे खडकावर माझ्याजवळ बसल्या आहेत.
पहिला : मी इथे पाचोळ्यावर बसलो आहे !
तिसरा : आणि ती... अप्सरा कुठे आहे ?
म्हातारी : प्रार्थना करताहेत त्यांच्याजवळ ती आहे.
दुसरा : बरे ! ती वेडी बाई आणि तिचे मूल कुठे आहे ?
तरुण आंधळी : तो निजला आहे. नका त्याला उठवू !
पहिला : अरेरे ! आम्ही इथे, अन् तू किती दूर आहेस ! मला वाटले, तू माझ्या समोरच आहेस !
तिसरा : जरुर तेवढे आपल्याला समजले आहे. तेव्हा गुरुजी परत येईपर्यंत थोडेसे आपण बोलू या.
म्हातारी : त्यांनी सांगितले आहे पण, गप्प बसून आपली वाट पहा म्हणून.
तिसरा : आपण काही देवळात नाही आहोत.
म्हातारी : पण आहोत कुठं हेही तुला माहीत नाही.
तिसरा : बोलत नसलो तर भय वाटते मला.
दुसरा : गुरुजी कुठे गेले आहेत तुला ठाऊक आहे ?
तिसरा : मला वाटते, आपल्याला सोडून त्यांना फारच वेळ झाला आहे.
पहिला : पुष्कळच थकत चालले आहेत ते. त्यांचे त्यांना सुध्दा नीटसे दिसत नाही असे दिसते. कबूल करायचे नाहीत ते. कारण दुसराच येऊन आपल्यामध्ये त्यांची जागा पटकावयाचा ! ही त्यांना भीती आहे ना. मलाही शंका आहे. त्यांनाही फारसे दिसत नाही. दुसरा नेता पाहिजेच आपल्याला. आताशा ते मुळीच आपले ऐकून घेत नाहीत. आपण इतके जण झालो आहोत की, त्यांना झेपेनासे झाले आहे. त्या तिघी देवदासी आणि हे, यांनाच काय ते घरात दिसते आहे. आणि ते तर आपल्याहूनही म्हातारे ! खात्रीने सांगतो, गुरुजींनी आपल्याला भलतीकडे आणले आहे. आणि धुंडताहेत आता रस्ता. गेले तरी कुठे असतील ? जायचेच.... नाही त्यांना.... अधिकार नाही त्यांना....
म्हातारा : ते फार लांब झुकले आहेत. मला वाटते बायकांजवळ असे काही ते म्हणाले.
पहिला : तर मग ते आताशा बोलतात बायकांशीच तेवढे ? आपण काय मेलो आहोत ? - ठीक आहे, अखेरीस याच्याबद्दल दाद मागावी लागेल आपल्याला !
म्हातारा : ती कोणाकडे मागणार ?
पहिला : मला नाही अजून ठाऊक, पण पाहू.... पाहू.... बायकांना विचारतो आहे मी. पण कुठे गेले असावेत ?
म्हातारी : इतके लांब चालून चालून थकून गेले होते ते. मला वाटते क्षणभरच ते आमच्यामध्ये बसले होते. अलीकडे फार उदास आणि अशक्त झाले आहेत ते. शास्त्रीबुवा गेल्यापासून चैन पडत नाही त्यांना. आपले एकटे असतात. चुकून कधी बोलतात. मग काय झाले आहे कोणास कळे. मला म्हणाले, ’ आज बाहेर जायचेच. उन्हे आहेत तो थंडी पडायच्या आधी, एक शेवटचे, बेट - थंडीचे - पहायचे आहे.’ दिवस फार कठीण जाणार अन् फार लांबणार असे दिसत आहे. उत्तरेकडे बर्फ एव्हाच उतरायला लागले आहे. ते फिकीरीत आहेत. नुकतीच मोठी वादळे झाली म्हणतात. त्यांनी पूर आला आहे ओढ्यांना, अन् धक्केसुध्दा ढासळत आहेत. म्हणून ते म्हणाले की, समुद्राचेसुध्दा भय वाटते. उगीचच खवळलेला दिसतो आहे. बेटाचे खडक तितके उंचही नाहीत. स्वत:लाच त्यांना पाह्यचे होते. पण काय पाह्यले ते आम्हाला सांगितले नाही. आता मला वाटते ते त्या वेडीकरता पाणी अन् भाकर आणायला गेले आहेत. कदाचित् आपल्याला बरेच लांब जावे लागणार असे ते म्हणाले. म्हणून थांबलं पाहिजे आपल्याला !
तरुण आंधळी : जाताना माझे हात धरले, त्यांचे हात कापत होते, जसे काही भ्याले होते. मग माझे चुंबन घेतले...
पहिला : हं ! हं !
तरुण आंधळी : काय झाले म्हणून विचारले त्यांना मी. म्हणाले, ’ काय होणार मला काही समजत नाही. ’ त्यांनी मला सांगितले की, म्हातार्या माणसांचे राज्य संपले ! आता कदाचित्....
पहिला : ह्या म्हणण्याचा काय अर्थ ?
तरुण आंधळी : मला त्याचा अर्थ समजेना. ’ मोठ्या दीपगृहाकडे निघालो आहे मी ’ असे मला म्हणाले.
पहिला : इथे दीपगृह आहे ?
तरुण आंधळी : हो, या बेटाच्या उत्तरेला आहे. आपण, मला वाटते काही त्याच्यापासून दूर नाही. ’ दिव्याच्या उजेड इथे पानांवर पडलेला मला दिसतो आहे.’ असे ते म्हणाले. आजच्याइतके ते मला दु:खी कधीच दिसले नाहीत. मला वाटते, ते रडतच असावेत. का ते ठाऊक नाही. मग मी सुध्दा रडत होते. त्यांना जाताना मी ऐकले नाही, आणि आणखी काही विचारले नाही.
पहिला : आमच्याजवळ ते यातले काहीच बोलले नाहीत.
तरुण आंधळी : बोलतात तेव्हा तुम्ही ऐकूनच घेत नाही.
म्हातारी : ते बोलायला लागले की तुम्ही सगळे कुरकुर करायला लागता !
दुसरा : निघताना ’ येतो बरे ’ एवढेच ते म्हणाले.
तिसरा : बराच वेळ झाला असेल !
पहिला : निघताना ’ जातो बरे ’ असे दोनदा - तिनदा म्हणाले ते, जसे काही निजायलाच चालले होते. मी ऐकले, ’ जातो बरे, ’ ’जातो बरे ’ म्हणताना माझ्याकडे पहात होते ते. एखाद्याकडे टक लावून पहायला लागले म्हणजे आवाज बदलतो.
पाचवा : आंधळ्यावर दया करा !
पहिला : कोण मूर्खासारखे बोलतो आहे हे ?
दुसरा : मला वाटते तो बहिरा असावा.
पहिला : गप बैस रे. भीक मागायची वेळ नाही ही !
तिसरा : भाकरी आणि पाणी आणण्याकरिता कुणीकडे जात होते ते ?
म्हातारी : समुद्राकडे गेले ते.
तिसरा : पण अशा वयामध्ये समुद्राकडे कोणी असे जातो थोडेच !
दुसरा : समुद्राजवळ आपण आहोत का ?
म्हातारी : हो. क्षणभर गप बसा. म्हणजे तुम्हाला ऐकायला येईल. ( जवळच हातावर समुद्राचा बारीक आवाज होतो आणि खडकाजवळ अगदी शांत आहे. )
दुसरा : त्या तिघी म्हातार्या प्रार्थना करीत आहेत, येवढेच मला ऐकू येत आहे.
म्हातारी : नीट ऐका म्हणजे त्यांची प्रार्थना चालू असली तरी ऐकायला येईल.
दुसरा : हां, आता काहीतरी ऐकू येत आहे. जवळच आहे इथून.
म्हातारा : तो झोपी गेला होता. जसा काही जागा होतो आहे तो.
पहिला : आपल्याला इथे आणले, चूक केली त्यांनी. मला नाही तो आवाज ऐकणे आवडत.
म्हातारा : हे बेट मोठे नाही अन् अनाथगृहाच्या भिंतीबाहेर यायचा अवकाश तो समुद्राचा आवाज ऐकू येतो, हे तर तुम्हाला चांगले ठाऊक आहे.
दुसरा : मी कधीच त्याच्याकडे लक्ष दिले नाही.
तिसरा : मला वाटते आज तर तो आपल्या नजीक आहे ! इतके जवळून आवाज ऐकणे नको बोवा !
दुसरा : मलासुध्दा नको; आणखी, अनाथगृह सोडायला आपण सांगितले नव्हते.
तिसरा : असे दूर आपण कधीच आलो नाही. उगीचच इतके दूर आणले आपल्याला.
म्हातारी : सकाळी आज फार मौज होती. हिवाळाभर अनाथगृहाकडे कोंडून बसायच्या आधी आपण उन्हाळ्याचे शेवटचे दिवस मजेत घालवावे असे हे गुरुजींनाच हवे होते.
पहिला : मला आपले अनाथगृहाथच राहणे बरे वाटते !
म्हातारी : ते म्हणाले देखील की, जिथे आपण राहतो, त्या लहानश्या बेटाची थोडीतरी माहिती आपल्याला असलीच पाहिजे. त्यांनी स्वत: तरी कुठे सगळे पाहिले आहे ? एक पर्वत आहे. कोणी गेले नाही त्याच्यावर. दर्याखोर्यात तर कोणाला जायलाच नको. आणि गुहांमध्ये आजपर्यंत कोणी शिरले नाही. त्यांचे म्हणणे येवढेच की, निजायच्या खोलीत बसून ऊन पडायची नेहमी कोणी वाट पाहू नये. त्यांच्या मनातून होते, आपल्याला समुद्रकिनारी न्यायचे. गेले आहेत तिकडे एकटेच.
म्हातारा : त्यांचे बरोबर आहे. प्रत्येकाने आयुष्याचा विचार केला पाहिजे.
पहिला : पण दाराबाहेर आहे काय पाह्यला ?
दुसरा : आता आपण उन्हात आहोत काय ?
तिसरा : अजून सूर्य आहे ?
सहावा : छे ! मला वाटते बरीच रात्र झाली आहे.
दुसरा : किती वाजले बरे ?
इतर सगळे : आम्हांला नाही ठाऊक - कोणालाच ठाऊक नाही.
दुसरा : आहे अजून उजेड ? ( सहाव्या आंधळ्याला उद्देशून ) कुठे आहेस तू ? तुला किंचित् दिसते आहे, सांग ना मग !
सहावा : मला वाटते दाट काळोख आहे. उन्ह असले म्हणजे पापण्याखाली मला निळी रेघ दिसते. बराच वेळ झाला, ती दिसत होती पण आता काही दिसत नाही.
पहिला : माझे तर असे आहे, मला भूक लागली की, बराच वेळ झाला असे मी समजतो. अन् मला आता भूक लागली आहे.
तिसरा : बरे, वर आभाळाकडे तर पहा कदाचित् दिसेल काही तुम्हाला ! ( सगळे वर आकाशाकडे माना करतात. मात्र जन्मत: आंधळे असलेले तिघेजण खाली जमिनीकडे पाहू लागतात )
सहावा : मला ठाऊक नाही आपण आभाळाखाली आहोत ते.
पहिला : आपले बोलणे तर असे घुमते की जसे गुहेत बोलतो आहोत.
म्हातारा : नाही, मला वाटते संध्याकाळ झाली म्हणून बोलणे असे घुमते आहे.
तरुण आंधळी : माझ्या हातावर कसे चांदणे पडले आहे असे वाटते.
म्हातारी : वाटते, नक्षत्र उगवली आहेत, मला ती ऐकू येत आहेत.
तरुण आंधळी : मला सुध्दा.
पहिला : मला काही कशाचा आवाज ऐकू येत नाही.
दुसरा : आपण श्वासोच्छवास करतो आहो, एवढेच मला ऐकू येत आहे !
म्हातारा : मला वाटते, बायका म्हणतात ते बरोबर आहे.
पहिला : पण मी नक्षत्रांचे कधी काही ऐकले नाही.
दुसरा व तिसरा : मी देखील नाही. ( रात्री उठणार्या पक्ष्यांचा घोळका एकदम झाडावर येऊन बसतो. )
दुसरा : ऐका ! ऐका ! काय बरे आपल्याला आहे ? ऐकू येते तुम्हाला ?
म्हातारा : आकाश आणि आपण यांच्यामधून काहीतरी गेले.
सहावा : आपल्या डोक्यावर काहीतरी फिरते आहे; पण त्याला हात पोचत नाहीत.
पहिला : कशाचा आवाज आहे काही समजत नाही. अनाथगृहात परत जातो झाले.
दुसरा : आहोत कुठे ते कळायला पाहिजे.
सहावा : उठायचा प्रयत्न केला मी, पण काटे आहेत, माझ्याभोवती काट्यांशिवाय काही नाहीच. नको बुवा आता हातसुध्दा इकडे तिकडे करणे नको.
तिसरा : आपण आहोत कुठे ते पाहिजे आहे.
म्हातारा : आपल्याला ते कळायचे नाही.
सहावा : आपण घरापासून बरेच दूर असलो पाहिजे, कशाचा म्हणून आवाज मला ओळखू येईनासा झाला आहे.
तिसरा : बराच वेळ झाला, वाळलेल्या पानांचा वासच घेतो आहे मी.
सहावा : मागे कुणी आपल्यापैकीं कधी हे बेट पाहिले आहे काय ? सांगता येईल त्याला आपण कुठे आहो ते ?
म्हातारी : आम्ही इथे आलो तेव्हा सगळे आंधळे होतो.
पहिला : कधीच काही दिसले नाही आम्हाला.
दुसरा : उगीच काळजी का करता, लवकरच येतील ते. थांबू आणखी थोडावेळ. पण यापुढे पुन्हा म्हणून त्यांचेबरोबर आपण बाहेर कुठे यायचेच नाही.
म्हातारा : एकटे आपल्याच्यानी थोडेच जाववते आहे !
पहिला : मुळी बाहेर गेलोच नाही कुठे. मी तर म्हणतो न जाणेच बरे.
दुसरा : बाहेर पडायची आमची इच्छाच नव्हती, अन् येता का असे कुणी विचारलेही नाही.
म्हातारी : बेटातला आज सणाचा दिवस होता. मोठमोठे सण आले की, नेहमी आम्ही बाहेर पडतो.
तिसरी : मी गाढ निजले होते. इतक्यांत ते आले अन् खांद्यावर मारुन म्हणाले, ’ उठ उठ कशी नामी वेळ आहे, चांगले ऊन पडले आहे !’ - खरेच का ऊन पडले होते ? मला याची दादही नव्हती. ऊन पडलेले कधी मी पाहिलेच नाही.
म्हातारा : मी फार लहान होतो. तेव्हा मी ऊन पडलेले पाहिले होते.
म्हातारी : मी देखील पाहिले होते. पुष्कळ दिवस झाले’ लहानच होते मी. पण आता काही म्हणण्यासारखे आठवत नाही.
तिसरा : जेव्हा जेव्हा ऊन पडते तेव्हा प्रत्येक वेळेला गुरुजींना आपल्याला बाहेर न्यावेसे का वाटते ? काय आपल्यातले कोणी पंडितजी सांगताहेत ? मला तर दुपारी चाललो आहे की मध्यरात्री चाललो आहे, कधीच काही समजत नाही.
सहावा : मी तर दुपारी जाणेच बरे म्हणतो. त्या वेळेला लख्ख उजेड पडेलसे वाटते, अन् माझे डोळे उघडण्यासाठी धडपडायला लागतात.
तिसरा : आपले जेवायच्या ठिकाणी शेकत बसणे बरे बुवा. तिथे सकाळी आज केवढी आग लागली होती....
दुसरा : अंगणामध्ये त्यांना आपल्याला उन्हात नेता आले असते. तिथे भिंतीचा आसरा तरी आहे; कोणाला बाहेर जाता येत नाही. दार बंद असले की, मुळी भ्यायला नको, मी नेहमी दार लावतो. का माझ्या डाव्या कोपराला हात लावलास ?
पहिला : नाही बोवा मी नाही हात लावला, मी तुजजवळ येईन कसा ?
दुसरा : तुला सांगतो माझ्या कोपराला कोणीतरी हात लावला.
पहिला : कोणी आमच्यापैकी लावला नाही.
दुसरा : चला बोवा आता !
म्हातारी : देवा रे देवा ! सांग आम्ही कुठे आहोत ते !
पहिला : निरंतर वाटच पाह्यची की काय ? ( बरेच दूर असलेल्या एका घड्याळामध्ये फार सावकाश बाराचे ठोके पडतात. )
म्हातारी : अगबाई ! अनाथगृहापासून आपण किती दूर आहोत !
म्हातारा : मध्यरात्र झाली की !
दुसरा : दुपार आहे ! - ठाऊक आहे कुणाला ? - बोला -
सहावा : मला नाही ठाऊक पण आपण सावलीत आहोत असे मला वाटते.
पहिला : काही मला समजत नाही. फार वेळ आपण निजलो.
दुसरा : मला तर भूक लागली आहे.
इतर : भुकेने आणि तहानेने कासावीस झालो आहोत.
दुसरा : बराच वेळ आपण इथे आहोत का ?
म्हातारी : बाई मला वाटते, शेकडो वर्षे मी इथे आहे !
सहावा : हळूहळू ध्यानात येत चालले आहे माझ्या. आपण कुठे आहोत...
तिसरा : बाराचे ठोके पडले. तिकडे जावेच आपण. ( सर्व पक्षी एकदम काळोखात उडून नाहीसे होतात. )
पहिला : ऐकले ?
दुसरा : आपण काही एकटे नाही आहोत.
तिसरा : पुष्कळ दिवस मला मधून मधून वाटते आहे की, कुणीतरी आपले ऐकते आहे - गुरुजी आले परत ?
पहिला : मला नाही ठाऊक काय आहे ते.
दुसरा : कोणी तुम्ही काही ऐकले नाही ? - नेहमी गप्प बसता तुम्ही !
म्हातारा : अजून काही ऐकतो आहोत....
तरुण आंधळी : वाटते पंख वाजताहेत माझ्या आसपास !
म्हातारा : देवा देवा ! सांग बुवा आम्ही कुठे आहोत ते !
सहावा : कुठे आहोत ते ध्यानात येत चालले आहे माझ्या.... अनाथगृह त्या मोठ्या नदीच्या दुसर्या बाजूला आहे. त्या जुन्या पुलावरुन आपण आलो. त्यांनी आपल्याला बेटाच्या उत्तरेला आणले आहे. नदीपासून आपण काही दूर नाही. अन् क्षणभर जर लक्ष दिले, तर तिचा प्रवाह कदाचित् ऐकू येईल आपल्याला.... परत आले नाहीत गुरुजी तर नदीकाठापर्यंत जावे लागेल आपल्याला.... मोठमोठी जहाजे रात्रंदिवस जात असतात आणि धक्क्यावर आपण आहोत हे खलाशांना दिसेल - दीपगृहाभोवतालच्या अरण्यात असू आपण नाहीतर. पण त्यातून कसे बाहेर पडायचे हे नाही मला ठाऊक ! आहे का कुणी खुशी माझ्या पाठोपाठ यायला ?
पहिला : बसा झालं ! वाट पहावी, वाट पहावी आपली. कोणत्या बाजूला ती मोठी नदी आहे ? आपल्याला काही ठाऊक नाही. आणि अनाथगृहाभोवती जिकडे तिकडे दलदल आहे. धावू झाले आपले - येतील ते परत - यायलाच पाहिजे त्यांनी.
सहावा : .... इकडे आपण आलो कसे कुणाला ठाऊक आहे ? येता येता त्यांनी सर्व सांगितले आपल्याला.
पहिला : मी मुळीच लक्ष दिले नाही.
सहावा : काय कुणी ऐकले का त्यांनी काय सांगितले ते ?
तिसरा : आता यापुढे त्यांचे आपण ऐकलेच पाहिजे.
सहावा : आपल्यापैकी या बेटावर कुणाचा जन्म झाला आहे ?
म्हातारा : तुम्हाला तर चांगले ठाऊक आहे की, आम्ही दुसरीकडून आलो ते.
म्हातारी : आम्ही आलो समुद्रापलीकडून.
पहिला : येता येता मरतो की काय असे मला वाटले.
दुसरा : मलासुध्दा ! आपण बरोबरच होतो.
तिसरा : तिघे आपण एकाच भागातले.
