|
न. सततत्त्व ; जगत्कारण ; सच्चिदानंदरुप वस्तु . बाह्यसृष्टीच्या बुडाशीं असणारें नित्य द्रव्य . - गीर २२१ . चार वेद . ( समासांत ) ब्राह्मण . ( ल . ) जातिभेद किंवा सोंवळेओवळें मोडल्यानें होणारा घोंटाळा ; भ्रष्टाकार . नवल ; गूढ ; अदभुत अथवा दुर्ज्ञेय गोष्ट . याचेच गाण्यांत तुम्हास काय ब्रह्म वाटलें आहे न कळे . ब्रह्मदेश . ( ल . ) विष्णु ; कृष्ण . ब्रह्मासहि गहिंवरवी महिवरवीरेंद्र पांडुची भार्या । - मोउद्योग ७ . ४४ . ईश्वर ; परमात्मा . [ सं . बृह = वाढणें ] ( वाप्र ) ०मिळणें सांपडणें हातीं लागणें प्राप्त होणें - क्रि . ( ल . ) पराकाष्ठेची आश्चर्यकारक , उत्कृष्ट गोष्ट सांपडणें , मिळणें . सामाशब्द - ०कटाह पु. जगत ; ब्रह्मांडरुप कढई तेथ ब्रह्मकटाह शतकूट । हो पाहत असे । - ज्ञा १ . १४७ . [ सं . ] ०कन्या स्त्री. सरस्वती . अहिल्या . [ सं . ] ०कपट कपाट - न . त्रासदायक , संतापजनक काम ; पेंच . पिच्छा न सोडणारें दुर्दैव . माझे पाठीसीं ब्रह्मकपाट लागलें . ०कर्म न. ब्राह्मणाचीं धार्मिक कर्तव्यें . [ सं . ] ०काष्ठ न. मांदार . गंडक्यादि शिळामूर्ती । कां कां दारु ब्रह्मकाष्ठव्यक्ती । - एभा २७ . ९९ . ०गांठ स्त्री. जानव्यास दिलेली गांठ ; पवित्र ग्रंथि . नेमानेम . ( ल ) घोंटाळा . न मोडणारा संबंध . [ सं ] ०गिरि पु. ज्यापासून गोदावरीचा उगम झाला तो नीलकूट पर्वत . [ सं . ] ०गिर्हा र्हो - पु ब्रह्मराक्षस . वेताळ खंडाळ लागला । ब्रह्मगिर्हो संचरला । - दा ३ . २ . २८ . ०गो ळ गोलक गोळक - पु . सृष्टि ; जगतः ब्रह्मांड . [ सं . ] ०ग्रह हो - पु . ( प्र . ) ब्रह्मगिरा - र्हाः ब्रह्मराक्षस . ( ल . ) वर्णसंकर ; अत्यंत घोटाळा . [ सं . ] ०घातक की - वि . ब्रह्महत्या करणारा . ( ल . ) व्रह्मद्वेषी . [ सं . ] ०घोंटाळा पु. आचारविचारांची अव्यवस्था ; फार गोंधळ . ०घोष पु. वेदघोष ; मोठ्यानें वेद म्हणणें . ब्रह्म मताचा ( जगदीश्वरवादाचा ) घोष . उपदेश [ स . ] ०घोळ पु. जातिभेद . शुद्धशुद्धता इ० च्या उपेक्षेनें झालेला घोंटाळा ; अव्यवस्था . त्या प्रयोजनांत सोंवळ्या - ओंवळ्याचा विचार राहिला नाहीं . सर्व ब्रह्मघोळ झाला . गोंधळ ; अव्यवस्था ( पुष्कळ माणसें एकदम बोलण्यापासून उत्पन्न झालेली ); पराकाष्ठेचा गोंधळ . ०घ्न वि. ब्रह्मघातक . [ सं . ] ०चर्य न. चार आश्रमांपैकीं पहिला , मुंजीपासून लग्नापर्यंतचा - ब्राह्मणाचा आश्रम स्त्रीसंग न करण्याचें व्रत ( आजन्म किंवा व्रतांगत्वेंकरुन ); एकपत्नीव्रत . [ सं . ] ०चर्यस्खलन न. स्त्रीसंगपरित्यागव्रताचा भंग ( मुख्यत्वें ब्राह्मणाचा ). ०चारी पु. मुंजीपासून लग्नाच्या कालापर्यंत सागितलेले नियम पाळणारा ब्राह्मण ; मुंज झालेला मुलगा ; बटु . स्त्रीसंगपरित्यागाचें व्रत आजन्म किंवा कांहीं कालपर्यंत करणारा ब्राह्मण . सोळा सहस्त्र गोपी भोगून ब्रह्मचारी . ( उप . ) पूर्ण रतिलंपट ; व्यभिचारी असूनहि अव्यभिचाराचा व पावित्र्याचा डौल करणारा . [ सं . ] ०चोटली स्त्री. फारच लहान अशी पेटी , दागिना , ताट , भांडें इ० . ०जन पु. ब्राह्मण . तेधवा रचिले ब्रह्मजन । तयां वेद दिधलें शासन । - ज्ञा १७ . ३३९ . ०जीवी पु. वेद शिकवून , आर्त्विज्य इ० करुन उपजीविका करणारा ब्राह्मण . [ सं . ] ०झांट० न. ( अश्लील ) शष्प या अर्थी क्वचित प्रयोग . - क्रिवि . काहीं देखील ; थोडेसेंहि ( क्रि० देणें ; मिळणें ; प्राप्त होणें इ० ). ०टाळी स्त्री. योगाचा एक प्रकार ; टाळींत ( डोक्याच्या वरच्या भागांत ) आत्मा नेणें . ( ल . ) रेंगाळणी ; दीर्घसूत्रीपणा . ( क्रि० देणें ; लावणें ; मांडणें ). ०तत्त्व न. आत्मतत्त्व ; तात्त्विक सत्य ; पदार्थमात्रांच्या सत्तेला आधारभूत असें ब्रह्म [ सं . ] ०ताल पु. एक ताल . यांत २८ मात्रा व १४ विभाग असतात . ०तेज न. सामान्य माणसाहून निराळें असें ब्राह्मणाच्या अंगचें तेज ; तेजस्विता . ब्राह्मणाच्या अंगचें विद्यादि सामर्थ्य . [ सं . ] ०दंड पु. प्रायश्चित , श्राद्ध , तीर्थविधि इ० कांच्या अधिकारार्थ ब्राह्मणास द्यावयाचें द्रव्य . [ सं . ] ०दंड डी - पुस्त्री . एक औषधी ; कांटेचुबक ; उंटकटारी ; अधःपुष्पी . ही पारदबंध करते . ०दत्त वि. ब्रह्मदेवानें दिलेलें . [ सं . ] ०दिन पु. ब्रह्मदेवाचा दिवस . वर्षप्रतिपदेच्या दिवशीं केलेलें गत व भावी मन्वादिकांचें श्रवण , अवलोकन , वर्षफळवाचन . [ सं . ] ०देव पु. ब्रह्मा ; त्रिमूर्तीपैकीं रजोगुणात्मक पहिला ; सृष्टिकर्ता . गांवच्या सोनार , सुतार , जिनगर इ० कांनीं बसविलेला व ब्राह्मण पुजारी असलेला ग्रामदेव ; ब्राह्मणदेव [ सं ] ०देव - क्रि . ( ल . ) ( कर . ) विवाहित होणें . होणें - क्रि . ( ल . ) ( कर . ) विवाहित होणें . ०द्रोह - पु . ब्राह्मणांचा द्वेष . [ सं . ] द्वेष - पु . ब्राह्मणांचा द्वेष . [ सं . ] ०द्रोही द्वेषी - वि . ब्राह्मणांचा द्वेष करणारा . [ सं . ] ०नंदन पुअव . ब्रह्मदेवाचे मानसपुत्र ( नारद - वसिष्ठादिक ). [ सं . ] ०नंदिनी स्त्री. ब्रह्मदेवाची कन्या ; सरस्वती ; अहल्या . तरी अहल्या ब्रह्मकन्यापूर्ण । गौतमाची निजपत्नी । - रावि ७ . १२९ [ सं . ] ०निर्वाण न. ब्रह्मांड लय होऊन त्याशीं एकरुप होणें ; मोक्ष . [ सं . ] ०निष्ठ वि. ब्रह्मचिंतनांत निमग्न झालेला . [ सं . ] ०पद पदवी - नस्त्री . ब्रह्मनिष्ठतेचा अधिकार ; पद ; पदवी ; अतिशय उच्च पद किंवा स्थान . ( क्रि० पावणें ; मिळणें ; प्राप्त होणें ). [ सं . ] ०पाश पु. ब्रह्मदेवाचा पाश ; एक पुरातन शस्त्र . [ सं . ] ०पिशाच पुरुष - नपु . ब्रह्मराक्षस . [ सं . ] ०पिसा वि. ब्रह्मराक्षसानें झडपलेला . ०पिसें न. ब्रह्मराक्षसानें झडपल्यामुळें उत्पन्न झालेलें वेड . ०पीडा