मौजेची आरती मौजेचा देव ।
मौजेचेही भक्त करिती उत्सव मौजेचा येथें धरुनी दृढ भाव ॥
मौज तेथे प्रगटे श्रीसद्गुरुराव ॥ १ ॥
जय देव जय देव जय मौजरुपा ।
नाना मौजा करिसी केशवगुरुकृपा ॥ धृ. ॥
मौजेची आरती मौजेचे घृत ।
पंचप्राण उजळुनि लावियली ज्योत । जिकडे पहावे तिकडे मौज भरीत ।
सर्वांघटी भरला तो मौजनाथ ॥ २ ॥
मौजेची आरती मौजेचें गान ।
मौजेचें येथें जहालें कीर्तन ॥
मौजेवाचुनि न दिसे आणिक शिवदीन ।
मौज पहातां येथें भासे विघ्न ॥ ३ ॥