पहिला : स्वच्छ हवा असली की, इथून तो दिसतो म्हणतात, उत्तरेलाच आहे - तिथे काही मनोरा नाही.
तिसरा : काठाला लागलो आम्ही.
म्हतारी : मी आले दुसरीकडून.
दुसरा : कोठून आलात तुम्ही ?
म्हातारी : नको बाई त्याची आठवण... सांगायला लागले की, ते धड आठवतच नाही.... पुष्कळ दिवस झाले.... तिथे इथल्यापेक्षा अधिक थंडी होती.
तरुण आंधळी : आणि मी, मी फार लांबून आले.
पहिला : बरे, कुठून आलीस तू ?
तरुण आंधळी : मला नाही बोवा सांगता येत. सांगता तरी कसे यावे ? इथून फारच दूर आहे. अगदी साता समुद्रापलीकडे. मोठ्या ठिकाणाहून आले.... त्याबद्दल खुणांनीच मला तुम्हाला सांगता येईल. अन् आपल्याला तर दिसत नाही.... पुष्कळच फिरले आहे मी. पण ऊन, पाऊस, विस्तव, पर्वत तशीच झाडे, चमत्कारिक फुले - एवढे पाहिले आहे मी. तसे इथे एकाही बेटावर नाही. भारी उदास आणि गारठा आहे इथे... माझे डोळे गेल्यापासून पुन्हा म्हणून मला त्यांचा वास नाही.... पण माझ्या आईबाबांना आणि बहिणींना पाहिले मी.... तेव्हा कुठे होते ते समजायला, फारच लहान होते मी.... नेहमी किनार्यावर खेळे मी.... पण पाहिल्याचे तरी कसे चांगले आठवते आहे मला !..... एक दिवस पर्वताच्या माथ्यावर बर्फ पाहिला मी.... दु:खात दिवस कोणाकोणाला काढायचे आहेत, हे नुकते कुठे मला समजू लागले होते....
पहिला : काय म्हणतेस तरी काय ?
तरुण आंधळी : कधे कधी त्यांच्या आवाजावरुन अजूनही मी त्यांना ओळखेन.... जेव्हा त्यांचा विचार करीत नाही तेव्हा मला गोष्टी चांगल्या आठवतात.
पहिला : मला काही आठवत नाही, मी.... ( देशांतर करणार्या मोठमोठ्या पक्ष्यांचा घोळका ओरडत झाडीवरुन जातो. )
म्हातारा : पुन: आभाळापासून काहीतरी जाते आहे !
दुसरा : तू का आलीस इकडे ?
म्हातारा : कोणाशी बोलते आहेस तू ?
दुसरा : आपल्या धाकट्या बहिणीशी.
तरुण आंधळी : त्यांनी सांगितले की, गुरुजी मला बरे करतील. गुरुजी म्हणतात, पुन्हा एखादे दिवशी मला दिसायला लागेल म्हणून मग मला या बेटातून जाता येईल.
पहिला : आम्हां सगळ्यांना या बेटातून जावेसे वाटते !
दुसरा : आम्ही तर निरंतर इथे राहणार !
तिसरा : ते फार थकले आहेत. आपल्याला बरे करायला त्यांना सवडच मिळणार नाही !
तरुण आंधळी : माझ्या पापण्या मिटल्या आहेत. पण डोळ्यांत जीव आहे असे वाटते !
पहिला : माझ्या आपल्या उघड्या आहेत.
दुसरा : मी डोळे ठेऊन निजतो.
तिसरा : आपल्या डोळ्यांबद्दल नका बोलू !
दुसरा : इथे येऊन काही फार वेळ झाला नाही तुम्हाला ?
म्हातारा : एकदा संध्याकाळी, प्रार्थना चालली असता बायकांच्या बाजूला अनोळखीचा असा एक मी आवाज ऐकला. तुझ्या स्वरावरुन तू तरुण आहेस हे मला सांगता आले असते.... तुझा स्वर ऐकला, तुला भेटायचं होतं मला.
पहिला : माझ्या नाही कधी लक्षात आले हे !
दुसरा : कधी काही कळून देत नाहीत ते आपल्याला.
सहावा : म्हणतात की, कुठून लांबून आलेल्या एखाद्या बाईसारखी तू फार सुंदर आहेस !
तरुण आंधळी : मी नाही बाई कधी स्वत:ला पाहिले.
म्हातारा : कधीच पहात नसतो आपण एकमेकांना. परस्परांना आपण विचारतो. परस्परांना जवाब देतो. आपण एकत्र राहतो, नेहमी जवळ असतो पण आपल्याला कळत नाही आपण कोण आहोत हे.... हातांनी एकमेकांना स्पर्श करणे हे सर्व ठीक आहे. पण कळते हातापेक्षां डोळ्यांनाच जास्त.
सहावा : कधी कधी सावल्या दिसतात मला तुमच्या तुम्ही उन्हात असला तर...
म्हातारा : जिथे आपण राहतो, ते घर आपण पाहिलेले नसते, भिंतीना, खिडक्यांना स्पर्श करणे हे सर्व ठीक आहे पण राहतो तिथले काहीच कळत नाही.
म्हातारी : म्हणतात, एक जुना किल्ला आहे. जिकडे तिकडे काळोख. अगदी खराब झालेला, कधी कोणाला उजेडही दिसत नाही. फक्त मनोर्यावर गुरुजींच्या खोलीत तेवढा उजेड.
पहिला : आंधळे आहेत त्यांना उजेडाची गरजच नाही.
सहावा : अनाथगृहाभोवती मेंढ्यांचे कळप मी पाळीत असलो की, संध्याकाळी मनोर्यावर त्यांना दिवा दिसायचा अवकाश, निघाल्या घरी आपल्या आपण परत.... कधी त्यांनी चुकविले नाही मला.
म्हातारा : वर्षे न् वर्षे आपण एकत्र आहोत पण अजून कधी आपण परस्परांना पाहिले नाही. एखाद्याने म्हणावे, नेहमी आपण एकएकटेच होतो ! .... प्रेम करायचे म्हणजे आधी पाहिजे....
म्हातारा : मला दिसते आहे, असे कधी कधी स्वप्न पडते.
म्हातारा : स्वप्नांतच का ते मला दिसते ?
पहिला : मध्यरात्रीशिवाय मला तर अगदी ठरलेले स्वप्न पडत नाही.
दुसरा : हातांची हालचाल बंद असल्याशिवाय स्वप्न तरी कशाचे पडणार ? ( जोराची वावटळ सुटून रान हलून जाते. पानांचा सडाच सडा पडतो. )
पाचवा : कोणी माझ्या हातांना स्पर्श केला ?
पहिला : आपल्याभोवती काहीतरी पडते आहे ?
म्हातारा : वरुन पडते आहे ते काय आहे काही समजत नाही.
पाचवा : कोणी धक्का लावला माझ्या हाताला ? चांगला मी निजलो होतो; निजू द्या मला !
म्हातारा : कुणी तुझ्या हातांना शिवले नाही.
