-
स्त्री. १ पुंजी ; ऐवज ; मालमत्ता ; पैसा ; डबोलें . त्याच्या जवळ बरीच माया आहे . २ वस्त्र इ० शिवतांना दोरा निसटूं नये म्हणून शिवणीच्या बाहेर सोडलेला वस्त्रादिकांचा भाग ; कोरी सोडलेली जागा , समास ( माचा विणतांना त्याच्या गाताचा , एका रेषेंत खिळे ठोकतांना लाकडाच्या फळीचा सोडलेला भाग इ० ). हा बरु केवळ कांड्याबरोबर कापूं नको , थोडी माया राख .
-
स्त्री. १ सृष्टि निर्माण करण्यास साधनीभूत अशी ईश्वरशक्ति . इंद्रो मायाभि ; पुरुरुप ईयते = इंद्र आपल्या मायेनें अनेक रुपें धारण करतो - ऋग्वे ६ . ४७ . १८ . - गीर २२१ . २ सृष्टिप्रपंच ; नामरुपात्मक जगत ; जग हें अमूर्त , नित्य , अद्वितीय अशा ब्रह्मतत्त्वापासून उत्पन्न झालें असतां तें द्रव्यमय व भिन्नस्थिति आहे अशी त्याच्या स्वरुपाची ऐंद्रजालिकता . पुराणांत मायेवर चेतनधर्मारोप करुन तिला स्त्री व ब्रह्मयाची सहधर्मचारिणी आणि चुकीनें सृष्टीची रचना व विस्तार मानिलें आहे . ३ कपट ; कृत्रिम गारुड ; ऐंद्रजाल ; मोह घालणारी ईश्वराची शक्ति . हे आदिपुरुषाची माया । - ज्ञा १ . २०३ . ४ अवस्तूच्या ठायीं वस्तुत्वबुद्धि ; मिथ्या कल्पना ; अवस्तूच्या ठिकाणीं वस्तुत्वाचा भास ; खोटा भ्रम . पैल जळ हे माया । - ज्ञा १३ . १०३० . तैसी हे जाण माया । - ज्ञा २ . १४० . ५ नाशवंत रुप . म्हणून विकारी किंवा नाशवंत नामरुपासच माया ही संज्ञा देऊन ... - गीर २१७ . ६ अविद्या ; अज्ञान . तैसा विश्वस्वप्नेंसी माया । नीद सांडूनि धनंजया । - ज्ञा १८ . ४०५ . ७ स्नेह ; प्रेम ; ममता . तेंवि करिल काय माय मायेतें ? - मोअनुशासन ४ . ३५ . ८ दया ; करुणा ; अनुकंपा . ९ भांग . [ सं . ] म्ह० माया वेडी ग फेडी = काम कितीहि किळसवाणें , नीच असो , तें करण्यास माया प्रवृत्त करते . ( वाप्र . )
-
०निवारणें मायेचें पटल घालविणें , दूर करणें . कृपादृष्टीनें पाहसी जया । तयाची माया निवारिसी ।
-
०सांखळणें अति प्रेम करणें ; अपुर्वाई करणें . मायेक गेल , सेवेक चुकलें -( गो . ) माया करायला दुसरीकडे गेलें पण त्यामुळें कर्तव्य चुकल्यें . मायेचें तोंड खालीं , निराळें माया , ममता ही वरपांगी , दिखाऊ नसून , ती प्रकट होण्यापेक्षां अप्रकट रहाण्यांतच विशेष आहे ; ममता नम्र असतें . मायेंत अटकणें , घोंटाळणें , पडणें , फसणें ; मायेनें गुंतणें , गोवणें , गुंडाळणें प्रपंचाच्या फेर्यांत सापडणें ; प्रवृत्तिमार्ग चालविणें . मायेन मगाळणें -( कु . ) द्रव , पाझर फुटणें . सामाशब्द -
Site Search
Input language: