शाक्तांस शिक्षा - ६२०१ ते ६२१०
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥६२०१॥
असों आतां ऐसा धंदा । तुज गोविंदा आठवूं ॥१॥
रक्षिता तूं होसी जरी । तरि काय येरीं करावें ॥२॥
काया वाचा मन पायीं । राहे ठायीं करुं तें ॥३॥
तुका म्हणे गाइन गीतीं । रुप चित्तीं धरुनियां ॥४॥
॥६२०२॥
नाहीं आम्ही विष्णुदास । करीत आस कोणाची ॥१॥
कांहे नष्ट करिती निंदा । नेणों सदा आमुची ॥२॥
असों भलते ठायीं मनें । समाधानें आपुलिया ॥३॥
तुका म्हणे करुं देवा । तुझी सेवा धंदा तो ॥४॥
॥६२०३॥
मागें संतीं होतें जें जें सांगितलें । तें येऊं लागलें अनुभवा ॥१॥
आचारभ्रष्ट होती लोक कळी । पुण्य क्षीण बळी झालें पाप ॥२॥
वर्ण धर्म कोणी न धरी विटाळ । घालिती गोंधळ एके ठायीं ॥३॥
वेदाचे पाठक सेवितील मद्य । न देखती भेद विषयीं भांड ॥४॥
तुका म्हणे किती करावे फजित । तेचि छंद नित्य बहू होती ॥५॥
===========
ज्ञाति किंवा वर्णविचार.
================
॥६२०४॥
चारी वर्ण झाले जेथोनी निर्माण । तोहा नारायण बाप माझा ॥१॥
मुख तें ब्राह्मण बाहू क्षत्रिय जाण । त्दृदयापासोन वैश्य वर्ण ॥२॥
चरणींचा रहिवास असे त्या शूद्रासी । तेथें जळराशी भागिरथी ॥३॥
तुका ह्मणे ऐसें पाहावें पुराणीं । साक्ष आहे वाणी व्यासाची हे ॥४॥
॥६२०५॥
वेदविहित तुह्मी आइका हो कर्मे बोलतों तीं वर्मे संतांपुढें ॥१॥
चारी वर्ण झाले एकाचिये अंगीं । पापपुण्य भागीं विभागिलें ॥२॥
प्रथम पाउलीं पावविला पंथ । आदि मध्य अंत भेद नाहीं ॥३॥
आंबे बोरी वड बाभुळा चंदन । गुणागुणें भिन्न अग्नि एक ॥४॥
तुका ह्मणे मन उन्मन जों होय । तोंवरी हे सोय विधी पाळी ॥५॥
॥६२०६॥
ब्रह्मचारी धर्म घोकावें अक्षर । आश्रमीं विचार षटकर्मे ॥१॥
वानप्रस्थ तरी संयोगीं वियोग । संन्यास तो त्याग संकल्पाचा ॥२॥
परमहंस तरी जाणे सहज वर्म । तेथें याती धर्म कुळा नाहीं ॥३॥
बोले वर्म जो चाले या विरहित । जो जाणा पतित श्रुति बोले ॥४॥
तुका ह्मणे कांहीं नाहीं नेमाविण । मोकळा तो सीण दु:ख पावे ॥५॥
॥६२०७॥
ज्यासी आवडी हरिनामाची । तोची एक बहू शुची ॥१॥
जपतो हरिनाम बीज । तोची वर्णामाजी द्विज ॥२॥
तुका ह्मणे वर्णधर्म । अवघें आहे समब्रह्म ॥३॥
॥६२०८॥
जोडोनियां धन उत्तम वेव्हारें । उदास विचारें वेच करी ॥१॥
उत्तम चि गती तो एक पावेल । उत्तम भोगील जीव खाणी ॥२॥
परउपकारी नेणें परनिंदा । परस्त्रिया सदा बहिणी माया ॥३॥
भूतदया गाईपशूचें पालन । तान्हेल्या जीवन वनामाजी ॥४॥
शांतिरुपें नव्हे कोणाचा वाईट । वाढवी महत्व वडिलांचे ॥५॥
तुका ह्मणे हें चि आश्रमाचें फळ । परमपद बळ वैराग्याचें ॥६॥
॥६२०९॥
उत्तम त्या याति । देवा शरण अनन्यगति ॥।१॥
नाहीं दुजा ठाव । कांहीं उत्तम मध्यम भाव ॥२॥
उमतती ठसे । ब्रह्मप्राप्ति अंगीं दिसे ॥३॥
भाविक विश्वासी । तुका म्हणे नमन त्यांसी ॥४॥
॥६२१०॥
दुधाळ गाढवी जरी झाली पाहे । पावेल ते काय धेनुसरी ॥१॥
कागाचिया गळा पुष्पांचिया माळा । हंसाची तो कळा काय जाणे ॥२॥
मर्कटें अंघोळी लावियेले टिळे । ब्राह्मणाचे लीळे वर्तू नेणे ॥३॥
जरी तो ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट । तुका ह्मणे श्रेष्ठ तिहिं लोकीं ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : April 12, 2019
TOP