धर्मराजाचे विचार ऐकल्यावर श्रीकृष्णाने आपले मनोगत व्यक्त केले. तो म्हणाला --- युधिष्ठिरा तू समेटाचा प्रस्ताव कौरवांपुढे मांडला आहेस. पाच गावांवर संतुष्ट राहायला तयार आहेस. कदाचित् भिक्षावृत्तीने जगणेही तुला मान्य असेल. पण नीट विचार कर. क्षत्रियाचा हा धर्म असू शकेल काय ? युद्ध करुन शत्रूला धडा शिकविणे हाच क्षत्रियाचा धर्म विधात्याने सांगितला आहे. तू पराक्रमी असताना दीनाप्रमाणे त्यांच्यापुढे याचना का करतोस ? दुर्योधनाने तुमच्यावर किती अन्याय केला आहे. त्याची एक एक नीच कृत्यं आठव. कपटद्यूतात तुम्हांला फसविले, सम्राज्ञी द्रौपदीची विटंबना केली, वनवासाचे दुःख दिले. हे करताना त्या दुष्टाला शरम वाटली नाही. विषारी सर्पाला मारावे त्याप्रमाणे या स्वार्थी व दुराचारी शत्रूला युद्धात मारणेच योग्य होईल. एक राजा म्हणून तुझे खरे कर्तव्य तुला का दिसत नाही ? मी मार्ग काढला आहे. आपण शांतीसाठी होईल तेवढा प्रयत्न करु. मी स्वतः शिष्टाईसाठी कौरवनरेशाकडे जाईन. पण शम झाला नाही तर युद्ध हाच पर्याय आहे.
कृष्णाचे उत्तर
युधिष्ठिरा राजेपण अपुले ठेवी स्मरणात ॥धृ॥
धर्मनिष्ठ तू जन्मापासुन
जे ते देतिल युद्धावाचुन
मानशील तू, दुःखे विसरुन समाधान त्यात ॥१॥
युद्धावरती शत्रूचा भर
देतिल ना ते भूमी तिळभर
दूताचा तो निरोप राजा घेई ध्यानात ॥२॥
क्षत्रियजीवन अग्नीसम हे
अवमानासी कधी ना सहे
पदस्पर्श जो करितो त्याला जाळी निमिषात ॥३॥
कपटाने ज्या तुला जिंकले
कृष्णेला अवमानित केले
कसे म्हणावे बांधव यांना ? वैरि मूर्तिमंत ॥४॥
द्रोण, भीष्म ही त्यांची शक्ती
चारि दिशातुन सैन्य जमविती
युद्ध हवे त्या मजसी चिन्हे, धर्मा, दिसतात ॥५॥
कपटी लोभी क्रूर सुयोधन
तुमच्या घाताचे करि चिंतन
अशा विषारी सर्पाचा तू करावास अंत ॥६॥
दया नीति धर्मास्तव तुजला
देतिल ना ते राज्यांशाला
समेट करण्या तरि मी जाईन दोन्ही पक्षात ॥७॥
सिंह जगे का दीनपणाने ?
भूप जगे का कधि भिक्षेने ?
नृपती करितो रणात हिंसा, पातक ना त्याला ॥८॥
प्रमाद त्यांचे सभेत दाविन
मांडिन तुमचे सुयोग्य वर्तन
हितकर जे मज दिसते सांगिन तिथे भाषणात ॥९॥
अशुभ काळ मज समीप दिसतो
तरि शिष्टाई जाउन करितो
प्रयत्न फसता, शौर्याने करु शत्रूवरती मात ॥१०॥