पाचवा : माझे हात कोणी धरले होते ? मोठ्याने सांगा, ऐकायला मला कमी येते आहे....
म्हातारा : आमचे आम्हास ठाऊक नाही.
पाचवा : ते काय आपल्याला ताकीद करायला आहेत ?
पहिला : काही बोलून उपयोगी नाही; त्याला काही ऐकायला येत नाही.
तिसरा : अगदी खरे आहे बुवा, बहिरी माणसे फार दुर्दैवी असतात.
म्हातारा : कंटाळा आला बुवा इथे बसून !
सहावा : कंटाळा आला बुवा इथे असून !
दुसरा : मला वाटते. एकमेकांपासून आपण फार दूर आहोत.... आणखी थोडेसे जवळ येता येत आहे का ? पाहू तर खरे.... बराच गारठा पडायला लागला आहे.
तिसरा : नाही बुवा उभे राहवत ! आहे तिथं राहणे बरे.
म्हातारा : आपल्यामध्ये काही असेल काही कुणाला ठाऊक नाही.
सहावा : मला वाटते माझ्या हातातून रक्त वाहते आहे, मला उभे राह्यचे होते.
तिसरा : मला ऐकायला येत आहे. तू माझ्याकडे वाकला आहेस ते ! ( आंधळी वेडी बाई जोराने आपले डोळे चोळते व कण्हत कण्हत निश्चेष्ट पडलेल्या गुरुमहाराजाकडे सारखी वळते.
पहिला : दुसरा कसला तरी आवाज ऐकतो आहे.
म्हातारी : मला वाटते बिचारी आपली बहिण डोळे चोळते आहे.
दुसरा : दुसरे काही ती करत नाही. रात्री रोज तेच ऐकते आहे.
तिसरा : वेडी आहे ती. कधी काही बोलतच नाही.
म्हातारी : तिला मूल झाल्यापासून ती कधी बोललीच नाही. नेहमी ती भिते आहे असे वाटते.
म्हातारा : मग तुला इथे भय नाही वाटत ?
पहिला : कोणाला ?
म्हातारा : आपणा सगळ्यांना.
म्हातारी : हो, हो. आम्हांला भय वाटते बाई !
तरुण आंधळी : फार दिवस झाले आम्हांला भय वाटते आहे बाई !
पहिला : हे का विचारले तुम्ही ?
म्हातारा : का विचारले ते नाही मला ठाऊक !... काहीतरी आहे, मला समजत नाही असे वाटते. जसे काही आपल्यामध्ये एकाएकी कुणी रडायलाच लागल्याचे ऐकले.... !
पहिला : मग मुळीच भ्यायला नको आहे. मला वाटते ती वेडी बाई...
म्हातारा : पण आणखी काहीतरी आहे... अगदी खात्रीने सांगतो आणखी काहीतरी आहे.... तेवढ्यानेच नाही भय वाटत मला...
म्हातारी : तिने मुलाला पाजायला घेतले की सदा रडते ती.
पहिला : अशी तीच काय ती रडते.
म्हातारी : म्हणतात की, अजून तिला मधून मधून दिसते....
पहिला : दुसरे रडतात ते कधीच ऐकू येत नाही.
म्हातारा : रडायचे म्हणजे पाह्यलाच पाहिजे....
तरुण आंधळी : आपल्याभोवती फुलांचा वास येतो आहे मला....
पहिला : मला फक्त मातीचाच वास येतो आहे !
तरुण आंधळी : आपल्या आसपास फुलेच फुले आहेत !
दुसरा : मातीचाच वास येतो आहे मला !
म्हातारी : वार्याने आता फुलांचा वास आला मला....
तिसरा : मला फक्त येतो मातीचा वास !
म्हातारा : मला वाटते बायका म्हणतात ते बरोबर आहे.
सहावा : आहेत कुठे ती ? जातोच आणि आणतो तोडून मी.
तरुण आंधळी : तुमच्याच उजव्या हाताला, उठा.
( सहावा आंधळा हळूच उठतो आणि झाडाझुडपापाशी धडक्या घेत घेत चाचपडत चाचपडत डॅफोडील नावाच्या फुलांजवळ जातो, चालता चालता ती पायाखाली तुडवीत व चिरडीत जातो. )
तरुण आंधळी : तुम्ही कोवळी कोवळी देठे तुडविल्याचे ऐकते आहे मी ! थांबा ! थांबा !
पहिला : जाऊ दे फुले तिकडे, आपला परत ये कसा !
सहावा : परत नाही बोवा येता येत !
तरुण आंधळी : परत येऊच नका तुम्ही ! थांबा ( ती उठते ) अग बाई ! किती गार आहे खाली ! जमीन अगदी गारठली आहे ! ( न कचरता सरकत सरकत चमत्कारिक व किंचित् सुकलेल्या अशा डॅफोडिल फुलांजवळ जाऊ लागते. पण पडलेल्या झाडांना अडखळून उभी राहते. फुले तिथून जवळच आहेत. ) ही इकडे आहेत ! - त्यांना हात नाही पोचत माझा. तुमच्याच बाजूला आहेत ती.
सहावा : मला वाटते तीच वेचतो आहे मी.
( आपल्या आसपास चाचपडत चाचपडत राहिलेली फुले गोळा करतो व ती तिला देतो; रात्री उडणारे पक्षी उडून जातात. )
तरुण आंधळी : मला वाटते मी एकदा ही फुले पाहिली.... त्यांचे नाव विसरले आहे. मी.... पण किती खराब झाली आहेत ही ! अन् देठही किती लवचिक झाले आहेत ! पुन्हा ओळखूच येत नाहीत मला.... वाटते ही मेलेल्या माणसांवरची फुले आहेत.... ( फुले आपल्या डोक्यामध्ये खोवते )
म्हातारा : तुझ्या केसांचा आवाज ऐकतो आहे मी.
तरुण आंधळी : फुले आहेत ती...
म्हातारा : तू काही आम्हाला दिसायची नाहीस.....
तरुण आंधळी : माझी मलाच दिसायची नाही मी.... गारठून गेले आहे मी.
( यावेळी रानात वार्याचा सोसाटा सुरु होता, आणि समुद्र एकाएकी गरजायला लागून आसपासच्या कड्यावर धडाधडा धडक्या घेऊ लागतो. )
पहिला : गडगडते आहे.
दुसरा : मला वाटते वादळ होते आहे.
म्हातारा : मला वाटते, समुद्र गरजतो आहे.
तिसरा : समुद्र ?..... समुद्र गरजतो आहे ?.... इथून तर दोन पावलांवर आहे तो..... !..... जवळ आहे आपल्या ! भोवती सगळीकडे ऐकतो आहे मी !.... दुसरेच काहीतरी असले पाहिजे.
तरुण आंधळी : माझ्या पायांशी लाटांचा आवाज ऐकते आहे मी.
पहिला : मला वाटते, वार्याने वाळलेली पाने वाजताहेत ही.
म्हातारा : बायकांचे म्हणजे बरोबर आहे असे वाटते.
तिसरा : येईल ते इथे.
पहिला : वारा येतो कुठून ?
दुसरा : समुद्राकडून येतो.
म्हातारा : नेहमी तो समुद्रावरुन येतो. चोहोकडून समुद्राने तर आपल्याला घेरुन टाकले आहे. तो दुसरीकडून येईल कुठून....
पहिला : नका आता समुद्राबद्दल विचार करु.
दुसरा : पण विचार करायलाच पाहिजे. आपल्याला येऊन भिडेल तो !
पहिला : तुलाच ठाऊक नाही समुद्र आहे की काय आहे ते.
दुसरा : चांगले हात बुडवीन म्हटले तर, बुडवता येईल अशा लाटा ऐकतो आहे मी ! इथे राहता नाही यायचे आपल्याला ! भोवती त्या सगळीकडे पसरल्या असतील.
म्हातारा : कुठे जायचे म्हणतोस ?
दुसरा : कुठं का असेना ! कुठे वाटेल तिकडे ! पण त्या पाण्याचा आवाज ऐकणे नको आता ! चला ! चला !
तिसरा : आणखी काहीतरी ऐकायला येते आहे असे मला वाटते.... ऐका !
( वाळलेल्या पानांवर जलद व लांब लांब पावले टाकलेली ऐकू येत आहेत. )
पहिला : कोणीतरी आपल्याकडे येत आहे.
दुसरा : आले ते ! गुरुजी आले ! तेच परत येत आहेत !
तिसरा : एखाद्या मुलासारखी लहान लहान टाकीत आहेत ते....
दुसरा : आज त्यांना अगदी बोलू नका !
म्हातारी : मला वाटते , माणसाचे पाऊल नाही हे.
( एक मोठा कुत्रा रानात येतो. त्यांच्यापुढून जातो. पुन्हा जिकडे तिकडे स्तब्ध. )
पहिला : कोण आहे तिकडे ? कोण आहात तुम्ही ? येऊ द्या आमची करुणा. किती वेळ वाट पहातो आहोत आम्ही ! ( तो कुत्रा थांबतो, व परत येऊन आपले पुढचे पाय आंधळ्याच्या गुडघ्यावर ठेवतो. ) अरे ! अरे ! गुडघ्यावर काय ठेविले आहे तुम्ही माझ्या ? काय आहे - जनावर आहे का ? मला वाटते एक कुत्रे आहे ? - अरे हो, हे तर कुत्रे आहे. अनाथगृहाकडून आलेले कुत्रे आहे हे. ये इकडे ये. आपल्याला सोडवायला आला आहे बरे का ? ये इकडे ये.
इतर : ये ये इकडे ये.
पहिला : आपली सुटका करायला आला आहे तो ! आपला मार्ग काढीत आला ! माझे हात चाटतो आहे गुलाम. जसा काही शंभर वर्षांनी भेटलो आहे मी ! काय आनंदाने ओरडतो आहे. आनंदाने मरेल तो ! ऐका ! ऐका !
इतर ये ! ये ! इकडे ये.
म्हातारा : कदाचित् कोणाकडून धावत आला आहे तो.
पहिला : छे ! छे ! तो एकटाच आहे. कोणी येतेसे मला ऐकू येत नाही. दुसर्या वाटाड्याची गरज नाही आता आपल्याला. कोणी चांगले नाही याच्यापेक्षा; आपल्याला हवे तिकडे नेईल तो ! आपले ऐकेल तो....
म्हातारी : मी नाही बाई येत त्याच्या मागे.
तरुण आंधळी : मी देखील नाही.
पहिला : का नाही ? आपल्यापेक्षा त्याला चांगले दिसते आहे.
दुसरा : बायकांचे ऐकू नका तुम्ही.
तिसरा : मला वाटते, आकाशात काहीतरी बदल झाला आहे. चांगले मोकळे वाटते मला. हवा कशी आता स्वच्छ पडली आहे....
म्हातारी : समुद्रातील वारा आपल्याला लागतो आहे....
सहावा : आता उजाडेल असे दिसते आहे. असे वाटते सूर्य उगवतो आहे....
म्हातारा : मला वाटते गारठा पडायला लागला आहे.
पहिला : वाट आपल्याला सापडेल. तो तर ओढतो आहे मला. आनंदाने वेडावून गेला आहे अगदी ! आपल्याला नाही तो आवरत. चला माझ्या मागे, चला माझ्या मागे, घरी निघालो आहो आम्ही. ( तो उठतो . कुत्रा त्याला ओढीत ओढीत निश्चेष्ट पडलेल्या गुरुमहाराजांजवळ नेतो व तेथे थांबतो. )
इतर : आहेस कुठे तू ? अरे आहेस कुठे तू ? निघालास कोठे तू ? सांभाळ बाबा !
पहिला : थांबा ! थांबा ! येऊ नका माझ्यामागे. अजून मी आलोच परत.... हा तर स्वस्थ उभा आहे. काय आहे हे ? अरे बापरे ! फार गार हाताला लागते आहे माझ्या....
दुसरा : काय म्हणतोस तू हे ? धड तुझे बोलणे आता ऐकायलाच येत नाही मला !
पहिला : माझ्या हाताला लागते आहे... मला वाटते तोंड हाताला लागते आहे !
तिसरा : म्हणतोस तरी काय हे ? नीटसे समजत नाही कुणाला. काय झाले आहे तुला ? आहेस कुठे तू ? इतका का तू दूर गेला आहेस आमच्यापासून ?
पहिला : छे ! छे ! छे ! अजून काही कळत नाही बोवा. काय आहे हे.... मेलेला माणूस आहे आपल्यामध्ये !
इतर : मेलेला माणूस आपल्यामध्ये ? आहेस कुठे तू ? अरे, आहेस कुठे तू ?
पहिला : मी सांगतो, आपल्यामध्ये मेलेला माणूस आहे ! अरे बापरे ! प्रेताच्या तोंडाला हात लावला मी ! - तुम्ही प्रेताजवळ बसला आहात ! खास कुणीतरी आपल्यापैकी एकाएकी मेले आहे. बोला पाहू आता, म्हणजे मी ओळखतो कोण कोण जिवंत आहेत ते ! आहात कुठे तुम्ही ? बोला ! एकदम सगळे बोला ! ( वेडी बाई व बहिर्या माणसाखेरीज बाकीचे पटापट सांगतात. तिघी म्हातार्यांनी प्रार्थना करणे थांबविले आहे. )
पहिला : मला काही कुणाचे आवाज ऐकू येत नाहीत. तुम्ही सगळे सारखे बोलता ?... ते सगळे थरथर कापत आहेत !
तिसरा : अजून दोघांनी उत्तरे दिली नाहीत.... कुठे आहेत ते ?
( तो आपली काठी पाचव्या आंधळ्याला लावतो. )
पाचवा : अरे काय हे ! मी आपला निजलो होतो; निजू द्या मला.
सहावा : तो नाही हा - वेडी बाई आहे का ही ?
म्हातारी : ती तर मजजवळ बसली आहे. मला ऐकू येते आहे ती जिवंत आहे.
पहिला : मला वाटते.... मला वाटते हे गुरुमहाराज असावेत ! ते उभे आहेत ! या ! या ! लवकर !
दुसरा : ते उभे आहेत ?
तिसरा : मग ते मेले नाहीत !
म्हातारा : आहेत कुठे ते ?
सहावा : या आणि पहा !...
( वेडी बाई व बहिर्या आंधळ्याखेरीज सर्व उठतात; अन् चाचपडत चाचपडत प्रेताजवळ जातात. )
दुसरा : इथे आहेत ते ? तेच का आहे ?
तिसरा : हो ! हो ! मी ओळखले त्यांना !
पहिला : देवा ! देवा ! आता आपले होणार कसे !
म्हातारी : महराज ! महाराज ! आपणच का हे ? महाराज ! काय झाले हो ? काय बरे झाले तुम्हाला ? सांगा आम्हाला. आम्ही सगळे तुमच्याभोवती आहोत.... आई ! आई ग !
म्हातारा : पाणी आणा थोडेसे, अजून जिवंत असतील ते....
दुसरा : पाहू तर खरे.... परत आपल्याला अनाथगृहाकडे कदाचित् नेता येईल त्यांना.
तिसरा : काही अर्थ नाही. मला त्यांच्या ह्रदयाचे ठोकेच ऐकू येत नाहीत. गार पडले आहेत ते....
पहिला : मेले पण तोंडातून शब्द नाही.
तिसरा : सांगायलाच पाहिजे होते त्यांनी आपल्याला.
दुसरा : अरेरे ! किती थकले होते ते !... पहिलीच वेळ ही. त्यांच्या तोंडाला हात लावतो आहे मी....
तिसरा : ( प्रेतावरुन हात फिरवून ) आपल्यापेक्षा उंच आहेत हे !....
दुसरा : डोळे यांचे चांगले उघडे आहेत. हातात हात अडकवून मेले हे...
पहिला : असे मरायचे काही कारण नव्हते....
दुसरा : उभे नाहीत हे. दगडावर बसले आहेत.
म्हातारी : देवा ! रे देवा ! मला सगळे हे कसे कळले नाही ! इतके दिवस हे आजारी होते.... आज किती हाल झाले असतील यांचे ! नाही ! नाही बरे कधी म्हणून तोंडावाटे अक्षर नाही ! हातात आमचे हात घेत तेव्हाच काय ते त्यांना वाईट वाटे.... नेहमी कुणाला थोडेच समजते आहे... कधीच कोणाला कळत नाही !... चला यांच्या भोवती आपण प्रार्थना करु. टेका गुडघे टेका. ( रडत रडत बायका गुडघे टेकतात. )
पहिला : आपण नाही बोवा गुडघे टेकीत...
दुसरा : हो, खाली कशावर गुडघे टेकीत आहोत हेच कुणाला कळत नाही.
तिसरा : आजारी होते का हे ? आपल्याजवळ कधी काही हे बोलले नाहीत.
दुसरा : जाताना काही तरी हे पुटपुटले येवढे ऐकले मी. मला वाटते आपल्या धाकट्या बहिणीशी बोलत होते हे. काय बरे बोलत होते ?
पहिला : ती नाही सांगायची.
दुसरा : तू काही आपल्याला सांगायची नाहीस आता ? मग आहेस तरी कुठे तू ? सांग.
म्हातारी : तुमच्यामुळे किती सोसावे लागले त्यांना, तुम्हीच त्यांना मारलेत... तुम्ही पुढे हालानात, रस्त्याच्या बाजूला दगडांवर बसून खायचे तटले होते ना तुमचे, सारा दिवस तुमची कुरकुर.... चांगले ऐकिले मी, सुस्कारे सोडीत होते. बिचारे.... धीरच खचला त्यांचा....
पहिला : आजारी होते ते ? तुम्हाला ठाऊक होते हे ?
म्हातारी : काही आम्हाला ठाऊक नव्हते.... कधीच आम्ही त्यांना पाहिले नाही.... आमचे बिचारे गेलेले डोळे, त्यांच्यापुढे काय झाले आणि काय नाही, कधी समजले आम्हांला ?.... कधीच काही ते बोलले नाहीत.... आता थोडेच होते आहे.... तिघांना मरताना पाहिले आहे मी.... पण असे नाही कधी.... आता आली आहे आमची पाळी...
पहिला : मी काही त्यांना सोसायला लावले नाही. कधी काही बोललोच नाही मी-
दुसरा : मी सुध्दा नाही; त्यांच्या पाठोपाठ आपण जात होता, पण एक अक्षर नाही.
तिसरा : वेडीकरता पाणी आणायला जाताना तर मेले ते....
पहिला : आता करायचे कसे आपण ? जायचे कुठे ?
तिसरा : कुत्रा कुठे आहे तो ?
पहिला : हा इकडे; पण तो प्रेताला सोडायचा नाही.
तिसरा : दूर खेचा त्याला ! हुसकून लावा ! हुसकून लावा त्याला !
पहिला : हालायचा नाही तो प्रेताजवळून !
दुसरा : आम्हाला नाही मेलेल्या माणसाजवळ थांबवत ! असे काळोखात करायचे तरी कसे आम्ही !
तिसरा : चला आपण जवळ बसू. हलायचे नाही एकमेकांपासून. एकमेकांचे हात धरुन बसू आपण, सगळे मिळून या दगडावर बसू... ते दुसरे आहेत कुठे ? चला इकडे या ! चला ! चला !
म्हातारा : तू आहेस कुठे ?
तिसरा : हां इकडे, इथे आहे मी. आलोत सगळे आपण जवळ ? या आणखी जवळ या माझ्या ! हात कुठे आहेत तुमचे ? फार गारठा पडला आहे !
तरुण आंधळी : अगबाई ! किती गार तुमचे हात आहेत !
तिसरा : काय करते आहेस तू ?
तरुण आंधळी : माझ्या डोळ्यावर हात ठेवीत होते मी. वाटले, एकाएकी मला दिसू लागले आहे.
पहिला : कोण रडते आहे ?>
म्हातारी : ती वेडी हुंदके देत आहे.
पहिला : तरी तिला खरे काय ते कळत नाही !
म्हातारा : मला वाटते आपण इथे मरणार....
म्हातारी : कदाचित् कोणी तरी येईल....
म्हातारा : आणखी कोण आता येण्यासारखे आहे ?...
म्हातारी : मला नाही ठाऊक
पहिला : त्या देवदासी अनाथगृहाबाहेर येतील असे वाटते.
म्हातारी : त्या कधीच संध्याकाळच्या बाहेर पडत नाहीत.
दुसरा : मला वाटते त्या मोठ्या दीपगृहांतील माणसांना दिसू आपण...
म्हातारी : आपल्या मनोर्यावरुन ते कधीच खाली येत नाहीत.
तिसरा : पहातील कदाचित् आपल्याला ते....
म्हातारी : ते तर नेहमी समुद्राकडे पहात असतात.
तिसरा : काय गारठा पडला आहे !
म्हातारा : वाळलेल्या पानांकडे लक्ष द्या. मला वाटते, सगळीकडे गोठते आहे.
तरुण आंधळी : बाई ! काय जमीन टणक झाली आहे ही !
तिसरा : माझ्या डाव्या हाताला आवाज ऐकू येतो आहे. कशाचा काही समजत नाही....
म्हातारा : ते खडकाशी चाललेले समुद्राचे रडगाणे आहे झाले.
तिसरा : मला वाटते, बायकांचा आवाज होता तो.
म्हातारी : मी ऐकते आहे लाटांखाली बर्फ फुटतो आहे तो...
पहिला : कोण इतके कांपत आहे ? त्याच्यामुळे दगडावर बसलेले सगळे आपण हलतो आहोत !
दुसरा : आपल्याला नाही आता हाताच्या मुठी उघडवत.
म्हातारा : दुसरा आवाज ऐकतो आहे मी, कशाचा काही समजत नाही...
पहिला : आपल्यापैकीं कोण इतके कांपत आहे ? सगळा दगड हलतो आहे त्याच्यामुळे !
म्हातारा : कोणी तरी बाई असावेसे वाटते.
म्हातारी : मला वाटते ती वेडीच फार कांपते आहे.
तिसरा : तिच्या मुलाचे काही मला ऐकू येत नाही.
म्हातारी : मला वाटते, तो अजून पितो आहे.
म्हातारा : त्यालाच काय ते दिसते आहे आपण कुठे आहोत हे !
पहिला : उत्तरेकडून आलेला वारा ऐकू येतो आहे.
सहावा : मुळी चांदणेच नाही असे वाटते; बर्फ पडेल आता.
दुसरा : मग आपली गच्छन्ति !
तिसरा : कोणी जर आपल्यापैकीं निजला तर उठवाच त्याला.
म्हातारा : मला बोवा झोप येते आहे. ( मोठी वावटळ होऊन वाळलेली पाने गरगर गरगर फिरु लागतात. )
तरुण आंधळी : वाळलेली पाने वाजताहेत; ऐकले का ते तुम्ही ? कोणी तरी येत आहेसे आपल्याकडे !
दुसरा : वारा आहे तो. ऐका ! ऐका !
तिसरा : कोणी यायचे नाही आता.
म्हातारा : फार थंडी पडेल.
तरुण आंधळी : दुरुन कोणीसे तरी येतेसे ऐकायला येते आहे !
पहिला : वाळलेली पानेच तर मला ऐकू येताहेत !
तरुण आंधळी : फारच लांबून कोणी तरी येतेसे ऐकू येते आहे.
दुसरा : उत्तरेकडून वारा वाहतो आहे तो मला ऐकू येतो आहे.
तरुण आंधळी : मी सांगते तुम्हाला, कोणीतरी येत आहे आपल्याकडे !
म्हातारी : अगदी सावकाश कुणीतरी चालल्याचे ऐकू येते आहे.
म्हातारा : मला वाटते, बायका म्हणतात तेच बरोबर आहे
( बर्फाचे मोठमोठे तुकडे पडू लागतात. )
पहिला : अहाहाहा ! काय इतके गार पडते आहे माझ्या हातावर !
सहावा : बर्फ पडतो आहे.
पहिला : चला अगदी एकमेकांना चिकटून बसू आपण !
तरुण आंधळी : पण पावले वाजताहेत तिकडे लक्ष द्या आधी !
म्हातारी : देवाकरिता तरी क्षणभर गप्प बसा.
तरुण आंधळी : ते आणखी जवळ जवळ येताहेत. चांगले जवळ जवळ येताहेत आता तरी ऐका ! ( इथे मध्येच एकदम अंधारात वेडीचे मूल रडू लागते. )
म्हातारा : मूल रडायला लागले !
तरुण आंधळी : दिसते अहे ! दिसते आहे त्याला, रडतो आहे तेव्हा काही तरी दिसते आहे त्याला ! ( मुलाला कवटाळून घेऊन, जिकडून पावलांचा आवाज आल्यासारखा वाटतो आहे त्या बाजूला जाऊ लागते; इतर बायका घाबरुन जाऊन तिच्या पाठोपाठ जातात व तिच्याभोवती उभ्या राहतात. ) जाऊन पहातेच तिकडे काय आहे ते !
म्हातारा : सांभाळ हो !
तरुण आंधळी : आई ग ! काय रडतो आहे ह ! काय झाले बाळ ? रडू नकोस अं भिऊ नकोस; काही भिऊ नकोस ! आम्ही सगळ्याजणी तुजजवळच आहोत. काय दिसते आहे तुला ? अगदी भिऊ नकोस ! नको रडूस असे ! काय दिसते आहे काय तुला ? सांग आम्हाला काय दिसते आहे तुला ते ?
म्हातारी : पावले आणखी जवळ जवळ ऐकू येताहेत; ऐका ! ऐका !
म्हातारा : वाळलेल्या पानांमध्ये अंगातले कपडे वाजल्याचे ऐकू येत आहे.
सहावा : बाई आहे का ?
म्हातारा : पावलांचाच आवाज आहे का तो ?
पहिला : कदाचित् वाळलेल्या पानांवर समुद्राचे पाणी असेल ते.
तरुण आंधळी : नाही हो ! पावलेच आहेत ती ! पावलेच आहेत ! पावलेच आहेत ती !
म्हातारी : लवकरच कळेल आपल्याला; वाळलेल्या पानांकडे ऐका.
तरुण आंधळी : ती ऐकू येताहेत मला, अगदी आपल्या जवळ ऐकू येताहेत मला. ऐका ! ऐका ! ऐका ! काय दिसते आहे तुला ? दिसते आहे काय तुला ?
म्हातारी : कुणीकडे पहातो आहे तो ?
तरुण आंधळी : नेहमी पावलांकडे लक्ष असते, त्याचे पहा ! पहा मी बाजूला फिरवायचा अवकाश, पुन: पहाण्याकरता फिरलाच तो.... दिसते आहे ! दिसते आहे ! त्याला चमत्कारिक काही तरी दिसतेच आहे त्याला !
म्हातारी : ( पुढे होऊन ) आपल्यावर घे, म्हणजे दिसेल त्याला.
तरुण आंधळी : व्हा बाजूला ! व्हा बाजूला ! ( मुलाला सगळ्या आंधळ्यांवर उचलते ) पावले तर चांगली आपल्यामध्येच थांबली की !
म्हातारा : ही इथे आहेत ! इथे आपल्यामध्ये आहेत ही !
तरुण आंधळी : कोण आहात तुम्ही ?
( जिकडे तिकडे स्तब्ध )
म्हातारी : येऊ द्या आमची कीव.
( जिकडे तिकडे स्तब्ध होते. मूल आणखी मोठमोठ्याने रडू लागते. )