संकल्प
१) हे व्रत करणार्या व्यक्तीने आपले आचरण अतिशय शुध्द ठेवले पाहिजे.
२) स्त्री-पुरुष दोघांनाही हे व्रत करता येईल.
३) सर्वांचे कल्याण चिंतावे. द्वेष, मत्सर टाकून द्यावा.
४) ज्या दिवशी व्रत करावयाचे असेल त्या दिवशी एक वेळच जेवावे.
५) ज्या दिवशी व्रत करावयाचे असेल त्या दिवशी पहाटे उठून स्नान करावे. शक्य तो शुभ्र वस्त्रे परिधान करावीत. श्री जोगेश्वरी मातेचा फोटो समोर ठेवावा. नंतर धुतलेल्या पातळाची घडी पसरावी व त्यावर बसावे. डोळे मिटून घ्यावेत व मन एकाग्र करुन "श्रीजोगेश्वरी भगवती" या नवाक्षरी मंत्राचा ८१ वेळा (माळ घेऊन) जप करावा. (माळ घेऊन) या जपामुळे माया शक्तिचा आविष्कार मनात होऊन मनातील संशय व भीति नाहीशी होते. नंतर देवीची यथाविधी नेहमीप्रमाणे पूजा करावी. तिला मोठया भक्तीभावाने हळद्कुंकू वहावे. निरांजन ओवाळावे. सुवासिक उदबत्ती ओवाळावी व देवीच्या फोटोकडे २-३ वेळा स्थिर दृष्टीने पहावे. डोळे मिटून घ्यावेत व "मी तुझी उपासना करीत आहे. यश दे. संकटातून मुक्त कर." अशी मनःपूर्वक प्रार्थना करावी. नंतर नारळ फोडून तो प्रसाद म्हणून वाटावा. जोगेश्वरीच्या फोटोला ८१ फुले वहावीत. श्री जोगेश्वरीची कहाणी, महात्म्य वाचावे व आरती म्हणावी. असे वर्षभर करावे.
६) दर शुक्रवारी, मंगळवारी व नवरात्रात ९ दिवस देवीचे दर्शन घेतलेच पाहिजे.
७) महिन्यातून एखाद्या शुक्रवारी किंवा मंगळवारी ब्राह्मणास जेवू घालावे.
८) देवी व्रताचे उद्यापन करावयाचे असेल त्या दिवशी एका सवाष्णीस जेवू घालावे व तिला बारा हिरव्या बांगडया द्याव्यात. यथाशक्ति दक्षिणा, दान द्यावे.
९) दुसर्याकडूनही व्रत करुन घ्यावे. वर्षभर श्रध्देने हे व्रत केल्यास दुःख, दारिद्र्य नाहीसे होते. मनातील इच्छित हेतू साध्य होतात. संकटे नष्ट होऊन मनाला समाधान वाटू लागते. निपुत्रिकाला पुत्र होतो. असाध्य रोग बरे होतात. वधूला योग्य स्थळ मिळते. नोकरी धंद्यात, परिक्षेत यश मिळते. सर्व अनुकूल परिणाम जाणवू लागतात व मनाला शांति मिळते. जोगेश्वरी मातेचा नवाक्षरी मंत्र अत्यंत प्रभावी आहे. नऊ या आकडयात मांत्रिक सामर्थ्य आहे. हा सिध्द मंत्र आहे, श्रध्दा मात्र पाहिजे.