|
न. १ सुदैव ; कल्याण ; अभ्युद्य ; ऐश्वर्य ; सुखकारक स्थिति . २ ( ज्यो . ) अनुकूलता ; कृपादृष्टि ; कल्याणकारकता ( तिथि , युति वगैरेची ). ३ हितकारकता ; लाभदायकता ( एखाद्या वचनाची अथवा दिग्दर्शक गोष्टीची ) . - पु . ( ज्यो . ) सत्तावीस योगांपैकी तेविसावा योग . - वि . १ मंगलदायक ; लाभदायक ; सुखकारक ; चांगले ; सुदैवी ; सुपरिणामी ( कृत्य , विधि , शकून , चिन्ह , योग ). २ मंगल ; उत्सवरूपी ; समारंभाचे ( विधि , प्रसंग , संस्कार वगैरे ). याच्या उलट अमंगल ; अशुभ , श्राद्ध ; पुण्यतिथि , वगैरेसंबंधी . ३ सामान्यतः चांगले ; बरें ; हवेसें . अशुभस्य कालहरणं शुभस्य शीघ्रम् । [ सं . शुभ् = शोभणें , प्रकाशणे ] म्ह० - शुभ बोल रे नार्या , मांडवास आग लागली . ०कर , शुभंकर - वि . शुभदायक ; मंगलकारक ; हितकर ; सुखकर . ०कर्म कार्य - न . मंगल समारंभ ; उत्सव ; कल्याणकारक संस्कार , विधि वगैरे ( उदा० लग्न , चौल , मुंज वगैरे ). ०कृत्य न. १ ( शब्दशः ) चांगले कार्य ; मंगलकार्य . २ ( सांकेतिक ) मैथून . ०गा स्त्री. एक प्रकारची लगाम . - अश्वप १ . १८५ . ०ग्रह पु. कल्याणकारक , सुखकारक ग्रह ; बुध , शुक्र व गुरु . ०चिंतक वि. चांगली इच्छा करणारा ; चांगले चिंतणारा ; बरें होईल अशी इच्छा करणारा . ०चिंतन न. चांगले होवो अशी इच्छा ; कल्याण ; इच्छिणे . ०चिन्ह , लक्षण - न . मंगलप्रद , कल्याणकारक खूण , शकून , दिग्दर्शक गोष्ट . घोडयाची कांही शुभ चिन्हे - खुंटेगाड , देवमण , पंचकल्य़ाण , रणशूर , श्यामकर्ण , गोम ( सुलटी , शिरोमुखी ), बाशिंग , गंगापाठ , कैरे , डोळे , जयमंगळ , कंठाभरण , कुशावर्त , सप्तदंती , बाहालकांचन , बदकमुख , पर्वती , चिंतामणी , मेखलामुख , अष्टमंगळ , ह्यकंठी , अधोमुखी गोम इत्यादि . शिलावर्त , पोटावर्त इ० ही अर्धवट अथवा मध्यम गुणकारी व इतर अशुभ चिन्हे असतात ती अशुभ चिन्हे या शब्दांत दिली आहेत . ०वर्तमान न. १ चांगली बातमी ; सुवार्ता ; मंगलवार्ता ; संदेश . २ ( ख्रि .) मॅथ्यु , मार्क , ल्यूक व जॉन यांनी लिहिलेले नव्या कराराचे भाग . ०वार्ता स्त्री. मंगलदायक , कल्याणकारक , सुखकारक बातमी , वर्तमान , हकीकत . ०वेळ वेळा - स्त्री . मंगलदायक वेळ ; दिवसांतील कांही विशिष्ट अनुकूल काल . वेळ पहा . शुभा - स्त्री . १ पार्वतीचे नांव २ गोंवर या रोगास म्हणतात . ३ ( सांकेतिक अशुभ सूचना टाळण्याकरितां ) गोंवर्या , शेणी यांस म्हणतात . बळे शुभा धबाबिती । कित्येक ढेंकळें भिती । - बसवकृत महाबळभट चरित्र १६ . शुभा वेंचोनि देशील मातें । तरी पानगे करून भक्षूं येथे । - भवि ५३ . ७९ . शुभानांवें विकती शेणी । - निगा २८१ . येका शुभा येकवटती । - दा ६ . ९ . ७ . शुभांगी - स्त्री . सुंदर स्त्री ; रूपवती स्त्री . शुभाचार - पु . शुद्ध , पवित्र आचरण , वागणूक . शुभाचारें होती नारी । - गुच ११ . ८ . शुभानना - स्त्री . सुंदरी ; रूपवती , देखणी स्त्री . शुभावेळ - स्त्री . शुभवेळ पहा . शुभाशुभ - वि . ( शुभ + अशुभ ) बरेवाईट ; मंगल व अमंगल ; ऐश्वर्य अथवा दारिद्रय ; पापपुण्यात्मक . तैसी शुभाशुभ कर्मे । जिये निफजती प्रकृति धर्में । - ज्ञा ३ . १७८ . शुभासन - न . मंगलकारक आसन , बैठक , जागा ; सुंदर बैठक ; शकुनाची जागा . शुभासनी रुक्मिणी बैसलीसे । - सारुह ८ . ६२ . शुभेच्छा - स्त्री . ज्ञानी जीवाच्या सप्तभूमिकांतील पहिली भूमिका , ही मुळे अनुताप होऊन साधनचतुष्टसंपन्नता येऊन गुरुपदेशपात्रता येते ; चांगली मंगलदायक इच्छा .
|