अंक तिसरा

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे


[ स्थळ : आबासाहेबांच्या वाड्यातील तीन खणी माडी. समोरच्या भिंतीला तीन खिडक्या आहेत. पण त्या बंद केलेल्या आहेत. खिडक्यांच्या वरच्या बाजूस साधारण वितभर अंतरावर तीन चौकोनी झरोके आहेत. उजव्या हाताकडील भिंतीला मधोमध एक दार असून, त्याच्याच पलीकडे अजमासे तीन फुट उंचीची लोखंडी गज बसविलेली एक जाळी आहे. दाराला कडी लावलेली असून, त्याला कुलूपही लावलेले आहे. डाव्या हाताकडील भिंतीला बंद केलेली दोन मोठी फडताळे असून, पलीकडे अगदी कोपर्‍यामध्ये मोठे दार आहे. फडताळामध्ये भिंतीला चिमणी बसविलेला व अंतकाळचे आचके देत बसलेला एक दिवा आहे. अलीकडील कोपर्‍यात दोरीने बांधलेली एक वळकटी उभी करुन ठेवलेली आहे. वरच्या बाजूस तुळ यांस ठोकलेल्या काठ्यांवर दोन धोतरे व लुगडी वाळत घातलेली आहेत. दिवा अगदी बारीक होतो, पुन: मोठा होतो, व चटकन विझून जातो. अंधारात दिसत तर काहीच नाही, पण दोन सुस्कारे मात्र ऐकू येतात. एक दोन मिनिटांनंतर दार उघडल्याचा आवाज ऐकू येतो. )

( अंधारात ) : अगबाई ! इथे तर अंधार !
( अंधारात ) : दिवा विझून गेला ?
( अंधारात ) : जा खाली जा लवकर ! चौकातला तो कंदील घेऊन ये.
( अंधारात ) : हा आलोच.
( क्षणभराने कोणीतरी चाचपडत असल्याचे ऐकू येते. )
( अंधारात ) अगबाई ! दाराला तर बाहेरुन कुलूप आहे. मालती - माले
( अंधारात ) : आई ! ( मोठ्याने हुंदका देऊन रडू लागते. )
( अंधारात ) ये बाळ ! नको रडूस.
( अंधारात ) आई ! आता मी कशी ग येऊ ? ( पुन: मोठमोठ्याने रडू लागते. इतक्यात विश्वनाथ हरिकेनचा कंदील घेऊन येतो व तो जाळीशी धरतो. लक्ष्मीबाई जाळीतून आत पाहू लागते. )
लक्ष्मीबाई : माले ! काय ग तुझी दशा झाली आहे ही !
मालती : ( आत अगदी कळवळून हुंदके देऊन रडते. )
लक्ष्मीबाई : का रे विश्वनाथ तुम्ही कोणीतरी जाऊन सोडवावे तर खरे.
विश्वनाथ : सांगितले ना बाईसाहेब, मी गेलो होतो, पण आबासाहेबांनी जर आतून दारच लावून घेतले होते, मी तरी काय करणार ?
लक्ष्मीबाई : पण मी म्हणते झाले काय एवढे ?
विश्वनाथ : काय सांगावे बाईसाहेब ! आठवण झाली की अजून अंगावर शहारे येतात. अहो कोणाला सांगितले तर खरेसुध्दा वाटायचे नाही इतके आबासाहेब संतापले होते.
लक्ष्मीबाई : असेच आहे ते. एकदा संतापले म्हणजे भारीच.
विश्वनाथ : छे छे ! काही विचारु नका. अक्कासाहेब जेव्हा म्हणाल्या की, जा जा, वर जाऊन काय गडबड आहे ती पाहून ये तेव्हा - मी हळूच जिना चढून वर गेलो आणि दाराच्या फटीतून जो पाहतो तो - काय सांगू बाईसाहेब ! वेताचे तडातड तडाखे बसत होते. ताईसाहेबांच्या अंगावर.
लक्ष्मीबाई : स्स देवा रे देवा !
मालती : ( पुन्हा रडू लागते )
विश्वनाथ : इकडे प्रभाकरपंतांच्या अंगावर तर सारखे ओरडत होते.
लक्ष्मीबाई : गरीब बिचारा.
मालती : ( अधिकच रडू लागते. )
विश्वनाथ : शेवटी प्रभाकरपंतांनी अगदी काळकुतीस येऊन सांगितले की मी काही मालूताईला फोटो  दिला नाही. त्यांनी तो भाऊसाहेबांजवळून घेतला असेल. मजजवळ त्यांनी कधीही मागितला नाही. पण काही नाही, " तू लबाड आहेस, विश्वासघात केलास. माझ्या पोरीला बिघडवलीस. चालता हो. पिस्तुल असता तर इथल्या इथे तुला गोळी घालून....
लक्ष्मीबाई : काय बाई तरी !
विश्वनाथ : असे म्हणून जे त्यांच्या अंगावर चवताळून गेले, तोच ताईसाहेबांनी जाऊन आबासाहेबांच्या पायाला विलखा घातला. मग काय ! पुन: मारायचा सपाटा.
लक्ष्मीबाई : बरे झाले बाई मी आज आले म्हणून, नाही तर -
विश्वनाथ : तर काय हो ! काही मारायचा सुमार. शेवटी प्रभाकरपंतांच्याने काही राहवेना, त्यांनी आबासाहेबांच्या पायावर डोके ठेवले आणि बिचारा रडू लागला हो. ( इतक्यात अंगात शर्ट व जाकिट घातलेले आबासाहेब आत येतात, तोच विश्वनाथ दचकून व घाबरुन दाराजवळ जाऊन उभा राहतो. )
आबासाहेब : ( रागावून ) कोण रडू लागला ?
विश्वनाथ : ( काही न बोलता खाली मान घालून उभा राहतो. )
आबासाहेब : काय रे विश्वनाथ ! कोण रडू - कोण लागला ? - शरम नाही वाटत ? चालता हो आताच्याआता घरातून ! फाजील माणूस चल नीघ ! उभा राहू नकोस ! ( लक्ष्मीबाई विश्वनाथास ’ जा ’ अशी हाताने खूण करते. विश्वनाथ जातो. इकडे आबासाहेब लक्ष्मीबाईकडे न पाहता पाकिटाच्या खिशातून किल्ल्या काढतात, व खोलीच्या दाराजवळ जाऊन कुलूप काढल्यावर दार उघडतात. )
आबासाहेब : चल ये बाहेर. ( थांबून ) माले ! आलीस का नाही ?
लक्ष्मीबाई : ये बाळ माले ! ( मालती धावत येऊन आईच्या गळ्याला घट्ट मिठी मारुन रडू लागते. लक्ष्मीबाई तिला पोटाशी धरुन आबासाहेबांकडे पाहू लागते. )
आबासाहेब : काय ग, अजून तरी नीट शुध्दीवर आली आहेस का ?
लक्ष्मीबाई : पण मी म्हणते, इतके पोरीवर संतापायला अन् मारायला काय झाले तरी काय ?
आबासाहेब : आणखी काय करायचे ! कसे चांगले स्थळ शोधून काढले, आणि ही म्हणते मला नाही त्याच्याशी लग्न करायचे, बेशरम कुठली !
लक्ष्मीबाई : म्हणून इतकी का हिला मारायचे ?
आबासाहेब : मारीन नाही तर जीव घेईन तिचा ! कधी सोडायचा नाही - भिकारडी पोर - असे स्थळ पुन: कधी मिळेल तरी का ? घरात माणसे नाही, काही नाहीत, बापाची इस्टेट किती उत्तम , मुलगा आय्. सी. एस्. आणखी काय पाहिजे ?
लक्ष्मीबाई : पण हिच्या मनातूनच जर नसेल -
आबासाहेब : अग पण ही कोण ? हिला काय त्याच्यात दगड समजते आहे ?
लक्ष्मीबाई : समजत नसेल, पण लग्न हिलाच करायचे आहे ना !
आबासाहेब : हिलाच करायचे म्हणजे ?
लक्ष्मीबाई : तसे नाही ! मी म्हणते, हिच्या मानानेच जर त्या माणसाबद्दल तिटकारा घेतला असेल, तर आपण जोर करुन काय होणार ? लग्न म्हणजे काही साधी गोष्ट नाही. जन्माच्या गाठी असतात. बरे आता ती काही लहान नाही; तेव्हा थोडे फार तिच्या मानानेच आपल्याला -
आबासाहेब : हो तर येवढ्याचसाठी तिला वाढविली आहे ! म्हणे तिच्या मनानेच आपल्याला घ्यायला पाहिजे. मोठी शहाणी की नाही ! असला इंग्रजी फाजिलपणा माझ्या इथे नाही चालायचा ! सांगून ठेवतो.
लक्ष्मीबाई : हे काय बोलणे ! तिला जर शिकवलेच आहे इंग्रजी, तर त्याला आता करायचे कसे ? तिला आपण वाढविली आहे खरी, मग असे करुन -
आबासाहेब : ते काही नाही ! हिला त्या आनंदरावाशीच लग्न करायला पाहिजे ! नाही तर माझ्याशी गाठ आहे ! चांगली फोडून काढीन ! काय ग माले ! बोल आताच्या आता -
लक्ष्मीबाई : पण इतकी घाई का ?
आबासाहेब : अग वेडी आहे ! चांगले स्थळ हातचे जाईल त्याची काय वाट ? म्हणे घाई का ! जसे काही माझ्याच सुखाकरता सगळे करतो आहे.
लक्ष्मीबाई : आता तिलाच जर ते स्थळ पसंत नाही -
आबासाहेब : काय झाले पसंत नसायला ! त्या आनंदरावाशी नाही लग्न करायचे, मग कोणाशी करायचे आहे ? त्या भिकारड्याशी ?
मालती : ( काही बोलत नाही )
आबासाहेब : पुन: नाव तर काढ त्या प्रभाकराचे ! की मरेपर्यंत -
लक्ष्मीबाई : काय ! आपल्या त्या प्रभाकराशी का तुझ्या मनातून - ?
मालती : ( लक्ष्मीबाईंच्या गळ्याला घट्ट मिठी मारुन रडू लागते. )
आबासाहेब : कुठला भिकारी पोर ! अन् त्याच्याशी ही लग्न करायला निघाली आहे ! लाज नाही वाटत ! ( थांबून ) कविता वाचता ! फोडून काढीन !
लक्ष्मीबाई : नसेल बिचारा इतका श्रीमंत. पण स्वभावाने तो किती चांगला आहे !
मालती : ( अधिकच रडू लागते. )
आबासाहेब : ( संतापून ) तू नको उगीच आता जास्त बोलूस ! तुला नाही त्यांच्यातले समजत ! लग्न म्हणजे काही पोरखेळ नाही आहे ! - माले ! बोल लवकर ! मी तर आताच्या आता जातो. आणि ठरवूनच टाकतो ! तुला माझे मुकाट्याने ऐकायचे आहे की, नाही बोल !
मालती : ( काही बोलत नाही. )
आबासाहेब : नाही माझे ऐकायचे ? ठीक आहे. ( लक्ष्मीबाईस ) चल बाहेर हो !
लक्ष्मीबाई : हे काय असे ?
आबासाहेब : आधी तू बाहेर हो ! मला आता उगीच -
मालती : ( आईच्या गळ्याला अगदी मिठी मारुन मोठमोठ्याने रडू लागते. )
आबासाहेब : ( मालतीस ) चल ! दूर हो ! ( मालतीस बाजूला करतो. ती रडत रडत आईकडे पाहू लागते. )
लक्ष्मीबाई : ( मालतीला आबासाहेबांच्या नकळत डाव्या हाताने खूण करते, व तिच्याकडे पहात दाराशी जाऊन उभी राहते. ) नको रडूस बाळ !
