-
पु. १ धार्मिक विधियुक्त क्रिया , कर्मे ; परमेश्वरासंबंधीचे कर्तव्य ; ईश्वरोपासना ; परमेश्वरप्राप्तीची साधने ; परमेश्वरप्राप्तीचा मार्ग , पंथ . करितो धारण यास्तव धर्म म्हणावे प्रजांसि जो धरितो । - मोकर्ण ४१ . ८१ . २ मनुष्यप्राण्यास सदाचरणास लावणारे व परमेश्वरचिंतनाचा मार्ग दाखवून देणारे ख्रिश्चन , यहुदी , हिंदु , इस्लामी वगैरे पंथ . मुख्यमुख्य नीतितत्त्वांबद्दल सर्व धर्माची एकवाक्यता आहे . ३ शास्त्रांनी घालून दिलेले आचार , नियम ; पवित्र विधी , कर्तव्ये . पंचपुरुषार्थापैकी एक . दान ; परोपकारवृद्धीने जे कोणास कांही देणे , किंवा जे कांही दिले जाते ते ; दानधर्माची कृत्ये ; परोपकारबुद्धि . अंधळ्यापांगळ्यास धर्म करावा . महाराष्ट्रीयांपेक्षा गुजराथ्यांत धर्म अधिक . ५ सद्गुण ; शास्त्रोक्त वागल्याने अंगी येणारा नैतिक , धार्मिक गुण . कर्तव्यकर्म , नीति , नीतिधर्म किंवा सदाचरण यांसच धर्म असे म्हणतात . - गीर ६५ . ६ स्वाभाविक गुण ; गुणधर्म ; नैसर्गिक प्रवृत्ति . गाईने दूध देणे हा गाईचा धर्म आहे . पृथ्वीस वास येणे पृथ्वीचा धर्म . ७ कर्तव्यकर्म ; रुढी ; परंपरेने , शास्त्राने घालून दिलेला नियम . उदा० दान करणे हा गृहस्थ धर्म , न्यायदान हा राजाचा धर्म , सदाचार हा ब्राह्मणधर्म , धैर्य हा क्षत्रिय धर्म . याच अर्थाने पुढील समास येतात . पुत्रधर्म - बंधुधर्म - मित्रधर्म - शेजारधर्म इ० ८ कायदा . ९ यम . धर्म म्हणे साध्वि बहु श्रमलीस स्वाश्रमासि जा मागे । - मोविराट १३ . ६५ . १० पांडवांतील पहिला . की धर्मे श्वानू सरता । केला सर्वथा स्वर्गलोकी । - एभा १ . १०९ . ११ धर्माचरणाचे पुण्य . ये धर्मचि , पुत्र स्त्री कोष रथ तुरग करी न सांगाते । - मोभीष्म ११ . २६ . १२ ( शाप . ) गुणधर्म ; स्वाभाविक लक्षण . दोन किंवा अधिक पदार्थाचे एकमेकांवर कार्य घडून त्यांपासून जेव्हा असा नवा पदार्थ उत्पन्न होतो की त्याचे धर्म मूळ पदार्थाच्या धर्मापासून अगदी भिन्न असतात . तेव्हा त्या कार्यास रसायनकार्य असे म्हणतात . - रसापू १ . ( वाप्र . ) धर्म करतां कर्म उणे राहणे - पाठीस लागणे - दुसर्यावर उपकार करावयाला जावे तो आपल्यावरच कांहीतरी संकट ओढवणे . धर्म खुंटीस बांधणे - ( जनावराला ) उपाशी जखडून टाकणे ; ठाणावर बांधून ठेवणे . [ धर्मखुंटी ] धर्म जागो - उद्गा . ( विशिष्ट गोष्टीचा संबंध पुन्हां न घडावा अशाविषयी ) पुण्य उभे राहो . धर्म पंगु - ( कलियुगांत धर्म एका पायावर उभा आहे . त्याचे तीन पाय मागील तीन युगांत गेले . यावरुन ल . ) धर्म अतिशय दुबळा , अनाथ आहे या अर्थी . धर्माआड कुत्रे होणे - दानधर्माच्या आड येणार्याला म्हणतात . धर्माचा - १ धर्मासंबंधी ( पैसा , अन्न इ० ). १ मानलेला ; उसना ; खरा औरस नव्हे असा ( पुत्र , पिता , बहीण इ० ). ३ फुकट ; मोफत . धर्माची राहण्याला जागा दिली आहे . - पारिभौ २७ . धर्माची वाट बिघडणे - मोडणे - एखाद्या दानधर्माचा ओघ थांबणे , थांबविणे . धर्माचे पारी बसणे - १ दुसर्याचे पैसे खर्चीत रिकामटेकडे बसणे ; धर्मावर काळ कंठणे . २ सद्गुणांचे चांगले फळ मिळणे ; सदाचारामुळे चांगले दिवस येणे . ३ सदोदित दानधर्म करणे . धर्मकृत्ये आचरणे . धर्मावर लोटणे - टाकणे - सोडणे - एखाद्याच्या न्यायबुद्धीवर सोपविणे . धर्मावर सोमवार सोडणे - स्वतः झीज न सोसता परभारे होईल ते पाहणे . - संम्ह . धर्मास - क्रिवि . ( कंटाळल्यावरचा उद्गार ) कृपा करुन ; मेहेरबानीने ; माझे आई ! याअर्थी . माझे रुपये तूं देऊ नको पण तूं एथून धर्मास जा ! मी काम करतो , तूं धर्मास नीज . धर्मास भिऊन - चालणे - वागणे - वर्तणे - करणे - धर्माप्रमाणे वागणे . धर्मास येणे - उचित दिसणे ; पसंतीस येणे ; मान्य होणे . मी तुला सांगायचे ते सांगितले आतां तुझे धर्मास येईल ते कर . म्ह ० १ धर्मावर सोमवार =( दानधर्म करणे ). कांही तरी सबबीवर , लांबणीवर टाकणे . - मोल . २ धर्माचे गायी आणि दांत कांगे नाही . ३ आज मरा आणि उद्यां धर्म करा . ४ धर्मादारी आणि मारामारी . ५ धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायाम = धर्माचे रहस्य गुहेमध्ये ठेवलेले असते . ( गूढ . किंवा अज्ञेय असते ). धर्माचे खरे तत्त्व गहन , अगम्य आहे . ६ धर्मस्य त्वरिता गतिः = धर्मास विलंब लावू नये या अर्थी . सामाशब्द -
-
०आई माता स्त्री . ( ख्रि . ) कांही चर्चेसमध्ये लहान मुलांचा बाप्तिस्मा होतो तेव्हां त्यांस ख्रिस्तीधर्मास अनुसरुन वळण व शिक्षण देण्यांत यावे म्हणून त्यांच्या मातेहून भिन्न अशी जी स्त्री आपणावर जबाबदारी घेते ती . ( इं . ) गॉडमदर . प्रत्येक मुलीला एक धर्मबाप व दोन धर्म आया पाहिजेत . - साप्रा ९० .
-
धर्म करतां कर्म उभें राहणें-पाठीस लागणें-दुसर्यावर उपकार करावयाला जावें तों आपल्यावरच कांहीं तरी संकट ओढवणें.
-
०कर्ता पु. १ धर्म करणारा ; परोपकारी माणूस . २ न्यायाधीश ; जज्ज . ३ ( दक्षिण हिंदुस्थान ) देवळाचा व्यवस्थापक , कारभारी .
Site Search
Input language: