पुजेच्या प्रांतीं अभ्यंग करी ॥
झडकरी उठे स्वामी येंई लवकरीं ॥
रत्न खचित आसन घातलें कुसरी ॥
तयावरी बैसे मोरया क्षण एक भरी ॥१॥
जयदेव जयदेव जय (श्री) मंगलमूर्ति ॥
आरति (भावार्थी) ओवाळूं तुज एक चित्तीं ॥जयदेव० ॥धृ०॥
पुष्पवासिक तेल आणिलें अपुर्व ॥
सर्वांगीं चर्चिन तुज मी सुंदर ॥
नाना परिमळ सहित उटणें तुजलावी ॥
यावें यावें मोरया उशीर तूं न लावी ॥जयदेव० ॥२॥
उष्णोदक देवा आणिलें तुजकारणें ॥
तयासीं उपमा काय देऊं मी नेणें ॥
आपुले हस्तें करुनि घालिन तुज वरी ॥
सनाथ करी मोरया येंई लवकरी ॥जयदेव० ॥३॥
ऐसी करुणा ऐकूनी आले गणपती ॥
समर्पिलें तयासीं अनुक्रमें एक चित्तीं ॥
आणुनि पीतांबर कासे कसिला ॥
तयाच्या प्रकाशें दिनकर लोपला ॥जयदेव० ॥४॥
कस्तुरी मळवट भाळीं रेखिला ॥
तयावरी मुक्ताफळाच्या अक्षता शोभल्या ॥
बावन चंदन कैसा अंगीं चर्चीला ॥
अनेक पुष्पांच्या (दुर्वांच्या) माळा शोभल्या ॥जयदेव० ॥५॥
आणुनि धूपदीप दाखविला भक्ता ॥
नैवेद्य समर्पिला तुज मंगलमूर्ती ॥
त्रयोदशगूणी तांबूल मूखीं शोभतो ॥
सुरंग रंगित दंत दिसतो सूरेख ॥जयदेव० ॥६॥
सूवर्ण दक्षिणा चरणीं (पायीं) ठेविली ॥
पंचप्राण करुनि तुज निरांजनी ॥
पुष्पांजली कैसी वाहिली तुजसीं ॥
पूजा मी करुं नेणे मज क्षमा करी ॥जय० ॥७॥
सुरेख मंचक कैसा घातला मंदिरीं ॥
तयावरी पासोडा शोभे कुसरी ॥
नाना पुष्प याती तयावरी शोभती ॥
तेथें (मोरया) निद्रा करी तूं मंगलमूर्ति ॥जयदेव० ॥८॥
ऐसें शेजेवरी पहुडले गणपती ॥
सिद्धि बुद्धि चरण संवाहन करिती ॥
भक्तासीं आज्ञा देतो गणपती ॥
आणिक वर्णूं नेणें मी अल्पमती ॥जयदेव० ॥९॥
ऐसी शेज तुझी न वर्णवे वाणी ॥
श्रमला शेष हा राहिला मौनी ॥
कृपा करी तूं दीना (दासा) लागूनी ॥
दास तुझा विनवितो ह्मणे चिंतामणी ॥जयदेव ॥१०॥