स्त्री. ( ल . ) अतिशय पीडा देणारा , त्रासदायक , द्वाड मनुष्य ; अतिशय दुःख किंवा त्रास . ०पुरी स्त्री. बहुतेक ब्राह्मणांची वस्ती असलेला गांव ; विद्वान व तपोनिष्ठ ब्राह्मणांनीं वसलेली जागा , गल्ली , पेठ . [ सं . ] ०प्रलय पु. ब्रह्र्याच्या प्रत्येक शंभर वर्षांच्या अंतीं होणारा सर्व विश्वाचा विनाश . यांत ब्रह्मा सुद्धां नाश पावतो . ( ल . ) मोठा अनर्थ ; संकट . [ सं . ] ०प्राप्ति स्त्री. ब्रह्माची प्राप्ति ; ब्रह्मांत जीवात्म्याचा लय ; जीवास होणारा स्वस्वरुपसाक्षात्काररुप लाभ . [ सं . ] ०बंधु पु. भ्रष्ट व बहिष्कृत ब्राह्मण . [ सं . ] ०बळ न. ब्राह्मणाचें तेज . क्षात्रबळाहुनि शक्रा ! परम गुरु ब्रह्मबळ पहा नीट । - मोअश्व १ . ९१ . ०बिंदु पु. ( ल . ) वेदपठन करतांना उडालेली ब्राह्मणांची थुंकी . [ सं . ] ०बीज न. ब्राह्मणवीर्यापासून उत्पन्न झांलेला कोणीहि माणूस . [ सं . ] ०भाव पु. ब्रह्मस्थिति . परि अनुभविलिया ब्रह्मभाव । गंवसणी होऊनि । - ज्ञा ८ . २१० . [ सं . ] ०भावना स्त्री. सर्व चराचर ब्रह्म आहे असा ग्रह ; अद्वैतमताचा स्वीकार . [ सं . ] ०भुवन न. ब्रह्मदेवाचा सत्यलोक . ०भूत वि. अद्वैतानुभवसंपन्न एवं ब्रह्मभूत ही होऊनी । - यथादि ५ . १८ . ०यज्ञ पु. वेदाध्ययन . ऋषियज्ञ पहा . [ सं . ] ०योनि स्त्री. काशींतील एक खडकांतील लांब व अरुंद असें भोंक . या मधून प्रत्येक यात्रेकरुस जावें लागतें . जातांना जर तो मध्येंच अडकला तर तो पापी असें समजतात . तेथेंच रुद्रयोनि नावाचें एक दुसरें भोक आहे . [ सं . ] ०रंध्र न. ज्यांतून मृत्यूनंतर आत्मा निघून जातो असें टाळूवरील गुप्त छिद्र ; योगसामर्थ्यानें जेथून प्राण नेतां येतो असें मस्तकांतील गुप्त छिद्र ; दहावें इंद्रिय . आकळलेनि योगें । मध्यमामध्यमार्गे । अग्निस्थानौनि निगे । ब्रह्मरंध्रा । - ज्ञा ८ . ९४ . [ सं . ] ०रस पु. दैविक ज्ञानाचा आस्वाद ; वेदाभ्यासानें होणारा आनंद . ब्रह्मानंद . [ सं . ] ०रात्रि स्त्री. ब्रह्मदेवाची रात्र . ही देवांच्या सहस्त्र युगांबरोबर असते . [ सं . ] ०राक्षस पु. विद्वान पण अभिमानी ब्राह्मणाचें मरणोत्तर झालेलें पिशाच्च . सामान्यतः ब्राह्मणाचें पिशाच्च . [ सं . ] ०रेखा षा लिखित लेख - स्त्रीनपु . ब्रह्मदेवानें प्रत्येक प्राण्याच्या कपाळावर लिहिलेलें त्याचें नशीब ; दैव ; कधींहि न टळणारी गोष्ट . ( ल . ) खातरीचें व निश्चयाचें भाषण , वचन इ० माझें बोलणें हें ब्रह्मरेषा आहे . कधींहि खोटें होणार नाहीं . [ सं . ] ०र्षि पु. ब्राह्मण जातीचा ऋषि पुरातनकालीं हा शब्द त्यांच्या विख्यात पावित्र्यामुळें ब्राह्मणांस लावीत असत . ब्राह्मण असून ऋषि ; ब्राह्मणांतील सत्पुरुष . [ सं . ] ०लोक पु. ब्रह्म्याचा लोक ; सत्यलोक . [ सं . ] ०वर्च्चस वर्चस्व - न . वेदांच्या अभ्यासापासून व व्रतपालनापासून उत्पन्न होणारा पवित्रपणा ; तेज . ब्रह्मचर्यव्रत धरणें । ब्रह्मवर्चस्व चढे तेणें । - एभा १७ . ३३४ . ब्राह्मणाची श्रेष्ठता , वैलक्ष्यण्य . [ सं . ] ०विद वि. ब्रह्मज्ञानी ; ब्रह्मवेत्ता ( पुरुष ). ०विद्या स्त्री. आत्मज्ञान . [ सं . ] ०वीणा पु. विशिष्ट प्रकारची वीणा ; नारदाची महती वीणा . मस्तक . [ सं . ] ०वृत्ति स्त्री. ब्रह्माकार वृत्ति . ब्राह्मणाची उपजीविका . [ सं . ] ०वृंद पु. ब्राह्मणांची सभा , समुदाय . ( ल . ) धर्मशीलतेनें , विद्वत्तेनें श्रेष्ठ असलेला ब्राह्मण . [ सं . ] ०वेत्ता वित - वि . ब्रह्मज्ञानी . [ सं . ] ०शाप पु. ब्राह्मणाचा शाप . [ सं . ] ०शाला ळा - स्त्री . वेदशाळा . केली जैसी वदनीं । ब्रह्मशाळा । - ज्ञा १७ . २२२ . [ सं . ] ०संतर्पण न. ब्राह्मणभोजन . ०सदन न. ब्रह्मलोक . ०संपदा स्त्री. दैवी संपत्ति . ०सभा स्त्री. ब्रह्मदेवाची सभा . [ सं . ] संबंध , समंध , द पु . ब्रह्मराक्षस . ०संविति स्त्री. ब्रह्मज्ञान . [ सं . ] ०साम्राज्य न. विस्तृत , बलाढ्य अधिराज्य , अंमल ; सम्राटाची सत्ता . ०सायुज्य न. ब्रह्माशीं एकरुपता . [ सं . ] ०साक्षात्कार पु. ब्रह्माची प्राप्ति ; ब्रह्मदर्शन ; निर्गुण साक्षात्कार . [ सं . ] ०सुख न. ब्रह्माचें सुख ; ब्रह्मरस . [ सं . ] ०सुत पु. नारदऋषि . ०सूत्र न. ब्रह्मदेवानें नेमलेली व्यवस्था , मार्ग ; ईश्वरी नेमानेम . जानवें ; यज्ञोपवीत . ब्रह्मसूत्रेवीण ब्राह्मण । संन्यासी नव्हे दंडेवीण । - भारा , बाल १० . ६२ . लग्नाबद्दलचा ईश्वरी नेमानेम ; ब्रह्म्यानें ठरवून ठेवलेलें दैव . ब्रह्मसूत्र असेल तर त्या मुलीशीं ह्याचें लग्न होईल . ( लग्न ठरवितांना ) नवरानवरीची उंची मोजण्याचें सूत्र ; प्रमाणसूत्र . व्यासकृत वेदान्तसूत्रें . तो न पढो कां ब्रह्मसूत्र । - ज्ञा १७ . ८५ . [ सं . ] ०सूत्राची - स्त्री . दैवानें बांधलेली गांठ ; लग्नाविषयीं ब्रह्म्यानें ठरविलेला पूर्व संकेत . गांठ - स्त्री . दैवानें बांधलेली गांठ ; लग्नाविषयीं ब्रह्म्यानें ठरविलेला पूर्व संकेत . ०सृष्टि स्त्री. ब्रह्मदेवानें निर्मिलेलें जगत , याच्या उलट विश्वमित्र सृष्टि [ सं . ] ०स्थान न. ब्रह्मदेवाच्या उत्पत्तीची जागा . बेंबी . सहस्त्रदळकमळ ; ब्रह्मरंध्रचक्र . तया अनाहताचेनि मेघें । मग आकाश दुमदुमों लागे । तंव ब्रह्मस्थानींचे बेगें । फिटले सहजे । - ज्ञा ६ . २७९ . [ सं . ] ०स्व न. ब्राह्मणाची मालमत्ता . ब्राह्मणाचें घेतलेलें कर्ज . ( सामा . ) कर्ज . त्याचे कालक्षेप चालत नाहीं , कमी जाहल्यामुळें ब्रह्मस्वही वहुत जाहलें . - समारो १ . ३३ . [ सं . ] ह्रदय - न . एक नक्षत्रपुंज . [ सं . ] ०हत्या स्त्री. ब्राह्मणाचा वध ; व त्यामुळें लागलेलें पातक . ( ल . ) एकसारखें पाठीस लागलेलें दुर्दैव . [ सं . ] म्ह० हैक - फट म्हणतां ब्रह्महत्या = क्षुल्लक कारणानें , प्रसंगानें मोठाले अनर्थ उद्भवणें . ०हत्यारा वि. ज्यानें ब्राह्मण मारला आहे तो . [ सं . ] ०ज्ञान न. जगाचें कारण व आधार असलेल्या ब्रह्माचें ज्ञान . दैविक , अध्यात्मिक , विशुद्ध ज्ञान . ( ल . ) फुकट शहाणपणाच्या गोष्टी . [ सं . ] म्ह० लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडा पाषाण . ब्रह्मज्ञानी , ज्ञ - वि . ब्रह्म जाणणारा . लोकांस ब्रह्मज्ञान सांगणारा . [ सं . ] ब्रह्माकार - पु . जग आणि सर्व वस्तू ब्रह्मरुप आहेत असें मानणें . ब्रह्माकार - बुद्धि - दृष्टि - मन - वृत्ति . [ सं . ] ब्रह्माची गांठ - स्त्री . लग्नाविषयीं ब्रह्मदेवानें ठरविलेली योजना , नेमानेम . ब्रह्मांड - न . जग ; चवदा लोक ; विश्व . चतुर्दशभुवनें व सत्यलोक पहा . डोक्यावरील टाळू ; ब्रह्मरंध्र . ब्रह्मांडी बैसली गोळी । - ऐपो ८६ . वि. प्रचंड ; विस्तृत ; अमर्याद . ( समासांत ) ब्रह्मांड - नदी - पर्वत - पाषाण - वृक्ष - साप - हत्ती - काम - कारखाना - कारभार - पसारा - कर्ज - खर्च - संसार . [ सं . ] ब्रह्मांडांत न माणें , मावणें - क्रि . अतिशय असंख्य , मोठा , अफाट इ० असणें . ब्रह्मांडकटाह - पु . विश्व ; ब्रह्मांड . अंडकटाह पहा . [ सं . ] ब्रह्मांड गोलक , गोल - पु . विश्व . ब्रह्मगोल . [ सं . ] ब्रह्मांड मंडप - पु . ब्रह्मांडाचा मंडप , गोल ; विश्व . ब्रह्मांडमंडपा माझारीं । जिची प्रतिमा नाहीं दुसरी । ब्रह्मांडज्ञान - न . जगाचें ज्ञान ( मुख्यत्वें मानवी शरीराच्या अभ्यासापासून व ज्ञानापासून मिळालेलें ); पिंडज्ञान . [ सं . ] ब्रह्मानंद - पु . ब्रह्माचें सुख . ब्रह्माच्या ठिकाणीं लय झाला असतां होणारा आनंद . ( ल . ) अत्यानंद , परमानंद . त्याचे ग्रंथ पाहतां विशेष । ब्रह्मानंद उचंबळे । [ सं . ] ब्रह्मानंदी टाळी लागणें - क्रि . सच्चिदानंदरुपांत तल्लीन होणें . ब्रह्मासन - न . ब्रह्मचिंतन करण्यास योग्य असें शरीराचें आसन , ठेवणें , बसण्याची पद्धति . अष्टधिकारांपैकीं एक ; वर्तकीपणाचा हक्क . [ सं . ] ब्रह्मास्त्र - न . ब्रह्मदेवाचें शस्त्र ; त्याच्या मंत्रानें अभिमंत्रित केलेली काडी , बाण अथवा कोणतीहि वस्तु . नरकें ब्रह्मास्त्र सोडिलें जाण । तेंही गिळिलें अवलीळा । ब्राह्मणाचा शाप . [ सं . ] ब्रह्माहमस्मिबोध - पु . मी ब्रह्म आहें असा बोध . जें ब्रह्माहमस्मिबोधें सणाणें । - ज्ञा १५ . २५९ . [ सं . ] ब्रह्माक्षर - न . त्रयमूर्ति ईश्वराचें पवित्र आणि गूढ नांव . ओम पहा . [ सं . ] ब्रह्मिष्ट - वि . ब्रह्मचिंतनांत निमग्न झालेला . [ सं . ] ब्रह्मीभूत - वि . स्वतःब्रह्म झालेला ; ब्रह्माशीं एकरुप झालेला , मृत संन्यासी . [ सं . ] ब्रह्मोपदेश - पु . ब्रह्माचा निर्गुण ध्यानात्मक पूजेचा उपदेश . [ सं . ]
|