आबासाहेब : ( हातात कुलूप किल्ल्या घेऊन ) आता बाळ नाही अन् काही नाही ! आधी बाहेर हो ! ( लक्ष्मीबाई जाते. ) कसे ऐकत नाही ते पाहतो आता ! खबरदार ! तिला कोणी काही खाऊ घातले तर ! अक्काला म्हणावे आज खालीच नीज ! ( जातो व दार लावू लागतो. ) चल बाजूला हो - हात काढ ! मरु दे तिला इथे ! ( जोराने दार लागते. )
मालती : ( लागलेल्या दाराकडे पहात व स्फुंदत स्फुंदत ) मरु दे तिला इथे ! ( थांबून ) बरे तर ! ( कळवळून रडते, व थोड्या वेळाने पदराने डोळे पुसून कंदीलाकडे पाहू लागते. ) आता का उगीच उशीर ? ( असे म्हणून कंदील हातात घेते व फडताळाजवळ जाऊन ती उघडू लागते, पण ती उघडत नाहीत. फडताळांची खडखड दारे वाजवून ) मरायलासुध्दा ! ( रडू लागते, तोच तिची दृष्टी दोरीने बांधलेल्या वळकटीवर जाते. एकदोन मिनिटे वळकटीकडे पाहिल्यानंतर ) हो, असेच करावे. पण - ( क्षणभर थांबते, व कंदील घेऊन खोलीत जाते, व थोड्यावेळाने परत येऊन वळकटीची दोरी सोडू लागते - पण मध्येच थांबून शून्य दृष्टीने पाहू लागते. आईने खूण केली, - ( जोराने मान हलवून ) पण छे ! नाही व्हायचे ते ! ( रडत रडत ) आईला त्रास - आबांना त्रास - आणि त्यांनासुध्दा - प्रभाकर ( मोठ्याने रडू लागते. ) माझ्याशी लग्न करायची आपली योग्यता नाही, असे का बरे म्हणालात ! ( जोराने मान हलवून स्फुंदू लागते. ) प्रभाकर ! आपण पापणी वर करुन कधी मजकडे पाह्यलेसुध्दा नाही ! माझी योग्यता ( पुन: मोठमोठ्याने रडू लागते , व दोरी सोडून हातात घेते. ) देवा ! त्यांना सुखात ठेव ! पण छे - त्यांना कशाचे आता सुख ! जिकडेतिकडे उदास - भयाण वाटेल त्यांना ! ( रडत रडत दाराकडे पाहून ) आई ! मी जाते बरे आता - माझी आई ! ( मोठमोठ्याने रडू लागते. नंतर डोळे पुसून खोलीकडे पाहते. ) चला आता - गळफास घेऊन - ( दोन्ही हातामध्ये घट्ट दोरी धरुन व हातावर डोके ठेवून ) देवा ! प्रभाकराचे - आमचे जग खरे, की हे ( जोराने हुंदका देऊन ) आय्. सी. एस्. ( पुन्हा मोठ्याने रडू लागते व खोलीच्या दाराजवळ जाऊन लावलेल्या दाराकडे पाहत ) आई ! आबा ! मी जाते बरे ! आणि जन्मेच्या जन्मे जरी मला भटकावे लागले - तरी प्रभाकर - शेवटी मी आपली - ( असे म्हणून रडतरडत आत जाते. खोलीचे दार लावते; व आतून कडी लावलेली ऐकू येते. गजांच्या जाळीतून कंदीलाचा प्रकाश समोरच्या भिंतीवर पडलेला दिसतो. चार पाच मिनिटानंतर जिकडे तिकडे अंधार होऊन लहानशी घडवंची किंवा स्टूल असे काही तरी पडल्याचे ऐकू येते. झरोक्यातून वरचेवर आत येणार्‍या वार्‍याची चाललेली तडफड व खिडक्यांची खडखड बराच वेळ चालू राहते. नंतर जिकडे तिकडे अगदी शांत होते आहे, तोच दाराशी कोणीतरी खडबडत असल्याचे ऐकू येते. इतक्यात दार उघडून लक्ष्मीबाई उजव्या हाताने लहानसे शामदान व डाव्या हातात जेवणाचे ताट घेऊन आत येते. त्यांच्या पाठोपाठ विश्वनाथ आत येऊन पाण्याचा तांब्या ठेवून जाऊ लागतो. )
लक्ष्मीबाई : ( लक्ष्मीबाई ताट खाली ठेवते व डाव्या हातात शामदान घेऊन खोलीच्या दाराशी जाते व दार उघडू लागते. तो दचकते व घाबरुन इकडे तिकडे पाहू लागते. नंतर जाळीशी मेणबत्ती धरुन आत पाहू लागते, व लागलीच किंकाळी फोडते. हातातून शामदान खाली पडते व विझून जाते. झरोक्यातून किटसनच्या दिव्याचा प्रकाश दिसतो, व " राम बोलो - भाई राम " असे खोल घोगर्‍या आवाजात म्हटलेले शब्द ऐकू येतात. )

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP