धनत्रयोदशीमागोमाग नरकचतुर्दशी हा दिवस ओघानेच येतो; या दिवशी सुगंधी उटणे, तेल लावून करावयाचे मंगल अभ्यंग स्नान पहाटे चंद्रोदयाच्या वेळी करायचे आहे. स्नानानंतर नित्य संध्यावंदन, गायत्री जप, देवपूजा, देवाला फराळाचा मिष्टान्न नैवेद्य समर्पण, दुपारी इष्टमित्रपरिवार, विद्वज्जनासह भोजनानंद लुटायचा आहे. पहाटे ब्राह्ममुहूर्तावर (पहाटे ४+५) दीपमाला (दीप+आवली=रांग) लावून दीपोत्सवाची बहार अनुभवावी, असा मंगलोत्सवी अत्यानंदाचा महोत्सव असतो. संपूर्ण वर्षातील अत्यानंदाचा हा क्षण एकट्यादुकट्याने नव्हे, तर इष्टमित्र बांधवजनांनी एकत्र यावे, आनंदीआनंद द्यावा आणि घ्यावा यासाठी हा सण आहे. नवी वस्त्रे स्वतः परिधान करण्याबरोबर किंवा अगोदर इतरांनाही लाडक्या लेकरांना वा आदरणीय वंदनीय ज्येष्ठांना साधा रुमाल असो वा भरजरी महावस्त्र; परंतु काही ना काही दीपावली उपहार (भेट) देऊन आनंद वाढवावा, हा या सणातील मुख्य उत्सवदिनाचा विशेष असावा. सर्व तणाव चिंता, दुःख, भीती यापासून सर्वांचीच मुक्तता आणि निखळ आनंद लाभावा यासाठी या दिवशी घरी अगर मंदिरात देवाची प्रार्थना करणे हा दिवाळीच्या फराळा आधीचा कार्यक्रम असावा.